विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 12 October 2023

अजातशत्रू शाहू ( भाग - १० )

 


अजातशत्रू शाहू
( भाग - १० )
लेखन ::संजय क्षीरसागर
निजामाच्या दुर्दैवाने मोगल बादशाहने स. १७१५ मध्ये त्यास उत्तरेत बोलावले व दिल्लीच्या प्रसिद्ध सय्यद बंधूंमधील हुसेनअली सय्यद यास दक्षिणच्या सुभ्यावर नेमले. निजाम व सय्यदांचे वैर असल्याने हुसेनअलीने दक्षिणेत आल्यावर शाहूचा पक्ष स्वीकारला. मोगलांशी वैर पत्करण्याची कोल्हापूरच्या संभाजीची तयारी नसल्याने तो अगदीच गप्प बसला. याचा फायदा शाहूने बरोबर उचलला व मोगलांच्या पाठींब्यावर त्याने बंडखोर सरदारांचा बंदोबस्त करण्याचे कार्य प्रथम हाती घेतले. यात पहिला नंबर लागला तो दमाजी थोराताचा ! शाहू, ताराबाई, मोगल अशा वारंवार चाकऱ्या बदलणाऱ्या थोराताची निष्ठा अशी कोणावरच नव्हती. अशा मंडळींची फार काळ गय करणे शाहूला परवडण्यासारखे नव्हते. बाळाजी विश्वनाथास त्याने थोराताच्या बंदोबस्तासाठी पाठविले. परंतु, बोलाचालीने दमाजीला सरळ करायला गेलेल्या बाळाजीस थोराताने कपटाने कैद केले. अखेर दंड भरून त्यास आपली सुटका करावी लागली. तेव्हा शाहूने सचिवास दमाजीच्या मुसक्या आवळण्यास पाठविले. परंतु दमाजीने अल्पवयीन सचिव नारो शंकर यासच छापा मारून कैद केल्याने शाहूच्या आक्रमणातील एकप्रकारे हवाच काढून घेतली. वस्तुतः पेशव्याचा पराभव झाल्यावर खुद्द शाहूने थोरातावर चालून जायला हवे होते किंवा सचिवाचे प्रकरण घडल्यावर तरी स्वतः मोहिमेवर बाहेर पडायला हवे होते पण का कोणास ठाऊक, तो स्वतः काही स्वारीसाठी बाहेर पडलाच नाही. ( स. १७१६ - १७ ) पुढे स. १७१८ मध्ये बाळाजी विश्वनाथने हुसेनअली सय्यदची मदत घेऊन मोगली तोफखान्याच्या सहाय्याने दमाजी थोराताचा पराभव करून त्यास कैद केले. त्याची हिंगणगावची गढी मातीस मिळवली तर गावावरून गाढवाचा नांगर फिरवला. दमाजीला शाहूने पुरंदरावर कैद करून ठेवले. पुढे शाहूच्या राण्यांनी त्याच्या वतीने रदबदली केल्याने शाहूने दमाजीस कैदमुक्त केले. पण स. १७२८ मध्ये दमाजीने कोल्हापूरच्या संभाजीसोबत हात मिळवणी करून शाहूविरोधात दंड थोपटले. तेव्हा फिरून त्यास पकडून शाहूने पुरंदरावर कैदेत टाकले. या बंदीवासातच दमाजीचा अंत झाला.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...