विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 16 November 2023

सरसेनापती संताजीबाबा घोरपडे

 


सरसेनापती संताजीबाबा घोरपडे
म्हणजे एक नरव्याघ्र.त्यांच्याबरोबर लढाई करायची म्हटली तरी शत्रुपक्षाचे सरदार वेळकाढू धोरण स्विकारायचे, हे बादशहा समजून होता पण तसाच तो हतबलही होता. शत्रुपक्षाच्या सरदारांना संतीजीबाबा बरोबर लढाई म्हटली की अर्धी गलीतगात्रता यायची,उरलेल्या मेलेल्या मनाने कितीही तलवारी पेलल्या तरीही संताजीबाबांच्या झंझावातासमोर कितीसे टिकणार. पराभव हा भाळी मारलेलाच असायचा.
आपल्या सरदारांचे हाल पाहून औरंगजेब चरीत्रकार खाफीखान,मुस्तैदखान व भीमसेन सक्सेना यांचा संयम सुटत असे. संताजी बद्दल लिहिताना यांच्या जीव्हेबरोबरच लेखनीचेही संतुलन ढळत असे. खाफीखान तर म्हणतो “युद्ध करण्यासाठी जिकडे तिकडे म्हणून तो नालायक आणि हलकट कुत्रा तयार होऊन जाई तिकडे तिकडे त्याचा मुकाबला करण्यास बादशहाच्या प्रतिष्ठित सरदारांपैकी एकही तयार होत नसे.
जगात धडकी भरून सोडणारी फौज घेऊन तो कोठेही पोहोचला, की नरव्याघ्राप्रमाणे असलेल्या अनुभवी योद्धयांची हृदये कंपायमान होत.” खाफीखानाने केलेले वर्णन हे संताजी यांचे नेतृत्व,पराक्रम व युद्ध कौशल्य सिद्ध करते.
बादशहा कायम याच विवंचनेत असत की संताजीचा मोड कसा करता येईल.नागोजी माने याने संताजींचा नि:शस्र अवस्थेत पाठीमागून वार करून शीर धडापासून वेगळे केले. ही बातमी देणार्या सेवकास “खुशखबर खान” ही पदवी दिली तसेच ज्या गावी संताजी यांची हत्या झाली त्या राजापुरचे नाव बदलून इस्लामपुर ठेवले आणि ज्या महादेवाच्या डोंगरात हत्या झाली त्याचे नाव इस्लामचा डोंगर (जबलुल्ल इस्लाम) ठेवले.
संताजींच्या मृत्युच्या बातमीने औरंगजेब इतका आनंदी झाला की त्याने वरील गोष्टी तात्काळ अमलात आणल्या. औरंगजेबाने,भाऊ मारल्याची व बाप मेल्याची खबर देणारा सेवकांना कोणतीही पदवी किंवा इनाम दिले नाही. तसे पाहिले तर या गोष्टी खुप महत्त्वाच्या होत्या कारण यामुळे सिंहासनावर बसण्याचा राजमार्ग खर्या अर्थाने मोकळा झाला होता.
पण तरीही संताजीच्या मृत्यूच्या बातमीने पातशहा जेवढा आनंदी झाला तेवढा भावाच्या व बापाच्या मृत्युने आनंदी झाला नाही, यावरूनच संताजीबाबांचे कर्तुत्व आणि मराठेशाहीतील पराक्रम व दरारा अधोरेखीत होतो.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...