#श्रीमंत_तुकोजीराव_पवार_महाराज यांना स्मृतिदिनानिमित्त
छत्रपती शिवाजी महाराजांचे सरदार कृष्णाजी पवार यांचे नातू काळोजी पवार यांना छत्रपती शाहू महाराजांनी "विश्वासराव" असा बहुमोलाचा किताब देऊन गौरव केला व सोबतच ६ लाख ३१ हजार ५५० रुपयेचा सरंजाम दिला होता. पुढे यांची मुले तुकोजीराव पवार व जिवाजीराव पवार यांना मध्यप्रदेश राज्यातील देवास चे ठाणे दिले यातील तुकोजीराव पवार यांचे घराणे "थोरल्या पातीचे देवास पवार" म्हणून ओळखले जाते तर जिवाजीराव पवार यांचे घराणे "धाकट्या पातीचे देवास पवार" म्हणून ओळखले जाते तर त्यांचे चुलत बंधू आनंदराव पवार यांचे घराणे "धारचे पवार" म्हणून ओळखले जातात.
तुकोजीराव यांचे मुख्य दिसून येणारे गुण म्हणजे स्वामिनीष्ठा,स्वार्थत्याग कर्तुत्वशक्ती व शौर्य हे होते. मराठा साम्राज्याची टोलेजंग इमारत उभारणीचे कामी अव्दितीय पराक्रम गाजवणाऱ्या मराठे सरदारांमध्ये तुकोजीरावांचे स्थान मानाचे आहे.तुकोजीरावांनी मराठा स्रामाज्य उभारणीच्या कामी केलेली कामगीरी थोडक्यात खालील प्रमाणे -
सन 1718 च्या दिल्लीच्या मोहिमेत निवडक मराठा सरदारांमध्ये तुकोजीराव आपल्या फौजेसह हजर होते. अलाहाबादचा मुघल सुभेदार महंमद खानबंगश च्या जैतापूरच्या किल्ल्याला वेढा देऊन त्याचा पराभव मराठ्यांनी केला. या युद्धात तुकोजीरावांनी मोठा पराक्रम गाजवला ,त्यासाठी छत्रपती शाहू महाराजांनी सातारा येथे तुकोजीरावांना बोलावून दरबारात जरीपटका ,चौघडा व एक हत्ती देऊन त्यांचा गौरव केला.
सन 1732 मध्ये माळव्याचा सुभेदार सवाई जयसिंग याचा पराभव मराठ्यांनी केला ,त्याने तह करून 6 लाख रोख व सुरतच्या 28 परगण्यांची खंडणी मराठ्यांना दिली. या लढाईत तुकोजीराव पवार, कृष्णाजी पवार विश्वासराव व उदाजीराव पवार यांनी मोठा पराक्रम गाजवला होता.
सन 1734 मध्ये मीरबक्षी, सवाई जयसिंग, जोधपुर चा राजा अभयसिंग, कोट्याचा दुर्जनसिंग यांच्या संयुक्त 2 लाख सैन्याचा पराभव मराठ्यांनी केला. सोबतच जयपुर, जोधपूरचा मुलुख लुटला या लढाईत शिंदे, होळकर, तुकोजीराव व जिवाजीराव पवार सामील होते.
सन 1724 च्या जुलैमध्ये धार व झाबुवाच्या परगणांचा मुकासा पवार घराण्यास एकत्रित देण्यात आला. यावेळी विश्वासराव पवार घराण्याचा विश्वासराव पदाचा सरंजाम 6 लाख 31 हजार 550 रुपये होता.
सन 1726 मध्ये माळव्याच्या सुभेदार गिरीधर बहाद्दर याचा मराठ्यांनी पराभव केला , या लढाईत तुकोजीराव पवार सामील होते .पुढे कोट्याजवळ चंदेलशी तुकोजीरावांची लढाई झाली यात चंदेलचा पराभव करून तुकोजीरावांनी चंदेलचा जरीपटका,चौघडा, सोन्या चांदीचे हौदे, अंबारीसह हत्ती आणि बराच मुद्देमाल लुटला.
सन 1728 मध्ये प्रसिद्ध पालखेडच्या लढाईतही तुकोजीरावांनी पराक्रम गाजवला या लढाई निजामने मराठ्यांशी तह करून निजामाच्या अंमलाखाली असलेला वऱ्हाड परगणे व जळगाव येथील मोकासाचे अधिकार तुकोजीरावांना दिले गेले.
वसईची मोहीम- तुकोजीराव पवारांचा पराक्रम.
इसवी सन १५३० पासून वसई प्रांत पोर्तुगिजांनी काबीज केला होता. त्यांनी हिंदू लोकांना बाटवून धर्मपरिवर्तन,हिंदुचे देवालये नष्ट करणे , ख्रिस्तीधर्माचा प्रसार करणे असे उद्योग चालवले होते.
इ.स.१७३८ च्या नोव्हेंबर महिन्यात वसईची मोहीम हाती घेण्यात आली. या संग्रामात राणोजी शिंदे ,मल्हारराव होळकर, तुकोजीराव पवार , यशवंतराव पवार , राणोजी भोसले ,पिलाजी जाधव , आंग्रे , बांडे वगैरे नामांकित सरदार चिमाजीअप्पांच्या नेतृत्वात लढण्यासाठी दाखल झाले .
या मोहिमेत ठाणे, माहीम ,तारापूर,धारावी, वसई या ठिकाणी झालेल्या लढाया महत्त्वाच्या होत्या. 30 डिसेंबर १७३८ रोजी मराठा फौजांनी माहीमच्या कसब्यात प्रवेश केला आणि किल्ल्याला वेढा घातला किल्ल्याचा किल्लेदार अॅन्टोनिये दिमेलो हा अधिकारी होता. मराठ्यांनी किल्ल्यावर रात्रंदिवस तोफांचा मारा सुरु केला , शिवाय सुरुंग लावून तट व बुरूज पाडून किल्ल्यात घुसण्याचा मार्ग तयार केला; तेव्हा दिनांक ९ जानेवारी १७३९ रोजी पोर्तुगिजांनी किल्ला मराठ्यांच्या स्वाधीन केला. त्यानंतर मराठ्यांनी केळंबे व शिरगाव ही ठाणी जिंकून घेतली, पुढे तारापूर या बळकट ठाण्यास वेढा दिला. २४ जानेवारीला सुरुंगाने किल्ल्यास खिंडारे पडताच मराठ्यांनी किल्ल्यात प्रवेश करून तारापूरचा किल्ला ताब्यात घेतला. पोर्तुगीजांचे ४००० सैन्य व ५०० घोडे मराठ्यांच्या हाती लागली.या लढाईत किल्लेदार ल्युईस व्हेलेझो हा मरण पावला.
माहीम व तारापूरचा किल्ला काबीज करताना मराठ्यांनी जे हल्ले केले त्यात आणि पोर्तुगीजांनी जे प्रतिहल्ले केले ते परतवण्यात तुकोजीराव पवारांनी पराक्रमाची शर्थ केली. पोर्तुगिजांच्या तोफांचा व बरकंदाजीचा मारा चालू असतांना तुकोजीराव पवार यांनी आपली फौज व निशान बरोबर घेऊन इतर मराठे सरदार हल्ला करण्यास तयार झाले आहे की नाही हे न पाहताच पोर्तुगीजांवर तुटून पडले. या युद्धात तुकोजीरावांच्या अंगी असलेले अचाट साहस, अतुलनीय पराक्रम आणि रणांगणात लढण्याचा अव्दितिय उत्साह हे गुण प्रकर्षाने जाणवले .
चिमाजीअप्पांनी ह्या घटने विषयी लिहिलेल्या बातमीपत्रात अभिमानाने उल्लेख केला आहे की ; " सारे झुंज नजरेस पडले, सारे नामांकित लोक बरे वजनें चालून गेले ." " बाजी भीवराव , रामचंद्र हरी, यशवंतराव पवार आणि तुकोजीराव पवार हे आपापले ध्वज घेऊन ' तु आधी कि मी आधी ' अशा स्पर्धेने व इभ्रतिने एकदम किल्ल्याकडे धावले.
त्यानंतर चिमाजीअप्पांनी धारावी जिंकण्याचे काम तुकोजीराव पवार , खंडोजी मानकर ,तुबाजी अनंत व रामाजी महादेव यांच्यावर सोपवले. या सरदारांनी मोठा पराक्रम गाजवून ६ मार्च १७३९ रोजी धारावी काबीज केले.तुकोजीराव पवारांच्या पराक्रमाबद्दल व यशाबद्दल हजर असलेल्या एका मातब्बर सरदाराने चिमाजी अप्पांना पुढील प्रमाणे पत्र लिहिले , "तुकोजी पवार यांनी धारावी चा कोट काबीज करण्यात चाकरी उत्तम रबेसीने केली आहे. यांस बक्षीस उत्तम दिले पाहिजे, वरकड वर्तमान जबानी तुकोजी पवार सांगता विदित होईल."
धारावी किल्ला काबीज केल्यानंतर आत सापडलेल्या मालाची मोजदाद करून यादी केली गेली, त्यात ८ तोफा ,१ फुटकी तोफ , २ गरनाळे व दारू आणि गोळे या वस्तू नमूद केल्या .
देवास(थोरली पाती)च्या शिलेखान्यात या तोफांपैकी एक तोफ आहे !ती तोफ आजही तुकोजीराव पवारांच्या पराक्रमाची साक्ष देते.
जून 1754 मध्ये तुकोजीराव पवार जयाप्पा शिंदेंबरोबर मारवाड प्रांतच्या मोहिमेवर गेले ,या स्वारीत मराठ्यांनी कृष्णगड किल्ला जिंकून मेडत्यावर आक्रमण केले व तोही किल्ला जिंकला, त्यानंतर नागोरच्या किल्ल्याला मराठ्यांनी वेढा दिला व याच ठिकाणी तुकोजीराव पवार यांचे दिनांक 16 नोव्हेंबर 1754 रोजी निधन झाले.
श्रीमंत तुकोजीरावांना स्मृतीदिनी विनम्र अभिवादन !
महेश पवार
७३५०२८८९५३
No comments:
Post a Comment