विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 12 October 2023

अजातशत्रू शाहू ( भाग - ५ )

 


अजातशत्रू शाहू
( भाग - ५ )
लेखन ::संजय क्षीरसागर
खेडच्या लढाईनंतर शाहूने प्रचंडगड, राजगड, चंदन वंदन वगैरे किल्ले ताब्यात घेऊन साताऱ्यास ओरचे लावून १७०८ च्या जानेवारी आरंभी सातारचा किल्ला ताब्यात घेतला. केवळ दोन - तीन महिन्यात शाहूने जे लागोपाठ विजय मावळले त्यामुळे ताराबाईची बाजू काहीशी खचू लागली होती. कारण, मिळणाऱ्या प्रत्येक विजयासोबत ताराबाईला सोडून शाहूकडे जाणाऱ्या मराठी सरदारांची संख्या वाढू लागली होती. स. १७०८ च्या जानेवारीतच शाहूने स्वतःस राज्याभिषेक करून अष्टप्रधानांची नियुक्ती केली.
त्यानंतर ताराबाईच्या बंदोबस्ताचे कार्य त्याने हाती घेतले. वस्तुतः, ताराबाईला कैद करण्याच्या उद्देशानेच शाहूने साताऱ्यावर हल्ला चढवला होता पण शाहू येण्यापूर्वीच ताराबाई पन्हाळ्याकडे सटकली होती. तेव्हा आता पन्हाळ्यावर स्वारी करणे शाहूस भाग होते. तत्पूर्वी नैतिक उपचारांचा एक भाग म्हणून वारणा नदीच्या दक्षिणेकडील भाग ताराबाई व तिच्या पुत्रास देण्याची तोड शाहूने काढली. मात्र ताराबाई अशा तुकड्यांवर संतुष्ट राहणाऱ्यांमधील नाही हे तो जाणून होता. त्याच्या अपेक्षेप्रमाणे ताराबाईने शाहूची सूचना धुडकावून लावली व फेब्रु. १७०८ मध्ये शाहूच्या फौजा कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाल्या. याचवेळी सातारच्या आसपास व पुण्यात आपला अंमल प्रस्थापित करण्याचा शाहूचा प्रयत्न चालला होता. यासाठी मोगलांशी लढणे त्यास भाग होते. थोरात, दाभाडे, बाळाजी विश्वनाथ, पवार, निंबाळकर इ. मंडळी त्यासाठी प्रयत्नशील होती.
शाहूची कोल्हापूर मोहीम बऱ्यापैकी यशस्वी झाली. वसंतगड, पावनगड, पन्हाळा, विशाळगड इ. किल्ले ताब्यात घेऊन रांगणा किल्ला जिंकण्यासाठी शाहू पुढे सरकला. त्यावेळी ताराबाईचा मुक्काम रांगण्यावर होता. शाहू रांगणा घेण्यासाठी पुढे येत असल्याचे पाहून ताराबाईने रांगणा लढवण्याची जबाबदारी रामचंद्रपंत अमात्यावर सोपवली व ती मालवणला निघून गेली. इकडे शाहू कोल्हापूर मोहिमेत मग्न होता त्याच सुमारास म्हणजे स. १७०८ च्या जुलै महिन्यात त्याचा सेनापती धनाजी जाधव हा मरण पावला. जाधवाच्या मृत्यूने शाहू खचला किंवा त्याची बाजू दुबळी झाली असे म्हणणे चुकीचे ठरेल. कारण धनाजीच्या तोडीचे कित्येक पराक्रमी सरदार शाहूच्या पदरी होते. धनाजीच्या निधनानंतर शाहूने सेनापतीपद धनाजीचा मुलगा चंद्रसेन यास दिले.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...