विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 26 October 2023

अजातशत्रू शाहू ( भाग - १५ )

 


अजातशत्रू शाहू
( भाग - १५ )
लेखन ::संजय क्षीरसागर
मोगलांच्या कैदेतून सुटका झाल्यावर परसोजी भोसल्याची शाहूला मोठी मदत झाली होती. परसोजी मरण पावल्यावर कान्होजी भोसले अधिकारावर आला. फौजबंद व स्वतंत्र वृत्तीचा असल्याने कान्होजी हा इतर मराठी सरदारांशी - विशेषतः पेशव्याशी अधिक फटकून वागे. भोसले - पेशवे घराण्याची हि चुरस पेशवाई अखेर पर्यंत दिसत असली तरी तिचा आरंभ बाजीरावाच्या काळातच झाल्याचे दिसून येते. स. १७२४ - २५ मध्ये कान्होजी निजामाच्या तंत्राने चालू लागल्यामुळे स्वतः शाहूने त्याच्यावर स्वारी केली. त्यावेळी प्रत्यक्ष भेटीत शाहूने त्याची समजूत घालून त्यास बाजीरावासोबत कर्नाटक स्वारीस पाठवले. परंतु घरातील कटकटी व बाजीरावा सोबतची सत्तास्पर्धा यांमध्ये कान्होजी गुरफटला जाउन त्याच्या हातून विशेष असे काही कार्य घडून आले नाही. पुढे स. १७२९ - ३० मध्ये त्याने निजामाशी स्नेहसंबंध जोडून त्याच्याकडे जाण्याची तयारी केली. त्यावेळी शाहूने, कान्होजीचा पुतण्या रघुजी यास, कान्होजीचा बंदोबस्त करण्याची कामगिरी सोपवली. रघुजीने कान्होजीला कैद करून साताऱ्यास पाठवले. तेथे सात वर्षांची कैद भोगून बंदिवासातच त्याचा मृत्यू झाला. कान्होजी भोसल्याच्या प्रकरणी बाजीरावाने आपल्या अधिकारक्षेत्राच्या बाहेर जाउन लक्ष घातल्याने या दोघांचा खटका उडणे स्वाभाविक होते. त्यात कान्होजीचा पुतण्या व इतर नातलग त्याच्या विरोधात असल्याने कान्होजीला दुर्बल करणे बाजीरावास काहीसे सोपे गेले. या प्रकरणी एक राजा म्हणून पुढाकार घेऊन आपल्या सरदारांना आळ्यात ठेवण्याचे जे कार्य शाहूने पार पाडायला हवे होते, ते पार पाडण्यास तो पुरता असमर्थ ठरला. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे, ताराबाईच्या विरोधातील समरप्रसंग अपवाद केल्यास स. १७०८ - ९ नंतर मोहिमांवर जाण्याचे शाहूने साफ टाळल्याचे दिसून येते. अर्थात, त्याचा हा निर्णय त्याने स्वेच्छेने घेतला होता कि परिस्थितीमुळे तो तसा वागत गेला हे समजायला मार्ग नाही, पण जाग्यावर बसून राज्य सांभाळण्याचे व राज्याचा विस्तार करण्याचे कार्य करता येत नाही हे त्याच्या लक्षात आले नाही. याचा परिणाम म्हणजे सातारच्या आसपासचे राजकारण सोडल्यास दूरवरील राजकारणे -- उदा. राजपुताना, गुजराथ, दिल्ली, हैद्राबाद इ. -- करण्यास किंवा त्यावर नियंत्रण ठेवण्यास तो साफ अपयशी ठरला आणि या राजकारणांचे सर्व नियंत्रण बाजीराव पेशव्याकडे गेले. बाजीरावाने हे हेतुपूर्वक केले असेही म्हणता येऊ शकते पण या ठिकाणी हे पण लक्षात घेतले पाहिजे कि, जर बाजीराव पुढे आला नसता तरी शाहूचे अधिकार नियंत्रित करण्यास कोणी मराठी सरदार वा अष्टप्रधान मंडळातील कोणी प्रधान पुढे आलाच नसता असे नाही. राजारामाच्या कारकिर्दीचा दाखला घेतल्यास संताजी व धनाजीने त्यास कित्येकदा वाकवल्याचे दिसून येते. खुद्द शाहूला देखील धनाजी - चंद्रसेन या पिता - पुत्रांनी काय कमी त्रास दिला होता. सारांश, स. १७२० नंतर जसजसा मराठी राज्याचा विस्तार होऊ लागला तसतसा शाहूच्या अधिकारांचाही संकोच होत गेला.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...