विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 22 November 2023

पंचहजारी_सेनानी_वीर_सिदोजीराव_निंबाळकर

 

स्वराज्यासाठी शिवछत्रपतींच्या काळात अखेरचे हौतात्म्य देणारे #

पंचहजारी_सेनानी_वीर_सिदोजीराव_निंबाळकर
यांना #पुण्यतीथीनिमीत्त
सिदोजीरावांचा जन्म १६३५ ते ४०च्या दरम्याचा असावा. वयाच्या विसाव्या वर्षी त्यांनी पन्हाळ्याच्या युद्धात पहिला उल्लेखनीय पराक्रम गाजवला. अफजलवधानंतर महाराजांनी अविश्रांतपणे विजापूरच्या दिशेने पन्हाळ्या पर्यंत धडक मारली . त्यावेळी कोल्हापूर जवळ आदिलशाही फौजेशी झालेल्या मोठ्या युद्धात महाराजांना मोठा विजय मिळाला . या युद्धात सिदोजीरावांनी विजापूरी सादतखानावर हल्ला करून त्याला जबर जखमी करून त्याला फौजेसह उधळून लावले . हीच सिदोजीरावांची पाहिली लढाई महाराजांच्या कसाली उतरली.
त्यानंतर १६७२ च्या साल्हेर च्या मैदानी युद्धातही सिदोजीरावांनी सुर्यराव काकडयांच्या बरोबरीने मोठा पराक्रम गाजवला होता . याच युद्धात सुर्यराव काकडे जंबुऱ्याचा गोळा लागुन धारातीर्थी पडले होते . या युद्धात प्रतापराव , मोरोपंत यांच्या बरोबरीने सिदोजीरावांनीही तलवार गाजवून निर्णायक विजय मिळवून दिला होता .
इ .स. १६७३ मध्ये जत जवळील उमराणी च्या लढाईत सिदोजीरावांनी प्रतापराव गुजरांच्या बरोबर विजापुरी बेहोलोलखानाचा दारुण पराभव केला होता . या लढाईत शत्रूचा एक हत्ती बिथरून फौजेत तांडव माजवू लागला त्यावेळी सिदोजीरावांनी त्या हत्तीला महत्प्रयासाने काबूत आणून स्थानबद्ध केले होते . असा उल्लेख सापडतो .
बेहलोलखानाला धर्मवाट देऊन प्रतापरावांनी जिवंत सोडून दिले . परंतू तो उलटला . तेव्हा त्याच्याशी पुन्हा झालेल्या कडव्या युद्धात प्रतापराव आपल्या सात वीरांसह धारातिर्थी पडले . हे सर्वज्ञात आहेच... त्यानंतर झालेल्या लढाईत सिदोजीराव आणि मकाजी आनंदराव यांनी बेहेलोल खानाचा पुरता पराभव करून त्याची जहागीरी साफ लुटली . प्रतापरावाच्या बलीदानाचा काही अंशी तरी बदला घेऊन सर्व खजीना रायगडावर दाखल केला होता . राज्याभिषेकाच्या ऐन तोंडावर ही संपत्ती रायगडावर दाखल झाली होती . या पराक्रमातूनच सिदोजीरावांना राज्याभिषेकानंतर पंचहजारी सरदारकी बहाल करण्यात आली असावी . कारण त्यानंतर च्या इतिहासात सिदोजीरावांचा उल्लेख पंचहजारी सरदार असा वारंवार येतो .
इ .स. १६७९ ची जालन्याची स्वारी ही महाराजांच्या आयुष्यातील शेवटची सर्वात मोठी आणि महत्त्वाकांक्षी मोहीम म्हणून प्रसिद्ध आहे .
दिलेरखानाने इ.स. १६७९च्या सुमारास विजापूरकरांवर हल्ला केला. तेव्हा विजापूरकर आदिलशाही शिवरायांकडे मदतीची याचना करू लागली . त्यावेळी शिवरायांनी मोठया चातुर्याने मोघलांना शह देण्यासाठी जालण्याची मोहीम काढली होती .
या जालना मोहिमेत महाराज दहाहजारांच्या फौजेसह जालना शहरात घुसले आणि सलग तीन दिवस लूट करून जालना शहर पुरते साफ केले.सर्व खजीना बैलांवर घोड्यांवर लादून रायगडचा रस्ता धरला . जालना लुटीची बातमी औरंगाबादेला धडकताच औरंगाबादेचा सुभेदार मुअज्जम ( औरंगजेबाचा मुलगा ) याने शिवरायांना अडवण्यासाठी तात्काळ मोठी फौज रवाना केली .मोघल सरदार रणमस्तखान , आसदखान , जावीदखान आणि केसरसिंग यांच्या वीस पंचवीस हजारांच्या फौजेने पाठलाग करून संगमनेर जवळ शिवरायांना गाठले .
#शेवटचा_रणसंग्राम संगमनेर जवळील रायतेवाडी येथे मोघलांची आघाडी महाराजांच्या पिछाडीची पहिली चकमक झडली . पाठलाग होईल याचा अंदाज असल्यानेच महाराजांचा गुप्तहेर प्रमुख बहिर्जी नायकाने पुढील योजना आखून ठेवली होती .
अशा प्रसंगी कोणत्यातरी, बलाढय किल्ल्याच्या आश्रयाला लुटीसह जाणे क्रमप्राप्त होते . म्हणून संगमनेर पासुन चाळीस मैलांवर असलेल्या पट्टा किल्ल्याच्या आश्रयाने वाटचाल सुरू झाली . महाराजांसोबत असलेल्या सिदोजीराव या पंचहजारी सरदारानं आपली पाच हजारांची तुकडी घेऊन शत्रुचा मार्ग अडवून धरायचा आणि उर्वरित पाच हजारांच्या तुकडीने महाराजांसह खजिना घेऊन पट्टा किल्ल्याकडे वाटचाल करायची . बहिर्जींनी पुढील सर्व मार्ग आखून ठेवलेला होताच.
अशा प्रसंगी खरी कसोटी होती सिदोजी निंबाळकर यांची . शत्रूपासून महाराज आणि खजिना वाचवायचा होता . लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा वाचला पाहिजे . ह्या सुत्रानुसार शत्रुशी जिवापाड लढा सुरूच होता . इकडे लुट सोबत असल्याने महाराजांनाही अंतर तोडायला उशीर लागत होता .
पट्टा किल्ल्याच्या दक्षिण बाजुला बित्तींगा किल्ल्यापासुन पर्वतगड सोनगड पर्यंत पूर्व पाश्चिम पसरलेली मोठी डोंगररांग आहे . पश्चिम बाजुला तुटलेला ताठ कडा आहे . उत्तर बाजुला औढा आणि आड किल्ला एका रेषेत असून ही डोंगररांग दापूर गावापर्यंत पोहोचली आहे . राहीला आता पुर्वेकडील छोटया मोठ्या डोंगर टेकडयांनी वेढलेला म्हाळुंगी च्या खोऱ्याचा प्रदेश . आता या प्रदेशातून पट्टयाकडे जाणाऱ्या अनेक वाटा आहेत .
आता शत्रुची नेमकी कोणती वाट अडवून धरायची हा मोठा प्रश्न सिदोजी समोर होता .
पन्हाळ्याच्या वेढ्याच्या वेळी तरी महाराजांचा पाठलाग करणाऱ्या फौजेचा मार्ग एकच होता . गजापूरच्या घोडखींडी शिवाय शत्रूला पर्यायच नव्हता . परंतू या प्रसंगी मार्गात अनेक घाटवाटा आणि खिंडी होत्या .
सिदोजींनी हेरांनी आणलेल्या माहितीनुसार आपल्या सैन्याच्या काही तुकडया करून पट्टयाकडे जाणाऱ्या सर्वच्या सर्व वाटा छोटया मोठ्या खिंडी पकडून अडवून धरल्या .
पाच हजारांच्या फौजे समोर पंचवीस हजारांची फौज अशी विषमता याहीवेळी सिदोजींच्या वाटयाला आली होती .परंतू हार मानतील ते महाराजांचे मावळे कसले ? तीन दिवस आणि तीन रात्री म्हाळूंगीच्या खोऱ्यात हा लपाछपीचा जीवघेणा खेळ सुरू होता .
यावेळी बहीर्जींनी महाराजांना अनेक आडमार्गांनी पट्टा किल्यापर्यंत सुखरूप आणले . शत्रू देखील सिदोजीला दाबीत दाबीत पट्टयाच्या दिशेने सरकत होता . रक्तरंजीत चकमकी जागोजागी घडतच होत्या . शेवटची धुमश्चक्री पट्टयाच्या पायथ्याशी औढ्याच्या बाजूला म्हाळुंगी नदीच्या उगमाजवळ झडली . आता किल्ल्यावरील शिबंदीसुद्धा किल्लेदारासह मदतीला धावून आली होती . कारण महाराज आता सुखरूप गडावर पोहोचले होते . तीन दिवसांचा रक्तरंजीत खेळ आता संपणार होता . दमल्या भागल्या सिदोजीच्या फौजेला आता गडावर विश्रांतीला घेऊन जायचे होते . पण नियतीच्या मनाचा ठाव लागत नव्हता . मोघलांचीही निम्मी अधिक फौज गारद झाली होती . सिदोजीरावांचेही भले भले हिरे इरेला पडले होते . पावनखिंडीची पुनरावृत्ती झाली होती . रक्तामासाचा चिखल पडला होता . म्हाळूंगीचं पात्र लालेलाल झालं होतं . अशाही अवस्थेत सिदोजींच्या रणगर्जना सुरूच होत्या . अंगावर नव्या जखमांसाठी जागा उरली नव्हती . २० , २१ आणि २२ नोव्हेंबर च्या तीन दिवस तीन रात्रींची अविश्रांत झुंज ... महाराज पट्टागडावर सुखरूप पोहाचल्याचा अंदाज आल्याने राहिलेल्या शुत्रूच्या फौजेनेही आता माघार घ्यायला सुरूवात केली होती . पण अचानक शत्रूकडून आलेल्या एका गोळीने सिदोजींच्या छातीचा वेध घेतला... *अरे येईना का मृत्यू ... पण परमोच्च समाधान या गोष्टीचं होतं की , ' माझा राजा सुखरूप गडावर पोहोचलाय ...' कामगीरी फत्ते झाली होती ... अधुरी कामगीरी सोडुन स्वर्गात जाव लागलं असतं तर काय जवाब दिला असता बाजीप्रभुना ... काय जवाब दिला असता रायाजी बांदलांना .. शभूसिंग जाधवांना ... हा विचार मनात ठेऊन सिदोजीरावांनी गडावरील महाराजांना अखेरचा मुजरा करत शेवटचा श्वास घेतला ...*
-. संतोष शेळके
९४०५००१५९८
*संदर्भ* -
१)जेधे शकावली
२)शककर्ते शिवराय - विजयराव देशमुख.
३) छत्रपती शिवाजी महाराजांची बखर.
४) जालनापूर स्वारी - गिरिशजी टकले.
५)मराठ्यांची धारातिर्थे - प्रवीण भोसले सर.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...