अजातशत्रू शाहू
( भाग - २९ )
लेखन ::संजय क्षीरसागर
पुढे
लवकरचं १५ डिसेंबर १७४९ रोजी वृद्धापकाळाने शाहूचे निधन झाले. त्याची
पत्नी सकवारबाई हिने सहगमन केले. अर्थात, तिने स्वखुशीने सहगमन केली कि
तिला तसे करण्यास भाग पाडले हा एक वादाचा मुद्दा आहे पण प्रस्तुत ठिकाणी
त्या वादात शिरण्याचे काही प्रयोजन नाही. शाहूच्या मृत्यूनंतर त्याच्या
इच्छेनुसार ४ जानेवारी १७५० रोजी ताराबाईचा नातू, रामराजा यास सातारच्या
गादीवर छत्रपती म्हणून बसवण्यात आले.
इथपर्यंत
आपण शाहूच्या हयातीचा व राजकीय कारकीर्दीचा धावता आढावा घेतला. छ. शिवाजी
महाराजांचा नातू व संभाजीचा मुलगा म्हणून ज्या प्रकारच्या वर्तनाची
अपेक्षा मराठी इतिहास वाचक मंडळी शाहुकडून बाळगून असतात, त्या
अपेक्षेप्रमाणे शाहूचे वर्तन घडले नव्हते हे उघड आहे. मात्र आपल्या
पराक्रमी आजोबाच्या कीर्तीला कलंक लागेल असेही काही कार्य / कृत्य त्याने
केले नाही. राजकारणात एक छत्रपती म्हणून वावरतांना स. १७२० नंतर शाहू
हळूहळू कमजोर पडत चालल्याचे दिसून येते. आरंभी मोहिमांवर स्वतः जाणारा
शाहू येथून पुढे स्वारीवर जाण्याचे टाळताना दिसू लागला. स. १७२० पूर्वी
त्याच्या सरदारांचे कार्यक्षेत्र मर्यादित होते व शाहू स्वतः मोहिमेवर जात
असल्याने त्यांच्या स्वैर वर्तनावर काहीसे नियंत्रण होते. परंतु
बाजीरावाच्या काळात हि परिस्थिती साफ बदलली. आपल्या २० वर्षांच्या
कारकिर्दीत बाजीरावाने आपले महत्त्व व सामर्थ्य इतके वाढवले कि,
राजकारणाचे केंद्र सातारा येथून पुण्यास कधी आले हे लोकांना उमगलेचं नाही.
शाहूच्या आज्ञेने बाजीराव जंजिरा स्वारीस गेला आणि मध्येच मोहिमेतून अंग
काढून बाजूला झाला. पण बाजीराव म्हणजे मराठी राज्य वा शौर्य नाही हे
शाहूने, बाजीरावाच्या अनुपस्थितीमध्ये जंजिरा मोहीम चालवून सिद्ध केले.
जंजिऱ्याच्या स्वारीत शेवटी मानाजी आंगऱ्यास मदत करण्यासाठी म्हणून
चिमाजीने सहभाग घेतला आणि यशाचा वाटेकरी बनला
No comments:
Post a Comment