विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 18 November 2023

नेताजी पालकर यांच्या जीवनावरील ऐतिहासिक कादंबरी 📜⚔ अग्निदिव्य भाग - 2

 


नेताजी पालकर यांच्या जीवनावरील ऐतिहासिक कादंबरी

📜⚔ अग्निदिव्य भाग - 2


नेताजी पालकर यांच्या जीवनावरील ऐतिहासिक कादंबरी📜

अग्निदिव्य

लेखक : कल्याणीरमण बेन्नूरवार

__📜🗡भाग - 2⃣ 📜🚩🗡___

_🚩🚩___

आईसाहेबांच्या समक्ष खलित्याचे नीट वाचन झाले. सविस्तर खल झाला. गडावरून कधी निघायचे, बरोबर कोण, किती शिबंदी असतील असा सारा तपशील भराभरा ठरला. महाराजांसोबत जाणारा प्रत्येक माणूस आईसाहेबांनी स्वत: पारखून घेतला. मात्र सारे ठरत असताना महाराजांची अलिप्तता आणि उदासी त्यांच्या नजरेने अचूक हेरली. धीर देत, समजावणी करीत त्या म्हणाल्या–

राजे, प्रसंग बाका तर खरा, पण इलाज नाही. गनिमी कावा खेळणे म्हटले की, हे भोग भोगणे आलेच. आडमुठे वागल्याने राजकारण साधत नसते. मूळ ध्येयावर आणि भविष्यातील लाभावर नजर ठेवून हे विष पचवावेच लागणार. शनीची पीडा आली तेव्हा प्रत्यक्ष गुरू बृहस्पतींनासुद्धा खुनाच्या आरोपाची मानखंडना सहन करावी लागलीच ना? हेही तसेच. परिस्थितीचा रेटा आला, तेव्हा महाराजसाहेबांनासुद्धा इच्छा नसताना गनिमाची चाकरी करावी लागलीच. आदबखाना पाहावा लागला. चिंता न करणे, जगन्माता यातून काहीतरी गोमटेच करवणार असेल.

तिसऱ्या प्रहरी मिर्झाराजांचा जासूद सदरेवर हजर झाला. मानाचा पोशाख आणि रोख रक्कम देऊन त्याची यथास्थित बोळवण केली गेली. जबाबाची थैली त्याच्या हाती सोपविली गेली.

मिर्झाराजांना आमचा खास सांगावा सांगणे. म्हणावे, केवळ त्यांच्या वचनावर विसंबून आम्ही उद्या सूर्यास्तापूर्वी छावणीत दाखल होत आहोत. जसे आम्हाला तीर्थरूप महाराजसाहेब तसेच मिर्झाराजे. आमची सारी दारोमदार त्यांचेवरच आहे.

भवानीमातेचे दर्शन घेऊन, महाराज आईसाहेबांचा आशीर्वाद घेण्यास त्यांच्या महाली आले. दुपारचे भोजन त्यांनी आईसाहेबांसोबतच घेतले. ते उरकताच महाराजांनी गड सोडला. ठरल्याप्रमाणे सोबत अगदीच मोजकी मंडळी होती. महाराज छावणीच्या गिर्दपेशात पोहोचले, तेव्हा संध्याकाळ होत होती. तेथेच थांबून छावणीत वर्दी रवाना झाली. महाराजांनी कंबरेची तलवार काढून नेताजींच्या हवाली केली. साऱ्यांच्या प्रश्नार्थक मुद्रांना विषादाने हसतच त्यांनी उत्तर दिले–

दिल्लीश्वराच्या खास कृपेस पात्र असलो, तरी अखेर आहोत शरणागतच ना! पुढची विटंबना सहन करण्यासाठी आतापासूनच आम्ही मनाची तयारी चालविली आहे.

महाराजांचा विद्ध स्वर साऱ्यांच्याच मनाचा तळ ढवळून गेला. मात्र समोरून किरतसिंह कछवाह, उदयराज मुन्शी आणि वीरसिंह बुंदेला राजपूत स्वारांची तुकडी घेऊन येताना दिसल्याने विषय तेवढ्यावरच थांबला. महाराजांजवळ येताच सारे पायउतार झाले. महाराजसुद्धा घोड्यावरून उतरले. त्यांनी किरतसिंहाची गळाभेट घेतली. औपचारिक वास्तपुस्त झाली. किरतसिंह म्हणाला–

मुबारक हो महाराजसाहेब. अशा शाही कृपेचे भाग्य क्वचितच कुणाला लाभते. ही मेहेरबानी हासिल करण्यासाठी कित्येक लोक कित्येक पिढ्या तपश्चर्या करतात. लेकिन महाराजसाहेबांचा चेहरा असा म्लान का म्हणून? उनके दुश्मनों की तबियत नासाज है क्या?

नाही कुंवरजी, सारे ठीकच आहे. पण आतापर्यंतची आमची सारी हयात बगावत करण्यात आणि खद्दारी जपण्यात गली आहे. एवढा मोठा सन्मान आम्हाला कसा काय झेपेल या काळजीने जरा व्यग्र आहोत. चला, निघावे काय? आपले पिताजी तिष्ठत असतील. आम्हालापण त्यांच्या भेटीची ओढ लागून राहिली आहे. त्यांना भेटले की, आम्हाला आमच्या आबासाहेबांना, तीर्थरूप थोरल्या महाराजसाहेबांना भेटल्याचा आनंद मिळतो.

बेशक! बेशक!! चलावे महाराजसाहेब.

महाराज घोड्यावर बसल्यानंतर राजपूत वीरही स्वार झाले. पुढे राजपूत तुकडी आणि मागोमाग किरतसिंहाच्या जोडीने महाराज आणि त्या मागे मावळ्यांची तुकडी दुडक्या चालीने छावणीकडे चालू लागली. चौक्या-पहारे ओलांडत, मुजरे घेत स्वाऱ्या मिर्झाराजांच्या दिवाणखान्याच्या डेऱ्यासमोर दाखल झाल्या. मिर्झाराजे जातीनिशी डेऱ्याच्या दारात स्वागत करण्यास हजर होते. सोबत दिलेरखान, उस्मान बेग आदी बडे सरदार उभे होते.

महाराज पायउतार होताच हुजऱ्या पुढे झाला. जोडे त्याच्या स्वाधीन करून ते अनवाणी चालत गेले आणि मिर्झाराजांच्या चरणांना स्पर्श करून नमस्कार केला. सभोवतालचे सारे एकदम अवाक् झाले. दोन्ही खांद्यांना धरून मिर्झाराजांनी त्यांना उचलून छातीशी कवटाळले.

अरे नहीं, नहीं, राजासाब; आपकी जगह तो यहाँ हमारे कलेजे में है. जसे माझे रामसिंह आणि किरतसिंह तसेच आपण आहात.

या प्रेमाची आणि मायेची जाणीव मागील भेटीत झाली होती. म्हणूनच आत्ता आपणास आमच्या आबासाहेबांच्या स्थानी मानून आपली चरणधूळ घेतली.

जीते रहो. आजवर अपराजित राहिलेल्या या जयसिंहाचा दिल शिवाजीने जिंकून घेतला.

मोठ्याने हसत त्यांनी महाराजांची पाठ थोपटली आणि हाताला धरून शामियान्यात नेले. आग्रह करून मोठ्या प्रेमाने त्यांनी महाराजांना आपल्या शेजारी बैठकीवर बसवून घेतले. महाराज वीरासनात बसत असताना त्यांच्या लक्षात आले, महाराजांच्या कंबरेस हत्यार नाही.

अरे, यह कैसा अजूबा! आपल्या कंबरेस समशेर नाही? आपण निहत्थेच आलात?

आपण पूर्वीच फर्मावले होते, रुमालात हात बांधून नि:शस्त्र येणार असलात तरच पुढे या. आपल्या आज्ञेचे उल्लंघन आमचेकडून होणे नाही. आम्ही शरणागत. आमच्या रक्षणाची आपण बेलभंडार उचलून शपथ घेतली आहे. शरणागताने आपल्या मर्यादेत असावे, हेच श्रेयस्कर.

नको, नको, राजासाब असे बोलू नका. असे काळीज दुखावणारे परत कधी बोलू नका. आपल्याला आमची शपथ आहे. त्या वेळी तो राजकारणाचा भाग होता. तेव्हा तुम्ही, आम्ही आमच्या ताकदीने नमविलेले दुश्मन म्हणून आला होतात. आता ते पर्व संपले. आज आम्ही आपल्याला आमचा मानसपुत्र म्हणून बोलावले आहे. वीरांच्या कंबरा कधी सुन्या राहू नयेत.

इशारत समजून उदयराज मुन्शीने त्वरेने सदरेवर तबके पेश केली. सेवकाने रुमाल दूर केला. तबकात रत्नजडित मुठीची पल्लेदार जातवान दुधारी फिरंग होती. तशीच रत्नजडित मुठीची तीक्ष्ण कट्यार होती. दोन्ही शस्त्रांची म्याने जरीच्या कलाबतूने मढविलेली होती. मध्यभागी हिरे आणि पाचू जडविलेला शिरपेच झगझगत होता. मिर्झाराजे आसनावरून उठले. त्यांनी महाराजांच्या कंबरेला स्वहस्ते तलवार बांधली. कट्यार दुशेल्यात खोचली आणि जिरेटोपावर शिरपेच खोवला. महाराजांनी अत्यंत विनयाने साऱ्या वस्तूंचा स्वीकार केला. महाराजांची इशारत होताच पंतांनी नजराण्याची ताटे पुढे आणली. सुरतेच्या लुटीत मिळविलेल्या काही अत्यंत मूल्यवान वस्तू नजराण्यात महाराजांनी सादर केल्या. तो मूल्यवान नजराणा पाहून मिर्झाराजे अगदी संतुष्ट होऊन गेले.

त्यानंतर औपचारिक बोलणी झाली. झाडून सारे मोगल सरदार महाराजांच्या भाग्याची तारीफ करीत होते. त्यांना वारंवार मुबारकबाद देत होते. काही मोकळ्या मनाने मनापासून, तर दिलेरखानासारखे काही आतून जळफळत, पण रीत म्हणून फक्त वरपांगी. अत्तर-गुलाब झाले. सदर बरखास्त झाली. उठता उठता मिर्झाराजे म्हणाले-

राजासाहब, अब थोडा विश्राम कर ले. रात्रीचे भोजन झाल्यानंतर निवांत बसून बोलू.

महाराजांच्या निवासाची व्यवस्था शेजारीच उभारलेल्या तितक्याच शानदार शामियान्यात केलेली होती. सोबतची शिबंदी आणि शागिर्दपेशा त्यांच्या आसपास तंबू आणि राहुट्यांमधून राहिला. आतले पहारे महाराजांच्या मावळ्यांचे होते. बाहेर किरतसिंहाचे सैनिक सख्त पहारा देत होते.

रात्री भोजनोत्तर पुन्हा बैठक बसली. बैठकीत महाराजांसोबत मोरोपंत आणि नेताजी, तर मिर्झाराजांसोबत फक्त किरतसिंह कछवाह आणि उदयराज मुन्शी अशी अगदी खास माणसेच होती. विशेष कृपेचे शाही फर्मान स्वीकारण्याची तहजीब व त्यासंबंधीचे रस्मोरिवाज उदयराज मुन्शीने नीट समजावून सांगितले. आपल्या मुक्कामापासून तीन कोस अंतरावर शानदार फर्मानबाडी उभारून तेथे फर्मानाचा रीतसर स्वीकार करावा. मुक्कामापासून फर्मानबाडीपर्यंत पायी, तेसुद्धा अनवाणी चालत जायचे. फर्मानाच्या उंटासमोर धुळीत गुडघे टेकून बसून फर्मान स्वीकारायचे. लगोलग फर्मान मस्तकी धरून पुन्हा अनवाणी चालत मुक्कामावर परत यायचे. फर्मान घेऊन येणारा जासूद मात्र त्याच उंटावर बसून मागोमाग येणार.

त्यानंतर स्वत: मिर्झाराजांनी अन्य तपशील सांगितले. स्वत:चे अनुभव सांगितले. मिर्झाराजे उत्साहाने बोलत होते. पण महाराज फक्त हुंकार देण्याव्यतिरिक्त प्रतिसाद देत नव्हते. चेहरा निर्विकार ठेवण्याचा कसोशीचा प्रयत्न करूनसुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेली नापसंतीची आणि सात्त्विक संतापाची पुसटशी झाक मिर्झाराजांच्या तीक्ष्ण नजरेने टिपलीच. बोलण्याच्या ओघात सहज बोलावे तसे ते बोलले–

राजासाहब, आम्ही तुम्हाला पुत्रवत मानले आहे. माझ्या खटपटीला यश आले आणि आलाहजरत तुमच्यावर कृपावंत झाले. मला या गोष्टीचा अत्यंत संतोष होत आहे. शानदार फर्मानबाडी उभारून तयार आहे. ती तुम्हाला माझ्याकडून खास भेट समजा.

इस इनायत के लिये तहे दिल से शुक्रिया. पण राजाजी, पुरंदराच्या तहात मी दौलतीचा मोठा हिस्सा गमावला असला, तरी हा खर्च पेलणे मला अशक्य नाही. आपण विनाकारण तकलीफ घेऊ नये.

गलतफहमी, राजाजी. अशी गलतफहमी होऊ देऊ नका. माझ्या हृदयात तुमच्याविषयी निर्माण झालेल्या मायेवर असा शक घेऊ नका.

नाना परीची बोलणी झाली. अनेक विषयांवर चर्चा झाल्या, पण महाराजांचे मन कशातच लागत नव्हते. मिर्झाराजांच्या नजरेतून त्यांची अस्वस्थता लपत नव्हती. घटकाभरात बैठक बरखास्त झाली. सर्व मंडळी उठून गेली तसे मिर्झाराजांनी हाताला धरून महाराजांना थांबवून घेतले. डेऱ्यात दोघेच एकांतात उरले. पहाऱ्यावरच्या हशमांना कोणालाही आत न सोडण्याची सख्त ताकीद दिली गेली.

पूर्ण उंचीचा हुक्का नव्याने तयार करून घेतला होता. जरीच्या कलाबतूने मढविलेल्या त्याच्या लांबलचक नळीतून मिर्झाराजांनी एक जोरदार कश घेतला. हुक्क्याचा नेचा हातात खेळवीत त्यांनी शांततेचा भंग केला–

राजाजी, तुमची अस्वस्थता आमच्या लक्षात येते आहे. तुमची नाराजगी जायज आहे. पण प्राप्त परिस्थितीत हेच करणे योग्य आहे. राजे, तहाच्या वेळी तुमचा मुक्काम आमच्या छावणीत होता. आम्ही तुमचे बारीक निरीक्षण करीत होतो. तुमचे पहारेकरी शागिर्दपेशा काही सामान्य बाजारबुणगे नव्हते, तर ते आमचे अत्यंत निष्णात नजरबाज होते. पलंगाला पाठ न लावता तुम्ही किती येरझारा घातल्या याचा जसा हिशेब माझ्याकडे आहे, तसाच तुम्ही आपल्या माणसांशी केलेल्या चर्चेचा शब्दाशब्दाचा लेखाजोखा माझ्याकडे आहे. एवढेच काय पण येरझारा घालताना स्वत:शी जे पुटपुटत होतात तेसुद्धा मला पूर्ण माहीत आहे. यात अर्थात राजकारणाचा भाग जसा होता तसाच तुमच्या संरक्षणाच्या काळजीचासुद्धा मोठा भाग होता. तद्वतच तुमच्याविषयीची माझी उत्सुकतासुद्धा यामागे होती. मोगलांसारख्या बलाढ्य सत्तेशी टक्कर देण्याची हिंमत दाखविणारा आणि त्यासाठी जिवाची पर्वा न करता झटणारी, कोणत्याही मोहाला बळी न पडणारी माणसे निर्माण करणारा राजा मला जाणून घ्यायचा होता. राजाजी, तुमची जाज्वल्य धर्मनिष्ठा, स्वराज्यावर असलेले तुमचे पराकोटीचे प्रेम, रयतेची जिवापाड काळजी, सवंगड्यांवरची माया, नि:स्वार्थ, निरपेक्ष बुद्धी, आत्मविश्वास, अगदी सर्वनाशाच्या उंबरठ्यावर उभे असतानासुद्धा आत्मसन्मान-स्वाभिमान जपण्याची तुमची अखंड धडपड, स्वत:च्या कार्यावरची अव्यभिचारी निष्ठा, दास्याची मनस्वी-अगदी पराकोटीची चीड, सारे सारे आम्ही फार बारकाईने निरखीत होतो. खरोखर राजाजी आपण धन्य आहात. आपले पिताजी, शहाजीराजांना आम्ही शहाजहान बादशहाच्या सोबत मोहिमेवर असताना जवळून पाहिले आहे. बादशहा सलामत त्यांचे मोठे चाहते होते. शहाजीराजांनी आपल्या रक्तातले सर्वच्या सर्व सद्गुण तुमच्यात सही सही उतरविले आहेत.

राजासाहेब, आपण आमच्या आबासाहेबांची याद काढलीत. आम्ही आपल्याला त्यांचेच स्थानी मानतो; त्यामुळेच आपल्यासारख्या गनिमाच्या छावणीत आम्ही निहत्थे, अंगरक्षकांशिवाय येण्याचे साहस करू धजलो. राजासाहेब, ज्या प्रभू रामचंद्राचे आपण थेट वंशज आहात, त्याच वंशाचा वारसा आम्हीसुद्धा मिरवितो. हा देश, ही भूमी प्रभू रामांची, कृष्णाची; आज म्लेंच्छ त्याची धुळधाण करीत आहेत. आपल्या देवांच्या मूर्ती फोडीत आहेत. मंदिरे उद्ध्वस्त करीत आहेत. सनातन वैदिक धर्म नष्ट करण्याचा, हिंदुमात्र नामशेष करण्याचा हर प्रकारे यत्न करीत आहेत. अशा दुर्धर प्रसंगी आपल्यासारखे महापराक्रमी महापुरुष, आपले पौरुष धर्मरक्षणाच्या कामी सार्थकी लावण्याऐवजी, धर्मशत्रूच्या रक्षणासाठी, त्याला त्याच्या पापकर्मात साहाय्यभूत होण्यासाठी व्यर्थ दवडीत आहेत. याची आम्हाला मोठी खंत वाटते. आज आपण केलेल्या मदतीमुळेच औरंगजेब पातशहा झाला आहे. तीच ताकद आपण स्वत: दिल्लीश्वर होण्यासाठी वापरता, तर त्या परते दुसरे गोमटे काय म्हणायचे! यवन सारा बुडवून स्वधर्माची, स्वराज्याची प्रतिष्ठापना करण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. हेच चतुरंग दल घेऊन आपण स्वत: सम्राट म्हणून दक्षिण दिग्विजयासाठी आला असतात तर आमच्या देहाच्या पायघड्या आपल्या चरणी घातल्या असत्या. पण अफसोस…

शांत व्हा राजाजी, शांत व्हा. आपल्या दिलातला हा दर्द आम्ही जाणला आणि आपले काही गोमटे करावे ही प्रेरणा मनात निर्माण झाली. आमची सारी हयात मोगली तख्ताची सेवा करण्यात गेली. आता या वयात आम्ही बगावतीचा झेंडा पेलू शकणार नाही. राजे जर तुमची किंवा तुमच्या पिताजींची अशी भेट आमच्या जवानीच्या दिवसांत झाली असती, तर किती बरे झाले असते! आम्ही आमच्या पद्धतीने होईल तेवढी तुमची मदत करण्याचा शर्थीचा प्रयत्न करू. हे आमचे तुम्हाला वचन आहे. आलमगिराच्या मनात आपल्याविषयी अतोनात संशय आणि द्वेष आहे. तो दूर करण्याचा, कमी करण्याचा आमचा प्रयत्न आहे. हे फर्मान म्हणजे त्या प्रयत्नांना यश येत असल्याचा पुरावा समजायला हरकत नाही, असे आम्ही मानतो. राजाजी, या संधीचा फायदा घ्या. साधेल तेवढे साधून घ्या. स्वराज्यासाठी या राजकारणाचा कसा उपयोग करायचा ते आम्ही तुम्हास शिकवायला नको. माझी प्रत्येक उघड कृती तुमच्याविरुद्ध आणि बादशहाच्या फायद्याची वाटणारी असेल, पण जिथे जशी जमेल तिथे तशी मदत माझ्याकडून तुम्हाला गुप्तपणे होत राहील याची मनोमन खात्री बाळगा.

रात्री उशिरापर्यंत दोघांचे बोलणे असेच चालू राहिले. क्रमश:

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...