अजातशत्रू शाहू
( भाग - १८ )
लेखन ::संजय क्षीरसागर
मोगल
बादशाहाने जरी शाहूला छ. शिवाजी महाराज निर्मित स्वराज्याचा वारस म्हणून
मान्यता दिली असली तरी स्वराज्याचे खरे मालक आपणचं हि भावना जशी ताराबाईची
होती तशीच संभाजीची देखील होती. संभाजीची मनःस्थिती चंद्रसेन जाधव
पूर्णतः ओळखून होता. ताराबाई कैदेत जाण्यापूर्वी किंवा कोल्हापुरच्या
गादीवर संभाजी आल्यावर केव्हातरी चंद्रसेन निजामाच्या चाकरीत दाखल झाला
होता. परंतु, असे असले तरी कोल्हापुरकरांशी त्याचा स्नेहसंबंध होताच.
जाधवाच्या सल्ल्याने निजामाने संभाजीला शाहूविरोधात चिथावणी दिली. शाहू
विरोधात लढण्याची संभाजीची तयारी होताच स. १७२६ मध्ये निजामाने कर्नाटक
प्रांती जाण्याची हूल उठवून शाहूला कर्नाटकात सैन्य पाठवण्यास भाग पाडले.
स. १७२६ अखेरीस शाहूच्या फौजा कर्नाटकात जाताच निजाम व संभाजी उघडपणे
शाहूच्या विरोधात चालून आले. वास्तविक, संभाजी असा काहीतरी आततायीपणा करेल
म्हणून स. १७२५ अखेर शाहूने त्याच्यासोबत एक तह केला होता. त्यानुसार
दोघांच्या फौजा जो काही मोगलांचा प्रांत आपल्या ताब्यात घेतील त्यात
उभयतांची निम्मी निम्मी वाटणी असणार होती. उदाहरणार्थ, जर संभाजीने
दक्षिणेतील मोगलांचा मुलुख जिंकला तर त्यातील अर्धा त्याने शाहूला द्यायचा
आणि शाहुने माळवा, गुजराथ इ. प्रांतात संभाजीला अर्धा वाटा द्यायचा असे
ठरले. संभाजीला तर असा निम्मा वाटणीचा व्यवहार मुळातचं नको होता. परंतु,
याचवेळी निजामासोबत चाललेले कारस्थान फळास न आल्याने त्याने वरवर तहास
मान्यता दर्शवली. इकडे निजामाने शाहूचे सुलतानजी निंबाळकर, चिमणाजी दामोदर
हे प्रमुख सरदार फितवले. मुख्य फौज कर्नाटकात गेलेली, जवळचे भरवशाचे
सरदार शत्रूला फितूर झालेले अशा स्थितीत देखील शाहूने आपले मनोधैर्य कायम
राखले. त्याने कर्नाटकातील सैन्याला ताबडतोब मागे फिरण्याचा आदेश दिला.
तसेच कान्होजी भोसले, रायाजी जाधव इ. सरदारांच्या मदतीने निजामाला
रोखण्याचाही प्रयत्न केला. शाहूच्या सुदैवाने कोल्हापूरचा संभाजी
युद्धकर्मांत तितकासा कुशल नसल्याने त्याच्यावर एका आघाडीचे नेतृत्व
सोपवणे निजामाला शक्य झाले नाही. उलट संभाजीच्या संरक्षणासाठी त्याला सतत
सोबत बाळगावे लागले. परिणामी शाहूच्या विरोधात एकदम दोन - तीन आघाड्या
उघडून लढाई घेण्याचा जो निजामाचा आरंभीचा उद्देश होता तो साफ बाजूला पडला.
त्यामुळे त्याच्या स्वारीचा वेग मंदावून कर्नाटकातील मराठी सरदारांना
महाराष्ट्रात परतण्यास सवड प्राप्त झाली. लष्करी मोहिमेचा वेग मंदावल्याचा
शत्रूला फायदा घेत येऊ नये यासाठी निजामाने मग शाहू आणि बाजीराव यांच्यात
संशयाचे वातावरण निर्माण केले व त्यात तो यशस्वी देखील झाला. काही काळ
बाजीराव व शाहू एकमेकांच्याविषयी साशंक झाले होते पण लवकरचं त्यांच्यात
एकी निर्माण झाली व स. १७२८ च्या मार्च महिन्यात मराठी फौजांनी पालखेड
येथे निजामाचा पराभव केला. यावेळी झालेल्या तहात निजामाने शाहूच्या
राजवटीस मान्यता दिली. दक्षिणेतून चौथाई व सरदेशमुखी वसूल करण्याच्या
शाहूच्या हक्कांना देखील त्याने मंजुरी दिली, पण संभाजीला शाहूच्या
ताब्यात देण्याची अट त्याने मानली नाही. तहाची वाटाघाट सुरु असतानाच
त्याने संभाजीला कोल्हापुरास पाठवून दिले. निजामाच्या स्वारीत एक गोष्ट
प्रकर्षाने जाणवून आली व ती म्हणजे प्रकरण अगदी गळ्याशी आले असताना देखील
शाहू स्वतः युद्धआघाडीवर आलाच नाही. जर आरंभीच शाहू स्वतः बाहेर पडला असता
तर त्याच्या सरदाराना फितुरी करता आली नसती. उलट शाहू जाग्यावर बसून
दुसऱ्यांच्या मदतीची वाट बघत बसल्याने आपण काहीही केले तरी हा स्वामी
स्वबळावर आपले काय वाकडे करणार अशी भावना सरदारांची बनत गेली.
No comments:
Post a Comment