#
आदिवासी_क्रांतिकारी_भागोजी_नाईक_यांना
आदिवासी_क्रांतिकारी_भागोजी_नाईक_यांना
भागोजी नाईक मूळचे सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे गावचे राहणारे. १८५५ साली भिल्ल, महादेव कोळींच्या बंडाला उत्तेजन दिल्याचा ठपका ठेवून त्यांना शिक्षा फर्मावण्यात आली. सुटकेनंतर एक वर्ष राजनिष्ठेचे जामीनपत्र धुडकावून त्यांनी सरळ बंडात उडी घेतली. भागोजी नाईकांच्यानेतृत्वाखाली झालेले उठाव धोकादायक होते. नांदूरशिंगोटेच्या डोंगरात ५० भिल्ल जवानांची तुकडी उभी केली. नाशिक-पुणे मार्गावर दबदबा वाढवला. ज्या घाटात ब्रिटिशांविरुद्ध लढा उभारला त्याला आजही ‘भागोजी नायकाचा घाट’ म्हणून ओळखतात. भागोजीचा पराभव करण्याच्या जिद्दीने नगरचा पोलीस सुप्रीटेंडेंट जे. डब्ल्यू. हेंन्ड्री २० ड्रेसवाले व २० बिगर ड्रेसवाले पोलीस घेऊन चाल करण्यास सिद्ध झाला. मात्र पहिल्याच माऱ्यात हेंन्ड्रीच्या पाठीमागचा पोलीस ठार झाला व क्षणार्धात दुसऱ्या गोळीने हेंन्ड्रीही ठार झाला. वीर भागोजींचा प्रतिकार पाहून बाकी पोलीस अधिकारी माघारी फिरले.
भागोजींनी हेंन्ड्रीचा निःपात केला या बातमीने भिल्ल, महादेव कोळी बंडखोरांमध्ये उत्साह संचारला. सुरगण्याच्या पवारांकडे भिल्ल, महादेव कोळी क्रांतिकारक साहाय्य मिळविण्यासाठी जात असल्याचे समजल्यावर कॅप्टन नूतालने बंडखोरावर चाल केली. मात्र आदल्या दिवशीच बंडखोर त्र्यंबकेश्वरचा खजिना लुटून दुसरीकडे गेले होते. याची चीड येऊन डोंगराळ भागातील अनेक महादेव कोळी लोकांना पकडून फाशी देण्यात आली. १२ नोव्हेंबर १८५७ रोजी संध्याकाळी ब्रिटिशांना बातमी मिळाली की पेठ महालात महादेव कोळींचा उठाव झाला, हरसुलचा खजिना लुटला आणि सरकारी कार्यालयाची होळी झाली. नूताल तिकडे वळला खरा मात्र तोवर क्रांतिकारकांनी धरमपूरला पळून गेले. खजिन्यातील सारी मालमत्ता इंग्रजांच्या हातून गेली होती. त्यावेळी भिल्ल, महादेव कोळी व रामोशी जमातीच्या आदिवासी क्रांतिकारकांची संख्या २ हजारवर गेली होती. नूतालच्या हल्ल्याने अनेक आदिवासी वीर धारातीर्थी पडले व पकडले गेले. बंडाचे वातावरण निर्माण करणे व बंडखोरांना साहाय्य करणे हे आरोप ठेवून पेठचा राजे भगवंतराव भाऊराजे यांना ब्रिटिशांनी फाशी दिली. कॅ. नूताल दक्षिणेकडे वळला. त्याचा सामना भागोजीचा भाऊ महिपती व पाचशे आदिवासी योद्धयांशी लढावे लागले. मात्र यात महिपतीला आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली.
१८५९ मध्ये भागोजी व हरजीने इंग्रजांची नासधूस करण्याचा सपाटा लावला. ५ जुलैला संगमनेच्या अभोरदरा येथे भागोजीच्या तुकड्यांना गाठून नूतालने चाल केली यात भागीजींचा मुलगा यशवंतां धारातीर्थी पडला. भागोजीच्या सैन्याने ब्रिटिश हद्द ओलांडून निजामाला जाऊन मिळायचे ठरवले व पलायन केले. जाताना कोपरगावचा इंग्रजांचा खजिना लुटला.
वीर भागोजींना जिंकण्यासाठी ब्रिटिशांनी खास मेजर फ्रॅक्साचरची नेमणूक केली. जागोजागी गुप्तहेर पेरले. जागोजागी फितुरी आणि इंग्रजांच्या आमिषाने भिल्ल, महादेव कोळी लढवय्यांचा पराभव होऊ लागला. याच सुमारास गुप्तहेराने ब्रिटिशांना बातमी दिली, भागोजी व त्यांचे लोक सिन्नरच्या माठसाखर डोंगराखाली मुक्कामी आहेत. चौफेर भागोजींच्या सैन्याची नाकेबंदी झाली, बंडखोर माऱ्याच्या टप्प्यात आल्यावर गोळ्या झाडल्या गेल्या, भागोजी व त्यांच्या सैन्याला हालचालीलाही वेळ मिळाला नाही. या गोळीबारात भागोजींसह ४५ लोक मारले गेले. यानंतर भागोजींच्या कुटुंबाची कत्तल करण्यात आली. वीर भागोजींची समाधी नांदूरशिंगोटेपासून एक मैलावर आहे. त्यांच्या घराची लाकडे निमीन गावच्या देवीच्या देवळास लावली आहेत. हेच भागोजी नाईकांचे स्मारक…
संदर्भ- स्वातंत्र्यलढ्यातील आदिवासी क्रांतिकारक: डॉ. गोविंद गारे
No comments:
Post a Comment