अजातशत्रू शाहू
( भाग - १६ )
लेखन ::संजय क्षीरसागर
शाहूच्या
कारकिर्दीत अनेक नवीन संस्थाने उदयास आली, त्यापैकी एक म्हणजे अक्कलकोटचे
भोसले घराणे होय ! स. १७०७ मध्ये शाहू नगरला आला. त्यावेळी दौलताबादजवळील
पारद गावचे एक प्रकरण उद्भवले. शाहूच्या सैन्यातील लोक रसद गोळा
करण्यासाठी फिरत असताना पारद गावच्या पाटलाने त्यांच्यावर हल्ला केला.
तेव्हा शाहूची पथके गावावर चालून गेली. गढीच्या आश्रयाने गावकरी व पाटील
लढू लागले. या लढाईत पारद गावचा पाटील शहाजी लोखंडे हा मारला गेला आणि गाव
शाहूच्या ताब्यात आले. मृत पाटलाची पत्नी आपल्या लहान मुलास घेऊन
शाहूच्या भेटीस आली व मुलाला शाहूच्या पायांवर घालून अभय मागितले. शाहूने
उदार मनाने त्यांना माफी दिली व पारद गाव इनाम म्हणून दिले. त्याशिवाय
त्याने आणखी एक गोष्ट विशेष केली. मृत लोखंडे पाटलाच्या मुलास आपल्या सोबत
बाळगले व त्याचे नाव फत्तेसिंग भोसले असे ठेवले. या फत्तेसिंगाचा एका
राजपुत्राप्रमाणे थाट ठेवण्यात आला. त्याची सर्व जबाबदारी शाहूने आपली
उपस्त्री विरुबाई हिच्यावर सोपवली. विरुबाई हि जरी शाहूची लग्नाची बायको
नसली ती त्याने तिचा मान महाराणीप्रमाणेचं ठेवलेला होता. स. १७४० अखेर
विरुबाईचा मृत्यू झाला तेव्हा तिच्या खाजगी खर्चासाठी तोडून दिलेला
अक्कलकोट परगणा शाहूने फत्तेसिंगास दिला. अशा प्रकारे अक्कलकोट संस्थानची
निर्मिती झाली खरी, पण तत्पूर्वीच फत्तेसिंगाच्या मर्यादा शाहू व दरबारी
मुत्सद्द्यांच्या लक्षात आल्याने पुढील राजकारणात फत्तेसिंगास फारसे
महत्त्व राहिले नाही. शाहूच्या पश्चात इतर सरदार व प्रधानांप्रमाणेचं
अक्कलकोटकर देखील पेशव्यांच्या प्रभावाखाली आले.
No comments:
Post a Comment