अजातशत्रू शाहू
( भाग - २५ )
लेखन ::संजय क्षीरसागर
स.
१७४० मध्ये बाजीरावाचा मृत्यू झाला त्यावेळी रघुजी भोसले व फत्तेसिंग
शाहूच्या आज्ञेने कर्नाटकांत मोहिमेवर होते. रघुजीने या स्वारीत बाजीरावास
जे जमले नाही ते करून दाखवले. अर्काटच्या नवाबाचा रघुजीने पराभव केला.
अर्काटकरांची बाजू घेण्यास फ्रेंच वळवळ करू लागले तर त्यांनाही रघुजीने
तराटणी देऊन गप्प बसवले. तसेच त्रिचनापल्ली सारखे प्राचीन वैभवाचे स्थळ
देखील रघुजीने आपल्या ताब्यात घेऊन तेथील मुस्लिम सत्ताधीश चंदासाहेब यास
कैद करून साताऱ्यास पाठवून दिले. त्रिचनापल्ली घेतल्यावर रघुजी पुढील बेत
आखणार इतक्यांत बाजीराव मरण पावल्याची बातमी आल्यामुळे त्याने मोहीम
आटोपती घेतली. त्रिचनापल्ली त्याने मुराराव घोरापड्याच्या ताब्यात देऊन
त्याने फत्तेसिंगसोबत परतीची वाट धरली. चिटणीस बखरीचा दाखला घेतला असता
असे दिसून येते कि, फत्तेसिंगाचे रघुजीसोबत साताऱ्यास परत येणे शाहूला
आवडले नाही. त्याच्या मते फत्तेसिंगाने स्वतः त्रिचनापल्ली येथे राहायला
हवे होते. त्यातच मुराराव घोरपड्याच्या ताब्यात त्रिचनापल्लीसारखे ठिकाण
दिल्याने शाहूच्या नाराजीत भर पडली. कारण, शाहूच्या आज्ञेने जरी मुराराव
कर्नाटकातील मोहिमांमध्ये सहभागी होत असला तरी तो काही शाहूचा अधिकृत
सरदार नव्हता. त्यामुळे शाहूची नाराजी स्वाभाविक होती. असे असले तरी,
रघुजीसमोर तरी दुसरा पर्याय काय होता ? एव्हाना त्यास फत्तेसिंगाची
कर्तबगारी समजून चुकली होती. त्याला एकट्याला मागे ठेवण्यात काही अर्थ
नव्हता. म्हणूनच त्याने मुरारावास जवळ करून कर्नाटकातून माघार घेतली.
No comments:
Post a Comment