अजातशत्रू शाहू
( भाग - २४ )
लेखन ::संजय क्षीरसागर
बाजीराव
हा निःसंशय पराक्रमी व रणशूर होता. पण त्याचे गोडवे गाण्याच्या नादात
अलीकडचे व आधीचे कित्येक इतिहासकार वाहवत गेले आणि शाहूच्या धोरणांकडे
डोळसपणे न पाहता त्यांनी त्याला मोगलधार्जिणा ठरवून बाजीरावाला हिरो बनवले.
वास्तविक याच बाजीरावाने संधी असताना देखील दिल्ली का लुटली नाही याचा
कोणी विचार केला का ? शाहूमुळे निजामाचा बचाव झाला असेही म्हटले जाते, मग
भोपाळच्या लढाईत निजामाच्या बचावाला काय शाहू गेला होता ? समजा, निजामाचा
संहार न करण्याची शाहूची आज्ञा होती तर मग डभईच्या संग्रामात त्रिंबकरावास
मारण्याचा हुकुम बाजीरावास कोणी दिला होता ? त्रिंबकरावाचा मृत्यू जर
युद्धातील अपघात मानला तर निजामाचाही तसा अपघात घडवून आणणे बाजीरावास शक्य
नव्हते काय ? तात्पर्य, बाजीरावाचे उदात्तीकरण करण्याच्या नादात शाहूची
प्रतिमा -- जाणीवपूर्वक असो किंवा अजाणतेपणी -- मलिन करण्याचे कार्य आमच्या
मराठी इतिहासकारांनी केलेलं आहे.
असो,
स. १७४० ,अध्ये २८ एप्रिल रोजी बाजीरावाचा मृत्यू झाला. त्यानंतर २५ जून
१७४० रोजी बाजीरावाचा थोरला मुलगा बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब यास
शाहूने पेशवेपद दिले. स. १७४० -४९ या नऊ वर्षांच्या काळात काही
महिन्यांचा अपवाद सोडल्यास नानासाहेब हाच पेशवेपदी कायम राहिल्याने
राजकारणावर नियंत्रण त्याचेच राहिले. नानासाहेब पेशवा झाला त्यावेळी शाहू
साठीच्या जवळ आला होता. म्हणजे शाहुच्या वृद्धावस्थेस आरंभ झाला होता.
शाहूच्या कारकीर्दीच्या अखेरच्या दशकातील घटनांची माहिती पुढील व अखेरच्या
भागात पाहू.
Posted by sanjay kshirsagar
No comments:
Post a Comment