नेताजी पालकर यांच्या जीवनावरील ऐतिहासिक कादंबरी
📜⚔ अग्निदिव्य ⚔🗡
भाग - 7
नेताजी पालकर यांच्या जीवनावरील ऐतिहासिक कादंबरी📜⚔
अग्निदिव्य
लेखक : कल्याणीरमण बेन्नूरवार
__📜⚔🗡भाग - 7⃣📜⚔🚩🗡___
_⚔🚩⚔📜🚩___
बस्स! बस्स!!
महाराज बस्स!!! आता अजून अधिक नाही ऐकवत असे अभद्र. महाराज, पोटच्या
पोराच्या निष्ठेची शंका येईल, लग्नाच्या बायकोच्या पातिव्रत्याबद्दल मनात
संशय येईल, एवढेच काय कपाळ फुटले तर जन्मदात्या आईच्या पावित्र्याबद्दल मन
साशंक होईल, पण महाराज आपल्या विषयी असे विचार? स्वप्नातसुद्धा कधी मनात
आले, तर पुढच्याच क्षणी हे प्राण कुडी सोडून गेलेले असतील. नका, नका असे
काळजाला घरे पाडणारे बोलू नका आणि बोलायला लावू नका.
नेताजीकाका,
ज्याची कल्पनासुद्धा असह्य ते वास्तवात किती दाहक असेल? नि:संशय हे
अग्निदिव्यच आहे. पुरोचनाने बांधलेल्या लाक्षागृहात पांडवांऐवजी राहायला
ठेवलेल्या भिल्लिणीच्या कुटुंबाने केले तसेच, आम्ही तुम्हाला खर्ची घालू
पाहत आहोत. मान्य आहे आम्हाला. मुरारबाजी आणि बाजी प्रभूसाहेब कामी खस्त
झाले. त्यांची कीर्त डंक्यावर चढली. येणाऱ्या पिढ्या त्यांचे नाव गौरवाने
आणि अभिमानानेच घेतील पण जोवर आपण परत येत नाही आणि आम्ही तुम्हाला जवळ
करीत नाही तोवर आपल्या नशिबी केवळ तिरस्कार, दूषणे आणि शिव्याशापच असणार,
याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे. कारण ही मसलत फक्त तुम्हाला आणि आम्हालाच
माहीत असेल. अगदी आईसाहेबांसमोरसुद्धा ही मसलत आम्ही उघड करणार नाही. कारण
गाठ आहे औरंगजेबासारख्या महापाताळयंत्री, कपटी, धूर्त, कारस्थानी,
क्रूरकर्मा धर्मांधाशी. किंचित जरी संशय आला तरी तो तुमचा जीव घेतल्याशिवाय
राहणार नाही. तुम्ही अशा परिस्थितीत जीव गमावलात तर तुम्हावरचा बदनामीचा
डाग धुणे आम्हास पण शक्य होणार नाही. आमचा जितका भरवसा स्वत:वर आहे,
त्यापेक्षा कांकणभर जास्त भरवसा तुम्हावर आहे. म्हणून हे अग्निदिव्य
तुम्हीच करावे, अशी आम्ही तुम्हाला दोन्ही हात जोडून आर्जवाची विनंती करतो
आहोत. काका, ही विनंती आहे. आज्ञा नव्हे. आपण नाकारलीत तरी आम्हास वावगे
वाटणार नाही. स्वराज्याचे पाईक स्वराज्यासाठी हसतहसत मरण कवटाळतात, पण
थट्टेत केलेला बेइमानीचा लटका आरोपसुद्धा सहन करू शकत नाहीत, याची आम्हास
पूर्ण जाणीव आहे. आत्ताच्या आत्ता, तातडीने उत्तर देऊ नका. विचार करून काय
ते ठरवा. आपले उत्तर काहीही आले, तरी आमच्या मनातील आपल्या स्थानाला धक्का
लागणार नाही, याची खात्री असू द्या.
नेताजी उठले. त्यांनी महाराजांच्या पायांवर लोळण घेतली. भरल्या गळ्याने ते कळवळून म्हणाले–
नको, नको
महाराज, असे बोलू नका. चाकरासाठी एवढा विचार करणारा धनी लाभावा या परते
भाग्य ते कोणते? आपल्या मनात एवढा विश्वास, एवढे प्रेम असताना आम्ही
करंट्यांनी कसला विचार करायचा! अशा धन्यावरून छप्पन्न नेताजींच्या जिंदगी
ओवाळून टाकल्या तरी कमी पडाव्यात. आपल्या दिलात या य:कश्चित चाकराला एवढी
मोठी जागा दिलीत, आता जग मला काय म्हणेल, इतिहासात माझ्याबद्दल काय लिहिले
जाईल, याची मला पर्वा नाही. आपण सांगाल ते दिव्य करायला हा नेताजी तयार
आहे.
महाराजांनी
नेताजींना दोन्ही खांद्यांना धरून वर उचलले आणि उराशी घट्ट कवटाळले. नंतर
मसनदीवर शेजारी बसवून घेतले. त्यांचा आवेग काहीसा शांत झाल्यावर महाराज
हळुवार आवाजात म्हणाले–
नेताजीकाका, असे
भावनेच्या समुद्रात वाहून जाऊ नका. हा निर्णय सोपा नाही आणि सहजासहजी
बदलताही येणार नाही. उद्दिष्ट गाठल्याशिवाय परतवाट नाही. परतीचे दोर कापून
पुढे झेपावण्याचा हा निर्णय आहे. निकराच्या झुंजीत शत्रूला मारतमारत चार
घाव घेऊन मृत्यूच्या कवेत जाणे वेगळे. हे म्हणजे उघड्या डोळ्यांनी स्वत:चे
जिवंत मरण रोज पाहणे आहे. काका या बाबीचा पण विचार करा की, उद्या फासे उलटे
पडले, तर आम्ही काहीही करू शकणार नाही. फक्त आतल्या आत जळत राहू. स्वत:ला
दोष देत राहू. उघडपणे मदतीचा हात आपल्या समोर करणे शक्य होणार नाही. पैलथडी
गाठेपर्यंत ही झुंज तुम्हास एकट्याने झुंजायची आहे. पूर्ण विचार करूनच
निर्णय घ्या. मात्र विचार तुम्हीच करायचा आणि निर्णयही तुमचा तुम्हीच
करायचा, कोणाचा सल्ला-मशवरा घेण्याची, आडपडद्यानेसुद्धा सवलत नाही, कारण
मसलत फक्त तुमच्यात आणि आमच्यातच राहील. मागे हटलात तर हरकत नाही, पण मग हा
विचार कायमचा सोडून द्यायचा. ‘षटकर्णो भिद्यते मंत्र:।’ हे तुम्ही जाणताच.
ज्या क्षणी
बेल-भंडार उचलून स्वराज्याची आण घेतली आणि इमान या पायांवर वाहिले, तेव्हाच
सारा विचार करून झाला. आता कसला विचार आणि कसला निर्णय? आपली इच्छा हीच
शंभू महादेवाची आज्ञा हे एकदा मनोमनी मान्य केल्यावर आता चिंता कसली. कीर्त
भले डंक्यावर चढणार नाही, त्यासाठी काही आपली साथ धरलेली नाही. आपल्या
हृदयातील स्थान त्यापेक्षा भारी आहे. प्रत्यक्ष भगवान विष्णू आपल्या छातीवर
भक्ताच्या चरणचिन्हांचे लांछन हौसेने मिरवतात, तर माझ्या दैवताच्या
काजासाठी या क्षुल्लक झुंझरटाला लागणाऱ्या लांछनाची काय तमा. महाराज, ज्या
वेळी सारे स्थिरस्थावर होईल आणि आपण उरी धराल त्या वेळी जो गौरव, जे कवतिक
होईल त्याची तुलना कशाशी करावी? गुळाची गोडी धन्याला चाखू द्यायची असेल तर
उसाने चरकात पिळून घेतलेच पाहिजे. महाराज, नि:शंक मनाने कामगिरी सोपवावी.
पडेल ते दिव्य करू, प्रसंगी हलाहल पचवू; पण कामी कसूर होणार नाही. आपल्या
चरणांची आण.
नका, नका
नेताजीकाका, आता कोणतीही आण नका घेऊ. तुमचा प्रत्येक श्वास स्वराज्याच्या
हितासाठीच आहे आणि असेल याची पूर्ण खातरजमा आम्हास आहे. एखादी विपरीत
परिस्थिती उद्भवली तरी तुमचा आमच्यावरचा विश्वास ढळणार नाही याची खात्री
आहे आम्हाला. आमचे स्वत:च्या निसबतीचे खास नजरबाज अष्टौप्रहर तुम्हावर नजर
ठेवून असतील. मात्र ते लक्ष ठेवून असतील ते फितूर झालेल्या त्यांच्या
सर्वोच्च सेनानायकाची गुपिते काढून घेण्यासाठी आणि तशीच वेळ आली तर त्याला
पळवून परत आणण्यासाठी. तसेच काही निकडीचे असेल तर ते आमचा संदेश
तुम्हापर्यंत पोहोचवतील. पण फक्त संदेशच. जे करणे ते तुम्हीच आपली शक्ती,
युक्ती आणि बुद्धी वापरून करणे आहे. आमची माणसे मौसम-बेमौसम, सकारण-अकारण
रत्नागिरीच्या कलमी आंब्यांचा उल्लेख आपल्यादेखत, तुम्हाला नव्हे तर
एकमेकांना ओळख पटवण्यासाठी करतील. आम्हास सोडून गेल्यावर तुम्ही एकांतात
भ्रमिष्टासारखी स्वत:शी मोठ्याने बडबड कराल. ती ऐकून आम्हास खबरी
पोहोचवल्या जातील. ध्यानात आले?
जी महाराज, पुरते ध्यानी आले. चिंता नसावी.
चिंता. चिंता
कशी नसेल काका? प्रत्यक्ष आमचे सरनोबत शत्रूच्या गोटात असताना चिंता कशी
नसेल? लवकरात लवकर योग्य असामी फितवा आणि सुखरूप परत या. काही वावगे घडतेय
याचा वास आला तरी पडेल ती किंमत चुकवा आणि जिवंत परत या. साहेब कामी खस्त
होणे भाग्याचे हे तर खरेच, पण स्वराज्य काजात जीव बचावून परत येणे यास
आमच्या लेखी जास्त किंमत आहे; हे सूत्र सदैव ध्यानी असू द्या.
महाराज, मनात उगीच एक शंका आली. इजाजत असेल तर पुसतो.
कोणतीही शंका
मनात ठेवू नका. बेलाशक विचारा. एकही दुवा कच्चा राहता उपयोगाचा नाही.
दोरखंडाचे सर्व सामर्थ्य नेमके काचलेल्या जागीच अजमावले जाते.
महाराज, असेच
उठून दिलेर वा मिर्झाराजांकडे जाणे कसे शक्य व्हावे? ते दोघे तर आलमगिराची
माणसे. जसा धनी तैसे चाकर. किंचित संशय आला तरी सारेच मुसळ केरात! तेलही
जायचे आणि तूपही; धुपाटणेसुद्धा हाती राहील अथवा नाही सांगता यायचे नाही.
अगदी बरोबर. तशी
परिस्थितीसुद्धा निर्माण करावी लागेल. सदरेवर एखादी अशी मसलत मांडा जी
प्रथमदर्शनी भारीच चमकदार आणि लाभदायक भासेल. पण प्रत्यक्षात फारच मुश्कील
असेल. त्या मसलतीच्या आम्ही चिंध्या करून ती उडवून लावू. आपण आडपडद्याने
नाराजी व्यक्त करा. आम्ही दुर्लक्ष करू. त्यानंतर अधिकाऱ्यांकडे उघडपणे
नाराजी व्यक्त करा; कामात चालढकल दाखवा. मग एखाद्या फसलेल्या मोहिमेचा ठपका
तुमच्यावर ठेवल्याचे निमित्त साधून आम्हाला सोडून निघून जा. नीट ध्यानात
ठेवा, सोबत फौज किंवा तुकडी असू नये, चार-दोन अत्यंत विश्वासातील आणि
तुमच्या खासगीतील माणसांव्यतिरिक्त कोणी बरोबर असणार नाही.
दिलेर पक्का बिलंदर. तो सहजी विश्वास ठेवणार नाही. फार त्रास पडेल.
म्हणूनच
मोगलांकडे थेट जायचे नाही. आम्हास सोडून प्रथम विजापूर गाठायचे. प्रत्यक्ष
दुसरा शिवाजी आश्रयाला येतो म्हटल्यावर आदिलशहा सोडतोय काय? तुमच्यासारखी
मातब्बर असामी आदिलशाहीत राहू देणे, त्याच्याच विरुद्ध मोहीम चालवत असताना
मिर्झाराजांना परवडणार नाही. कारण जसा त्यांनी तुमचा धडाका पाहिला आहे तसाच
त्यांनी विजापूरकरांकडून सपाटून मारसुद्धा खाल्ला आहे. ते हर प्रयत्नांनी
तुम्हाला वळवून घेण्याचा प्रयत्न करतील. मग म्हाताऱ्या नवऱ्याच्या तरण्या
नवरीचा मान घेत, नखरे करत त्यांच्या पदरी जायचे. तटही त्यांचा आणि शिडीही
त्यांचीच; वर फडकवायला झेंडा तेवढा आपला.
गनिमी कावा.
खरोखर महाराज केवढी ही आपली दूरदृष्टी. केवढा बारीक विचार. केवढी तळमळ,
केवढी चिंता प्रत्येक बाबीची. या साऱ्याला निदान काही काळ तरी मी मुकणार.
काही दिवसच.
प्रश्न काही महिन्यांचा, फार तर एखाद वर्षाचा. शक्य तेवढ्या लवकर सुखरूप
परत या. आम्ही डोळ्यांत प्राण आणून वाट पाहत राहू. चला. छावणीतल्या
मुल्लाची बांग देऊन झाली. लवकरच उजाडेल. थोडा आराम करा. मनाला फार लावून
घेऊ नका. आता पुन्हा चर्चा करण्यास वा विचार करण्यास सवड सापडणार नाही. या
आता.
नेताजींनी
शेल्याने डोळे कोरडे पुसले. यत्नपूर्वक चेहरा निर्विकार केला. मुजरा करून
ते पाठ न दाखविता डेऱ्याबाहेर निघून गेले. थकून महाराज लोडावर रेलले.
हुजऱ्याला हाक मारून त्यांनी पाणी मागविले.
दुसरे दिवशी
तिसरे प्रहरी महाराजांच्या डेऱ्यात मसलत बसली. विषय होता मोगलांच्या वतीने
पण आदिलशहाविरुद्ध स्वतंत्र नवी मोहीम चालविण्याचा नेताजींनी मोठ्या
उत्साहात मनसुबा मांडला.
महाराज, बारदेश,
गोवा आणि कारवारची मोहीम हाती घ्यावी. गोव्याच्या फिरंगी गोरंदोराने
आतापर्यंत आपली एकसुद्धा मोहीम फते होऊ दिली नाही. मोठमोठ्या खाड्यांच्या
आसऱ्याने लढून तो प्रत्येक ‘खेपी’ सरस ठरत आला आहे. मोगली मदतीने आता आपले
बळ वाढले आहे. आपण मागितली तर मिर्झाराजांकडून आपल्याला फौजेची कुमकसुद्धा
सहज मिळेल. आजघडीस जंजिऱ्याचा सिद्दी मोगलांचा मनसबदार आहे. मिर्झाराजांनी
हुकूम केला तर त्याला आरमार घेऊन आपली कुमक करावीच लागेल. सुरतेच्या मोगली
आरमाराचीसुद्धा आपल्याला मदत होईल. मग इकडून खुश्कीच्या मार्गाने आपण आणि
दर्यासारंगाच्या हाताखालचे आपले आणि सिद्दीचे मोगली आरमार असा दुहेरी हल्ला
चढवला की, मूठभर गोऱ्यांची आणि पसाभर देशी शिपायांची फौज घेऊन लढणे
गोरंदोरास शक्य होणार नाही. हप्ताभरात फिरंगी पार दर्यात बुडवून टाकता
येईल. एकदा बारदेश, गोवा हाती आला की, मग कारवार परगणा कितीसा दूर.
त्यानंतर गदग, शिरसी काबीज करीत आपल्या सरहद्दी थेट तुंगभद्रेस भिडवणे
अशक्य नाही. अगदीच नाही तरी गेला बाजार या भागातून मोठी लूट करणे फारच सोपे
होईल.
वरकरणी
नेताजींचा मनसुबा फारच चमकदार आणि फायद्याचा वाटत असल्याने अनेक पगड्या आणि
मुंडाशी त्यांच्या तालावर डोलल्या. कुडतोजी गुजर तर एकदम उत्साहात आले.
नेताजीरावांनी
लई नामी मनसुबा काडलाय बघा म्हाराज. आपुन मोगलांच्या तर्फेने मोहीम चालवणार
म्हटल्यावर राजपूत फौज दिल्याबिगर ऱ्हायतोय व्हय? त्याच्या हुकमानं
जंजिऱ्याचा सिद्दी येकदा का आपल्या हुकमतीखाली आला की, संधी मिळताच त्याला
बी पार उखडून फेकता ईल. येकाच दगडात दोन पाखरं गावतील म्हाराज.
त्र्यंबक सोनदेवांनी मात्र नाराजीचा सूर लावीत म्हटले-
सरनोबतांची मसलत
आकर्षक भासत असली, तरी व्यवहार्य वाटत नाही. महाराज आपण परवानगी घेत आहोत
आदिलशाहीविरुद्ध स्वतंत्र मोहीम चालवण्याची. फिरंग्यांविरुद्ध नव्हे.
तद्वतच सिद्दी आणि आणि सुरतेचे मोगली आरमार आपल्या थेट हुकमाखाली आणि
आपल्या पद्धतीने लढतील याची शाश्वती ती काय? सिद्दी बेभरवशाचा. उद्या उठून,
आदिलशहास मिळायचा. मग नसती बिलामत मात्र उत्पन्न व्हायची.
पंतांचा मुद्दासुद्धा बिनतोड वाटतो. पंतप्रधान तुम्हास काय वाटते?
महाराज,
त्र्यंबक सोनदेवांचे प्रतिपादन यथार्थ आहे. फिरंग्यांविरुद्ध मोहीम
चालवण्यास स्वतंत्र परवानगी घ्यावी लागेल. सांप्रत मोगली मोहीम
आदिलशहाविरुद्ध आहे. मोहिमेअंतर्गत वेगळ्या आघाडीवर स्वतंत्र मोहीम मंजूर
करण्याचा अधिकार सरसेनापती म्हणून मिर्झाराजांस आहे. फिरंग्यांविरुद्ध
मोहीम काढण्यास दिल्ली दरबाराची परवानगी घ्यावी लागेल. पत्रव्यवहारात
प्रचंड कालापव्यय होईल. मग त्यामध्ये आपले मूळ उद्दिष्ट साधणार नाही. या
मोहिमेसाठी आपण फक्त पैसा आणि साधने मागत आहोत; फौज नव्हे. मागाल तर
फौजसुद्धा मिळेल, पण मग आपले स्वतंत्र अस्तित्व राहणार नाही. मोगली सरदार
आपले हुकूम, आपले थेट वर्चस्व मानणार नाहीत. कुचराई करतील. तद्वतच मिळणारी
फौज केवळ राजपूत, मराठे वा अन्य हिंदूंची असणार नाही, ही काळ्या दगडावरची
रेघ. दिलेरखान या संधीचा फायदा उठवल्याखेरीज राहणार नाही. त्याची
विश्वासाची माणसे तो आपल्या माथी मारणार. मग ज्यासाठी आपण मोगली छावणी
सोडण्याचा प्रयत्न करीत आहोत, त्याला काहीच अर्थ उरणार नाही.
किंबहुना आपण आयतेच दिलेरच्या कचाट्यात सापडू. मोगली ढिसाळपणात गुप्तता राखणे दुरापास्त.
याला म्हणतात
विचार. मोहीम म्हणजे फक्त तलवारीचा मनसुबा नव्हे. त्याला मुत्सद्दी योजनेची
जोड हवी. अशा चमकदार मोहिमा तर साधे शिलेदारसुद्धा आखतील. त्यासाठी सरनोबत
कशास हवे?
महाराजांचे भेदक
बोलणे ऐकून सारे चमकले. नेताजींची चर्या खर्रकन उतरली. महाराजांची नजर
चुकवीत त्यांनी काही बोलण्याचा प्रयत्न करताच हात उंचावून त्यांना थोपवीत
करड्या स्वरात महाराज म्हणाले–
बस्स! अधिक
समर्थनाची गरज नाही. पुरंदराचा तह होऊन फक्त काही महिनेच उलटलेत आणि आमच्या
सरनोबतांच्या बुद्धीस गंज चढू लागला. इकडे दिल्लीचे राजकारण हातातोंडाशी
असताना आपल्या फौजा दूर तुंगभद्रेच्या मुलखात गुंतवण्यात शहाणपणा तो कोणता?
आमचा विचार ठरला. सिद्दी जौहरला द्यावा लागलेला पन्हाळा पुन्हा जिंकून
घ्यायचा. बस्स.
क्रमश:
No comments:
Post a Comment