विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 18 November 2023

नेताजी पालकर यांच्या जीवनावरील ऐतिहासिक कादंबरी📜⚔अग्निदिव्य ⚔🗡भाग - 4

 


नेताजी पालकर यांच्या जीवनावरील ऐतिहासिक कादंबरी📜⚔अग्निदिव्य ⚔🗡भाग - 4


नेताजी पालकर यांच्या जीवनावरील ऐतिहासिक कादंबरी📜

अग्निदिव्य

लेखक : कल्याणीरमण बेन्नूरवार

__📜🗡भाग - 4⃣📜🚩🗡___

_🚩📜🚩___

राजासाहब, यह सिवा बडाही खतरनाक है। त्याच्या रक्तात बगावत ठासून भरलेली आहे. पुरंदरावर झालेल्या पराभवाचा सूड घेण्यासाठी तो टपून बसला आहे; त्यामुळे त्याने आदिलशहाशी गुप्त संधान बांधून कट केला आहे. फितूर झाला आहे तो आदिलशहाला. आपला हा ताजा पराभव त्याचाच नतीजा आहे. सिवाच जबाबदार आहे या नुकसानीला.

सबूत.

सबूत? राजाजी, आपली पुरंदराची मोहीम चालू असताना याच सिवाने विजापुरास आणि भागानगरास खलिते धाडले होते. काय तर म्हणे दक्षिणेची पातशाही दक्षिणीयांच्या हाती असावी. दक्षिणेतील साऱ्या सत्तांनी एकजूट करून परकीय मोगलांचा खातमा करायचा. त्यांना नर्मदापार ढकलून द्यायचे. हा सारा त्याच कारस्थानाचा नतीजा आहे. त्यानेच कुतुबशाही फौज मागवली आहे.

वरकरणी पाहता कोटिक्रम तर अगदी बिनतोड होता. मिर्झाराजे काही बोलले नाहीत. मात्र दिलेर जेव्हा महाराजांवर कारवाई करण्याची, त्यांना अटक करण्याची जोरदारपणे मागणी करू लागला, तेव्हा त्यांनी ती साफ धुडकावून लावली. या साऱ्या प्रकरणामुळे दिलेरच्या मनात काय चालले आहे ते मात्र उघड झाले. तसेच दिलेरने केलेल्या बिनतोड कोटिक्रमाने बऱ्याच काळापासून त्यांच्या मनात घोळत असलेल्या एका विचाराला मात्र चांगलीच बळकटी आली. मोठ्या कष्टाने हाती आलेला शिवाजीसारखा मोहरा गमावता कामा नये. आपल्याला त्याच्या मार्गावरून चालणे शक्य नसले तरी होईल तशी, जमेल तेवढी त्याची मदत करायची. शिवाजीला मदत करता-करताच मुघल तख्ताचेसुद्धा भले करायचे.

उदयराज मुन्शीवर मिर्झाराजांचा अतोनात विश्वास; अगदी पोटच्या पोरापेक्षासुद्धा जास्त. त्याचा सल्ला घेतल्याशिवाय ते काहीच करीत नसत आणि तो सल्ला शक्यतो डावलतही नसत. मोगल तख्ताची सेवा करीत असतानाच शिवाजीला मदत करण्याचा त्यांचा मानस पक्का झाल्यावर एक दिवस त्यांनी रपेटीच्या वेळी उदयराज मुन्शीला सोबत घेतले. छावणीपासून दूरवर एकांतात आल्यावर त्यांनी सोबतचे पथक जरा लांब उभे केले. आपण एका मोठ्या झाडाखाली बसले. उदयराज हात बांधून समोर उभा राहिला.

उदयराज, जरा तुझा सल्ला हवाय.

हुकूम सरकार. जेव्हा सरकारांनी सेवकाला सोबत येण्यास फर्मावले तेव्हाच सेवकाला अंदाज आला सरकार.

उदयराजच्या बोलण्याकडे मिर्झाराजांचे फारसे लक्ष नव्हते. स्वत:शीच विचार करीत असल्याप्रमाणे त्यांनी बोलण्यास सुरुवात केली–

शहाजी भोसल्याचा लोहा शहनशाहे आलम शहाजहान हुजुरांनीसुद्धा मानला होता. निजामशाही बुडविली त्या वक्ताला लहानग्या निजाम मुर्तुझाला वाचवण्यासाठी स्वत:च्या जिवाची पर्वा न करता शहाजी हुजुरांसमोर बेधडक पेश झाला होता. तेव्हा आयता कचाट्यात सापडलेल्या शहाजीचा जीव घेण्यासाठी आदिलशहा नुसता टपून बसला होता; परंतु अलीजा सलामतांनी त्याला नुसते जिवंतच ठेवले नाही, तर भरपूर अधिकार देऊन त्याला पदरी ठेवून घेण्यास आदिलशहाला भाग पाडले. पुढे आदिलशहाच्या वतीने शहाजीने कर्नाटकात मोठा मुलूख काबीज केला आणि स्वतंत्र राजाप्रमाणे कर्नाटकात सत्ता उपभोगली. अलीजा सलामतांचा होरा अचूक ठरला. शहाजीची सारी बगावत, स्वातंत्र्याची खुमखुमी पार थंडी पडली. मरेपर्यंत तो कर्नाटकातच डांबला गेला. मोगल सलतनतीची एक मोठी डोकेदुखी कायमची दूर सारली गेली.

जी हाँ सरकार, याबाबत बादशहा सलामतांबरोबर आपण केलेली चर्चा माझ्या स्मरणात व्यवस्थित आहे.

शहाजीचा हा कुंवर - शिवाजी, आपल्या बापापेक्षा सवाई आहे. तो जसा पराक्रमी आहे तसाच विचारी आणि मुत्सद्दी आहे. आज पुऱ्या दख्खनमध्ये त्याला तोड नाही. आज आम्ही आमच्या सामर्थ्याच्या बळावर त्याला नमवून कह्यात आणला आहे. आता त्याच्यासारखा मोहरा सहजासहजी गमावून चालणार नाही. तो शालीन आहे. मला बापाच्या जागी मान देतो. जर आम्ही त्याला त्याच्या हिताचे राजकारण सांगितले, तर तो ते धुडकावून लावणार नाही, असा आमचा होरा आहे.

बिलकुल दुरुस्त सरकार. शिवाजीराजांच्या दिलात आपल्यासाठी मोठी मोहब्बत आणि इज्जत आहे. ते आपला शब्द डावलणार नाहीत. आपल्या जागी दुसरा कुणी असता तर शिवाजीराजांनी एवढा कडक तह इतक्या सहजासहजी कबूल केला नसता.

आमच्या मनात घोळणारा हा खयाल जर आम्ही आलाहजरत आलमगीर बादशहा सलामतांच्या मनामध्ये रुजवू शकलो तर आम्ही स्वत:ला भाग्यवान समजू.

कोणता खयाल सरकार?

आम्ही प्रयत्न केले, तर शिवाजीला आपल्याकडे वळवून घेणे अशक्य नाही. त्याला जर दख्खनच्या वंशपरंपरागत मिळणाऱ्या सुभेदारीची लालूच दाखविली तर ते अधिकच सोपे होऊन जाईल. थोडेबहुत स्वातंत्र्य आणि नाममात्र स्वायत्तता बहाल केली तर बापासारखीच त्याचीसुद्धा बगावत, बंडखोरी आणि स्वतंत्र राज्याची महत्त्वाकांक्षा पार थंड पडून जाईल. तख्ताच्या खिलाफ चाललेल्या त्याच्या कारवायांना आपोआपच पायबंद बसेल. मुघलशाही दख्खनच्या कटकटीतून कायमची मोकळी होईल.

सरकारांना काय म्हणायचे आहे ते सेवकाच्या ध्यानात येत नाही सरकार.

शिवाजीची माणसे किती तिखट आणि चिवट आहेत याचा पुरेपूर अनुभव आपण घेतला आहे. आत्ताच्या आपल्या आदिलशाही स्वारीत त्यांनी ठाणी काबीज करताना जी तडफ दाखवली, तिची तारीफ करावी तेवढी थोडी आहे. विजापुरी फौजा जेवढ्या निकराने आपल्याशी लढल्या तेवढ्याच निकराने शिवाजीच्या फौजेशी लढल्याचे दिसत नाही. म्हणूनच फक्त अकरा दिवसांत नेताजी एवढा विजय मिळवू शकला. शिवाजीला आपल्याकडे वळवून घेतला, त्याला शाही दरबारातून फौजेची कुमक, दारूगोळा आणि खजिन्याची मदत पुरवली तर तो झपाट्याने कुतुब आणि आदिल या दोन्ही शाह्या पार नेस्तनाबूद करून टाकील. यासाठी त्याला वंशपरंपरागत दख्खनची सुभेदारी बहाल करून जिंकलेल्या प्रदेशाची मुखत्यारी सोपवली तर हे त्याच्याकडून सहज शक्य करून घेता येईल. शहेनशहा अकबरे आझमांपासून मुघल दख्खनचा कब्जा करण्याचे जी तोड प्रयत्न करीत आहेत, पण अजून आपण नीरा नदी पार केलेली नाही. शिवाजीचा योग्य उपयोग करून घेतला, तर पाच-सहा वर्षांत मुघल सलतनतीच्या सरहद्दी कावेरी पार करून थेट समुद्राला भिडतील. हे सारे शहेनशहांच्या जहनमध्ये रुजवायचे आहे.

पण सरकार, दख्खनची सुभेदारी शहजाद्यालाच देण्याचा रिवाज आजपर्यंत चालत आला आहे. गुस्ताखी माफ सरकार. पण आपल्या हातात फार मोठे मुल्की आणि फौजी अधिकार आहेत, तरी सुभेदारी मात्र शहजादा मुअज्जमकडेच आहे.

असेलही, तो काही फार मोठा सवाल नाही. सलतनतीच्या भल्यासाठी गरज पडलीच तर असे रिवाज बदलता येतात.

मगर सरकार, दिलेरखानसाहेब म्हणाले, ‘त्या शिवाजीराजांच्या ‘दक्षिणेची पातशाही दक्षिणीयांनी सांभाळावी’ या राजकारणाचे काय? ते राजकारण जर खरोखरच प्रत्यक्षात आले, तर आपल्यासाठी फार मोठी तकलीफ उभी राहील.

बेवकूफ है दिलेरखान. त्याला समशेर चालवणे उत्तम समजते, डोके चालवणे नाही. तसे काही वास्तवात उतरू नये म्हणून तर माझा हा आटापिटा आहे. शिवाजीला ना आदिलशाहीचे प्रेम आहे ना कुतुबशाहीचे. त्याने आजवर सर्वांत जास्त त्रास आदिलशहालाच दिला आहे; मोगलांना नव्हे. बापाला कैदेतून सोडवण्यासाठी त्याने मोगलांचीच मदत घेतली होती. मोगली फौजेशी टक्कर देणे, तेसुद्धा आमच्याशी सोपे जाणार नाही हे जाणूनच त्याने अली आदिलशहा आणि कुतुबशहाची मदत मिळवण्याचा या राजकारणाच्या निमित्ताने यत्न केला. नतीजा काय झाला? दोन्ही शहांनी त्याला पार झिडकारले. म्हणूनच तो आज आमच्या कह्यात आला आहे. आपल्या मदतीने त्याला दोन्ही शाह्या गिळून सत्ता गाजवता येणार असेल तर तो हे उपद्व्याप कशाला करीत बसेल? काय?

सरकार, खयाल तर एकदम उमदा आहे. जर आपण म्हणता तसे वास्तवात घडून आले, तर आपल्या आजवरच्या कामगिरीवर चार चाँद लागतील. फक्त प्रश्न एवढाच आहे की, बादशहा सलामत शिवाजीराजांना दख्खनची सुभेदारी आणि मुखत्यारी देण्यास राजी होतील का?

बस्स तर मग, उदयराज आता ठरले. बादशहा सलामतांना हे राजकारण पटवून द्यायचे. शिवाजीला हर प्रयत्न करून दिल्लीला जाण्यास राजी करायचे आणि आलाहजरतांकडून त्याला दख्खनची सुभेदारी आणि मुखत्यारी देववायची. त्यासाठी भले मला माझे सारे कौशल्य, प्रतिष्ठा, कर्तृत्व आणि अधिकार पणास लावावे लागले, तरी बेहत्तर! शिवाजीची बगावत समशेरीच्या आणि तोफेच्या ताकदीने कधीच संपणार नाही, तिला संपवायची असेल तर याशिवाय दुसरा पर्याय नाही. काश, आपल्या वालिदसाहेबांची समजदारी आलाहजरत दाखवतील तर गोष्टी किती सोप्या होऊन जातील.

मिर्झाराजांचा विचार पक्का झाला. त्यांनी महाराजांना एकांतात बोलावून घेतले. शब्दाशब्दांत साखर पेरीत त्यांनी आपणाशीच रंगविलेले चित्र महाराजांसमोर उभे केले. शेवटी स्वत:च्याच मांडीवर मोठ्याने थाप मारीत मोठ्याने हसून म्हणाले–

तो, राजासाहब यह बात है। आमचे ऐका. बादशहाची चाकरी पत्करा. त्यात काहीच वावगे नाही. तुमचे पिताजीसुद्धा आदिलशाही सरदार होतेच. आपले धाकटे बंधू व्यंकोजीराजे, त्यांचाच वारसा पुढे चालवीत आदिलशाही मनसबदार म्हणून आपल्या पिताजींची जहागिरी उपभोगीत आहेत. मी माझी सारी पुण्याई आणि बादशहाकडे असलेले वजन खर्चून तुम्हाला दख्खनची सुभेदारी देववीन; अगदी वंशपरंपरेने. तुम्ही तुमचे कर्तब शाबीत करीत आहातच. एकदा सुभेदारी मिळाली की, शाही फौजा आणि खजिना तुमच्या पायाशी हाजिर होईल. हवा तेवढा पराक्रम गाजवा. प्रदेश जिंका. आदिलशाही आणि कुतुबशाही पार नेस्तनाबूद करून टाका. जिंकलेल्या संपूर्ण प्रदेशाची मुखत्यारी वंशपरंपरेने तुमच्याकडे राहण्याची सनद मी बादशहाकडून मिळवून देतो. आपल्या ताब्यातील प्रदेशात तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे कारभार करू शकाल. बादशहाचे देणे दरवर्षी नियमित देत राहिलात तर तुम्हाला विचारणारे कुणी नाही.

स्वप्न तर मोठे गुलजार होते. वास्तवात उतरणे कितपत शक्य होते कुणास ठाऊक! शिवाय मिर्झाराजांचा शब्द डावलणे आलमगिराला सोपे नव्हते हेसुद्धा तितकेच खरे. मिर्झाराजे बादशहाच्या भेटीसाठी दिल्लीला जाण्याचा वारंवार आग्रह करू लागले. कोणतीही उघड प्रतिक्रिया न देता, विचार करण्यासाठी वेळ मागून घेऊन महाराजांनी रजा घेतली.

महाराजांच्या डेऱ्यात मोरोपंत पिंगळे, रघुनाथपंत कोरडे, त्र्यंबक सोनदेव, अनाजी दत्तो, नेताजी पालकर, कुडतोजी गुजर, तानाजी मालुसरे, बाजी जेधे अशा अगदी खास खाशांची मसलत बसली. पहाऱ्यावरील हशमांना सख्त ताकीद दिलेली होती. महाराजांनी मिर्झाराजांनी रंगविलेले स्वप्न सर्वांसमोर मांडले. बराच वेळ महाराज एकटेच बोलत होते. अखेर ते म्हणाले–

फर्मान आल्यानंतर बसलेल्या मसलतीत रघुनाथपंतांनी भविष्य केल्याप्रमाणेच राजपूत बोलत आहे. पण बादशहा महाकपटी, महासंशयी आणि पराकोटीचा धर्मद्वेष्टा. तो त्यांचा शब्द कितपत राखेल याचा संदेह वाटतो. मिर्झाराजे दिल्ली दरबारात जाण्याचा आग्रह करतात. मात्र वतनापासून शेकडो कोस दूर शत्रूच्या ऐन गुहेत जाण्याचे धाडस कितपत शहाणपणाचे ठरेल कुणास ठाऊक!

मिशीवर ताव देत कुडतोजी म्हणाले–

महाराज दोन लाख फौजेच्या गराड्यात घुसून शाहिस्ते खानाची शास्ता केली. मग आता का चिंता करायची. दग्याचा संशय आला तरी भुर्रर्र व्हायचे.

डोळे काढत तानाजी म्हणाले–

कुडतोजी, जरा सबूर. फौज मोगली खरी पण मुलूख आपला होता. सिंहगड हाकेच्या अंतरावर. लाल महालात महाराज राहिलेले. कशाची कुठे बरोबरी करता.

त्र्यंबक सोनदेव म्हणाले–

महाराज, खरोखरच संधी चालून येत असेल तर साधून घ्यावी. मुघलशाहीच्या खर्चाने अन्य दोन्ही शाह्या जिंकून घेता येतील. नाहीतरी वर्षानुवर्षांच्या रक्तरंजित परिश्रमांवर अशी एखादी मोगली स्वारी पार वरवंटा फिरवून जाते.

मनसुबा तर आमचासुद्धा तसाच होत आहे. शाही खजिना आणि फौज वापरून ताकद कमवावी आणि योग्य संधी सापडताच चाकरीचे जोखड झुगारून देऊन स्वराज्याचे निशाण फडकवायचे. नर्मदा ओलांडून सरळ दिल्लीलाच मोर्चे लावायचे.

नेताजी म्हणाले–

मनसुबा तर रास्त आहे. पण महाराज, आलमगीर म्हणजे आदिलशहा वा कुतुबशहा नव्हे. तो पक्का धूर्त आणि धोरणी. त्याचे मस्तक म्हणजे सैतानाचा कारखाना. त्याला हिंदूंची कोणतीही गोष्ट सरळ दिसत नाही. सरळ काही सुचत नाही. इस्लाम आणि इस्लामचा प्रसार याशिवाय तो दुसरे काही जाणत नाही. कदाचित तो रजपुतांची मसलत मानेल पण अट घालेल. मुसलमान हो. काय भरवसा?

दुजोरा देत मोरोपंत म्हणाले–

सरनोबतांची शंका मला रास्त वाटते. असाच हेतू मनी धरून थोरल्या महाराजसाहेबांनी मुर्तुझा निजामाचे बाहुले वापरून निजामशाहीवर ताबा ठेवण्याचा आटोकाट यत्न केला. दैवाने साथ दिली नाही. प्रयत्न फसला, शहाजहान बादशहाची मैत्री कामी आली. जीव-वतन वाचले. तेव्हा हाच मनसुबा पुढे चालवीत संधीची वाट पाहत आदिलशहाची चाकरी पत्करली. आईसाहेब आणि आपली ताटातूट सहन करीत दूर कर्नाटकातील हद्दपारी स्वीकारली. त्यांची सारी हयात खर्ची पडली, पण नतीजा काय हासिल झाला? मोठ्या शर्थीने त्यांनी दक्षिणी राज्ये राखली. पण स्वराज्य उभारणे त्यांना अखेरपावेतो, अगदी अली आदिलशहासारखा दुबळा शहा असतानासुद्धा शक्य झाले नाही. त्या उलट व्यंकोजीराजे भावाविरुद्ध हत्यार उचलून उभे झाले.

पंतप्रधानांचे निरीक्षण अगदी वास्तव आहे. चूक काढण्यास त्यात तिळाएवढासुद्धा वाव नाही. मग काय करावे असा सल्ला आहे मंडळी?

बराच वेळ शांततेत गेल्यावर त्र्यंबक सोनदेव म्हणाले–

तूर्तास काहीच जवाब देऊ नये. स्वत:स बांधून घेऊ नये. परिस्थिती कशी वळण घेते बघावे. खबरी काढाव्या. अंदाज घ्यावा आणि सावकाश निर्णय घ्यावा. राजपूत काही उद्याच परत फिरत नाहीत.

यावर थोडी अधिक चर्चा झाली आणि तूर्तास स्वस्थ राहण्याचा निर्णय होऊन मसलत उठणार एवढ्यात तानाजी म्हणाले–

महाराज, बहिर्जीचा नजरबाज कवापासून खोळंबलाय. येता बराबर पेश करायचं म्हनत हुतो, पन मामला गंभीर जानवला आनि उगा ऱ्हायलो. इजाजत आसंन तर पेश करतो.

काही विशेष बाब? अहो, ही नजरबाज मंडळी फार मोलाची. त्यांना असे खोळंबून ठेवायचे नाही. त्यांचा वेळ मोठ्या मोलाचा. त्यांची ओळख उघड झाली तर थेट प्राणांशीच गाठ. तर कधी अगदी हातघाईची खबर आणलेली असते. आणा, त्याला लवकर आत घेऊन या.

तानाजी स्वत: उठून गेले आणि त्यांच्यासोबत एक फकीर डेऱ्यात दाखल झाला.

आत येताच फकिराने जमिनीपर्यंत लवत मुजरा केला. त्याला पाहताच महाराज एकदम उद्गारले–

अरे वा कर्माजी! सोंग तर अगदी नामी काढलेत. काय खबर?

आश्चर्याने डोळे विस्फारत तानाजी म्हणाले–

कमाल आहे म्हाराज. अवो खुनेचा शबुद आन् निशानी दावली तवा ठेवला थांबवून. आनि तुमी तर पार येकाच नजरत अगदी नावानिशी वळखलात की.

ही माणसे नुसती नजरने पाहायची नसतात तानाजी. काळजाला काळीज मिळाले तर सावलीसुद्धा ओळख पटवते. गाई अवघ्या सारख्याच, पण वासरू नेमकी माय ओळखते. तसेच हे काळजाचे नाते असते. शिकून घ्या. काय सरनोबत?

जी म्हाराज.

असो. बोला कर्माजी. जागा सोडून स्वत: येण्याचा धोका घेतलात. काय एवढी तातडी?

म्हाराज, खबर वंगाळ हाय.

तुम्ही स्वत: आलात तेव्हाच ते कळले. बोला.

म्हाराज, परवा दिलेरचा आनि मिर्जाराजांचा मोटा झगडा झाला. विजापूरकरांना फितूर झाल्याचा आरोप दिलेर तुमावर करीत व्हता. गुनेगार करार करून तुमाला ठार करायचं मागत व्हता. मिर्जाराजे कबूल व्हइनात तवा म्हन्तो कसा की, राजे ते तुम्ही माज्यावर सोडा. मी त्येला असा उडवतो की, या कानाचं त्या कानाला कळनार न्हाय. तुमच्यावर जरा आंच येऊ देनार न्हाई म्हनत हुता. राजपूत लय तापला. त्यानं दिलेरला सज्जड दम दिला. आपल्या केसाला जरी धका लागला, तरी त्येची खैर ऱ्हानार नाय म्हनाला. पन पठान लय कपटी. आपल्या जातभाईंना मिर्जाराजाच्या इरुध फितवतोय. कदाचित थेट बाच्छावासबी काही भलंबुरं लिवायचा. नेम नाय.

खबर खरी? खात्री पटवली?

जी म्हाराज, अक्षी पक्की. म्या सोताच तितं पिकदान्यांची ने-आन करीत व्हतो. पेले भरीत व्हतो.

ठीक. कर्माजी तडक निघा. थेट जागेवर रुजू व्हा. उशीर नको. मोरोपंत…

मोरोपंतांनी फेकलेली थैली कर्माजीने अचूक झेलली. मुजरा घालीत तो तडक निघून गेला.

आता ही तर नवीनच काळजी निर्माण झाली म्हणायची महाराज.

त्यात काही नवीन नाही. आम्ही जेव्हा पहिल्यांदा मोगल छावणीत गेलो, तेव्हापासूनच आम्हाला या कारस्थानाचा अंदेशा होता. म्हणून आम्ही आणि मिर्झाराजे सतत सावध राहत होतो.

ते तर खरे. पण महाराज आता थोडी वेगळी परिस्थिती आहे. अफजलखानाने जसा संभाजीराजांना दगा केला, तसे काही घडण्याची भीती वाटते.

क्रमश:

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...