नेताजी पालकर यांच्या जीवनावरील ऐतिहासिक कादंबरी
📜⚔ अग्निदिव्य ⚔🗡
भाग - 5
नेताजी पालकर यांच्या जीवनावरील ऐतिहासिक कादंबरी📜⚔
अग्निदिव्य
लेखक : कल्याणीरमण बेन्नूरवार
__📜⚔🗡भाग - 5⃣📜⚔🚩🗡___
_⚔🚩⚔📜🚩___
दिलेरखान कसा
दगा करू शकेल याचे विविध तर्क अनेकांनी केले. वातावरणात एक वेगळाच तणाव
भरून राहिला. महाराज स्वस्थ राहून आपसात चाललेली चर्चा ऐकत होते. त्यांनी
कोणतीच प्रतिक्रिया उघड केली नाही. नेताजींनी मग एक अगदी नवीनच बेत मांडला.
महाराज, अशा
तणावात छावणीत गुंतून राहण्यापेक्षा आदिलशाहीविरुद्ध कोकणात स्वतंत्र
मोहिमेचा मनसुबा मिर्झाराजांसमोर मांडावा. आदिलशाही फौज दोन आघाड्यांवर
विभागली गेल्याने मोगली फौजेवरील ताण सैलावेल आणि आपल्यालासुद्धा मोकळीक
मिळेल. दिलेरचा हट्ट आणि मूळ कपटी स्वभाव पाहता, अशा काही योग्य कारणामुळे
आपण छावणीतून अनायासे दूर झालो, तर मिर्झाराजांवरील जबाबदारी टळल्याने
त्यांना ते सोईचेच ठरेल; त्यामुळे ही मसलत मान्य करणे त्यांना अनेक अंगांनी
सोईचेच ठरेल.
स्वत:च्या मांडीवर थाप मारून मोठ्याने हसत दुजोरा देत मोरोपंत म्हणाले–
गनीम सरनोबतांना
दुसरा शिवाजी म्हणतो ते उगीच नाही याचे प्रत्यंतर आले. काय नामी शक्कल
काढलीय बघा. वाह क्या बात है! साँप भी मर जाय और लाठी भी न टूटे। कोकणात
जिंकलेला मुलूख आपल्या सरहद्दींना लागून. तेव्हा तो आपण आपल्याच कब्जात
ठेवावा. मात्र ये विषयी आत्ताच चर्चा करण्याची गरज नाही.
महाराजांना
नेताजींनी सुचविलेली ही मसलत एकदम पसंत पडली. बैठकीचा सारा नूरच पालटून
गेला. अनेक पैलूंचा साधक-बाधक विचार झाला. अनेक तपशिलांवर खल झाला. आणि नीट
सविस्तर योजना ठरून बैठक उठली. नेताजी आणि मोरोपंतांना थांबवून महाराजांनी
मिर्झाराजांबरोबर करायच्या चर्चेचा तपशील पक्का केला.
दुसऱ्या दिवशी
सकाळी मंडळी मुजऱ्याला येऊन गेली आणि महाराजांनी नेताजी पालकरांना एकांतात
बोलावून घेतले. आदल्या दिवशीच्या चर्चेच्या संबंधाने थोडी बोलणी झाली. मग
नेताजींचा अंदाज घेत महाराज म्हणाले–
नेताजीकाका, मिर्झाराजांनी जे राजकारण पुढे मांडले आहे त्याबद्दल तुमचे काय विचार आहेत?
महाराज,
मिर्झाराजांच्या हेतूबद्दल शंका नको. त्यांचे हेतू प्रामाणिक दिसतात.
तख्ताची सेवा करता करता त्यांना आपले कल्याण साधावे वाटते. पण आलमगीर
महाबिलंदर. संशयी. धर्मांध. हिंदूंचा परमद्वेष्टा. तो दख्खनेत राहून
गेलेला. लोकांना आपलेसे करून, स्वत:कडे वळवून घेण्याचे आपले कसब त्याजपासून
लपून राहिलेले नसणार. थोरल्या महाराजांना आदबखान्यातून सोडवण्यासाठी
खेळलेली आपली चाल त्याने फार जवळून पाहिलेली आहे. म्हणूनच कदाचित आपण आणि
राजपूत एक व्हाल असा शक तो मनी धरून आहे. अगदीच नाही तर गेला बाजार आपल्या
प्रभावाखाली येऊन मिर्झाराजे तुम्हाला नरमाईने वागवतील या अंदेशापोटीच
त्याने मिर्झाराजांचे पायी दिलेरचा पायगुंता घालून मग पाठवले आहे; त्यामुळे
हे राजकारण बादशहा सहजासहजी मान्य करील असे वाटत नाही. पण दरबारातील हिंदू
मनसबदारांवरील मिर्झाराजांचे वजन पाहता त्यांना सहजासहजी डावलणेसुद्धा
बादशहाला सोईचे ठरणारे नाही. राजपूत तसे टोकाचे स्वाभिमानी, हा मुद्दा
त्यांनी प्रतिष्ठेचा बनवलाच तर रजपुतांना बिथरवणे तख्ताला परवडणारे नाही;
त्यामुळे जरी हे राजकारण मान्य केले तरी त्यात काहीतरी मेख मारल्याशिवाय
आलमगीर राहणार नाही हेही तितकेच खरे.
या राजकारणास
मूर्त रूप देण्यासाठी आम्ही बादशहाच्या भेटीस दिल्लीस जावे, असा आग्रह
मिर्झाराजे धरीत आहेत. त्यांचे म्हणणे असे की, केवळ पत्रापत्री करून,
खलित्यांवर आणि फर्मानांवर विसंबून एवढे मोठे राजकारण साधणार नाही.
दिल्लीला गेल्यास समोरासमोर चर्चा होईल. उभयतांच्या दिलातील शक-शुबह दूर
करता येईल. बादशहाने सुभेदारी देण्याचे ठरवलेच तर भरदरबारात मानमरातबातच तो
ती बहाल करील.
मिर्झाराजांच्या
तर्कात काहीच उणे नाही. तरी साधेल तितके दिल्लीस जाणे टाळावे. आपल्या
घरापासून, मुलखापासून, माणसांपासून एकट्याने इतके दूर जाणे फारच जोखमीचे
ठरेल. त्या महाकपटी अन् क्रूर बादशहाने काही दगाफटका करण्याचा प्रयत्न
केला, तर त्याच्या पोलादी तावडीतून निसटून शेकडो कोस पसरलेले मोगली
साम्राज्य ओलांडून, सुखरूप परत येणे पोरखेळ नव्हे, महाराज.
तुमचा शब्दन्
शब्द वास्तवाला आणि तर्काला अगदी धरून आहे काका, पण जर मिर्झाराजांनी फारच
नेट लावला आणि तेवढ्या एकाच बाबीवर राजकारण तटले तर ती जोखीमसुद्धा पत्करणे
भाग आहे.
मोहीम असो वा
राजकारण; जोखीम ही आलीच. यात दुमत असण्याचे कारण नाही. दुसरा पर्याय नसेल
तर जावे हे लागणारच. पण जाताना पूर्ण विचार करून, घराचा चोख बंदोबस्त करून,
पिछाडी सुरक्षित करून मगच जावे. आपल्या गैरहाजिरीत पठाण किंवा आदिलशहा
पाठीत वार करणार नाही याची काळजी घ्यावी. हे सांगणे सेवकास शोभणारे नाही,
मात्र गेलात तर परतीच्या वाटेचा नीट बंदोबस्त करून मगच स्वामींनी ठाव
सोडावा, असे सेवकाला वाटते.
परतीच्या वाटेचा बंदोबस्त? तो कसा काय म्हणता?
महाराज, जिवाची
जोखीम शिरावर घेऊन आपले नजरबाज स्वराज्यापासून दूर मुलूखभर हिंडत असतात.
देशभरात ठिकठिकाणी त्यांनी अनेक घरे आपल्या बाजूने वळवून घेतली आहेत.
त्याशिवाय ठिकठिकाणचे साधूंचे आखाडे, महंतांचे मठ, संन्याशांचे आश्रम,
क्षेत्रोक्षेत्रीचे उपाध्याय, देवळे हीसुद्धा आपल्या नजरबाजांनी स्वराज्यास
अनुकूल करून ठेवली आहेत. त्याउपर देशभरातील समर्थांचे मठ आहेतच. या
साऱ्यांच्या आसऱ्यानेच त्यांची कामे एवढ्या जलदीने आणि खात्रीशीरपणे पार
पडतात. ही अत्यंत मजबूत आणि कार्यक्षम साखळी दिल्लीपर्यंतच नव्हे तर थेट
काश्मीर आणि अटकेपारपावेतो पसरलेली आहे. जर जाणे अनिवार्य झालेच तर ही
साखळी अगदी जय्यत आणि चोख असली पाहिजे. इतकी चोख की, शाही
हुकूमनाम्यापेक्षा आपला परतीचा वेग दुप्पट-तिप्पट असला पाहिजे.
वाहवा! काका
वाहवा!! काल मोरोपंत म्हणाले ते काही नुसते थट्टेने नव्हे. वा! आता लगेचच
बहिर्जीला वर्दी पाठवा आणि बोलावून घ्या. जेवत असाल तर आचवण्यास समक्ष दाखल
व्हा म्हणावे. आधी तुम्ही स्वत: त्यांच्याशी बोलून घ्या. सारे नीट
तपशीलवार समजावून सांगा. आम्ही मग शेवटी बोलू. या कामी पैका बक्कळ लागेल.
तो कोठेच कमी पडता उपयोगाचे नाही.
चिंता नसावी
महाराज. नुकतीच जी आदिलशाही ठाणी जिंकली, तेथील लूट अजून मोगली खजिन्यात
भरणा केलेली नाही. मोरोपंतांच्या ताब्यातच आहे. मोगली अंदाधुंदीचा फायदा
उठवीत ती आपल्याकडेच राखून घ्यावी. त्याशिवाय महाराज, मोगलांसाठी आपण
कोकणात मोहिमा करणार. आपली फौज लढणार हे तर ठरलेलेच, या लढणाऱ्या फौजेचे
पगार आणि मोहिमेचा इतर खर्च मिर्झाराजांकडून मंजूर करून घेऊच की.
पुरंदराच्या तहात स्वराज्य एवढे साफ झाले आहे आणि त्या आधी झालेल्या
लुटालुटीत एवढे नागवले गेले आहे की, आता स्वखर्चाने मोहिमा अंगावर घेणे
परवडणारे नाही.
वा नेताजी काका,
काय बिनतोड आणि प्रभावी युक्तिवाद! क्षणभर आम्हालासुद्धा वाटले की, खरोखरच
स्वराज्याची स्थिती अशी आणि इतकी बिकट झाली आहे. यालाच आबासाहेब गनिमी
कावा म्हणायचे. गनिमाचाच पैका गनिमाच्याविरुद्ध. छान!
हे सगळे याच पायांशी शिकलो जी. नाहीतर आमची पोहोच ती काय? महाराज, इजाजत असेल तर रात्री डोक्यात विचार आला तो बोलून दाखवावा म्हणतो.
बोला, सरनोबत बोला. आजचा दिवस नवनवीन कल्पनांचाच आहे म्हणायचे.
महाराज, काल
कर्माजीने खबर आणली, पठाण आपल्या खुनाचे कारस्थान करतोय. मिर्झाराजे
बादशहाकडून तुम्हाला दख्खनची सुभेदारी देवविण्याच्या खटपटीत आहेत. दिलेरला
ते खपणारे नाही. या मुद्द्यावर दोन बलाढ्य मोगल सरदार आपसात झुंजताहेत. उघड
नसले तरी गुप्तपणे! नाही, म्हणजे आपले नजरबाज अगदी खात्रीशीर खबरी आणतात
हे खरे, पण मोगलांच्या अगदी आतल्या गोटातील कोणी वजनदार असामी फोडली
पाहिजे. नुसते निर्णयच नाही तर कोणा मुत्सद्द्याचे काय मत ते तपशीलवार
समजले पाहिजे. जसे अफजलच्या गोटात नाईकजी मामा पांढरे होते, तसे म्हणतो मी.
कल्पना तर अगदी रास्त आहे. आमच्यासुद्धा मनात असाच काहीसा विचार डोकावत आहे. बरे तुमच्या ध्यानात अशी कोणी असामी आहे का?
जी महाराज, जाधवराव सरकार. आपले मामा. आईसाहेबांचे बंधू.
ते शक्य वाटत
नाही. मराठ्यांच्या पिढ्या संपतात काका पण त्यांचे वैर संपत नाही.
पराकोटीचे वैर ते अशा निष्ठेने आणि नेटाने चालवतात की, फक्त वैऱ्याला
अपशकुन करायचा; या एवढ्याच कारणासाठी स्वत:चे नाकसुद्धा बिनदिक्कत कापून
मोकळे होतील. आजवर आम्ही कमी का आवतणे धाडली, आर्जवे केली, पण वैरापायी
त्यांना भाच्याच्या आणि बहिणीच्या मायेपरीस यवनाची गुलामी गोड वाटते. आज
आमचे मामासाहेब आणि रायबाधन देशमुखीण स्वराज्यात येते, तर स्वराज्याच्या
सीमा थेट वैनगंगेस जाऊन भिडल्या असत्या. पण सहजासहजी तसे होणे या देशाच्या
भाग्यात नाही. ठीक आहे. तुम्ही म्हणता तसे करायचेच. दुसरा कोणी असामी नजरेत
येतो का पाहा. आम्हीही तसा विचार करतो. हं! मात्र इतक्यात हा विषय कोणाकडे
बोलू नका.
महाराजांनी
मोरोपंतांना लगोलग बोलावून घेतले. कोकणच्या स्वतंत्र मोहिमेची परवानगी
मागणारा अर्ज मिर्झाराजांच्या नावे तयार करण्यास त्यांना सांगितले.
मोहिमेच्या सर्व खर्चाची तरतूद करण्याचा मुद्दा त्यात न विसरता घालण्याची
सूचना केली. रोजच्या रिवाजाप्रमाणे महाराज मिर्झाराजांच्या भेटीस निघाले
तेव्हा अर्ज तयार झाला होता. प्रसंग पाहून महाराजांनी अर्ज पेश केला. शिवाय
सर्व योजना तपशीलवार तोंडी मांडली.
मिर्झाराजांनी
अगदी लक्षपूर्वक अर्ज ऐकला. काही मुद्द्यांची बारीक चौकशी केली.
हुक्क्यातून एक भला मोठा कश घेऊन त्यांनी धुराचे लोट हवेत सोडले.
अर्जामागचे कारण त्यांच्यासारख्या मुरब्बी राजकारण धुरंधराच्या लक्षात
आल्यावाचून राहिले नाही. आपला गंभीरपणा हास्याच्या गडगडाटात लपवीत ते
म्हणाले–
क्यों राजासाहब,
कंटाळलात आमच्या छावणीला? दिल्लीहून निघालेल्या मोठ्या तोफा लवकरच छावणीत
दाखल होतील. मागवल्या होत्या तुमच्याविरुद्ध वापरण्यासाठी, पण आता
आदिलशहाविरुद्ध वापरू. एकदा त्या तोफांचा धडाका घुमायला लागला की, विजापूर
फत्ते व्हायला वेळ नाही लागणार.
ही दर्पोक्ती ऐकून महाराजांना हसू आले. पण हसू दिसू न देता महाराज गंभीरपणे म्हणाले–
कंटाळा कसा येईल
राजाजी? आपल्या सहवासात आम्हाला आमच्या आबासाहेबांच्या सहवासाचे सुख
मिळते. पण सगळी ताकद एकाच मोर्च्यावर लावण्यापेक्षा अलग अलग मोर्चे उघडले
तर गनिमाचे लक्ष विचलित होते. शक्ती विभागली जाते, हे आपल्यासारख्या अनुभवी
आणि जाणत्या सेनापतीला मी सांगणे उचित नव्हे.
बहोत खूब! क्यों दिलेरखान तुमचा काय मशवरा आहे?
हातातील शिकार सहजासहजी निसटून जाऊ देण्याइतका दिलेर खुळा नक्कीच नव्हता पण आपला कुटिल हेतू लपविण्यात तो नक्कीच वस्ताद होता.
आमचा विचार
वेगळा आहे. शिवाजीराजे वीस वर्षांपासून आदिलशाहीशी झुंजत आहेत; त्यामुळे
आदिलशाहीची नसन्नस ते ओळखतात. त्यांचे वडील त्याच दरबाराचे जहागीरदार;
त्यामुळे माझा विचार असा आहे की, विजापूरचा सारा जिम्मा शिवाजीराजांनी
उचलावा. माणसे फोडावी. शहरावर एल्गार करावा. आम्ही मागे राहून कुमक करू.
मिर्झाराजे
चमकले. त्यांनी आपली तीक्ष्ण नजर दिलेरच्या नजरेला भिडविली. दिलेरने नजर
चुकवीत हलकेच मान खाली केली. महाराजही दचकले. सरळ सरळ अफजलचा डाव. बऱ्याच
वेळच्या शांततेनंतर मिर्झाराजांनी सोडलेला सुस्कारा डेऱ्यात घुमला.
नहीं, कतई नहीं।
विजापूरची मोहीम आलमपन्हांनी खास तुझ्यावर आणि आमच्यावर सोपवलेली आहे.
त्या मोहिमेत तिसऱ्या नवख्या माणसाला आघाडी देणे ही शाही हुकमाची तौहीन
समजली जाईल. दिलेरखान, इरादे नेक रहे तो कामयाबी कदम चूमते देर नहीं लगती।
शिवाजीराजांचा अर्ज आम्ही मंजूर करीत आहोत. पुरणमल बुंदेला तुम्ही आणि गाझी
बेग तुम्ही दोन-चार दिवसांत शिवाजीराजांच्या मोहिमेची पूर्ण माहिती घ्या.
त्यांना लागणारे साजसामान आणि खजिना मुहैया करून द्या. हफ्तेभर में कोंकण
की मुहीम शुरू हो।
क्रमश:
No comments:
Post a Comment