अजातशत्रू शाहू
( भाग - ४ )
लेखन ::संजय क्षीरसागर
शाहू
जसजसा दक्षिणेकडे सरकू लागला तसतसे परसोजी भोसले, नेमाजी शिंदे, निंबाळकर
सारखे फौजबंद मराठी सरदार त्याच्या गोटांत दाखल होऊ लागले. मराठी
सरदारांचा वाढता पाठिंबा लक्षात घेऊन शाहूने नगर मुक्कामातून ताराबाई सोबत
वाटाघाटी आरंभल्या. शाहूचे मत, मराठी राज्याचा छत्रपती म्हणून त्याचा
अधिकार ताराबाईने मान्य करावा असे होते. त्याउलट, ताराबाईचे म्हणणे होते
कि, शिवाजी महाराजांनी स्थापलेले स्वराज्य संभाजीने गमावले. तिच्या पतीने
-- म्हणजे राजारामाने -- स्वपराक्रमाने नव्याने राज्य संपादन केले आहे.
अशा या राज्यावर हक्क सांगण्याचा शाहूला अधिकारच काय ? तांत्रिकदृष्ट्या
या वादात ताराबाईची बाजू योग्य व न्यायाची असल्याचे दिसून येते. पण १८
व्या शतकातील पुरुषांची मानसिकता पाहता एका कर्तबगार स्त्रीच्या हाताखाली
काम करण्याची बव्हंशी मराठी सरदारांची तयारी नव्हती असेच म्हणावे लागते.
१८ व्या शतकातील कर्तबगार स्त्रियांच्या मालिकेत ताराबाईचे स्थान अव्वल
आहे यात शंकाच नाही. ती युद्धकला, कपट, धूर्तता, निग्रह, तडफ इ. राजकीय
पुढाऱ्यांस आवश्यक अशा गुणांनी युक्त होती व तीच तिची नेमकी कमजोर बाजू
होती ! परिणामी, ताराबाईचा पक्ष न्यायाचा असून देखील तिच्याशी निष्ठेने
राहण्याची शपथ वाहणारे धनाजी जाधव प्रभूती सरदार शाहूच्या गोटांत दाखल
झाले.
स.
१७०७ च्या ऑक्टोबर महिन्यात भीमा नदीच्या काठी खेड येथे शाहू व
ताराबाईच्या सरदारांची लढाई घडून आली. शाहू स्वतः सैन्याचे नेतृत्व करीत
होता तर ताराबाईच्या फौजेचे नेतृत्व तिचा सेनापती धनजी जाधव याच्याकडे
होते. त्याशिवाय परशुरामपंत प्रतिनिधी देखील लढाईत हजर होता. प्रत्यक्ष
संग्रमाआधीच शाहूने धनाजी जाधवास फितवण्यात यश मिळवले. परिणामी प्रत्यक्ष
युद्धाच्या वेळी जाधवाची फौज संग्रामात सहभागी न झाल्याने शाहूच्या
सैन्याचा सर्व मारा प्रतिनिधीच्या पथकांवर झाला व शाहूचे आक्रमण असह्य
झाल्याने प्रतिनिधीला पळून जावे लागले. शौर्य, तडफ इ. आनुवांशिक गुणांचे
शाहूने या निमित्ताने स्वपक्षीयांना व विरोधकांना जे दर्शन घडविले
त्यामुळे त्याची बाजू वरचढ बनत गेली. खेडची लढाई जिंकल्यावर शाहूने धनाजी
जाधवास सेनापतीपद दिले तर बाळाजी आवजीची वंशपरंपरागत चिटणीशी खंडो बल्लाळ
या त्याच्या वारसास दिली. आरंभीच्या दिवसांत शाहूचा जम बसवण्याचे मुख्य काम
या खंडो बल्लाळने व परसोजी भोसल्याने पार पाडले हे या ठिकाणी नमूद करणे
योग्य होईल.
No comments:
Post a Comment