विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 21 December 2023

नेताजी पालकर यांच्या जीवनावरील ऐतिहासिक कादंबरी📜⚔ अग्निदिव्य _📜⚔🗡 भाग -14

 

नेताजी पालकर यांच्या जीवनावरील ऐतिहासिक कादंबरी📜

अग्निदिव्य

_📜🗡
भाग -14📜🚩🗡__

लेखक : कल्याणीरमण बेन्नूरवार

_🚩📜🚩___

नेताजी दिवसभर गडावर देवदर्शन, पूजा-अर्चा वगैरेमध्ये गुंतून होते, तर खान आणि त्याची फौज पायथ्याशी वाघ्या-मुरळींचे नाच पाहत जीव रमवत होते. कडुस पडल्यानंतर नेताजी गोटावर परत आले. रात्रीचा भाकरतुकडा खाऊन ते पुन्हा गडावर जाण्यास निघाले. खानाने अचंब्याने पुसले–

अजी हुजूर, दिवसभर तर पूजापाठ झाले. आता परत काय आहे? पहिल्या मजलेवर कबिला गाठू म्हणालात, आता निघणार कधी आणि त्यांना गाठणार कधी?

खानसाहेब, आज रात्री आमच्यातर्फे गडावर गोंधळ, म्हणजे एक प्रकारची इबादतच असते, ठेवला आहे. त्यासाठी आम्हाला हजर राहिलेच पाहिजे. तुम्ही फिकीर करू नका. तुमच्या फजरच्या नमाजाची अजान होण्याच्या आत आम्ही मुक्कामावर हजर असू. जीन कसून घोडी तयार ठेवा. इकडे नमाज आटोपला की, थेट सुटायचे. न्याहारी वाटेतच कुठेतरी करता येईल.

नेताजीपुढे खानाचा दर्जा तसा क्षुल्लकच होता; त्यामुळे फार ताणणे वा अविश्वास दाखविणे त्याला शक्य नव्हते.

दिवस उजाडून चांगला दोन कासरे वर आला तरी नेताजींचा पत्ता नव्हता. खानाचा जौहरचा नमाजसुद्धा आटोपला तरी त्यांचा पत्ता नव्हता. हळूहळू खानाचा धीर सुटत चालला. त्याच्या बरोबरचे सारे शिपाई अरब. त्यांना कोणी गडावर रीघ लागू देईना. अखेर खानाने तपासासाठी काही बाजारबुणगे गडावर पाठविले. ते हात हलवीत परत आले तेव्हा खानाचा मगरीबचा नमाज आटोपला होता.

जेजुरी म्हणजे बांके ठिकाण. सांप्रत तो प्रदेश मोगली फौजांच्या कब्जात होता. शिवाजीच्या स्वराज्याची सरहद्दसुद्धा अगदी खेटून; त्यामुळे फारशी हालचाल करायला वावच नव्हता. मोगली गस्तीपथकाची गाठ पडली असती तर फजितीला पारावार राहिला नसता; त्यामुळे अधिक गुंतून राहण्यापेक्षा थेट छावणी गाठावी आणि झाला प्रकार रुस्तमेजमाच्या कानी घालावा, असा खानाने निर्णय घेतला. रात्रीच्या अंधाराची तमा न धरता खान जेजुरीहून टाकोटाक निघाला. मोगली सरहद्द लवकरात लवकर ओलांडण्यासाठी त्याने चौखूर दौड मारली.

रात्रीचा अंधार फिटून हळूहळू पूर्व उजळू लागली. काही कोस दूर आकाशात घिरट्या घालणाऱ्या घारी आणि गिधाडांनी त्याचे लक्ष वेधून घेतले. त्याच्या मनात अशुभाची पाल चुकचुकली. उडत्या पाखरांवर नजर ठेवून तो दौडत राहिला. करकचून लगाम खेचत त्याने घोडा थांबविला. समोरचे दृश्य मोठे भयानक होते.

घारी-गिधाडांनी फाडलेली आणि कोल्ह्या-कुत्र्यांनी अर्धवट खाल्लेली पंचवीस प्रेते समोर पडलेली होती. प्रत्येक प्रेताचे मुंडके धडावेगळे झालेले होते. सडक्या-कुजक्या मांसाच्या दर्पाने भवताल कोंदले होते. घाईघाईने पडाव उठवून गेल्याच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या पण मुक्कामावर हल्ला झाल्याची एकही निशाणी आढळत नव्हती. आपल्या तुकडीला दगा करून, कापून काढून पालकरांचा कबिला फरार झाल्याचे खानाच्या लक्षात येण्यास वेळ लागला नाही.

घाईगर्दीने त्याने सारी प्रेते त्याच ठिकाणी पुरून टाकली. फातिहा पढण्याच्या भानगडीत न पडता, पुढचा श्वास घेण्यासाठीसुद्धा तो तेथे थांबला नाही. छावणीच्या दिशेने त्याची घोडी बेफाम दौडू लागली.

-

तांबडे फुटण्याच्या सुमारास नेताजींनी आपला कबिला गाठला. सासवडची मोगली छावणी फक्त काही कोसांवरच होती. आता खानजमाची भीती बाळगण्याची जरुरी नव्हती. संथ चालीने घोडी मिर्झाराजांची छावणी जवळ करू लागली.

छावणीच्या गिर्दपेशात पोहोचताच नेताजींनी गोदाजीला वर्दी घेऊन पुढे रवाना केले. कबिला एका ओढ्याच्या काठी सोईस्कर जागा पाहून विसावला.

दीड-दोन घटकांतच नेताजींच्या स्वागतासाठी छावणीतून स्वारांचे पथक आले. वीरसिंह बुंदेला पथकाची आगवानी करीत होता. मोठ्या मरातबात नेताजींना मोगली छावणीत नेण्यात आले. छावणीमध्ये नेताजी आणि त्यांच्या कुटुंबासाठी स्वतंत्र आणि प्रशस्त डेरे उभारण्यात आले होते. दुपारच्या भोजनानंतर तिसरे प्रहरी मिर्झाराजांच्या दिवाणखान्याच्या शामियान्यात सदर भरली. दरबारी इतमामात नेताजी सदरेवर पेश झाले. मिर्झाराजांनी मोठ्या गर्मजोशीने त्यांचे स्वागत केले. पोशाख, शिरपाव, कट्यार, तलवार आणि चांदीचा साज चढविलेला घोडा देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. पाचहजारी सरदारीची मनसब आणि सुपे प्रांताची जहागिरी मंजूर करण्यात आली.

खासगी खर्चासाठी तात्पुरती तरतूद म्हणून रोख पन्नास हजार रुपये त्यांच्या पदरी घालण्यात आले. त्यांना दिलेरखानाची निसबत फर्मावण्यात आली. शेवटी मिर्झाराजे म्हणाले–

मुघलिया सलतनत की खिदमत में दाखिल होकर तुमने बडा नेक काम किया है। तुझे पूर्वीचे मालक शिवाजीराजेसुद्धा आता मुघल तख्ताची खिदमत करण्यास राजी झाले आहेत. तुझा आणि त्यांचा दर्जा आता बरोबरीचा झाला. मुघल फौज अस्मानातील ताऱ्यांप्रमाणे अगणित आहे. आपल्या टापांखाली कोणतीही बगावत चिरडून टाकण्याची तिची ताकद आहे. उशिरा का होईना तुला आणि तुझ्या मालकाला हे पटले, हे

उत्तम झाले. ‘देर आये, दुरुस्त आये।’ तुझ्या शौर्याची खरी किंमत आता तुला समजेल. तुझी कर्तब, तुझी किरत मी आता डंक्यावर चढवीन.

दिलेरखानसाहेबांची निसबत तुला फर्मावली आहे. उद्या त्यांच्याकडे रुजू हो. ते तुला पुढची कामगिरी फर्मावतील.

हुजूर राजासाहेब, गरिबाचा एवढा गौरव जन्मात कधी झाला नाही. बंदा त्यासाठी जन्मभर कृतज्ञ राहील. या नेताजीच्या तलवारीची चमक आणि अकलेचा चमत्कार आता तुम्ही पाहाच. लेकिन हुजुरांच्या पायाशी एक दरखास्त आहे. इजाजत असेल तर पेश करतो.

मिर्झाराजांच्या कपाळीचे गंध आठ्यांनी आकसले.

तू जे मागितले त्यापेक्षा जास्त तुला दिले आहे. अधिक लोभ बरा नव्हे. तरी माग तुला काय पाहिजे ते. योग्य वाटले तर मंजूर करू.

हुजूर, पैकाअडका, मानमरातब सारे मिळाले. आता त्याचा लोभ नाही. मी शिवाजीराजांच्या फौजेचा सरनोबत होतो. मला आपल्या पायाशी राहून तख्ताची सेवा करण्याचा मौका मिळावा एवढीच बंद्याची इच्छा आहे. बाकी काही नको. सारे भरून पावले आहे.

नेताजी, तू पूर्वी काय होतास हे आता विसर. शिवाजीराजांनी तुला बरखास्त केले, म्हणून तू आज आमच्यासमोर आहेस. तुझी योग्यता ध्यानी घेऊनच आलाहजरतांनी तुला हा मरातब बहाल केला आहे. तुझ्यासंबंधीचा प्रत्येक फैसला आलाहजरतांनी स्वत: केला आहे. दिलेरखान माझेच नायब आहेत, म्हणजे तू माझ्याच खिदमतीत आहेस. पराक्रम दाखव. त्याचे योग्य चीज होईल. हा माझा शब्द आहे.

-

नेताजी दिलेरखानाकडे रुजू झाले. बादशहाने खास त्यांच्यासाठी पाठविलेला मानाचा पोशाख तर त्यांना दिला गेलाच, पण दिलेरखानानेसुद्धा अनेक मूल्यवान वस्तू देऊन त्यांना नावाजले. सुप्यामध्ये त्यांच्यासाठी नवा वाडा बांधून देण्याचे काम त्याने सुरू केले आणि वाड्याचे काम पूर्ण होईपर्यंत नेताजींचा कुटुंबकबिला त्याने मोठ्या आग्रहाने छावणीतच ठेवून घेतला. अर्थात बादशहाच्या तशा सूचनाच होत्या त्याला.

महाराज आग्र्याला पोहोचले. शहजाद्याप्रमाणे बडदास्त राखण्याची फर्माने काढणाऱ्या बादशहाने शहर प्रवेशापासूनच त्यांच्याकडे अपमानजनक दुर्लक्ष करण्यास सुरुवात केली. त्यांचा योग्य मरातब ठेवला नाही. दरबारात अत्यंत अपमानास्पद वागणूक दिली गेली; त्यामुळे महाराजांनी भरदरबारात आपला संताप व्यक्त केला आणि बादशहाला पाठ दाखवून ते दरबारातून बाहेर पडले. अशा सगळ्या रसभरित बातम्या, त्यात बराच मीठमसाला मिसळून छावणीत येत होत्या. त्यावर उलटसुलट चर्चा होत होत्या. मात्र चर्चेचा एकूण सूर महाराजांचे वर्तन कसे गैर आणि बदतमीजीचे होते असाच असे. असल्या चर्चा ऐकून नेताजी मनोमन अस्वस्थ होत. पण प्राप्त परिस्थितात महाराजांची निंदानालस्ती मुकाटपणे ऐकत राहण्यापलीकडे ते काहीच करू शकत नव्हते.

शिवाजीसारख्या मातब्बराचा उपयोग करून दख्खनमधील मुघलसत्ता बळकट करण्याचे आणि वाढविण्याचे मिर्झाराजांचे अवघे राजकारण उधळले गेल्यामुळे ते फार अस्वस्थ झाले.

आयुष्यभराची पुण्याई, कर्तबगारी, मोगली सिंहासनाशी पिढ्यान्पिढ्या चालत आलेली निष्ठा त्यांनी या राजकारणासाठी पणाला लावली होती. औरंगजेबाला बादशहा म्हणून सिंहासनावर बसविण्यासाठी त्यांनी जी अनमोल मदत केली होती, त्याचे भान ठेवून बादशहा आपला शब्द डावलणार नाही अशी त्यांना खात्री वाटत होती. या भरवशावरच त्यांनी महाराजांना बेल-भंडार उचलून सुखरूप घरी परत आणण्याचे वचन दिले होते. कदाचित बादशहा त्यांना दख्खनची सुभेदारी देणार नाही पण त्याच तोडीचे एखादे मोठे मानाचे पद बहाल करून त्यांनी सुचविलेल्या योजनेप्रमाणे दक्षिणी सत्ताधाऱ्यांशी लढण्यासाठी कुलमुखत्यारी बहाल करील या त्यांच्या विश्वासाला संपूर्ण तडा गेला होता. रजपुताचे वचन धोक्यात आले होते.

आणि एक दिवस छावणीत बातमी येऊन थडकली. पाच हजार स्वार आणि तोफांच्या गराड्यात बादशहाने शिवाजीला राहत्या डेऱ्यात बंदिस्त करून ठेवले आहे. वेढ्याची जिम्मेदारी आग्र्याचा शहर कोतवाल सिद्दी फुलादखान याच्यावर आहे. याचा अर्थ साफ होता. शिवाजी आता बादशहाचा कैदी होता आणि त्याचे जिवंत घरी परत येणे दुरापास्त आहे.

या बातमीने राजपूत गोटात चिंतेचे सावट पसरले, तर मोगल व पठाणी गोटात आनंद उचंबळून आला.

-

महाराज आग्र्यात अडकून पडल्याने आता सारेच राजकारण विसकटले होते. घटना एवढ्या झपाट्याने घडत गेल्या होत्या की, त्या परिस्थितीत स्वराज्याच्या बाजूने वळविण्यासाठी असामी हेरण्याची आणि त्याला फितविण्याची बोलणी करण्याची सोयच मुळी उरली नव्हती.

एकामागोमाग एक येऊन थडकणाऱ्या बातम्यांमुळे नेताजींची मन:स्थिती फारच बिकट झाली होती. असहायतेने त्यांना पुरते घेरून टाकले. मोगली छावणीत राहून महाराजांविषयी काळजी दाखविणे, उत्सुकतेने चौकश्या करणे, कशाचीच सोय नव्हती. त्यातून मग मोगली पद्धतीने भलतेसलते तर्क-कुतर्क लढविले गेले असते. महाराजांची सारी मसलतच नव्हे तर त्यांचे प्रतिरूप सहकुटुंब संकटात पडले होते. छावणीत तर सोडाच पण स्वराज्यात संधान बांधूनसुद्धा कोणाचा सल्ला घेण्याची सोय नव्हती. कारण ही मसलत फक्त ते आणि महाराज याव्यतिरिक्त कोणालाच माहीत नव्हती.

याच कारणामुळे महाराज सुखरूप परत येईपर्यंत स्वराज्यात परत जाणे शक्य नव्हते. परत जाताच त्यांची रवानगी अंधारकोठडीत झाल्याशिवाय राहणार नव्हती. तेवढ्यावर भागते, तर महाराज परतताच सुटका झाली असती. पण संतापलेल्या आईसाहेबांनी थेट तोफेच्या तोंडीच दिले तर? चारी बाजूंनी नुसती कोंडी होऊन बसली होती. उरात तीर रुतलेल्या पक्ष्यासारखे मनातल्या मनात तडफडत राहण्यापलीकडे ते काहीच करू शकत नव्हते. त्याउपर मनाची ही तगमग शब्दातून वा कृतीतूनच नव्हे तर चर्येवरसुद्धा उमटून चालणार नव्हते.

दिलेरखानाच्या दिवाणखान्याच्या डेऱ्यात त्याचे सारे सरदार जमून एकदा याच विषयावर चर्चा करीत होते. काही उथळ मनाचे सरदार अगदीच खालच्या पातळीवर जाऊन महाराजांची खिल्ली उडवीत होते. चेहऱ्यावर उसनी अलिप्तता ठेवून नेताजी गप्प उभे होते. दिलेरखानाच्या चाणाक्ष नजरेतून तो उसना भाव सुटला नाही. त्याने एकदम विचारले–

क्यों नेताजी? बडा अफसोस महसूस हो रहा होगा नहीं?

नेताजी चपापले. पण प्रसंगावधान राखून लगेचच उत्तरले–

हुजूर, अफसोस कसचा? स्वतंत्र दौलत निर्माण करायला निघालेला माणूस. सुभेदारीच्या मोहाने जसा वाघ स्वत:च्या पायाने चालत येऊन पिंजऱ्यात बंद व्हावा तसा अलगद आलमपन्हांच्या जाळ्यात सापडला. अनेक वर्षे ते आमचे खाविंद होते तेव्हा अशा प्रकारे त्यांचा नाश होताना पाहून वाईट वाटणे साहजिक नाही का? बस्स! तेवढाच अफसोस.

त्याच दिवशी सायंकाळी मिर्झाराजांची भेट मिळविण्यासाठी त्यांनी अर्ज केला. मिर्झाराजांनी तुरंत भेट फर्मावली. त्याप्रमाणे चिंतेने काळवंडलेल्या मिर्झाराजांस्रुस्तम आहमोर नेताजी पेश झाले. बराच वेळ अस्वस्थ शांततेत गेला.

राजासाहब, आता तुमच्यापासून काय लपवून ठेवायचे? राजे सुटून सुखरूप परत येतील ना?

नेताजी, शिवाजीराजांना आलमपन्हांनी कैदेत ठेवले आहे म्हणून तू काळजीत पडला आहेस हे आम्ही समजू शकतो. पण लक्षात ठेव, आता तू मुघलिया तख्ताचा चाकर आहेस आणि शिवाजी तख्ताचा शत्रू. शत्रूला सहानुभूती म्हणजे धन्याशी गद्दारी. कुणाला संशय आला तरी तुझी खैर नाही हे पक्के समजून अस.

बादशहाच्या कचाट्यात सापडलेला शत्रू आणि मगरीच्या दाढेत अडकलेले भक्ष्य कधी सुटत नसते. पण येथे एका रजपुताचे वचन गुंतलेले आहे, हे आलमपन्हा जाणतात. आम्हास दुखवणे सध्या तरी त्यांना परवडणारे नाही याची त्यांना जाणीव असावी, असे वाटते. एवढ्या एकाच कारणाने आशेला थोडी जागा आहे. शिवाजी परत आला तर पुन्हा त्यास जाऊन मिळण्याचा विचार आहे की काय तुझा?

ते आता या जन्मी तरी शक्य नाही. खंडोजी खोपडे काय नतीजा पावला ते सरकारांच्या कानी असेलच. कान्होजी मध्ये पडले म्हणून जीव बचावला त्याचा. गद्दारीचा शिक्का कपाळी मिरवत कुत्र्याच्या मौतीने मरण्याची किंवा तोफेच्या तोंडी जाण्याची माझी इच्छा नाही. विशाळगडावरून निघालो तो परतीचे दोर कापूनच. पण अनेक वर्षांचे ऋणानुबंध मनात काळजी उत्पन्न करतात यापरते दुसरे काही नाही.

सावध राहा. सावध वाग. मी बादशहांचा आणि तख्ताचा इमानी चाकर आहे, हे कायम ध्यानात असू दे. तुझ्या निष्ठेचा नुसता संशय जरी आला तरी माझेसुद्धा हत्यार तुझ्यावर उठेल याची जाणीव सदैव जागती ठेव.

मिर्झाराजांनी दिलेल्या स्पष्ट इशाऱ्यामुळे तगमग कमी न होता उलट वाढलीच. मनात कुठेतरी एक आशेचा तंतू होता तोसुद्धा तुटून गेला.

-

दिवसांमागून दिवस उलटत होते. मिर्झाराजांची आदिलशाहीविरुद्धची मोहीम नेटाने सुरू होती. पाऊस उणावण्याची वाट पाहत छावणी परिंडा प्रांतात भूम गावाजवळ पडली होती. मिर्झाराजांची छावणी दिलेरखानाच्या पिछाडीस अडीच कोसांवर होती. नेताजींचा मुक्काम दिलेरच्या छावणीतच होता.

वाड्याच्या बांधकामाचे निमित्त पुढे करून त्यांचा कबिलासुद्धा छावणीतच ठेवून घेतला गेला होता. नेताजींची स्वत:ची फौज नव्हती; त्यामुळे त्यांची फौज उभी करण्याचे काम अद्याप सुरूच होते; त्यामुळे त्यांना अजून आघाडी फर्मावण्यात आली नव्हती. शाही हुकमांप्रमाणे नेताजींवर दिलेर बारीक नजर ठेवून होता. आणि एक दिवस खुद्द बादशहाकडून आलेले गुप्त फर्मान त्याच्या हाती पडले. त्या फर्मानात नेताजीला ताबडतोब गिरफ्तार करून आग्र्याला पाठविण्याचा हुकूम होता. कारण?

कारण दगा करून शिवाजी पाच हजार स्वारांचा वेढा फोडून आग्र्यातून निसटला होता. पळून गेला होता.

आलमगिराला दाट संशय होता की, नेताजी मोगलांना मिळाला यात शिवाजीचेच काही कारस्थान असावे. आता त्याला शिवाजीच्या बदल्यात प्रतिशिवाजी हवा होता. सुदैवाने तो अनायासे त्याच्याच छत्राखाली होता. त्याला खात्री वाटत होती की, शिवाजी पळाल्याचे समजताच नेताजी मोगली छावणीतून पळ काढेल. बादशहा आता त्याला कोणतीच संधी घेऊ देणार नव्हता. म्हणूनच ही बातमी षट्कर्णी होण्यापूर्वी त्याला नेताजीवर झडप टाकायची होती.

फर्मान वाचून दिलेरने नजर वर केली. बक्षिसाच्या आशेने उभ्या असलेल्या जासुदावर वीजच कोसळली.

गिरफ्तार करा या जासुदाला आणि मुसक्या बांधून शेजारच्या तंबूत बसवून ठेवा. पुढचा हुकूम देईपर्यंत त्याला कोणाला भेटू देता कामा नये.

जासुदाला काही समजण्यापूर्वीच त्याच्या दंडावर काढण्या चढल्या. दिलेरने स्वत:च्या डेऱ्यावरचे पहारे वाढवून सख्त केले. आपला विश्वासू सरदार करीमखान कंदाहारी याला त्याने ताबडतोब बोलावून घेतले. तो उंच धिप्पाड निर्दय मुद्रेचा पठाण काही क्षणांतच आपल्या आकासमोर दाखल झाला.

पठाण करीमखान कंदाहारी, नीट ध्यान देऊन ऐक. जिल्हेसुभानी आलाहजरत आलमगीर बादशहा सलामतांच्या मिठाचे कर्ज फेडण्याचा वक्त आला आहे. आलमपन्हांचा गुन्हेगार, जो त्याच्या दुर्दैवाने आणि आलाहजरतांच्या कृपेने आपल्याच पनाहमध्ये आला आहे; त्या नेताजी पालकरला या क्षणी गिरफ्तार करायचे आहे. मात्र याद राख, तो माझ्यासमोर पेश होईपर्यंत ही खबर तुझ्या डाव्या हातालासुद्धा समजता कामा नये.

नेताजी म्हणजे दुसरा शिवाजीच आहे याचे भान जागे ठेव. त्याला नुसता संशय आला तरी तो हाताला लागणार नाही. तो जसा शूर समशेरबहाद्दर रुस्तम आहे तसाच अत्यंत चलाखसुद्धा आहे. कारवाई पुरी होण्याआधी खबर बाहेर फुटली आणि तुझ्या पदरी अपयश आले, तर उद्याचा सूर्य बघायला तुझे मस्तक जागेवर असणार नाही लक्षात ठेव.

तीनशे हत्यारबंद कडवे पठाण घेऊन करीमखान तडक निघाला. त्या वेळी सारी छावणी दुपारच्या जेवणाच्या गडबडीत होती. तसेच शिरस्त्याप्रमाणे रोजचे पहारे बदलले जाण्याची ती वेळ असल्याने शिपायांची ही हालचाल विशेष कोणाच्या लक्षात आली नाही. नेताजी आपल्या डेऱ्यात भोजनाला बसले होते. जेमतेम चार-सहा घास खाल्ले असतील नसतील; डेऱ्याच्या दरवाजावर गलका ऐकू आला. हुजऱ्या धावत आत आला.

हुजूर काहीतरी गडबड दिसतीया. करीमखानाचे पठाण डेऱ्याला वेढा घालत्यात. समद्या पहारेकऱ्यांची हत्यारं काढून, त्यांना जेरबंद केलंया…

हुजऱ्या असे बोलत असतानाच वीस-पंचवीस राक्षसी पठाणांना घेऊन करीमखान डेऱ्यात घुसला.

तलवारीच्या एकाच फटक्यात हुजऱ्याचे मुंडके जमिनीवर उतरले. नेताजींच्या बायकांनी जोरात किंकाळ्या फोडल्या. हातातला घास ताटात टाकून नेताजी ताडकन उठले. चार हात अंतरावर तिवईवर त्यांची तलवार होती. वाघाच्या तडफेने त्यांनी तलवारीकडे झेप घेतली; पण आधीच सावध असलेल्या एका पठाणाने लाथेच्या फटकाऱ्याने तलवार दूर उडवून दिली. त्याच वेळी दुसऱ्या पठाणाने झेप घेणाऱ्या नेताजींसमोर स्वत:स झोकून दिले. त्याला अडखळून नेताजी खाली पडले. डोळ्याचे पाते लवते न लवते तोच करीमखानाने त्यांच्या पाठीवर बसकण मारली. त्याच चपळाईने दोन पठाण त्यांच्या दोन्ही हातांवर, तर दोन त्यांच्या पायांवर बसले. त्याच वेळी काही पठाणांनी शेजारच्याच ताटावर जेवत असलेल्या कोंडाजी पालकरच्या मुसक्या आवळल्या.

हाती नंग्या समशेरी असणाऱ्या पठाणांच्या गर्दीने डेरा भरून गेला. सुटण्यासाठी नेताजींनी जिवाच्या आकांताने धडपड केली पण व्यर्थ. त्यांचे हातपाय साखळदंडांनी जखडण्यात आले. बैलांच्या कासऱ्याच्या काढण्या त्यांच्या दंडांना बांधण्यात आल्या. भले मोठे जडजूड जोखड त्यांच्या गळ्यात अडकवून त्यांना उभे केले गेले. संतापाने नागासारखे फूत्कार टाकणारे नेताजी कडाडले–

करीमखान, ही काय बदतमिजी चालवली आहे? तुला या दांडगाईचा निश्चितच पश्चात्ताप करावा लागेल ध्यानात ठेव.

बादशहा सलामतांच्या दुश्मनांशी आणि गद्दारांशी असाच सलूक केला जातो. हजरत दिलेरखानसाहेबांनी तुला जिंदा हाजिर करण्याचा हुकूम दिला नसता, तर आज आत्ता हे तुझे उद्दाम मुंडकेच त्यांना नजर केले असते. घेऊन चला रे या गद्दाराला.

-

एखाद्या पुष्ट खोंडाला बांधून न्यावे तसे गळ्याला कासरे बांधून कोंडाजी आणि नेताजींना छावणीतून चालविले. ही धिंड पाहण्यासाठी हातातली कामे टाकून लोकांनी दुतर्फा गर्दी केली. संतापाने फुललेल्या नेताजींना दिलेरखानासमोर उभे करण्यात आले.

शाबास करीमखान! आज तू आलाहजरतांची मनशा पूर्ण केलीस. तुझ्या इमानदारीची आणि या अजोड कर्तबाची नक्कीच कदर होईल. उद्याच मी तुझी सिफारिश आग्र्याला रवाना करतो.

त्यानंतर नेताजींकडे वळून, चेहऱ्यावर उसनी दिलगिरी आणून, नाटकी ढंगात दिलेरखान म्हणाला–

आवो, नेताजी आवो. तुझ्यासारखा तिखट तलवारीचा रुस्तम इतक्या आसानीने जेरबंद होईल, असे मला कधी स्वप्नातसुद्धा वाटले नव्हते. मला वाटत होते, आज माझे पंधरा-वीस पठाण जवान शहीद झाल्याशिवाय राहत नाहीत, कारण मुरारबाजीची बेहाय फिरणारी तलवार आजसुद्धा माझ्या नजरेसमोर आहे. पण आता माझ्या लक्षात आले, तो धन्यासाठी इरेला पडून लढत होता आणि तू स्वार्थ साधण्यासाठी धन्याला सोडून येथे आला आहेस. तरी तुला अशा प्रकारे आणावे लागले याचा मला सख्त अफसोस आहे.

शरमेने आणि अपमानाने खजील झालेले नेताजी त्याही परिस्थितीत खवळून उठले. संताप त्यांच्या अंगी मावत नव्हता. खैराच्या इंगळासारखे पेटून उठलेले डोळे आग बरसत होते. मानेच्या शिरा तटतटून फुगल्या होत्या आणि कपाळावरची धमनी ताडताड उडत होती. फुस्कारे टाकीत, गडगडाटी आवाजात त्यांनी सवाल फेकला–

मी शिवाजीराजांना सोडून का आलो याच्याशी तुला काय देणे-घेणे?

मिर्झाराजांनी आवतण देऊन बोलावले म्हणून मी तुझ्या छावणीत दाखल झालो. आज मी आलमगीर बादशहा सलामतांचा नेक वफादार सेवक, सरदार आणि दरबारी मनसबदार असताना मला असे अपमानित करून जेरबंद करण्याचे मुळी कारणच काय? अरे! ताटावर बसून जेवत असताना, हाती हत्यार नसताना तुझे कुत्रे भेकडांसारखे माझ्या अंगावर चढून बसले, म्हणून; अन्यथा त्या नामर्दांची माझ्या अंगाला हात लावण्याची काय बिशाद होती. अंगात हिंमत असेल, सच्चा बापाचा असशील तर माझे हात मोकळे करून बघ. तू कपटाने गोळी घातल्यामुळे पुरंदराखाली बाजी जे साधू शकले नाहीत, ते तुला आत्ता दाखवतो. दरबारी मानकऱ्यांना वागवण्याची हीच तुमची रीत आहे की काय?

छद्मी हसत दिलेर म्हणाला–

दरबारी मनसबदारांशी नव्हे पण तख्ताच्या दुश्मनांशी आम्ही असेच वागतो. तू काय करू शकतोस याचे पूर्ण भान आहे म्हणूनच तुला असे जेरबंद करून आणि जोखडात गुंतवून आणावे लागले. रही बात नेक वफादार सेवकाची. मेरे प्यारे नेताजी, मोगली दरबाराची चाकरी म्हणजे सुळावरची पोळी. शहेनशहाची मर्जी खफा झाली तर वजिराचा क्षणात हुजऱ्या होतो आणि मर्जी बहाल झाली तर जनानखान्यावरचा खोजासुद्धा अमीर म्हणून मिरवतो. मी तर बादशहा सलामतांचा बंदा गुलाम. त्यांच्या हुकमाची काटेकोर तामिली हाच माझा धर्म आहे. करीमखान, कैद्याला असाच महाराजसाहेब मिर्झाराजांच्या समोर पेश करा. घोडेस्वार पाठवून वर्दी पुढे रवाना होऊ दे. याद रहे, वाटेत काही गडबड झाली आणि कैदी निसटला तर तुझ्यासह तुझी सारी तुकडी गारद करून टाकीन. ले चलो इस गुस्ताख बेइमान को.

क्रमश:

*____📜🚩

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...