विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 26 October 2023

अजातशत्रू शाहू ( भाग - २८ )

 


अजातशत्रू शाहू
( भाग - २८ )
लेखन ::संजय क्षीरसागर
यानंतर राज्याच्या कारभारात शाहूने पूर्वीसारखे लक्ष घालणे सोडूनचं दिले. तसेही त्याच्या हाती आता फारसे अधिकार शिल्लकचं कुठे राहिले होते म्हणा ! फक्त सातारा व आसपासच्या प्रदेशावर आता त्याची हुकुमत होती व ती हुकुमत देखील किती पोकळ होती हे त्याने नानासाहेबास पेशवेपदावरून दूर केल्यावर त्याच्या लक्षात आले. त्यातच २५ ऑगस्ट १७४८ रोजी शाहूची धाकटी राणी सगुणाबाईचे निधन झाल्याने तो मनातून पुरता खचला. त्याची प्रकृती झपाट्याने खालावू लागली. शाहूचा अंतकाळ समीप आल्याचे जाणून मुत्सद्दी पुढील उलाढालीस प्रवृत्त झाले. शाहूची थोरली राणी सकवारबाईने विठोजीराजांच्या व शरीफजी राजांच्या वंशजांपैकी एकाला दत्तक घेण्याचा बेत आखला. नानासाहेबाचे संभाजीसोबतचे स्नेहसंबंध वाढीस लागले. रघुजी भोसले यात सहभाग घेणार पण त्याची पुरस्कर्ती सगुणाबाई आता हयात नसल्याने त्याने यात सहभाग घेतला नाही. याच सुमारास कैदेत असलेल्या ताराबाईने आपला नातू हयात असल्याने जाहीर करून मुत्साद्द्यांमध्ये आणखीनचं गोंधळ माजवला. खुद्द शाहूला यातील कोणतीच मसलत पसंत नव्हती. तरीही नाईलाजाने त्याने ताराबाईच्या नातवास आपल्या माघारी साताऱ्यास आणण्याचे ठरवले. परंतु, तत्पूर्वी ताराबाईचा महत्त्वकांक्षी व खटपटी स्वभाव जाणून त्याने ताराबाई ज्यास आपला नातू म्हणत आहे तो खरोखरचं राजपुत्र आहे कि नाही याची गोविंदराव चिटणीस मार्फत खात्री करून घेतली. आपल्या हातातील डाव ताराबाईच्या हातात जात आहे हे पाहून सकवारबाईने कोल्हापूरच्या संभाजीस साताऱ्यास येण्याची सूचना केली. त्यानुसार संभाजी कोल्हापुरातून बाहेर देखील पडला पण शाहूला हे समजताच त्याने संभाजीला परत जाण्याची आज्ञा केली. तेव्हा संभाजी चुपचाप माघारी वळाला. इकडे, पुढील निरवानिरव करण्याची शाहूने तयारी चालवली व आपल्या सर्व प्रमुख सरदारांना भेटीस बोलावले. बव्हंशी प्रधान व सरदार पेशव्यास अनुकूल असल्याने शाहूच्या आज्ञेनुसार फारसे कोणी साताऱ्यास येउन दाखल झाले नाही. तेव्हा निरुपायाने शाहूने स्वहस्ते दोन याद्या नानासाहेब पेशव्यास लिहून दिल्या. या याद्या म्हणजे शाहूचे एकप्रकारे राजकीय मृत्यूपत्रचं होय ! या याद्यांनुसार वागण्याचे नानासाहेबाने मान्य केले. तसेच शाहूच्या इच्छेनुसार त्याच्या पश्चात ताराबाईचा नातू रामराजा यास साताऱ्यास आणून त्यास राज्यपद देण्याचेही पेशव्याने मान्य केले. ( ऑक्टोबर १७४९ )

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...