विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 18 November 2023

नेताजी पालकर यांच्या जीवनावरील ऐतिहासिक कादंबरी📜 अग्निदिव्य भाग - 3

 

नेताजी पालकर यांच्या जीवनावरील ऐतिहासिक कादंबरी


📜 अग्निदिव्य भाग - 3

नेताजी पालकर यांच्या जीवनावरील ऐतिहासिक कादंबरी📜

अग्निदिव्य
लेखक : कल्याणीरमण बेन्नूरवार
📜🗡भाग - 3⃣ 📜🚩🗡___

_🚩📜🚩___

बुधवारचा दिवस दरबारी भेटीगाठी आणि मेजवान्यांमध्ये गेला. गुरुवारी महाराजांनी शाही फर्मानाचा स्वीकार केला. अगदी मिर्झाराजांनी सांगितला होता तसा. राजा जयसिंह आणि मिर्झा बेग या दोन दरबारी जाणकारांना त्यांनी मुद्दाम सोबत दिले होते. त्यांनी महाराजांकडून सारे सोपस्कार अगदी यथास्थित करवून घेतले. फर्मान घेऊन महाराज छावणीत दाखल झाले. मोगली सरदारांनी मुबारकबादीचा एकच जल्लोष केला. दुपारी महाराजांकडून दावते शुक्रानीचा मोठा कार्यक्रम झाला. वरकरणी हसून बोलून महाराज प्रसंग साजरा करीत असले तरी आतल्या आत जळत होते.


मिर्झाराजांची इजाजत घेऊन महाराज राजगडावर परतले आणि त्यांनी स्वत:ला कोंडून घेतले. तीन दिवस त्यांनी कोणाच्याही विनवण्यांना दाद दिली नाही. मात्र आईसाहेबांनीही तीन दिवस पाण्यालासुद्धा स्पर्श केला नाही असे जेव्हा त्यांना सांगितले गेले तेव्हा अखेर ते बाहेर आले. आईसाहेबांना भेटले. एकांतात बसून माय-लेक खूप बोलले. तेव्हा महाराज शांत झाले. आईसाहेबांनी स्वत: बसून त्यांना फराळ करविला. महाराज सदरेवर आले.


_सदर खच्चून भरली होती. सारेच पंत आणि राव सदरेवर हजेरी लावून होते. सर्वांवरून नजर फिरवून महाराज म्हणाले–+


हे काय? सारेच जर इथे आहेत तर गडकोटांवर, ठाण्या-छावण्यांवर कोण आहे? रयतेकडे कोण पाहतेय?
क्षमा महाराज, पण शाही फर्मानाचे महाराजांनी मनाला फारच लावून घेतल्याचे कळले आणि न राहवून मंडळी दर्शनासाठी गडावर उतरली. आता आपले दर्शन झाले. आपल्याला सुखरूप असलेले पाहिले, आता सारे समाधान पावले. आईसाहेबांनी आग्रहाने भोजनासाठी थांबवून घेतले आहे. हातावर पाणी पडताच जो तो ठिकाणावर रवाना होईल.


पगड्या आणि मुंडाशी समाधानाने डुलली. महाराजांनी सर्वांवर नजर फिरवून नजरेनेच प्रत्येकाचा समाचार घेतला. क्षण-दोन क्षण त्यांनी आपले मोठाले नेत्र मिटून घेतले. दीर्घ सुस्कारा सोडून त्यांनी डोळे उघडले. म्हणाले–


मंडळी, काय त्या य:कश्चित फर्मानाच्या चिटोऱ्याची मिजास! आपला पोकळ मोठेपणा आणि अधिकार गाजवून घेण्याचा अन् दुसऱ्याला कमीपणा घ्यायला लावण्याचा कोण हा अट्टाहास. स्वत:ला रामाचे, कृष्णाचे, चंद्रा-सूर्याचे अस्सल औरस वारस म्हणविणारे हे राजपूत आणि मराठे, आपलाच धर्म बुडवायला निघालेल्या गनिमाची केवढ्या अहमहमिकेने चाकरी करतात. धन्य ती त्यांची निलाजरी वृत्ती. आम्हाला आमची स्वत:चीच शरम वाटत राहिली. वीस-वीस वर्षे अथक प्रयत्न करून, जीवघेण्या लढाया खेळून, प्रत्यक्ष कलीकाळाचा थरकाप व्हावा अशी साहसे पत्करून धरतीमोलाच्या सवंगड्यांचे प्राण वैरून, उभे केलेले ऐसे हे स्वराज्य; एखादा मिर्झाराजा येऊन तहाच्या एकाच फटकाऱ्यात पार उद्ध्वस्त करून टाकतो. पंत, केवळ आमच्या एका शब्दाखातर, नजरेच्या एका इशारतीवर ज्यांनी आपले प्राण ओवाळून टाकले, ती मंडळी, ते माझे मावळे मला विचारताहेत, ‘सांगा महाराज, सांगा. काय याच मानखंडनेसाठी आम्ही आमच्या संसारावर पाणी सोडले? घरादारांवर निखारे ठेवले? प्राण वाऱ्यावर सोडले?’ पंत, काय उत्तर देणार आहोत आम्ही त्यांना?


सारी सदर तटस्थ होऊन केवळ ऐकत होती. महाराजांच्या चर्येकडे पाहण्याची कोणाचीही छाती नव्हती. सात्त्विक संतापाने पेटून उठलेली त्यांची मुद्रा पाहवतच नव्हती. आपसात बरीच नेत्रपल्लवी झाल्यावर अखेर रघुनाथपंतांनी शांततेचा भंग केला-


महाराज, कर्मगतीस उपाय तो काय? आपण स्वत:स असा बोल लावून घेऊ नये. आज संकटाची घडी आहे. दैव साथ नाकारीत आहे. हे तर सारेच जाणतात. आज जी नामुष्की पदरी घ्यावी लागली, ती सर्वनाश टाळण्यासाठीच ना? महाराज, हासुद्धा गनिमी कावाच नव्हे काय? शत्रू शिरजोर असेल तर सर्वनाश ओढवून घेण्यापेक्षा आपण माघार घेतोच, पण संधी मिळताच त्याला पुरता चेचून काढतो. हेच तर मराठ्यांचे वैशिष्ट्य. आज रजपुताने तेवीस किल्ले आणि मुलूख लुबाडला. मात्र स्वराज्यातल्या प्रत्येकाला खात्री आहे जेव्हा संधी मिळेल तेव्हा त्याच्या नरड्यात हात घालून ते तेवीस किल्ले आपण हिसकावून घेऊ. जाताहेत कुठे? महाराज, मानखंडना झाली हे खरे पण आपण रजपुताचे मन तर काबीज केले. विचारांचा भुंगा त्याच्या डोक्यात सोडण्यात यश आले, हे काय कमी झाले? उद्या हेच मिर्झाराजे असे राजकारण सुचवतील की, झालेले सारे नुकसान एका मुठीने भरून निघेल.


पंत, जगदंब करो आणि तुम्ही म्हणता तैसे होवो.
या आशावादाने सुरुवातीची उदासी, उद्विग्नता, मरगळ निघून गेली. महाराजांनी प्रत्येकाकडून त्याच्या त्याच्या कामाचा झाडा घेतला. सावधगिरीच्या आणि संरक्षणाच्या सख्त सूचना दिल्या. ढिलाईचा मुलाहिजा राखला जाणार नाही याची स्पष्ट शब्दांत ताकीद दिली. वाड्यातून जेवणाची वर्दी आली तेव्हाच सदर उठली.


महाराजांनी मोजक्या मंडळींना गडावर थांबवून घेतले. रात्री सारी मंडळी आईसाहेबांच्या महालात जमली. महाराजांनी फर्मान प्रकरण सविस्तर सांगितले. त्यानिमित्ताने स्वत: केलेली निरीक्षणे तपशीलवार सांगितली व अखेर म्हणाले–


लवकरच आदिलशहाविरुद्ध मोगल मोहीम सुरू करीत आहे. तहाच्या कलमाप्रमाणे आम्हाला फौजेनिशी त्यांच्या मदतीसाठी दहा-पंधरा दिवसांत छावणीत दाखल व्हावे लागेल. वैऱ्यासाठी लढावे लागेल, माणसे गमवावी लागतील, प्रदेश जिंकावा लागेल. कसे काय करावे सुचत नाही.
रघुनाथपंत म्हणाले–


महाराज, निरुपाय तर आहेच. दुसरा काही पर्यायसुद्धा तर नाही. यानिमित्ताने निदान आदिलशाही बुडवता आली तरी पाहावे. मिर्झाराजे अनुकूल झाले तर साधेल तेवढा आदिलशाही मुलूख दाबून घेता येईल. निदान त्यानिमित्ताने एक आघाडी तर कायमची बंद होईल.
कुडतोजी फणकाऱ्याने म्हणाले–


आलमगीर काय दूधखुळा वाटला की काय? त्या मिर्झाराजाने असे परस्पर हलवायाच्या घरावर तुळशीपत्र ठेवू नये म्हणूनच त्यांच्या गळ्यात दिलेरखानाचे लोढणे बांधले आहे ना.


कुडतोजी, अगदी रास्त बोललात. एक डोळा दिलेरखानावर ठेवूनच तर रजपुताने तह एवढा कडक केला आहे. पण पंत म्हणतात तशी शक्यतासुद्धा अगदीच नाही असे नाही. कितपत आणि कसे साधेल ते पाहावे.
त्यानंतर फौज किती घ्यावी, सोबत कोण कोण घ्यावे, महाराज स्वारीत असताना स्वराज्याचा बंदोबस्त कसा काय असावा, असा सारा तपशील यथासांग ठरला.

नऊ हजारांची फौज घेऊन महाराज मिर्झाराजांच्या छावणीत दाखल झाले. फौजेची कुलमुखत्यारी सरनोबत नेताजी पालकरांकडे होती. मिर्झाराजांनी आपल्या छावणीतच महाराजांना फौजेनिशी ठेवून घेतले. महाराजांचा डेरा अर्थातच मिर्झाराजांच्या शेजारीच होता. दोन-तीन दिवस योजना आखण्यात गेले आणि पहिल्याच शुभमुहूर्तावर मोगली छावणी विजापूरच्या दिशेने हलली. मिर्झाराजांनी दिलेरखानाला न जुमानता आघाडी महाराजांवर सोपविली. महाराजांची इशारत होताच नेताजी पुढे सरसावले. मराठी झपाट्यात त्यांनी फक्त अकरा दिवसांत फलटण, ताथवगड, खटाव, मंगळवेढा अशी कित्येक आदिलशाही ठाणी काबीज केली. मिर्झाराजे निहायत खूश झाले, कारण एवढा प्रदेश जिंकण्यासाठी मोगली फौजेला कित्येक महिने आणि लक्षावधी रुपये खर्चावे लागले असते.


मिर्झाराजांनी महाराजांचे आणि नेताजींचे जाहीर कौतुक केले. नेताजींची उत्तम सर्फराजी केली. दिल्लीला पाठविलेल्या टपालात या विजयाची रसभरित वर्णने असलेल्या हकिकती कळविल्या. अत्यंत मोकळ्या मनाने त्यांनी विजयाचे पूर्ण श्रेय महाराजांना दिले. त्यांना बादशहाची अधिक कृपा लाभावी आणि स्वतंत्र मोहीम चालविण्याचे अधिकार मिळावेत म्हणून जोरदार शिफारस केली.


एकेक ठाणे जिंकत मोगली फौजा विजापूरजवळ पोहोचल्या. या वेळी मात्र मिर्झाराजांनी सूत्रे आपल्या हाती घेतली आणि विजापूरच्या किल्ल्याला वेढा घातला. आदिलशाहीलाच घरघर लागलेली पाहून आदिलशाही सरदारांनी अपूर्व एकी दाखविली. झाडून सारे आदिलशाही सरदार सर्व मतभेद विसरून एकत्र आले. एकदिलाने पेटून उठले आणि त्यांनी मोगलांना सपाटून मार दिला. तो दणका एवढा जबरदस्त होता की नाइलाजाने मिर्झाराजांना मागे हटावे लागले.


विजापूरचा सुलतान अली आदिलशहा गोवळकोंड्याच्या कुतुबशहाचा जावई. जावयाची सलतनत धोक्यात आलेली पाहून सासरेबुवांनी आपण होऊन पन्नास हजारांची फौज, भारी तोफखान्यासह विजापुराकडे रवाना केली. विजापुरी दणक्याने सैरभर झालेली फौज या बातमीने अधिकच घाबरली. छावणीवर चिंतेचे आणि घबराटीचे सावट पसरले. खासमखास बड्या सरदारांची मिर्झाराजांच्या डेऱ्यात मसलत बसली. दिलेरखानाचे मन महाराजांविषयी कधीच साफ नव्हते. मिर्झाराजांनी त्यांचे चालविलेले कौतुक आणि मिळवून दिलेली बादशाही मेहेरबानी यामुळे तर त्याचा नुसता जळफळाट होत होता. नेताजींनी मिळविलेल्या चमकदार विजयामुळे तर त्याच्या मत्सराने अगदीच टोक गाठले. त्या पार्श्वभूमीवर झालेला हा झणझणीत पराभव पाहून तर त्याचा संयम सुटला. तोल ढळला. त्याने महाराजांवर बेछूट आरोप करण्यास सुरुवात केली–
क्रमश:

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...