विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 14 October 2023

!!... छत्रपती राजाराम महाराज ....!!!












!!... छत्रपती राजाराम महाराज ....!!!
स्वराज्यचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज यांचा स्मृतीदिन ३ मार्च १७०० मध्ये महाराजांचे किल्ले सिंहगड येथे देहावसान झाले.
छत्रपती संभाजी महाराज कैदेत पडल्याची बातमी कळताच रायगडावर कोलाहल मजला व हि बातमी म्हणजे रायगडावर व मराठा साम्राज्यावर पडलेला मोठा आघात होता. मराठा साम्राज्यातील सर्वच प्रमुख मंडळींची अवस्था हि भांबवल्यासरखी झाली होती.
त्या वेळी राजकुटुंबातील महत्वाच्या व्यक्ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या धर्मपत्नी सकवारबाई साहेब, छत्रपती संभाजी महाराज यांच्या पत्नी महाराणी येसूबाई साहेब या गडावर होत्या. परंतु बदललेल्या राजकीय परिस्थिती मुळे सर्व जबाबदारी हि महाराणी येसूबाई साहेब यांच्यावर पडली होती. या वेळी चांगोजी काटकर हा रायगडाचा किल्लेदार होता व छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचे विश्वासू येसाजी कंक तसेच रामचंद्रपंत अमात्य, प्रल्हाद निराजी व इतर प्रमुख मंडळी हे सुद्धा रायगडी होते. अशा या अस्मानी संकटाच्या वेळी सर्व मराठ्यांचे नीतीधौर्य हे महाराणी येसूबाईसाहेब यांनी उंचाविले.
छत्रपती संभाजी महाराज हे कैदेत पडल्याने व त्यांची सुटका हि अशक्यप्राय झाल्याने रिकाम्या झालेल्या राजसिंहासनावर वारस बसविणे हे क्रमप्राप्त झाले होते. छत्रपती संभाजी यांचे पुत्र शाहूमहाराज हे अवघे ७ वर्षाचे होते व राजाराम महाराज हे १८-१९ वर्षांचे होते. अशा समयी महाराणी येसूबाईसाहेब यांच्या समोर दोनच पर्याय होते ते म्हणजे आपला पुत्र म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांचे पुत्र शाहू महाराज यांना वारस घोषित करून "छत्रपती" बनविणे व सर्व राजसत्ता आपल्या ताब्यात घेणे व दुसरा पर्याय म्हणजे राजाराम महाराज यांना वारस घोषित करून त्यांना मराठा साम्राज्याचे "छत्रपती" बनविणे व राज्यकारभाराची सूत्रे हि प्रमुख अष्टप्रधानांच्या हाती सोपविणे.
अशा वेळी दुसऱ्या कोणत्याही स्त्री ने आपल्या पोटच्या मुलाचाच सर्वप्रथम विचार केला असता परंतु अशा कठीण व गंभीर परिस्थिती मध्ये महाराणी येसूबाईसाहेब यांनी आपल्या स्वतःच्या मुलाच्या ऐवजी आपल्या दिरास म्हणजे राजाराम महाराज यांचे दिनांक ९ फेब्रुवारी १६८९ रोजी राज्याभिषेक न करता मंचकरोहन केले. कारण राज्याभिषेक हा निवांत व वैभवाने करण्याचा समारंभ होय. त्यावेळच्या परिस्थिती नुसार राजाराम महाराज यांना मंचकरोहन करून सर्व कारभार त्यांच्या हाती सोपविला गेला.
अशा गंभीर व संकटकालीन कठीण परिस्थिती मध्ये सुद्धा महाराणी येसूबाईसाहेब यांनी संपूर्ण मराठा साम्राज्याच्या पुढे एक निस्वार्थीपणाचा व आपल्या संकट समई धीरोदत्त वागण्याचा आदर्श निर्माण केला.
यामुळे समस्थ मराठा साम्राज्य धीरोदत्तपणे व एकदिलाने औरंगजेबाच्या विरुद्ध ठामपणे लढण्यास सज्ज झाले.
छत्रपती राजाराम महाराज यांच्या मंचकरोहनानंतर महाराणी येसूबाईसाहेब यांच्या पुढाकाराने झालेल्या मसलतीत ठरल्या प्रमाणे राजाराम महाराज यांनी शूर सरदारांच्या बरोबर रायगडावरून बाहेर पडावे व मोगलांशी संघर्ष चालू ठेवावा. या वेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तालमीत तयार झालेली एक पिढी अद्यापही अस्तित्वात होती त्यात प्रामुख्याने प्रल्हाद निराजी, संताजी घोरपडे, धनाजी जाधव, मानाजी मोरे, बहिर्जी घोरपडे, बंकी गायकवाड, रुपाजी भोसले, विठोजी चव्हाण, मालोजी घोरपडे, जनार्दनपंत हणमंते हि मंडळी त्यावेळी मसलतीसाठी रायगडावर उपस्थित होती.
रायगडावर ठरलेल्या मसलतीप्रमाणे राजाराम महाराज यांनी रायगडाचा व्यवस्तीत बंदोबस्त करून आपल्या दोन्ही राण्याच्या बरोबर तसेच प्रल्हाद निराजी, संताजी घोरपडे, धनाजी जाधव व इतर प्रमुख सरदारांच्या बरोबर गुप्तपणे रायगड सोडला. राजाराम महाराज हे रायगड सोडून थेट प्रतापगडावर दाखल झाले. परंतु हे रायगडला वेढा घालून बसलेल्या जुल्फिकारखान यांच्या लक्षात आले व त्याने फतेहजंग खान यास राजाराम महाराजांच्या पाठलागावर पाठवले. प्रतापगडावर दाखल होताच राजाराम महाराज यांनी स्वराज्याची सूत्रे आपल्या हातात घेतली व सर्व सरदार व इतर लोकांना दिलासा व धीर देण्यास प्रारंभ केला व आपल्या सरदारांना व लष्कराला शत्रू मुलखात धामधूम उडवून गडकोट हस्तगत करण्यास सांगितले.
या वेळी पाठलागावर आलेल्या फतेहजंग खान याने प्रतापगडाच्या पायथ्याशी पार या गावी छावणी केली. या वेळी फतेहजंग खान याच्या तुकडीचे नेतृत्व काकरखान हा करत होता. या मोगल तुकडी बरोबर छत्रपती राजाराम महाराज यांची पहिली लढाई लढले तशी हि लढाई मराठ्यांच्या इतिहासात अज्ञातच राहिली (या लढाईवर अभिषेकदादा कुंभार यांनी फेसबुक वर सविस्तर पोस्ट टाकली आहे).
यानंतर राजाराम महाराज यांनी प्रतापगडावरून वासोट्या किल्ल्या कडे प्रयाण केले. या दरम्यान महाराजांचा पाठलाग मोगल सैन्य करत होते. वासोट्यावर जास्त काळ न थांबता सातारच्या किल्ल्यावर आले व तिथे हि जास्त काळ न थांबता ते पन्हाळागडावर गेले (ऑगस्ट १६८९). मोगल सैन्य इथेही पाठलागकरत पोहोचले त्याच वेळी इतर काही किल्ल्यांना देखील मोगल फौजेणे वेढे घातले होते. याच दरम्यान संताजी घोरपडे व धनाजी जाधव यांच्या नेतृत्वाखाली भीमपराक्रम केला. तुळापूर मुक्कामी असणाऱ्या बादशहाच्या डेर्याचे सोन्याचे कळस घेऊन सिंहगड मुक्कामी गेले. या घटनेमुळे मराठा सैन्याचे नितिधोर्य उंचावले गेले व स्वतः औरंगजेब या घटनेने धास्तावला गेला. या नंतरच छत्रपती राजाराम महाराज यांनी संताजी घोरपडे यांना "ममलकतमदार" हा किताब दिला.
मराठ्यांची जी खरी शक्ती म्हणजे गडकोट त्यांची संख्या कमी होत होती. कारण मोगल सैन्याचा पूर्ण प्रतिकार मराठा सैन्य थोपवू शकत नव्हते. अशा परिस्थिती मध्ये एका किल्ल्यावर जास्त काळ वास्तव्य करणे धोक्याचे होते म्हणून प्राप्त परिस्थितीचा विचार करून कर्नाटक प्रांती असणाऱ्या जिंजी किल्ल्यावर आश्रयास जाणे राजाराम महाराज व त्यांच्या सहकाऱ्यांनी निवडला कारण या एका गोष्टी मुळे अनेक गोष्टी साध्य करता येणार होत्या. पहिली गोष्ट म्हणजे संपूर्ण राजकुटुंबास एकाच वेळी कैद करून मराठ्यांची दक्षिणेतली सत्ता नष्ट करणे या बादशहाच्या महत्वकांक्षेस शह देता येणार होता व दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मराठा साम्राज्याची राजधानी जिंजी किल्ल्यावर स्थापन केल्यास औरंगजेबाच्या मोगल सैन्यास दोन आघाड्यांवर मराठयांच्या सैन्याबरोबर संघर्ष करावा लागणार होता. तिसरी गोष्ट म्हणजे महाराष्ट्रातील व दक्षिणेतील भागातील अनेक गडकोट मोगलांनी जिंकली होती ती सांभाळून ठेवण्यासाठी मोगल सैन्याचा खूप मोठा भाग गुंतून राहणार होता त्याच वेळी मराठा सैन्य मोठया प्रमाणात रिकाम्या होत्या या सैन्याला एकत्र करून त्याचे नियंत्रण संताजी व धनाजी यांनी करून त्यांनी नाशिक ते जिंजी च्या प्रदेशात धामधूम उडवू शकणार होते व चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे राजाराम महाराज यांनी दक्षिणेतील नायक पाळेगार यांच्या मदतीने मोगल सैन्याच्या विरुद्ध संयुक्त आघाडी उभारू शकणार होते .
जिंजीला जाण्याअगोदर राजाराम महाराज यांनी महाराष्ट्रातील कारभाराची जबाबदारी हि रामचंद्रपंत, संताजी घोरपडे, धनाजी जाधव शंकराजी नारायण यांच्या हाती सोपवला. अशा परिस्थिती मध्ये २६ सप्टें १६८९ रोजी मध्यरात्रीच्या वेळी वेषांतर करून राजाराम महाराज व त्यांच्या सहकार्यानी जिंजी कडे प्रयाण केले. या वेळी महाराजांच्या बरोबर मानसिंग मोरे, प्रल्हाद निराजी, *बंकी गायकवाड* , मानसिंग मोरे, रुपाजी भोसले, कान्होजी आंग्रे, तिमाजी हनुमंते, बाजी कदम, गिरजोजी यादव,खंडोजी दाभाडे, कृष्णाजी अनंत, खंडो बल्लाळ व इतर मराठा सरदार हि मंडळी होती. ज्यावेळी राजाराम महाराज यांनी बेद्नूर राणीच्या प्रदेशात प्रवेश केला त्यावेळी महाराजांच्या बरोबर जवळपास ३०० मातब्बर सरदार होते असे मोगल इतिहासकार साकी मुस्तैदखान याने लिहून ठेवले आहे.
बेदनूर च्या राणीने देखील राजाराम महाराज यांना त्यांच्या प्रवासात मदत केली व त्यांच्या प्रवासाची चोख व्यवस्था ठेवली . मराठ्यांना मदत करणे म्हणजे आपला राजधर्म आहे असे बदनूरच्या राणीने मानले होते. तुंगभद्रा नदीकाठी शिमोगा येथे मोगलांनी राजाराम महाराजांच्या छावणीवर छापा घातला परंतु राजाराम महाराज व इतर सरदार शिताफीने निसटले. निसटण्या पूर्वी शत्रूला ओळखपटू नाही म्हणून आपल्या राजवस्त्रांचा त्याग केला. या वेळी महाराज सुखरूप बाहेर पडावेत म्हणून रुपाजी भोसले, येकोजी, बहिर्जी, मानाजी घोरपडे यांनी प्रयत्नाची शर्थ केली परंतु महाराज निसटल्या नंतर शत्रुसैन्यापुढे निरुपाय होऊन ते कैदेत पडले. या घटनेबद्दल केशव पंडित व साकी मुस्तैदखान यांनी सविस्तर लिहले आहे. राजाराम महाराज व त्यांच्या बरोबरच्या सहकाऱ्यांनी पुढचा प्रवास यात्रेकरू, व्यापारी, कापडी अशी वेगवेगळी वेषांतरे करून चालू ठेवला व बंगलूर पर्यत सुखरूप पोहचले. बेंगलोर मुक्कामी असताना देखील महाराजांच्यावर आणखी एक संकट ओढवले होते परंतु त्यातूनही महाराज सुखरूप निसटून चंदीला पोहोचले. चंदीहून महाराज अंबुर या ठिकाणी पोहचले हे ठाणे मराठ्यांच्या ताब्यात होते व येथे बाजी काकडे नावाचे सरदार ठाणेदार होते त्यांनी राजाराम महाराज यांचा यथोचित स्वागत केले इथपासून राजाराम महाराज गुप्तप्रवास संपला व ते उघडपणे मराठा सैन्या सह पुढच्या प्रवासाला निघाले. येथून महाराज वेलोरला गेले. वेलोर सुद्धा मराठ्यांच्याच ताब्यात होते. महाराजांना पन्हाळाकिल्ला ते वेल्लोर या प्रवासाला ३३ दिवस लागले २८ ऑगस्ट १६८९ रोजी महाराज वेल्लोरच्या किल्ल्यात पोहचले होते. व अखेरीस नोव्हें १६८९ मध्ये राजाराम महाराज जिंजी किल्ल्यावर सुखरूप पोहचले.
नोव्हें १६८९ च्या पहिल्या आठवड्यात राजाराम महाराज जिंजी इथे पोहचतात त्यावेळी जिंजी व परिसराचा कारभार छत्रपती शिवाजी महाराज यांची कन्या अबिकाबाईसाहेब (हरजीराजे महाडिक यांच्या पत्नी. हरजीराजे त्यावेळी हयात नव्हते त्यांचे काही महिने अगोदर निधन झाले होते) या बघत होत्या. त्यांनी आपल्या बंधूंचें म्हणजे छत्रपती राजाराम महाराज यांचे यथोचित स्वागत गडावर केले. राजाराम महाराज जिंजी मध्ये पोहचताच त्यांनी राज्यकारभाराची विस्कळीत झालेली घडी व्यवस्तीत बसविण्यास सुरवात केली. जिंजीत तख्त स्थापन करून राजाराम महाराज यांनी आपले नवे अष्टप्रधान मंडळ नेमले -
निळोपंत पिंगळे - पंतप्रधान (पेशवे)
रामचंद्रपंत - हुकूमत-पन्हा (अमात्य)
संताजी घोरपडे - सेनापती
जनार्दनपंत हणमंते - अमात्य
महादजी गदाधर - सुमंत
शंकराजी नारायण - सचिव
रामचंद्र त्रिंबक - मंत्री
श्रीकराचार्य - पंडितराव
व या व्यवस्थेत छत्रपती राजाराम महाराज यांनी एक नवीन पद निर्माण केले व त्यास "पंतप्रतिनिधी" असे नाव दिले व या पदावर प्रल्हाद निराजी यांची नेमणूक केली व त्यांना कारभाराचे प्रमुख केले. तसेच मोठ्या सरदारांच्यावर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या. यात प्रामुख्याने धनाजी जाधव, *बंकी गायकवाड*, बाजी कदम, खंडो बल्लाळ हि मंडळी होती. या राजमंडळाच्या साहाय्याने छत्रपती राजाराम महाराजांनी आपल्या राज्यकारभरास सुरवात केली. कर्नाटकातील वेगवेगळ्या ठाण्यांवर, किल्ल्यांवर विश्वासातील माणसांच्या नेमणुका केल्या.
याच वेळी इकडे महाराष्ट्रात पन्हाळगड घेण्यासाठी शेख निजाम उर्फ मुकर्रबखान हा आला होता त्यावेळी एक मोठी लढाई पन्हाळगडाच्या इथे झाली व यात संभाजी महाराजांना कैद करणारा शेख निजाम उर्फ मुकर्रबखान याला संताजी व धनाजी यांनी हरवले.
हे सगळे चालू असताना संभाजी महाराजांच्या दुर्दैवी हत्येनंतर नंतर रायगड जवळपास ८ ते ९ महिने लढता ठेवला गेला होता. अखेर ३ नोव्हें १६८९ रोजी महाराणी येसूबाईसाहेब, *महाराणी सकवरबाईसाहेब (छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पत्नी व गाईकवाड घराण्याची लेक)*, शाहू महाराज यांच्या सह रायगड मोगलांच्या स्वाधीन झाला. छत्रपती संभाजी महाराजांचा कुटुंबकबिला हा महाराणी सकवारबाई साहेब यांच्या बरोबर औरंगजेबाच्या कैदेत असताना महाराणी येसूबाईसाहेब व छत्रपती राजाराम महाराज यांच्यात गुप्तपणे निरोप देवाणघेवाण करण्याचे महत्वाचे काम he *बंकी गाईकवाड* यांनी केले.
जिंजीत राजधानी स्थापन केल्या नंतर छत्रपती राजाराम महाराज यांच्या समोर खरी अडचण होती ती पैशांची. राज्यकारभार करण्यासाठी फौजफाट, सैन्य उभारण्यासाठी पैसा हवा होता. खजिना भरून काढण्यासाठी छत्रपती राजाराम महाराज यांनी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या. याचाच एक भाग म्हणजे मद्रास किनारपट्टीवर असलेल्या इंग्रज, पोर्तोगीज, फ्रेंच यांनी आपल्या वाखारींच्या ठिकाणी परवानगी न घेता बांधलेल्या बांधकामाबद्दल दंड म्हणून रक्कम बसवली गेली.
"छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेले मराठयांचे राज्य बुडालेले नाही व बुडत नाही" हे पाहून रयत व सर्व सरदार, वतनदार यांच्यात विश्वास निर्माण झाला. त्याच वेळी जे मराठा सरदार मोगलांची चाकरी करत होते ते सुद्धा परत स्वराज्यात चाकरी साठी माघारी येऊ लागले त्यात नेमाजी शिंदे, माणकोजी पांढरे, नागोजी माने हि मंडळी होती. या मंडळींना महाराजांनी वतने दिली. या घडामोडीच्या मुळे महाराष्ट्रातील सरदार मंडळी मोगलांच्या ताब्यात गेलेले गडकोट परत घेण्याचे प्रयत्न सुरु झाले हे प्रयत्न कोल्हापूर सातारा भागापूरते न राहता ते बादशहाच्या इतर मूलखांवर म्हणजे औरंगाबाद, सोलापूर या भागात सुद्धा सुरु झाले. सगळीकडे पुन्हा स्वराज्यासाठी जिंकू किंवा मरू असे वातावरण परत तयार झाले याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे सर्जाखान याचा पाडाव तसेच संताजी, धनाजी यांनी सातारा व खटाव परिसरात मोगलांजी उडवलेली धांदल असो किंवा परत स्वराज्यात घेतलेले राजगड, प्रतापगड, रोहिडा असो. या सर्व मोहिमांचे वैशिष्ट्य म्हणजे सर्वांची एकवाक्यता, मोहिमांचे उत्कृष्ट नियोजन, गुप्त हालचाली व शत्रूस हुलकावणी देऊन त्यास गोत्यात आणण्याचे हुकमी पान म्हणजे गनिमी काव्याचा अतिसुंदर वापर होय.
छत्रपती राजाराम यांच्या मुळे एकूणच दक्षिणेतील राजकारणाचे रंगच बदलले. मोगल फौजांना जर कोणी विरोध करतील तर ते फक्त मराठे हि भावना दक्षिणेत निर्माण झाली व त्यास कारण ठरेल ते छत्रपती राजाराम महाराज यांनी जिंजीमधून उद्घोशीत केलेली ध्येयधोरणे होत. जिंजी मध्ये आल्यावर प्रथम राजाराम महाराजांनी जाहीर केले होते की मोगलांनी जिंकलेली विजापूर व गोवळकोंडा हि दोन राज्ये दक्षिणेतील हिंदू राजांना एकत्र करून पुन्हा जिंकून घेन्याचा इरादा मराठ्यांनाचा आहे. कारण औरंगजेबाने दक्षिणेत साम्राज्य विस्तारासाठी केलेला संघर्ष हा केवळ लष्करी नव्हता तर त्याला धार्मिक सुद्धा बनवले होते जिंकलेल्या प्रदेशातील जनतेला तो काफिर समजून जाचक असा जिझिया कर लावत असे. या मुळे दक्षिणेत एक वेगळी भावना निर्माण झाली होती व या परिस्थितीचा अचूक वेध घेऊन दक्षिणेतील नायक व पाळेगारांची एक आघाडी मोघलांच्या विरुद्ध स्थापन केली.
मोगलांनी जिंजीला घातलेला वेढा हा प्रदीर्घ असा होता व यात मुगल सरदार जुल्फिकारखान व असदखान यांना दारुण पराभव पत्करावा लागला व राजाराम महाराजांन बरोबर वाटाघाटी कराव्या लागल्या. याच वेळी मराठ्यांचे आरमार हे कोकण किनाऱ्यावर संचार करत होते. फेब्रुवारी १६९५ मध्ये मराठा आरमार हे तापी नदीच्या मुखापर्यंत येऊन गेले व त्यांनी शत्रूची अनेक गलबते ताब्यात घेतली या बद्दलची नोंद सुरतकर इंग्रजांच्या पात्रात आहे ही नोंद खूप महत्त्वाची आहे कारण राजाराम महाराजांच्या काळात मराठा आरमाराचे खूप कमी संदर्भ मिळतात. या कालखंडात मराठ्यांचे आरमार हे कारवार गोव्यापासून गुजरात पर्यंत मुक्त संचार करत होते.
२२ फेब्रुवारी १६९८ रोजी छत्रपती राजाराम महाराज आपल्या परिवारासह परत महाराष्ट्रात विशालगडास सुखरूप पोहचतात. येथून १० एप्रिल १६९८ रोजी महाराज उत्तर कोकणच्या मोहिमेवर जातात. तेथून महाराज प्रतापगडावर जातात व परत तेथून ते विशाळगडावर परतात. जुलै च्या शेवटच्या आठवड्यात महाराज परिवारासह सातारच्या किल्ल्यात मुक्कामी येतात. या दरम्यान म्हणजे १६९८ - ९९ दरम्यान महाराज स्वराज्यात एकसारखे फिरत होते याच दरम्यान ते एकदा कर्नाटकप्रांती गेल्याची देखील नोंद आहे. म्हणजे महाराजांनी महाराष्ट्रात आल्या पासून उत्तर कोकण मोहीम, दक्षिण कोकण मोहीम, उत्तर कर्नाटक मोहीम, शेवटी खानदेश वऱ्हाडची मोहीम अशा चार मोठ्या मोहिमा त्यांनी १६९८-९९ च्या काळात केल्या. या दरम्यान सातारा भागात मराठे व मोगलांच्यात अनेक लढाया झाल्या. हि धावपळ चालू असताना महाराज फेब्रुवारी १७०० च्या अखेरीस सिंहागाडी मुक्कामी येतात. या सगळ्या धावपळीचा त्रास होऊन छत्रपती राजाराम महाराज हे आजारी पडतात व ३ मार्च १७०० रोजी महाराजांचे दुःखद निधन होते.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे दिल्ली जिकण्याचे स्वप्न होते त्याची अंमलबजावणी करण्याचे कार्य छत्रपती राजाराम महाराज यांनी केले. कारण छत्रपती राजाराम महाराजांच्या शेवटच्या काळात मराठ्यांनी सर्व दक्षिण आपल्या घोड्यांच्या टापाखाली घेऊन नर्मदा पार केली जी मोगल साम्राज्याच्या हृदयस्थानी वार केल्या सारखी घटना होती व १६९९ मध्ये कृष्णा सावंत या मराठा सरदाराने नर्मदा पार करून माळव्यात धडक मारली. व पुढे ताराबाईच्या काळात माळवा भागात मराठ्यांच्या स्वाऱ्या सुरु झाल्या.
मराठ्यांच्या उत्तराभिमुख धोरणाची, दिल्ली पादक्रांत करण्याच्या धोरणाची अंमलबजावणी हि राजाराम महाराजांच्या कार्यकाळात सुरु झाली व याचे फलित ४० वर्षांनी मराठ्यांनी माळवा जिकुंन व अटकेपार झेंडा फडकावून सिद्ध केले.
!!!...छत्रपती राजाराम महाराज यांना विनम्र अभिवादन व मानाचा त्रिवार मुजरा ...!!!
संकलन - संतोषराजे गायकवाड
संदर्भ-
१) मराठे व औरंगजेब
२) मोगल - मराठा संघर्ष
३) शिवपुत्र छत्रपती राजाराम
४) मराठ्यांचे स्वातंत्रयुद्ध
५) थोरले राजाराम महाराज यांचे चरित्र
६) ताराबाईकालीन कागदपत्रे
७) राजारामचरितम
८) शिवचारित्रप्रदीप
९) मराठ्यांच्या इतिहासाची साधने
१०) Martin's Memories
११) History of Aurangzeb
फोटो :
१) छत्रपती राजाराम महाराज
२) छत्रपती राजाराम महाराज यांची राजमुद्रा
३) छत्रपती राजाराम महाराज यांची सिंहगडावरची समाधी
४) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नित्य पूजेतील चंद्रशेखर बाण छत्रपती राजाराम महाराज यांच्या नित्य पूजेत सुद्धा होता.
५) छत्रपती राजाराम महाराज यांची अस्सल सनद

 

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...