नेताजी पालकर यांच्या जीवनावरील ऐतिहासिक कादंबरी📜⚔
अग्निदिव्य
लेखक : कल्याणीरमण बेन्नूरवार
_⚔🚩⚔📜🚩___
अशा प्रकारे जेरबंद करून नेताजीला समोर उभे केलेले पाहून मिर्झाराजे अचंबितच झाले. संतापाची तिरीमिरी त्यांच्या मस्तकात गेली.
करीमखानाला जाब
विचारण्यासाठी त्यांनी तोंड उघडण्यापूर्वीच संपूर्ण दरबारी पोशाखातील
दिलेरखान पठाण कुर्निसात करीत डेऱ्यात दाखल झाला. त्याचा तोरा आणि ऐट पाहत
राहावी अशी होती. एखादी अत्यंत अवघड लढाई जिंकून घ्यावी तशी कृतकृत्यतेची,
समाधानाची भावना त्याच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होती. मिर्झाराजांचे शब्द
ओठातच अडखळले. दिलेरला न्याहाळीत ते काही क्षण स्तब्ध बसून राहिले.
बऱ्याच वेळाने
त्यांचा प्रदीर्घ सुस्कारा डेऱ्यात घुमला. तलवारीच्या मुठीवर डावा हात
ठेवून, छाती पुढे काढून गर्वोन्मत्त आवेशात समोर उभ्या ठाकलेल्या
दिलेरखानाकडे संतापलेल्या, तीक्ष्ण नजरेने पाहत गंभीर आवाजात ते म्हणाले–
दिलेर, यह क्या
तमाशा है? नेताजी और गिरफ्तार? तुला याचा जाब द्यावा लागेल. खुद्द
आलाहजरतांच्या सही-शिक्क्याने नेताजीला मनसबदारी बहाल झाली आहे, हे तुला
माहीत आहे.
उन्ही आलाहजरत के हुक्म की आज तामिली हो रही है.
दिलेरने खूण
करताच एका हुजऱ्याने शाही फर्मानाची मखमली थैली मिर्झाराजांसमोर तिपाईवर
ठेवली. नजरेचा इशारा समजून उदयराज मुन्शी पुढे झाला आणि त्याने थैली उघडली.
झरझरा त्याचे डोळे मजकुरावरून फिरले. कपाळावर जमा झालेला घाम उपरण्याने
पुसत थरथरत्या हाताने त्याने खलिता मिर्झाराजांच्या हाती दिला. त्यांच्या
नजरेतील प्रश्न ओळखून खुणेनेच त्यांना खलिता स्वत: वाचण्यास सुचविले.
फर्मान वाचून ते कसेबसे उदयराजच्या हाती देत ते मटकन मसनदीवर बसले.
त्यांच्या कपाळावर घाम डवरून आला. थरथरत्या ओठांमधून कसेबसे शब्द बाहेर
आले–
हे भगवान! क्या राजा शिवाजी आग्रा से भाग निकले? फुलादखानाचा जागता पहारा तोडून? अशक्य. अशक्य.
जी हाँ
महाराजसाहब. सिद्दी फुलादखानाच्या तोफांचा आणि जांबाज पाच हजार शिपायांचा
वेढा तोडून हवेत विरघळून जावा तसा शिवाजी कैदेतून पळाला. ही बाजारगप्प
नाही.
खुद्द
आलाहजरतांच्या शिक्क्याच्या फर्मानात तसे स्पष्ट लिहिलेले आहे. आणि त्या
फर्मानाप्रमाणेच या दुसऱ्या शिवाजीला, नेताजीला जेरबंद करून आपल्यासमोर
हाजिर केले आहे. हुक्म हो.
महाराज
औरंगजेबाच्या कचाट्यातून सुखरूप पळाल्याचे ऐकताच, तशा जखडलेल्या
अवस्थेतसुद्धा नेताजींच्या चेहऱ्यावर समाधानाचे आणि आनंदाचे हास्य पसरले.
सारी मसलत आता मातीमोल झाली होती,
प्राप्त
परिस्थितीत औरंगजेब आपला जीव घेतल्याशिवाय राहणार नाही, हे स्पष्ट होते;
त्यामुळे आपला आनंद लपवून ठेवण्याची गरज आता उरली नव्हती.
शक्तिपात
झाल्यासारखे मिर्झाराजे गिर्दीला टेकून बसून राहिले. त्यांची शून्य नजर
डेऱ्याच्या आढ्याला खिळली. डेऱ्यात नीरव शांतता पसरली होती. रामसिंहांचे
आणि त्यांचे भवितव्य त्यांना उघड्या डोळ्यांसमोर स्पष्ट दिसत होते. काही
वेळ वाट पाहून दिलेरखानाने उदयराजकडे एक तीक्ष्ण-अस्वस्थ कटाक्ष टाकला.
त्याची नजर वाचीत किंचित खाकरत दबक्या आवाजात तो मिर्झाराजांच्या कानाशी
कुजबुजला–
हुकूम…
मिर्झाराजांची जड
नजर त्याच्याकडे गेली. हृदयातील वेदना नजरेत स्पष्ट दिसत होती. उदयराजने
खुणेनेच त्यांना नेताजींची आठवण करून दिली. त्यांची नजर नेताजींवर खिळली.
नजरेत ओळख दिसत नव्हती.
बोटांची अस्वस्थ
चाळवाचाळव उमगून उदयराजने झटकन पुढे होऊन हुक्क्याचा नेचा बोटात सरकविला.
नेचा दाताखाली दाबून धरत त्यांनी एक प्रदीर्घ झुरका घेतला. डोळे तांबडेलाल
होऊन त्यांत पाणी तरळले. हुजऱ्याने पुढे केलेल्या रेशमी रुमालाने चेहरा
स्वच्छ पुसून आणि घशातील खाकरा पिकदाणीत थुंकून त्यांनी स्वत:वर ताबा
मिळविला. नजर साफ झाली. स्थिर दृष्टीने दिलेरखानाकडे पाहत त्यांनी बोलण्यास
सुरुवात केली–
अफसोस। सख्त अफसोस! दिलेर,
आमचा
जिंदगीभरचा तजुरबा आणि मुघलिया तख्ताच्या चाळीस वर्षांच्या चाकरीचे इमान
पणाला लावून आम्ही हे फार मोठे राजकारण उभे केले होते. जर त्याला यश लाभते
तर मुघली झेंडे, तुला-मला तोशीश न लागता पार कावेरीच्या पलीकडे
कन्याकुमारीपर्यंत पोहोचले असते. आपल्यासाठी ते शिवाजीने फडकावले असते.
स्वतंत्र दौलतीचे खूळ डोक्यात घेऊन बसलेल्या त्या वेड्या पिराला मी कसे
राजी केले, माझे मलाच माहीत.
लेकिन अफसोस की
मी जिल्हेसुभानी आलाहजरतांना माझा हा मकसद पूर्णपणे पटवून देण्यात
नाकामयाब ठरलो. कदाचित त्यांची रुबरू भेट झाली असती तर मला कामयाबी हासिल
करणे शक्य झाले असते. भगवान एकलिंगजीच्या मनात तसे घडवावयाचे नव्हते, असेच
आता समजायचे. पण शिवाजी निसटला म्हणून आपल्या चाकरीत आलेल्या नेताजीला
गिरफ्तार करून आग्र्याला पाठवण्याच्या हुकमाचा अर्थ मला अजून लागत नाही.
नेताजी आज शिवाजीचा सरलष्कर नाही. त्याला बरखास्त करून अपमानित केले गेले
आहे. आज तो तख्ताचा चाकर आहे. दरबारी मनसबदार आहे. त्याला त्याचे इमान
सिद्ध करण्याचा मौका मिळाला नसला, तरी त्याची गद्दारी वा बेइमानी मला कधी
नजर आलेली नाही. फर्मानातसुद्धा त्याच्यावर कुठला आरोप केलेला नाही. कुठला
शक शुबहा व्यक्त केलेला नाही. मग शिवाजी पळाल्याचा गुस्सा नेताजीवर
काढण्याचा मतलब काय?
गुस्ताखी माफ हो
महाराजसाहब. तुम्ही माझ्यापेक्षा वयाने, अनुभवाने, रुतब्याने, प्रत्येक
बाबतीत फार मोठे आहात. मी तुम्हाला काही सांगणे कितपत बरोबर आहे मला माहीत
नाही. पण मला एवढेच समजते की, सेवकाने खाविंदांच्या हुकमाची तामिली करायची
असते. तो चूक की बरोबर याची चिकित्सा करण्याचा हक्क ना मला आहे ना
आपल्याला. पण आपल्याला त्याचा अर्थच जाणून घ्यायचा असेल तर लहान तोंडी मोठा
घास घेण्याचा दोष पदरात घेऊन सांगतो, यालाच मोगलाई म्हणतात.
पिढ्यान्पिढ्या
मुघल तख्ताची सेवा करूनसुद्धा आपण अजून कोरडेच राहिलात. या फर्मानामागचे
कारण तुम्हाला लक्षात येत नाही त्याचे कारण हेच आहे. तुमच्या शक्तीचा,
बुद्धीचा आणि सामर्थ्याचा वापर करून बादशहा सलामत आणि सुलतान तुमच्यावर
शेकडो वर्षे राज्य करीत आले आहेत. म्हणूनच आज तुम्ही महाराजसाहब असलात तरी
बंदे गुलाम आहात त्यांचे आणि आलाहजरत जिल्हेसुभानी आहेत ते तुमचे.
महाराजसाहब, दिलात काही ख्वाहिश ठेवून, तुमच्या शब्दाखातर आज जसा शिवाजी
आपल्या पायांनी चालत आलाहजरतांच्या पाक कदमांशी गेला होता, तसाच त्याचा बाप
शहाजी मुर्तुझा निजामाचे प्राण वाचवण्याच्या जुनूनमध्ये आपल्या पायांनी
चालत ‘मरहूम’ आलाहजरत बादशहा शहाजहान हुजुरांच्या मुबारक कदमांपाशी आला
होता.
तेव्हा
सुलतानाने दख्खन हजरत महम्मद आदिलशाह सलामतांचा आग्रह झुगारून आपल्या
रहमदिल, दर्यादिल हुजूर सलामतांनी त्याची जान बख्शली. त्याला फक्त हद्दपार
केले. त्या नेक दर्यादिलीचा नतीजा काय? तर या नादान शिवाजीचा काटा नासूर
बनून मुघलिया सलतनतीच्या कलेजामध्ये रुतून बसला आहे. सिद्दी फुलादखानाच्या
नादान गफलतीमुळे हातात आलेला शिवाजी पळाला. अन्यथा आलाहजरतांनी त्याला
जिंदा सोडलाच नसता. काफिर गुलामाने दिलेले वचन त्याच्या सच्चा मोमिन
मुसलमान आकावर कधीच आणि कोणत्याच परिस्थितीत बंधनकारक नसते.
स्वत:ला दुसरा
शिवाजी म्हणवून घेण्यात फक्र महसूस करणारा हा नेताजी उद्या आपल्या पुरान्या
आकाकडे परत जाणार नाही याचा काय भरवसा? जाताना तो सोबत काय काय आणि
कुणाकुणाला घेऊन जाईल याचा अंदाज तरी करता येणे शक्य आहे का? नेताजी म्हणजे
खंडोजी खोपडा नाही हे हुजूर जाणत नाहीत की काय? भविष्यात निर्माण होऊ
शकणारा धोका आजच उपटून फेकून देण्याचा मौका हातात असताना कोण शहाणा घर
पेटण्याची वाट बघत बसणार आहे? महाराजसाहब, नीट ध्यानात ठेवा, पुढे-मागे
कोणत्याही कारणाने या शिवाजीचा पोरगा संभाजी जर असाच हातात सापडला, तर
आलाहजरत त्याचीसुद्धा हीच गत करतील.
महाराजसाहब,
फर्मान थेट माझ्या नावे आले असले, तरी मी आपला नायब आहे म्हणून कैदी आपल्या
खिदमत में हाजिर केला आहे. आपण हुकूम करा, त्याप्रमाणे कैद्याची रवानगी
आग्र्याला केली जाईल.
कैदी असाच कडक बंदोबस्तात पुरंदरावर रवाना करा. आग्र्याला पाठवण्याची माणसे उद्या नामजद केली जातील.
गुस्ताखी माफ
महाराजसाहब, पण कैदी फक्त पठाणांच्या पहाऱ्यातच आग्र्याला पाठवावा, असे
फर्मानात साफ लिहिले आहे. आपल्या अधिकारात मला दखलअंदाजी करावयाची नाही, मी
फक्त फर्मानात दर्ज असलेल्या अल्फाजांची याद करून देत आहे.
मिर्झाराजांची
तीक्ष्ण नजर दिलेरखानाच्या नजरेला भिडली. व्यथित असली तरी त्या नजरेचा दाह
दिलेर फार काळ सहन करू शकला नाही. त्याची उर्मट नजर आपसूकच स्वत:च्या
पायाशी उतरली. तीव्र पण विषादाच्या कटुतेने ओतप्रोत स्वरात मिर्झाराजे
म्हणाले–
शुक्रिया नायब
दिलेरखान पठाण; फर्मानात दर्ज असलेल्या अल्फाजांची याद ताजी केल्याबद्दल
तहे दिल से शुक्रिया! आम्ही हे विसरलोच होतो की, शिवाजीला आग्र्याला
पाठवण्याचा आग्रह आमचाच. भरदरबारात त्याने जी गुस्ताखी केली, आलाहजरतांचा
अपमान केला आणि त्यावर कडी म्हणजे त्यांच्या मर्जीविरुद्ध राजधानीतून पळून
जाऊन नाफर्मानीचा जो सबूत जगजाहीर केला, त्या पापात आमचा वाटा आहे. दुनिया
तसे मानो ना मानो पण आलाहजरत तरी तसे म्हणणारच. या वास्तवाची आम्हाला जाणीव
करून दिल्याबद्दल आम्ही तुमचे एहसानमंद आहोत. पठाण सारेच तुमच्या निसबतीत
आहेत. योग्य वाटतील त्या विश्वासातल्या माणसांना नामजद करा.
याद रहे कैदी कोई मामुली शख्स नहीं है. त्याला सोडवण्याची कोशिश केली जाण्याची शक्यता आहे.
बंदोबस्तासाठी
किमान दोन हजारांची फौज सोबत जाऊ देत. त्यात निष्णात बरकंदाजांचा समावेश
असला पाहिजे. सोबत तोफा आणि पुरेसा दारूगोळा तैनात करा. अनुभवी आणि निष्णात
माग काढणारे सोबत पाठवा.
कोणताही धोका
पत्करता कामा नये. जल्द अज् जल्द परवाने आणि दस्तावेज आमच्या दस्तखतीसाठी
पेश करा. वाटेतल्या प्रत्येक ठाण्यावर आणि चौकीवर आजच्या आज सांडणीस्वार
रवाना करून सूचनांचे खलिते पाठवा.
कैद्यासाठी खास मजबूत लोखंडी पिंजरा तयार करवून घ्या.
वाटेने जाताना
एक हजार स्वार आणि निम्म्या तोफा पिंजऱ्याच्या पुढे आणि तसाच बंदोबस्त
पिंजऱ्याच्या मागे ठेवला गेला पाहिजे. प्रवास फक्त दिवसाउजेडीच केला जावा.
कोठेही, कोणत्याही कारणाने एका रात्रीपेक्षा जास्त मुक्काम करण्यास सख्त
मनाई आहे. कैद्याला मोठ्या गावात किंवा शहरात न नेण्याची सख्त ताकीद द्या.
कैद्याला भेटण्याची तर सोडाच पण पाहण्याचीसुद्धा मनशा कोणी व्यक्त करील, तर
त्याला सख्त मना करा. फितुरीला जरासुद्धा वाव मिळता कामा नये. प्रत्येक
मुक्कामावरून आमच्याकडे आणि राजधानीत अखबार पोहोचले पाहिजे.
उदयराज, आता आम्ही आराम करणार आहोत. आम्हाला आमच्या आरामात खलल नको. समजलात? तखलिया.
-
पठाणांच्या सख्त
पहाऱ्यात पुरंदरावर नेताजींची रवानगी केली गेली. हातपाय मणामणाच्या
बेड्यांमध्ये जखडलेले होते. दंडांना काढण्या लावलेल्या होत्या.
बेडीचे एक टोक
करीमखानाच्या घोड्याच्या खोगिरात गुंतविलेले होते. रोखलेल्या भाल्यांच्या
आणि तळपत्या नंग्या तलवारींच्या सख्त बंदोबस्तात पुरंदराचा चढ चढताना
त्यांच्या मनात कल्प कल्प उसळले. त्यांचे मन आक्रंदत होते–
‘अरे देवा
खंडेराया, महाराजांनी काय योजले आणि हे काय होऊन बसले? आता परतीची वाट कशी
शोधावी? दु:खात सुख एवढेच, महाराज सुटले. आग्र्यातून निसटले म्हणजे घरी
सुखरूप पोहोचणार यात संशय नाही कारण ती व्यवस्था बहिर्जीवर सोपविली होती.
पण मला महाराजांचे पाय या जन्मात परत कधी दिसतील का? महाराज, माथी लागलेला
गद्दारीचा हा कलंक पुसणे आता फक्त तुमच्याच हातात आहे. तुम्हीच तारक,
तुम्हीच उद्धारक.’
पुरंदराच्या
अंधारकोठडीत आणि आग्र्याच्या वाटेवर त्यांच्या मनात सतत हेच आक्रंदन सुरू
होते. आत्मघात करून मोकळे व्हावे असे अनेकदा त्यांच्या मनात येऊन गेले, पण
बंदोबस्त अतिशय कडक असल्याने एकांत मिळू शकला नाही. अशाच नैराश्यपूर्ण
विचारांच्या ग्लानीत असताना अंधारात वीज चमकून जावी तसा त्यांच्या मनात
विचार चमकून गेला–
‘असे
मच्छर-मुरुकुटासारखे मरणे मराठ्याला आणि त्यातही स्वराज्याच्या सरनोबताला
शोभणारे नाही. होय, सरनोबतच. लोकांच्या दृष्टीने बरखास्त झालेला असलो, तरी
मला आणि महाराजांना माहीत आहे, मीच आजसुद्धा सरनोबत आहे. मरणे तर आहेच.
मरणाला कोण घाबरतो? दाखवून देईन त्या कपटी धर्मांध आलमगिराला, रणांगणात
तलवार गाजविणारा मराठा दुर्दैवाने नि:शस्त्र आणि असहाय असला, तरी कसा
निधड्या छातीने मरणाला सामोरा जातो. असे मरण मरीन की, महाराजांनासुद्धा
माझ्या मरणाचा कायम अभिमान वाटेल आणि बाजी प्रभू अन् मुरारबाजीप्रमाणे
माझीसुद्धा कीर्त ते डंक्यावर चढवतील.’
पकडल्यापासून
दहाव्या दिवशी नेताजींची धिंड आग्र्याकडे निघाली. वाघ- सिंहांसाठी असतो तसा
मजबूत लोखंडी गजांचा पिंजरा उंटाच्या गाड्यावर चढविलेला होता. भोवताली
क्रूर पठाणांचा पहारा. त्यांच्या खांद्यावर तळपत्या तेग. सूर्योदयानंतर
अर्ध्या-पाऊण घटकेत तांडा प्रवासास सुरुवात करी. सूर्यास्तापूर्वी
अर्धा-पाऊण घटका प्रवास थांबे. वाटेत जेवणासाठीच काय पण पाणी पिण्यासाठी
किंवा विधी उरकण्यासाठीसुद्धा थांबण्याची कोणाला परवानगी नव्हती.
हुकमाप्रमाणे रोज मुक्काम हलता असे. मोठ्या गावातून वा शहरातून कधी काफिला
जात नसे.
प्रवासात सारा
वेळ नेताजींना गजाला धरून उभे राहावे लागे. गाड्याला वेडेवाकडे इतके हादरे
बसत की, आडवे होणे तर सोडाच पण खाली बसणेसुद्धा शक्य होत नसे. सर्व बाजूंनी
उघड्या पिंजऱ्यात दिवसभर उन्हाचा मारा, तर रात्री थंडीचा कडाका सहन करावा
लागे. दिवस सरत्या पावसाळ्याचे. मधूनच येणारी पावसाची सर ओलेचिंब करी.
वाऱ्यावर अंग
आपोआप सुकून जाई. ऊन पडले की, कपडे वाळून जात. नेताजींना वाटे, नरकयातना
म्हणून म्हणतात त्या याच. मग त्यांचेच मन त्यांना सांगे, ‘अरे! अगदीच भोळा
रे तू, ही तर सुरुवात. नरकयातना कशाला म्हणतात ते आग्र्याला आलमगिरासमोर
गेल्यानंतर चाखायला मिळतील.’
काफिला आग्र्याला पोहोचला. सिद्दी फुलादखानाने नेताजीचा ताबा घेतला.
तो, ये है
नेताजी. म्हणे दुसरा शिवाजी! माझ्या शराफतीचा गैरफायदा घेऊन तो बदमाश
शिवाजी पळाला. पण तू याद राख. मला सिद्दी फुलादखान म्हणतात. आता तूच काय
तुझे प्राणसुद्धा माझ्या परवानगीशिवाय येथून बाहेर पडू शकणार नाहीत. दरोगा,
ले जाओ इस काफिर को. याला अशा कोठडीत ठेवा जिथे प्रकाशाचा कतराच काय पण
हवेची लहरसुद्धा पोहोचू शकणार नाही.
पुढचा हुकूम
होईपर्यंत दिवसभरात एक खुजा पाण्याशिवाय याला काही देता कामा नये.
जालिमातील जालिम सिद्दी आणि तार्तर याच्या पहाऱ्यावर नेम.
आजचा खुराक
म्हणून उघड्या पाठीवर दहा कोरडे ओढ. आम्ही याच्या आगमनाची वर्दी आलमपन्हा
जिल्हेसुभानींना देऊन येतो. गफलत किंवा ढिलाई दिसली तर तुम्हा प्रत्येकाची
चामडी लोळवीन; याद राखून ठेवा.
क्रमश:
*____⚔📜🚩
No comments:
Post a Comment