अजातशत्रू शाहू
( भाग - १७ )
लेखन ::संजय क्षीरसागर
फत्तेसिंगास
भागानगरचा सुभा देऊन त्यास कर्नाटक प्रांतात पाठवण्याचा शाहूचा विचार
होता. त्यानुसार त्याने स. १७२५ मध्ये फत्तेसिंगाच्या नेतृत्वाखाली पेशवे,
प्रतिनिधी, सेनापती इ. प्रमुख मंडळी कर्नाटकात रवाना केली. या स्वारीमागे
काही विशेष राजकीय कारणेदेखील होती. तंजावारास व्यंकोजीचा वंशज शरफोजी
राज्य करत होता. त्यास आसपासच्या मोगल अंमलदारांनी उपद्रव दिल्याने त्याने
शाहूकडे मदतीची याचना केली. तसेच याच सुमारास निजाम देखील कर्नाटक
प्रांतात जाण्याच्या बेतात होता. अशा परिस्थितीमध्ये शाहूने तातडीने
फत्तेसिंगास कर्नाटकात रवाना केले. फत्तेसिंग हा मोहीमप्रमुख असला तरी
पेशवा, प्रतिनिधी, सेनापती, सरलष्कर इ. बड्या धेंडांना रगडून त्यांजकडून
काम करून घेण्याची त्याची कुवत नव्हती. तसेच शाहूने त्याचा मान
राजपुत्रासारखा ठेवला असला तरी तो राजघराण्यातील नाही याची जाणीव
त्याच्यासहित इतरांना असल्याने त्याच्या अधिकारांना तशाही मर्यादा पडत
होत्या. विशेष काही कार्यभाग न साधता मे १७२६ मध्ये थोडीफार खंडणी वसूल
करून फत्तेसिंग मागे फिरला. या स्वारीचे एक वैशिष्ट्य म्हणजे संताजी
घोरपडेचा वंशज व गुत्ती संस्थानचा संस्थापक मुराराव घोरपडे शाहूच्या
आज्ञेने फत्तेसिंगास सामील झाला होता. शाहूच्या फौजा साताऱ्यास परत
येण्यास निघाल्या त्याचवेळी निजामाने कर्नाटकात जाण्यची तयारी चालवली.
तेव्हा निजामाला पायबंद देण्यासाठी शाहूने स. १७२६ च्या नोव्हेंबरमध्ये
फिरून एकदा फत्तेसिंगास सर्व प्रमुख सरदारांसह कर्नाटकांत पाठवले. यावेळी
फत्तेसिंग स्वतः कलबुर्गा येथे चौथाई वसुलीला गेला तर बाजीराव तसाच पुढे
निघून श्रीरंगपट्टणला थडकला. आदल्या स्वारीप्रमाणेच फत्तेसिंगाची हि मोहीम
साफ अपयशी झाली. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे पेशवे - प्रतिनिधी -
सेनापती यांच्यातील अंतर्गत लाथाळी हे होय. त्यामुळे मोहीम फक्त रेंगाळत
गेली. त्याशिवाय शाहूचे प्रमुख सरदार दूर कर्नाटकांत गेल्याचे पाहून
निजामाने कर्नाटक प्रांती न जात कोल्हापूरकर संभाजीला हाताशी धरून खुद्द
शाहूलाच राज्यासनावरून खाली खेचण्याचा डाव आरंभला. त्यामुळे शाहूने
तातडीने कर्नाटकातील फौजा मागे बोलावल्या. अशा प्रकारे, छ. शिवाजी
महाराजांच्या दक्षिण दिग्विजयानंतर प्रथमचं दक्षिण दिग्विजयास बाहेर
पडलेल्या मराठी फौजांना दोनवेळा अपयश घेऊन मागे यावे लागले. मात्र
फत्तेसिंग हा विशेष कर्तुत्ववान नसल्याने त्याच्यावर मोठी जबाबदारी टाकणे
बरोबर नाही एवढा धडा मात्र शाहूला या कर्नाटक मोहिमांमधून मिळाला.
त्याचप्रमाणे शाहूच्या सरदारांनीही फत्तेसिंगाच्या कुवतीचा अंदाज घेतल्याने
पुढील राजकारणात त्यास त्यांनी फारसे महत्त्व दिलेच नाही.
No comments:
Post a Comment