विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 18 November 2023

नेताजी पालकर यांच्या जीवनावरील ऐतिहासिक कादंबरी📜अग्निदिव्य ⚔🗡भाग - 6

 


नेताजी पालकर यांच्या जीवनावरील ऐतिहासिक कादंबरी📜अग्निदिव्य ⚔🗡भाग - 6

 नेताजी पालकर यांच्या जीवनावरील ऐतिहासिक कादंबरी📜⚔


अग्निदिव्य
लेखक : कल्याणीरमण बेन्नूरवार

__📜⚔🗡भाग - 6⃣📜⚔🚩🗡___


_⚔🚩⚔📜🚩___

दुपारचे जेवण होताच महाराजांच्या डेऱ्यात पुन्हा मसलत बसली. मिर्झाराजांसमक्ष घडलेल्या प्रसंगाबद्दल नीट चर्चा झाली. तशीच मोहिमेची तपशीलवार आखणी झाली. सरतेशेवटी मोगली छावणीतील बडी असामी फोडण्याचा नेताजींनी सुचविलेला मुद्दा पुढे आला. अनेक नावे सुचविली गेली. चर्चिली गेली. अनेक शंका निघाल्या. अनेक कुशंका उपस्थित झाल्या. काही उडविल्या गेल्या, काही सुटल्या; बऱ्याच तशाच राहिल्या. मग अखेर मोरोपंतांनी विचार मांडला–


महाराज, हा विषय असा घाईगडबडीत, एकाच बैठकीत निकालात निघणारा नाही. मला वाटते, सध्या आपलाच एखादा खात्रीचा माणूस मोगलांच्या आतल्या गोटात घुसवावा. त्याने व्यवस्थित चाचपणी करावी. योग्य असामी हेरावी. फोडावी. सर्व बंदोबस्त नीट जुळवावा आणि परत यावे.
हा पर्याय ऐकून सारेच गंभीर झाले. महाराजांविरुद्ध, आपल्या महाराजांविरुद्ध गनिमाला सामील? जे स्वप्नात येणेसुद्धा पाप, ते राजकारणातले नाटक म्हणून का होईना प्रत्यक्षात करायचे? छे! छे!! काहीतरीच काय! साऱ्यांचे बोलणेच बंद झाले. शेवटी महाराजांनीच शांततेचा भंग केला.


ठीक, ठीक. या विषयावर नंतर सावकाश बोलता येईल. आता घाई करून लवकरात लवकर छावणी सोडण्याच्या तयारीला लागा. हुकूम होताच अर्ध्या घटकेत मुक्काम हलवता आला पाहिजे अशा जय्यत तयारीत राहा. मोरोपंत, तुम्ही जातीनिशी त्र्यंबकपंत आणि कुडतोजींना संगे घेऊन खजिना आणि साहित्य दोन-तीन दिवसांत पदरात पाडून घ्या. पंतप्रधान, या मोहिमेत सरनोबतांनी मिळवलेली लूट तुमच्याच ताब्यात आहे. बोभाटा न होता ती राजगडाकडे रवाना होऊ द्या. रजपुताकडून मिळणारा खजिनासुद्धा परस्पर राजगडावर पोहोचता करा.


उठता उठता सहज बोलल्याप्रमाणे नेताजी म्हणाले–
महाराज, रात्रीपावेतो बहिर्जी दाखल होईल.
नेहमीचीच बाब असल्याप्रमाणे महाराज म्हणाले–
ठीक आहे. त्याचा खोळंबा करू नका.


रात्री बहिर्जीला घेऊन नेताजी हुजूर दाखल झाले. राजपूत योद्ध्याच्या सोंगातले बहिर्जी ओळखणे अशक्यच होते. डेऱ्याच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत महाराज अस्वस्थपणे फेऱ्या घालीत होते. नेताजी आत आल्यावर महाराजांच्या फेऱ्या थांबल्या. डेऱ्याच्या एका टोकाला उभे राहून महाराजांनी दोघांकडे एकटक पाहिले. त्यांच्या नजरेतील अस्वस्थता जाणवूनसुद्धा काही विचारण्याचा धीर नेताजींना झाला नाही. काही वेळाने महाराजांची नजर निवळली. नेहमीसारखे प्रसन्नपणे हसत ते मसनदीवर लोडाला टेकून बसले.


या नाईक. गडबडीत बोलावणे करावे लागले. काम तसेच तातडीचे आहे. पहिले काम. चार दिवसांच्या आत पन्हाळ्याची खडान्खडा माहिती दाखल झाली पाहिजे. तपशील तुम्हाला सांगण्याची गरज नाहीच.
झाले म्हणून समजा महाराज. दुसरे?


मग नजरबाजांच्या देशभर सर्वदूर पसरलेल्या दुव्यांची आणि साखळीची महाराजांनी बारकाईने चौकशी केली. बऱ्याच उशिरापर्यंत महाराज प्रत्येक बाब तपशीलवारपणे समजावून सांगत राहिले. बहिर्जी मनाच्या टीपकागदाने प्रत्येक तपशील डोक्यात टिपून ठेवत होता. जरूर तिथे अधिक तपशील जाणून घेत होता. एका साध्या सूचनेवर एवढ्या कमी अवधीत महाराजांनी केलेला खोलवर विचार आणि तयार केलेली तपशीलवार योजना पाहून नेताजी अचंबित होऊन गेले. ते फक्त दोघांकडे टकमक पाहत राहिले. बोलणे संपता संपता महाराजांनी दोन खलिते बहिर्जीच्या हवाली केले. एक आईसाहेबांसाठी आणि दुसरा अनाजी दत्तोंसाठी.



तर नाईक रातोरात रवाना व्हा आणि लगोलग राजगड गाठा आणि ताबडतोब कामाला सुरुवात होऊ द्या. खर्चांचे तोंड पाहू नका. लागेल तशा रकमा अनाजींकडून उचला. माणसे मात्र चोख आणि नीट पारखलेली असू द्यात. आई भवानी न करो, पण जर डाव उलटा पडला तर लवकरात लवकर घरी सुखरूप परतता आले पाहिजे. अगदी बिनबोभाट.
नाईक, एखादा फितूर किंवा एखादी क्षुल्लक चूक महाराजांच्या घाताचे कारण होऊ शकते याची जाणीव अष्टौप्रहर जागती राहू द्या.


जी. चिंता करू नगा सरकार. अशी चोख येवस्था व्हईल की, या कानाचं त्या कानाला कळनार न्हाय.
काही विचारणे असेल तर लगेच विचारून घ्या नाईक. कुठलीही शंका वा दुविधा राहू देऊ नका. आणि हा विषय फक्त तुमच्यात आणि आमच्यात. सरनोबतांनासुद्धा यात त्रास देणे नाही. प्रत्येक बारीकसारीक घडामोड आम्हाला थेट कळली पाहिजे. तुम्हाला ती कितीही क्षुल्लक वाटली तरी आणि आम्ही कोठेही आणि कशातही गुंतलो असलो तरी. ढिलाईचा मुलाहिजा राहणार नाही.


म्हाराज, ह्ये काम तर करतोच. नि:शंक ऱ्हावा. पन इजाजत आसंन तर मनात आलेली गोठ सांगतो. सौराष्ट्रात येरावळ बंदरात आरमार तयार ठेवलं तर? खुश्कीची वाट धोक्याची वाटली तर दर्यातून घर जवळ करता ईल.


वा! नामी कल्पना. एकटे वेरावळच नको अन्य तीन-चार बंदरांतसुद्धा अशीच व्यवस्था करावी लागेल. आम्ही दर्यासारंगांशी बोलतो आणि तुम्हाकडे सांगावा धाडतो. मात्र सांगाव्याची वाट न पाहता तयारीला लागा.


जी म्हाराज.
आता या. मात्र पन्हाळा…
चार दिवसांत खबर दाखल करतो म्हाराज. येतो.
मुजरा करून बहिर्जी डेऱ्यातून बाहेर पडला आणि रात्रीच्या अंधारात विरघळून गेला.


उठू पाहणाऱ्या नेताजींना महाराजांनी खुणेनेच बसते केले.
कोण आहे रे तिकडे? पहारे वाढवा. चौफेर कडक लक्ष असू द्या. डेऱ्याच्या पिछाडीला दोन हशम आवाजाच्या टप्प्याबाहेर उभे करा. सरनोबत आत असताना कोणीही आत डोकावता कामा नये. अगदी पंतप्रधान मोरोपंत जरी आले, तरी इजाजत नाही. स्पष्ट सांगा. कितीही निकडीचे काम असले तरी नाही.
हुकूम महाराज.


हुजऱ्या बाहेर गेला. काही वेळ महाराज डोळे मिटून स्वस्थ बसून राहिले. त्यांच्या चेहऱ्यावरचे बदलते भाव निरखीत नेताजी स्वस्थ बसून राहिले. महाराजांनी उठून पुन्हा येरझारा घालण्यास सुरुवात केली. हात मागे बांधलेले; एकमेकांत गुंफलेल्या बोटांची अस्वस्थ चाळवाचाळव. नजर खाली जाजमावर. मध्येच थबकून नेताजींकडे पाहत. काही बोलतील असे वाटून नेताजी किंचित पुढे झुकत. पण नजर वळवून पुन्हा येरझारा सुरू. असा बराच वेळ गेल्यावर अखेर नेताजींनीच तोंड उघडले.


काही वाईट खबर आलीय का महाराज?
अं? नाही.
मग काही अवघड मनसुबा?
होय नेताजीकाका. अवघड मनसुबाच म्हणायचा. तुम्हाला कसा सांगावा उमगेनासे झाले आहे. जीभच रेटत नाही.


महाराज, आपली इच्छा आमच्यासाठी शंभू महादेवाची आज्ञा. असा काय मोठा अवघड मनसुबा असायचा? तुमच्या शब्दांपरीस आमच्या प्राणांचे मोल मोठे नाही. कितीही अवघड असू देत. जिवाची बाजी लावू आणि तडीस नेऊ. निश्चिंत राहावे.


काका, प्रश्न नुसती जिवाची बाजी लावण्याचा असता, तर मनसुबा भरसदरेवर सांगितला नसता का? पण त्यापेक्षाही नाजूक आणि अवघड आहे. घरंदाज पतिव्रता हसत हसत नवऱ्यासाठी सती जाते. पण नवऱ्याने अगदी प्राणांची शपथ घातली तरी बदफैल करत नाही. तसाच अवघड हा मनसुबा आहे असे समजा.


माझा जीव घाबरा व्हायला लागलाय महाराज, असे कोड्यात बोलू नका.
ठीक आहे काका. बोलले तर पाहिजेच. तुमचा मनसुबा असा की, मोगली छावणीत आपला माणूस हवा. त्यासाठी वजनदार असामी फोडावी. त्यावर मोरोपंतांचा तोडगा असा की, अशी असामी भेटेपर्यंत आपलाच कोणी खात्रीचा माणूस मोगली छावणीत घुसवावा. याच दोन बाबींवर आम्ही विचार करीत आहोत. तुमचे काय मत आहे काका?
मोरोपंतांचा मनसुबा बिनतोड आहे. योग्य असामी हेरण्यास बळ आणि वेळ दोन्ही मिळेल.
आमचाही कौल तसाच जातोय काका. कोणता मोहरा इरेला घालावा?
खरोखरच अतिशय नाजूक बाब आहे महाराज. आपल्याविरुद्ध, स्वराज्याविरुद्ध गनिमाला मिळायचे? राजकारणातले एक नाटक म्हणूनसुद्धा अवघडच. त्यापरीस दहा वेळा गर्दन उतरून पायी वाहणे सोपे; मुलूखमैदानाच्या तोंडाशी स्वत:च्या हाताने बांधून घेणे सोपे.


जाणतो आम्ही. म्हणूनच फार अस्वस्थ आहोत. आपला माणूस असा असावा ज्याच्या इमानात किंचितसुद्धा खोट नाही. निष्ठेत कुठेच उणे नाही. मातब्बर असा, जो मनसबदारांच्या, घरंदाजांच्या वरच्या गोतावळ्यात सहजी सामावला जावा. त्याच्या नावाला किंमत आणि शब्दाला वजन हवे. गनिमाकडील मोहरा फोडताना माणसाची अचूक पारख करणारा आणि बोलणी करण्यासाठी पुरेसे अधिकार असणारा असावा. मुत्सद्दी असा असावा ज्याला कठीणातल्या कठीण परिस्थितीत अचूक निर्णय घेता यावा. हरघडी आमच्या सल्ल्याची त्यास गरज भासू नये. पाण्यात ऐकणारा आणि अंधारात पाहणारा असला पाहिजे. काका, स्वराज्यासाठी मरणे फार सोपे. पण स्वराज्याच्या हितासाठी का होईना बेइमानी केल्याच्या बदनामीचा डाग लावून घेणे फार अवघड! कुळवंतिणीला जसा शिलावर शिंतोडा उडलेला खपत नाही, तसेच हे म्हणूनच तर जीभ रेटत नाही.


खरे आहे महाराज. फारच अवघड कामगिरी आहे ही.
डेऱ्यात पुन्हा शांतता पसरली. पुन्हा महाराजांच्या येरझारा सुरू झाल्या.


डेऱ्याच्या एका टोकाला गेलेले महाराज तिथेच थबकले. उघड्या दारातून अंधारात जणू त्यांचे डोळे वेध घेत होते. गर्रकन वळून महाराज नेताजींना संमुख झाले. डोळे अश्रूंनी डबडबलेले. सारे प्राण एकवटून बोलावे तशा जड आवाजात ते एकदम बोलले.


नेताजीकाका, तुम्ही… तुम्ही कराल हे दिव्य आमच्यासाठी? आमच्या शब्दाखातर पेलाल हे शिवधनुष्य?


जहरी भुजंग अचानक अंगावर पडावा तसे नेताजी दचकले. ते ताडकन उठून उभे राहिले.
काय? मी? महाराज, त्यापरीस आगीत लोटा. तोफेला बांधून उडवा. तोंडातून ब्र नाही निघायचा.
ठाऊक आहे. म्हणूनच एवढा वेळ जीव धजावत नव्हता. ओठात शब्द येत होते पण जीभ रेटत नव्हती.
पुन्हा अस्वस्थ शांतता पसरली. महाराजांच्या येरझारा पुन्हा सुरू झाल्या. शेल्याने डोळे टिपत नेताजी खालमानेने बसून राहिले. काही वेळाने त्यांनीच अस्फुट स्वरात हाक मारली–
महाराज…
अं?


महाराज, कृपा करा पण गैरसमज करून घेऊ नका. आपली इच्छा शंभू महादेवाचा आदेश. पण हे राजकारण मोठे नाजूक. केवळ भावनेच्या आवेगात करायचे हे काम नाही. चोहो बाजू नीट पारखल्या पाहिजेत. महाराज, आम्ही सरनोबत. आपले आप्त. गनीम आम्हास दुसरा शिवाजी म्हणतो. अशी असामी सहजासहजी धन्याला सोडून गनिमास मिळेल, यावर गनिमाने तरी विश्वास कसा ठेवावा? गनीम आम्हास कसा जवळ करील? महाराज, आमची बदनामी वेगळी, पण बोल आपल्यावरसुद्धा आल्याशिवाय राहणार नाही. आपली पारख चुकली, असेच जग म्हणत राहणार. परके तर परकेच पण आपलेसुद्धा बोल लावतील. कसे जमावे हे?


आम्ही पूर्ण विचार केला. साऱ्या शक्यता पडताळल्या. कोणत्याही बाजूने विचार केला तरी… तरी या कामी आपल्यासारखा कोणी लायक सापडतच नाही. म्हणून तर आम्ही तुम्हाला गळ घालीत आहोत. ज्या बाबी आत्ता तुम्ही अडचणीच्या म्हणून सांगितल्या त्याच आमच्या दृष्टीने तुमची बाजू मजबूत करणाऱ्या आहेत. त्याविषयी आम्ही केलेला विचार ऐका. आपण सरनोबत. कुणाचे? तुर्कांना गाडून टाकून स्वत:चे धर्माचे राज्य स्थापू पाहणाऱ्या, स्वत:चे स्वतंत्र, सार्वभौम राज्य निर्माण करण्याचे भव्यदिव्य पवित्र स्वप्न पाहणाऱ्या वीराचे. आज काय स्थिती आहे? स्वराज्याचे स्वप्न पार बासनात गुंडाळून ठेवून आज आम्हीच मोगलांपुढे गुडघे टेकले आहेत. आमचे चिरंजीव मोगलांचे पाचहजारी सरदार. आम्ही दख्खनच्या सुभेदारीची आस धरून बसलेलो. अशा परिस्थितीत तुमच्यासारखा कर्तबगार आणि महत्त्वाकांक्षी माणूस एका चाकराचा पडचाकर होऊन राहण्यापेक्षा थेट बादशहाचाच सरदार आणि मनसबदार होणे केव्हाही पसंत करील. तुम्हाला आस होती स्वतंत्र राज्याची, स्वराज्याची; पण ज्याने स्वराज्याचे हे स्वप्न दाखवले, हा एवढा खेळ मांडला, तोच मोगली दणक्याने पार कोसळून पडला. आपला जीव, दौलत वाचवण्यासाठी गुलामी पत्करण्यास तयार झाला. मोगली झंझावातात स्वराज्याचे स्वप्न बारा वाटा उधळले. मग ते उराशी कवटाळून तुम्ही तुमचा जीव विनाकारण का आगीत धरावा? जर शिवाजी सुभेदारी मिळवण्याची आस धरतो, तर तुम्ही, प्रतिशिवाजी, सरदारी आणि मनसबदारी मिळवू शकणार नाही की काय? तुमच्या मनगटात निश्चितच तेवढी ताकद आहे. शिवाजीने दौलत उभी केली ती तुमच्यासारख्या स्वत:चा जीव इरेला घालणाऱ्यांच्याच जिवावर ना? मग तुम्ही तुमची दौलत उभारण्यात गैर ते काय? एकाच दणक्यात स्वप्न वाऱ्यावर सोडून, प्रतिज्ञा विसरून, त्याच्यासाठी जीव पाखडणाऱ्या, रक्त सांडणाऱ्या, सख्या, सोबत्या, सवंगड्यांना विसरून, जो जीव आणि दौलत वाचवण्यासाठी गनिमापुढे लोळण घेतो, त्याची चाकरी का करीत राहावी?
क्रमश:

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...