अजातशत्रू शाहू
( भाग - ३२ )
लेखन ::संजय क्षीरसागर
बाजीरावाने
सेनापतीला लोळवले. आंगऱ्यांच्या विरोधात इंग्रजांशी हातमिळवणी केली.
प्रतिनिधीच्या ईर्ष्येने मुद्दाम जंजिरा मोहीम रखडवली. नानासाहेबाने पुढे
कर्नाटकात इतर कोणत्याही मराठी सरदाराचा शिरकाव होऊ दिला नाही. शाहूच्या
पाठबळावर बाबूजी नायकाने कर्नाटकात जाण्याचा प्रयत्न केला पण प्रसंगी
निजामाशी संधान बांधून नानासाहेबाने बाबूजीचा कर्नाटकातून साफ उठावा केला.
याचा परिणाम म्हणजे, कर्नाटकात मुस्लिम आणि युरोपियन सत्ता प्रबळ होऊन तो
भाग मराठी राज्याच्या ताब्यातून कायमचा निघून गेला. शाहूने वेळीच
पेशव्यांना न रोखल्यामुळे पेशव्यांची हिंमत व सामर्थ्य वाढतच गेले. पुढे
आपल्या विरोधकांचा तडकाफडकी बंदोबस्त करून पेशव्यांनी इतर प्रधानांवर आणि
सरदारांवर आपला वचक बसवला व हा प्रकार छत्रपती असून देखील शाहू निमुटपणे
पाहत बसला.
शाहूच्या
या उदार आणि शांत वृत्तीचा फायदा कोल्हापूरकरांनी भरपूर घेतला. संभाजीने
शाहुवर कित्येकदा मारेकरी घातले, पण शाहूने संभाजीचा कायमचा बंदोबस्त
करण्याचे कधी मनावर घेतले नाही. त्याच्या जागी खुद्द कोल्हापूरचा संभाजी
वा ताराबाई असते तर मिळालेल्या संधीचे भांडवल करून त्यांनी शाहूचा केव्हाच
निकाल लावला असता. परंतु, शाहूने मात्र असे काही केल्याचे दिसून येत
नाही. शाहूवर तो मोगलाधार्जिणा असल्याचे अनेक आरोप होतात. परंतु, हे आरोप
अजूनपर्यंत कोणी पुराव्याने सिद्ध केलेले नाहीत. त्याचप्रमाणे
त्याच्यामुळेचं निजामाचे अस्तित्व शिल्लक राहिले असेही म्हटले जाते पण
त्यातही तथ्य नाही. पालखेड प्रसंगी बाजीराव निजामाला लोळवेल असे खुद्द
बाजीरावाला वाटत नव्हते तर इतरांची काय कथा ! पालखेड नंतर निजामाशी भोपाळ
येथे बाजीरावाचा संग्राम घडून आला पण, सोबत तोफा - बंदुका नसल्याने त्याला
निजामाचा काटा काढता आला नाही. पुढे नानासाहेबाच्या कारकिर्दीत शाहू हयात
असेपर्यंत निजामाशी प्रत्यक्ष असा संघर्षचं न उद्भवल्याने लढाईचा प्रसंग
आलाच नाही. शाहूच्या निधनानंतर पेशवे - निजाम यांच्यात वैमनस्य आले पण
त्याची चर्चा येथे अनावश्यक आहे.
No comments:
Post a Comment