विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 12 October 2023

अजातशत्रू शाहू ( भाग - ११ )

 


अजातशत्रू शाहू
( भाग - ११ )
लेखन ::संजय क्षीरसागर
औरंगजेबाच्या छावणीवर हल्ला चढवून त्याच्या तंबूवरील सोन्याचे कळस कापण्याचे कार्य संताजी घोरपडेच्या साथीने विठोजी चव्हाणाने पार पाडले. स. १६९९ मध्ये कर्नाटकांत मोहिमेवर असताना विठोजी लढाईत मारला गेला. त्याचा मुलगा उदाजी यास बापाचे पद व जहागीर मिळाली. शाहू व ताराबाई यांच्या झगड्यात त्याने नेहमीच ताराबाईचा व पुढे संभाजीचा पुरस्कार केला. स. १७६२ मध्ये एका लढाईत उदाजी मरण पावला पण शाहू हयात असे पर्यंत त्याने शाहूच्या मुलखावर वारंवार हल्ले चढवून त्यास त्रस्त केले. उदाजी पराक्रमी असला तरी तो मनापासून कोल्हापूरकारांशी एकनिष्ठ असल्याने शाहूच्या उद्योगास त्याचे पाठबळ लाभले नाही. शाहूने कित्येकदा त्याच्यावर मोहिमा आखल्या, त्यास पराभूत करून कैद देखील केले पण उदाजी काही त्यास बधला नाही. उदाजीला कायमचे कैद करणे व ठार करणे वा त्यास अनुकूल करून घेणे हे तीनच पर्याय शाहूपुढे होते. पण त्याने यातील कोणताच पर्याय न निवडल्याने उदाजी चव्हाणाच्या शौर्याचा मराठी राज्यास कसलाही फायदा न होता हा मोहरा वाया गेला. कमीत कमी त्याने उदाजीला कायमचे कैदेत टाकून ठेवले असते तर इतर बंडखोर सरदारांना थोडा तरी आळा बसला असता. उलट उदाजीला वारंवार कैद करून सोडून देण्याच्या वृत्तीमुळे इतरांना दहशत अशी कधीच बसली नाही. परिणामी पेशवाई संपेपर्यंत या बंडखोर सरदारांचा सातारच्या राज्यास नेहमीच उपद्रव होत राहिला. गुणग्राहक म्हणून प्रसिद्ध असलेल्या शाहूच्या कीर्तीला लागलेले हे एक मोठे वैगुण्यच मानले पाहिजे.
छ. शिवाजी महाराजांच्या जावयाचा -- महादजी निंबाळकराचा वंशज -- रंभाजी निंबाळकर हा मोगलांच्या तर्फेने पुणे प्रांतावर नियुक्त होता. या रंभाजीस आपल्या बाजूला ओढून घेण्याची शाहूने बरीच खटपट केली पण रंभाजी मोगलांशीच एकनिष्ठ राहिल्याने स. १७१६ मध्ये खंडेराव दाभाड्याच्या करवी शाहूने त्यास पुण्यातून पळवून लावले.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...