अजातशत्रू शाहू
( भाग - ३३ )
लेखन ::संजय क्षीरसागर
सारांश,
शाहूच्या एकूण जीवनाचा व राजकीय कारकीर्दीचा आढावा घेतल्यास असे दिसून
येते कि, मराठ्यांचा हा राजा आपल्या आजोबा वा बापाप्रमाणे पराक्रमी,
कर्तबगार व धोरणी नसला तरी नेभळट, कर्तुत्वशून्य देखील नव्हता. बालपण
शत्रूच्या कैदेत गेल्याने त्याच्या मनाची जी काही जडणघडण झाली तिचा विचार
केल्याखेरीज त्याच्या स्वभावाचा व वर्तनक्रमाचा अंदाज येणार नाही. ज्या
ठिकाणी सतत आपल्या जीवितावर वा धर्मावर घाला पडण्याची धास्ती आहे अशा
ठिकाणी १७ - १८ वर्षे काढावी लागल्याने कोणाचाही स्वभाव हा शांत व उदार आणि
तडकाफडकी निर्णय घेण्यास असमर्थ असा बनणे स्वाभाविक होते. शाहूच्या
बाबतीत हेच घडून आले. स. १७०७ मध्ये मोगलांच्या कैदेतून सुटून आल्यावर
पहिल्या दोन - चार वर्षांत त्याचा मुळचा स्वभाव दिसून आला. पण हि उमेद
अल्पकाळचं टिकली आणि पुढे त्याची वृत्ती शांत होत गेली. शाहू हा शिवाजी -
संभाजीच्या मनाने चैनी व विलासी असला तरी राज्यकारभाराकडे त्याचे दुर्लक्ष
कधी झाले नाही. औरंगजेबाच्या कैदेत असताना शाहू सतत त्याच्या सोबत वावरत
असल्याने स्वारीत, दरबारात कसे वर्तन करायचे, कारभार कसा करायचा याचे
अप्रत्यक्ष शिक्षण त्यास तिथेच मिळाले होते. त्या शिक्षणाचा फायदा त्यास
पुढील आयुष्यात बराच झाला. मुक्कामात वा प्रवासांत कोठेही जनतेची तक्रार
ऐकून त्यावर त्वरित निर्णय देण्यास शाहू नेहमी तत्पर असे.
तात्पर्य,
फारसा महत्त्वकांक्षी नसला तरी कर्तबागार पण काहीसा दुबळ्या मनाचा हा
दुसरा शिवाजी उर्फ शिवाजी, बखरकारांनी गौरवल्याप्रमाणे ' अजातशत्रू '
निश्चितचं होता. अकारण कोणाला दुखवायचे नाही, आपली खोड काढणाऱ्यास फारसे
गंभीर शासन करायचे नाही अशा राज्यकर्त्याचा शत्रू तर कोण बनणार व याच्याशी
वैर ते काय धरणार ?
Posted by sanjay kshirsagar
समाप्त --------
---------------
-----------
No comments:
Post a Comment