अजातशत्रू शाहू
( भाग - १४ )
लेखन ::संजय क्षीरसागर
स.
१७२० मध्ये बाजीरावाकडे पेशवेपद आल्यावर सातारच्या राजकारणास निराळे वळण
लागले. स. १७२८ पर्यंत दरबारावर शाहूचे वर्चस्व होते पण स. १७२८ मधील
पालखेडच्या लढाईनंतर दरबारासह खुद्द शाहूवर देखील बाजीरावाचा प्रभाव वाढू
लागला. पालखेडच्या यशाचा हा दुष्परिणाम सातार दरबार तसेच शत्रू दरबारातील
मुत्सद्यांच्या नजरेतून सुटला नाही. स. १७३० नंतर परराज्यातील वकील व
मुत्सद्दी थेट सातार दरबारसोबत बोलणी न करता पुण्याला शनिवारवाड्याचे
उंबरठे झिजवू लागले. परंतु याविषयी या ठिकाणी अधिक लिहिणे योग्य नाही.
प्रसंगानुसार याची माहिती पुढे येईलच.
स.
१७२४ मध्ये दक्षिणचा सुभेदार मुबारीझखान व निजाम यांच्यात तंटा निर्माण
झाला. मुबारीझ हा मोगल बादशहाचा अधिकारी म्हणून तर निजाम बंडखोर म्हणून
लढण्यास समोरासमोर आले. दक्षिणेत स्वतंत्र सत्ता स्थापण्याचा निजामाचा बेत
मोगल दरबारांत आता उघड झाला होता. त्याचा हा बेत हाणून पाडण्यासाठी खुद्द
मोगल बादशहा प्रयत्नशील होता व त्याच्याच प्रोत्साहनाने मुबारीझखान
निजामाच्या विरोधात दंड थोपटून उभा राहिला. या झगड्यात शाहूच्या
नेतृत्वाखालील मराठी फौजांची गरज दोन्ही पक्षांना होती व मोगल बादशहाने
शाहूला, मुबारीझखानास मदत करण्याचा हुकुमही पाठवला होता. परंतु, शाहूच्या
संमतीने बाजीराव, दाभाडे, भोसले इ. सरदार निजामाच्या मदतीस गेले व स. १७२४
च्या सप्टेंबर अखेर साखरखेडले येथे झालेल्या लढाईत मुबारीझखानाचा पराभव
होऊन तो मारला गेला आणि दक्षिणेत निजामाची सत्ता कायम झाली. स. १७१९ मध्ये
बाळाजी विश्वनाथाने दिल्लीहून आणलेल्या सनदांनुसार दक्षिणच्या सहा
सुभ्यातुन सरदेशमुखी व चौथाई वसुलीचे हक्क शाहूला देण्याचे निजामाने मान्य
केले होते. त्या भरवशावर शाहूने निजामाला मदत केली पण एकदा वेळ निघून
गेल्यावर निजामाने आपण त्या गावचेच नाही असे दाखवून शाहूला हात चोळत
बसायला लावले.
No comments:
Post a Comment