शालिवाहन शके १५९६, आनंदनाम संवत्सरे, ज्येष्ठ शुध्द त्रयोदशी (६जून १६७४ इ.स.) ये दिवशी हा महाराष्ट्राचा राजा सिंहासनाधिष्ठित चक्रवर्ती नृपति झाला. येणेप्रमाणे राजे सिंहासनारुढ झाले. या युगी सर्व पृथ्वीवर म्लेंच्छ बादशहा. हा ‘मऱ्हाटा पातशाहा’ येवढा छत्रपति झाला. ही गोष्ट काही सामान्य झाली नाही. शिवरायांचा निकटतम आदयं चरित्रकार कृष्णाजी अनंत ‘सभासद’ हिरेपारखी यांचे वरील वर्णन महाराजांच्या देदीप्यमान, अतुलनीय अशा राजाभिषेक सोहळयाची यथोचित माहिती देते. ज्याप्रमाणे महाराजांची प्रत्येक कृती अदभूत व असामान्य होती तद्वत त्यांनी मोगली वर्चस्वाला व पर्शियन भाषेच्या प्रभावाला झुगारुन देवनागरी लिपीत पाडलेली स्वत:ची ‘नाणी’ ही एक दूरगामी व क्रांतिकारी घटना होती.
बिंदूमय वर्तुळात एका बाजूला तीन ओळीत ‘श्री राजा शिव’ व दुसऱ्या बाजूस दोन ओळीत ‘छत्रपति’ असे महाराजांच्या नाण्याचे सर्वसाधारण स्वरुप होते. तसेच या मजकूराबरोबर सूर्य, चंद्र, बेलाचे पान, पिंडी, त्रिशूळ अशी काही चिन्हे ही त्या नाण्यांवर छापलेली असायची. शिवराईच्या अशा जवळपास दीडशेच्या वर वैविध्यपूर्ण आवृत्त्या मिळतात. राजाभिषेक समयी महाराजांची पाडलेली स्वभाषेतील (लिपीतील) नाणी तसेच प्रचलित पर्शियन / उर्दू शब्दांना पर्याय म्हणून संस्कृत / नागरी प्रतिशब्दांचा (राज्यव्यवहार कोश) वापर या क्रांतिकारक व स्वधर्मावरील, स्वभाषेवरील असलेल्या ज्वलंत निष्ठेची उदाहरणे आहेत. राजाभिषेक समयी इंग्रज वकील हेन्री ऑक्झिंडेन रायगडावर उपस्थित होता. त्याने कंपनीतर्फे जी कलमे मंजुरीसाठी महाराजांकडे आणली होती त्यातील महत्त्वाचे कलम म्हणजे इंग्रजी नाणी स्वराज्यात चालावी. मात्र महाराजांनी परकीय चलनाचा स्वराज्याला निर्माण होणारा संभाव्य धोका ओळखून इतर कलमे मंजूर करताना ही मागणी साफ नाकारली तसेच ग्रँट डफ तेव्हा दि. २७ मे १६७४ला हेन्री ऑक्झिंडेन रायगडावरुन लिहिलेल्या पत्रात असे म्हणतो, ‘and especially against that wherein it incerted that Bombay money shall go current in the Rajas (शिवाजी महाराज) dominions, which will never be granted for after his coronation he intends to setup a mint, and proposes to himself great advantage thereby. (Ref. English Records on Shivaji (१६५९-१६८२), Letter no. ४८०, Page – ३६३)’
औरंगजेबाच्या चरित्रकार खाफीखान तसेच ग्रँट डफ म्हणतात, शिवाजीने १६६४ मध्ये म्हणजे शहाजी राजांच्या दुर्दैवी अपघाती मृत्यूनंतर ‘राजा’ हा किताब धारण केला व स्वत:ची नाणी पाडण्यास सुरुवात केली, मात्र हे ग्राह्य धरल्यास नाण्याच्या मागील बाजूस (ध्दङ्ढध्ङ्ढध्दद्मङ्ढ) ‘छत्रपति’ हे शब्दं कसे येतील? कारण अभिषिक्तं राजाच हे शब्दं वापरु शकेल आणि शिवरायांचा राजाभिषेक १६७४ मध्ये झाला. त्या समयी त्यांनी ‘छत्रपति’ हा किताब धारण केला. म्हणून खाफीखानाचे म्हणणे ग्राह्य धरण्यास अडचण येते.
मात्र शिवराई तसेच होन यांवर मूल्यदर्शक उल्लेख (फेस व्हॅल्यू)े वर्ष (मिंटिंग ईयर), कोठे पाडले याचा उल्लेख (ंमिंट-टांकसाळीचे ठिकाण) इ. बाबी छापलेल्या नाहीत. त्यामुळे केवळ धातूवरुन त्याचे महत्त्व लक्षात घ्यावे लागते. गेल्या शतकात देखील शिवराई हे नाणे पुणे व इतर भागात वापरत होते असा स्पष्ट उल्लेख दत्तो वामन पोतदार यांनी केला आहे. गेली दोन-तीन वर्षे शिवराई मुंबईतही बऱ्यापेैकी उपलब्ध होती (संग्राहकांसाठी) पण आता ती क्वचितच मिळते. महाराजांचे सोन्याचे होन हे मात्रं खूपच दुर्मिळ नाणे आहे. आज हाताच्या बोटांवर मोजता येतील इतकेच होन शिल्लक आहेत. तरीही काही संशोधक तसेच अभ्यासक महाराज राज्याभिषेकाआधी नाणी पाडत असावेत असे अजून समजतात. मात्र हेन्री ऑक्झिंडेनचे वरील पत्रं साऱ्या गोष्टी स्पष्ट करणारे आहे.
शिवाजी महाराजांना आपल्या हिंदू धर्माचा रास्त आभिमान होता. त्यांनी आपल्या नाण्यांवरील लिपी ही देवनागरी ठेवली तसेच मोगलांप्रमाणे सोन्याच्या मोहोरा न पाडता विजयनगरच्या हिंदू साम्राज्याच्या धर्तीवर सोन्याचे २.७२८ ग्राम वजनाचे होन पाडले. मराठी भाषेत शिरलेल्या ‘फारसी’ (पर्शियन) शब्दांना संस्कृत प्रतिशब्दं, देवनागरी भाषेतील नाणी व चक्रवर्ती राजाप्रमाणे राजाभिषेकाद्वारे धारण केलेले छत्रपतिपद यांवरून महाराजांना स्वधर्म, स्वभाषा व स्वराज्य या गोष्टींचा निस्सीम अभिमान होता हे दिसून येते. महाराजांनी तांब्याच्या व सोन्याच्या नाण्याप्रमाणे चांदीची नाणी का पाडली नाहीत याचा उलगडा होत नाही. नाही म्हणायला ‘श्री जगदंबा प्रसन्न’ असे लिहिलेले एक नाणे उपलब्ध झाले आहे. मात्र ते शिवाजी महाराजांनी पाडले असे ग्राह्य धरण्यास कोणताही आधार नाही. जर तांबे व सोन्याच्या नाण्यांवर श्री राजा शिव छत्रपति ही अक्षरे / मजकूर असेल तर तोच न्याय चांदीच्या नाण्यास का नसावा? मात्रं गुजरातमधील एका व्यापाऱ्याकडे चांदीची शिवराई असल्याचा उल्लेख श्री. पद्माकर प्रभुणे यांनी एके ठिकाणी केला आहे.
इतिहासातील उल्लेखांस पुरावा जरी अत्यावश्यक असलाच तरी केवळ पुरावा नसल्याने एखाद्या गोष्टीची शक्यता नाकारणे हे ही तितकेसे योग्य नव्हे. मात्र छत्रपतिंचे नाव घेताच डोळया समोर येणारी नाणी म्हणजे होन आणि शिवराई. हिलाच रुका, तांबडा छत्रपति अशी ही अन्य संबोधने आहेत.
तांब्याच्या या शिवराई पैश्याचे वजन साधारणत: १२ ते १४ ग्राम इतके असते, व तिचा व्यास २.५ सेंमी इतका असतो. शिवराई पैसा तसेच सोन्याचा होन हे हाती पाडले जायचे. एका बाजूची डाय (आवृत्ती) खाली, मध्ये तांब्याची पट्टी व त्यावर दुसऱ्या बाजूच्या पंचिंग रॉड किंवा हातोडयाने (ज्यावर उलटी / अक्षरे असायची) घाव घातला जायचा. त्यामुळे नाण्यावरील लिपी / लिखाण हे बरेचदा आजूबाजूला सरकलेले दिसते. या पध्दतीने पाडलेल्या नाण्यास क्रूड कॉईन्स असे म्हणतात. त्यामुळे ही नाणी साधारणत: ओबड धोबड स्वरुपात दिसतात. सह्याद्रीच्या मुलुखाप्रमाणे. सोन्याचे होन पाडण्याची पध्दतही हीच होती. मात्र त्याची डाय वेगळी असायची. कारण होनाचा व्यास १.३ सेमी इतका असायचा. बाकी मजकूर, नाण्याच्या कडेभोवती (कॉलर) बिंदूयुक्त वर्तुळ ह्या अन्य बाबी समान होत्या.
स्वभाषेत पाडलेल्या या क्रांतीकारी नाण्यांची परंपरा महाराजांनंतर छत्रपति संभाजी महाराज, छत्रपति राजाराम महाराज, तसेच छत्रपति शाहू (थोरले) महाराज यांच्या कालावधीत सुरु होती. मात्रं शाहू महाराजांच्या काळात पेशव्यांनी मराठा साम्राज्य संपूर्ण हिंदुस्थानात पसरवण्यास सुरुवात केली. थेट अटकेपर्यंत मराठा सैन्याने राघोबादादांच्या नेतृत्वाखाली धडक मारली. त्यामुळे पेशवे व त्यांचे आधारस्तंभ असणाऱ्या शिंदे, होळकर, पवार, गायकवाड आदि संस्थानिक सरदारांना स्थानिक भाषेचा (पर्शियिन) आधार घ्यावा लागला. कारण इंदौर, धार, देवास, ग्वाल्हेर, बडोदा, कटक (रघुजी भोसले – नागपूरकर) असे सर्वत्र मराठा साम्राज्य विस्तारले होते. दिल्लीला कोण बादशाहा बसणार हे सुध्दा मराठेच ठरवित. आज ऐकायला नवल वाटेल की, सध्याच्या पाकिस्तानातील लाहोर तसेच मुलतान या शहरांवर काही काळ मराठयांचा ताबा होता व त्यांच्या तेथे टांकसाळी (मिंटस्-नाणी पाडण्याची जागा) सुध्दा होत्या. छत्रपति शिवरायांनी जनतेला स्वत:च्या तेजाने पुन्हा जागृत केले. त्यांना स्वधर्म,स्वभाषा व स्वराज्य यासाठी लढा देण्यास शिकवले. त्यासाठी स्वभाषेतील नाणी पाडली, संस्कृत प्रतिशब्दांचा कोष (डिक्शनरी) तयार केली.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे ‘स्वत्वाची’ जाणीव करुन दिली
Sardar Patil
No comments:
Post a Comment