विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 26 October 2023

अजातशत्रू शाहू ( भाग - २३ )

 


अजातशत्रू शाहू
( भाग - २३ )
लेखन ::संजय क्षीरसागर
स. १७३९ मध्ये नादीरशहाने दिल्लीत थैमान घातले त्यावेळी मोगल बादशाहीच्या मदतीसाठी शाहूने बाजीराव पेशव्यास उत्तरेत जाण्याची आज्ञा केली. या प्रसंगी शाहूने, औरंगजेब बादशाहला दिलेल्या वचनाचा उल्लेख कित्येक इतिहासकार करतात. परंतु, या वचन कथेत दम नसल्याचे माझे ठाम मत आहे. औरंगजेब मरण पावला स. १७०७ मध्ये, शाहूचा जन्म स. १६८२ चा -- म्हणजे औरंगजेबाच्या मृत्यूप्रसंगी शाहू २४ - २५ वर्षांचा होता. स्वराज्याचे नेतृत्व त्यावेळी ताराबाई करत होती. पुढेमागे ताराबाईचा पाडाव करून शाहू हा राज्याचा अधिकारी होईल असे काय औरंगजेबास स्वप्न पडले होते काय ? त्याहीपलीकडे म्हणजे आपल्यामागे मोगल बादशाहीची धूळदाण होईल हे भविष्य काय औरंगजेबास आधीच कळले होते का ? तात्पर्य, शाहूने औरंगजेबास मोगल बादशाहीच्या रक्षणाचे वचन दिले होते असे म्हणतात ते साफ चुकीचे असल्याचे सिद्ध होते. आयुष्याचा बराचसा काळ -- विशेषतः बालपण ते तारुण्य --- मोगलांच्या सहवासात गेल्याने शाहू मानसिकदृष्ट्या मोगलांच्या थोडासा अधीन झाला होता. होता होईल तितकी मोगल बादशाही राखायची त्याची इच्छा होती. त्याशिवाय आपण आजच्या काळाच्या चष्म्यातून गतकालीन घटनांकडे पाहतो, हा दृष्टीकोनचं मुळात चुकीचा आहे. बाबरपासून औरंगजेबपर्यंतच्या प्रदीर्घ काळात दिल्लीतील मोगलांचे आसन पक्के झाले होते. मोगल राजवटीच्या विरोधात बंडे झाली, नाही असे नाही, पण मोगल बादशाही उलथवून टाकून नवीन राजवट प्रस्थापित करण्याचे प्रयत्न झाले नाहीत. मोगल बादशाहीचा देखावा कायम ठेऊन आपापली सत्ता बळकट करण्याची खेळी त्यावेळचा प्रत्येक सत्ताधीश खेळत होता. मोगल बादशाहीचा हा देखावा स. १८५७ पर्यंत कायम ठेवणे जेथे इंग्रजांना देखील गैर वाटले नाही तिथे मोगलांच्या कैदेत १७ - १८ वर्षे काढलेल्या शाहूचे मन मोगल बादशाही उलथवून टाकण्यास धजवेल हे संभवत नाही. त्याहीपलीकडे विचार केला असता मोगलांनी नर्मदेच्या उत्तरेस आपले राज्य रक्षावे, नर्मदा उतरून दक्षिणेत त्यांनी ढवळाढवळ करू नये अशी छ. शिवाजी महाराजांची देखील भूमिका होती. म्हणजे मोगल बादशाहीचे उत्तरेतील अस्तित्व एका मर्यादेपर्यंत त्यांनाही मंजूर होते असे म्हणता येते. त्यावरून त्यांचा नातू हा आपल्या आजोबांच्याच धोरणाचा पुरस्कार करत होता असे का म्हणू नये ? म्हणजे मोगल बादशाही राखण्याचे अनिष्ट धोरण शाहूने स्वीकारले असा जो आरोप केला जातो त्यात तथ्य नसल्याचे दिसून येते. मोगल बादशाहीचे नाममात्र अस्तित्व राखून राज्यविस्तार करण्यास जर त्याने परवानगी दिली नसती तर मराठी राज्याचा विस्तार नर्मदेच्या उत्तरेकडे झालाच नसता याकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष करण्यात येत आहे. राहता राहिला मोगल बादशाहीच्या रक्षणाचा मुद्दा तर चौथाई व सरदेशमुखीच्या बदल्यात मोगली सत्तेचे शत्रूंपासून संरक्षण करण्याची अट शाहूने मान्य केली होती. अशा परिस्थितीत, नादिरशहाच्या हल्ल्याच्या वेळेस त्याने बाजीरावास उत्तरेत जाण्याची आज्ञा केली तर ती मोगल बादशाहीसोबत केलेल्या करारांच्या अटींना जागूनच केली होती असे म्हणावे लागते.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...