500 वर्षांपूर्वी अहमदनगर शहर हे केवळ भारतातलं नव्हे, तर जगातील महत्वाचं आणि सुंदर शहर होतं. 'कैरो आणि बगदाद नंतर अहमदनगर...' असा उल्लेख त्या काळी केला जात असे, असं आजच्या पिढीला सांगितलं, तर त्यांचा विश्वास बसणार नाही.
शिवपूर्वकाळात अहमदनगर ही महाराष्ट्राची राजधानी होती. जवळजवळ 100 वर्षे राज्याची सगळी सूत्रं नगर जिल्ह्यातून हलत होती. इंग्लंडपेक्षा जास्त आर्थिक उलाढाल तेव्हा इथल्या निजामशाही राज्यात होत असे. इथं तयार होणारं धान्य, कापड परदेशात पाठवलं जात असे, परदेशातून बंदुकीची दारू, अरबी घोडे आयात केले जात असत. कोकण किनाऱ्यावरील अनेक बंदरं आणि राज्यातील 80 पेक्षा जास्त गडकोट तेव्हा इथल्या राजाच्या ताब्यात होते. सोन्या,चांदीची आणि तांब्याची नाणी तयार करणाऱ्या टांकसाळी इथे होत्या. हातमागाचा मोठा व्यवसाय इथे चालत असे. ढाक्याच्या मलमलीसारखी नगरची लुगडी प्रसिद्ध होती. देशातील सर्वाधिक तोफा नगरमध्ये तयार होत असत. जगातील सर्वात मोठी तब्बल 55 टन वजनाची 'मलिक ए मैदान' तोफ तेव्हा नगरमध्येच तयार झाली होती, एवढं सांगितलं तर नगर हे खरोखरच प्रगत आणि वैभवशाली शहर होतं, हे कुणीही मान्य करेल.
अहमदनगर शहर हे एकेकाळी उद्यानं, तलाव, कालवे आणि कारंजांसाठी प्रसिद्ध होतं. 'महाराष्ट्रातील व्हेनिस' असं या शहराला म्हटलं जाई. इथं हवामहल, जलमहाल आणि विशाल बारवा होत्या. उद्यानाने वेढलेल्या, गुलाबांच्या ताटव्यांनी सुशोभित केलेल्या तलावाच्या मध्यभागी असलेला अष्टकोनी फराहबक्ष महाल इथल्या राजांनी बांधला. आशियातील हे पहिलं बंदिस्त ऑडिटोरियम! सुगंधित अत्तरं मिसळलेल्या कारंजांनी धुंद झालेल्या वातावरणात देश-विदेशातील नृत्यांगना आणि गायक-वादक या 'प्लेझर पॅलेस'मध्ये आपली कला सादर करत. नामवंत शायर इथे आपली कवनं गात, मुशायरे रंगत... हाच फराहबक्ष महाल पाहिल्यानंतर शाहजहान बादशहाला ताजमहालाची कल्पना सुचली, असं म्हणतात...
दूर डोंगरावर उभा असलेला चांदबीबी महाल (सलाबतखान मकबरा) ही वास्तू आज पर्यटकांची आकर्षण बनली असली, तरी ही वास्तू नुसती हवा खाण्यासाठी बांधलेली नव्हती. टेहळणी आणि संदेशांची देवाण-घेवाण करण्यासाठी हा लष्कराच्या दृष्टीने महत्वाचा 'दुर्बीण महाल' किंवा मनोरा होता. काही मिनिटांत 100 मैलांवरचे संदेश किल्ल्यात पोहोचवण्याची जगात अन्यत्र कुठे नव्हती, अशा व्यवस्था निजमशाहीतील वजीर सलाबत खानाने तेव्हा तयार केली होती.
जगात 'करेझ' किंवा 'कनात' म्हणून ओळखली जाणारी पाणी पुरवठा योजना नगरमध्ये त्या काळी अस्तित्वात होती. नगर हा तेव्हाही दुष्काळ टापू होता. त्यामुळे डोंगरावर पडणारा पावसाचा थेंब न थेंब अडवून, साठवून हे पाणी नगर शहराला पुरवणाऱ्या खापरी नळ योजना नगरच्या राजांनी तयार करून घेतल्या होत्या. नगर हे शिक्षणाचं मोठं केंद्र होतं. युद्धकलेचंही हे मोठं प्रशिक्षण केंद्र होतं. कला आणि साहित्याला इथे राजाश्रय होता. रणांगणात उतरलेली दख्खनमधील पहिली वीरांगना सुलताना चांदबीबीच्या रूपाने नगरने दिली. बलाढ्य मोगलांना रोखण्याचं अतुलनीय धाडस तिनं दाखवलं...
सगळ्या जाती-धर्मांचेच नव्हे, तर जगातील विविध देशांमधील अतिशय कर्तबगार मंडळी तेव्हा नगरमध्ये गुण्यागोविंदाने नांदत होती. त्यांनी हे शहर मोठं करण्यासाठी मोठा हातभार लावला. मूळचे इराणचे असलेल्या शहा ताहीर यांनी नगरच्या राजाचे अन्य राज्यांशी, देशांशी राजनैतिक संबंध प्रस्थापित करून दिले. आफ्रिकेतून गुलाम म्हणून आणलेल्या मलिक अंबरने महसुली सुधारणा करण्याबरोबर इथल्या मराठा सरदारांना गनिमी कावा शिकवून संघटितपणे मोगलांविरुद्ध लढण्याचा कानमंत्र दिला. त्यामुळेच शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे स्वराज्याचं स्वप्न बघू शकले. निजामशाही नंतर लयाला गेली, पण इथेच मोठ्या झालेल्या सरदारांनी शिवरायांना साथ देत स्वराज्याचं स्वप्न प्रत्यक्षात साकारायला मदत केली...
अशा या ऐतिहासिक शहराचा गौरवशाली इतिहास एकदा जाणून घ्यायला हवा, इतिहासाच्या साक्षीदार असलेल्या वास्तू बघायला हव्यात, देशाच्या राष्ट्रीय नेत्यांनी जिथे कारावास भोगला, त्या भुईकोट किल्ल्याला वर्षातून एकदा तरी भेट द्यायला हवी...चारशे-पाचशे वर्षांपूर्वी बांधलेल्या या वास्तूंची देखभाल करत त्यांचे केवळ जतन केले, तरी पर्यटनाच्या रूपाने नगरचे बकालपण दूर करून, इथल्या युवक-युवतींना रोजगार देत पुन्हा एकदा या शहराला वैभवशाली करण्याचं सामर्थ्य इतिहासाच्या या वारशात आहे. गरज आहे आपल्या प्रयत्नांची...
- *भूषण देशमुख*
मोबाईल 9881337775
No comments:
Post a Comment