विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 21 December 2023

नेताजी पालकर यांच्या जीवनावरील ऐतिहासिक कादंबरी📜⚔ अग्निदिव्य भाग - 16

 

नेताजी पालकर यांच्या जीवनावरील ऐतिहासिक कादंबरी📜⚔ अग्निदिव्य भाग - 16


नेताजी पालकर यांच्या जीवनावरील ऐतिहासिक कादंबरी📜

अग्निदिव्य

__📜🗡भाग - 1⃣6⃣📜🚩🗡___

लेखक : कल्याणीरमण बेन्नूरवार

🚩📜🚩___

ढकलत, पाडत, लाथा घालून उठवत; पायऱ्यांवरून तंगड्या धरून फरफटवीत नेताजींना लाल किल्ल्याच्या आदबखान्यातील तळघरात नेण्यात आले. क्षणही न दवडता त्यांना कोठडीच्या गजांना आवळून बांधण्यात आले. अंगावर बोटभर चिंधीसुद्धा ठेवली नाही. एक उंच धिप्पाड हबशी हातात लवलवता वेत घेऊन तयार झाला. दरोगा खच्चून ओरडला–

लगाव कसके…

त्या क्षणी लवलवता वेत पाठीवर पडला. एकामागोमाग एक कोडे उघड्या अंगावर कोसळू लागले. दर फटक्यागणिक रक्ताचे शिंतोडे आणि मांसाचे कण भिंतीवर उडत. दाताखाली ओठ दाबून आणि श्वास कोंडून घेऊन नेताजी ते सहन करीत राहिले. तोंडातून अस्फुट चीत्कारसुद्धा उमटला नाही; त्यामुळे दरोग्याला आपलाच अपमान झाल्यासारखे वाटले.

अरे! हरामजादा काफिर, चिल्लाता नहीं। मेरी तरफ से पचास कोडे और लगाव।

दरोग्याचा मान राखण्यासाठी हबशाने अजून चार-पाच फटके हाणले. अखेर त्याच्या मनीच देव उभा राहिला.

नहीं हुजूर, मी यापेक्षा अधिक मारू शकत नाही. कैदी मरता कामा नये अशी सख्त ताकीद आहे. तो आलमपन्हांची खास अमानत आहे.

नेताजींना तसेच उघडेनागडे अंधारकोठडीत फेकून देण्यात आले. आग्र्यात हिवाळ्याला सुरुवात झालेली. ओल आलेली आणि थंडीमुळे गारठलेली बर्फाळ फरसबंदी ताज्या जखमांमधून कळा काढत होती. अखेर वेदनेलाच दया आली. तिने नेताजींच्या शरीरावर हलकेच बेशुद्धीची चादर पांघरली. सर्व संवेदना त्यामध्ये पार बुडून गेल्या.

रोज संध्याकाळी तीस-तीस फटक्यांचा रतीब सुरू झाला. खुजाभर पाण्याव्यतिरिक्त खायला-प्यायला काहीच दिले जात नव्हते. निम्मे पाणी पोटात जाई, निम्मे लवंडून जाई. हा क्रम आठ दिवस अखंड चालू राहिला. नवव्या दिवशी खासा फुलादखान कोठडीच्या दारात उभा राहिला. विकलांग नेताजींना शिपायांनी दोन्ही हात गजांत गुंतवून उभे केले. दात विचकत खान मुक्ताफळे उधळू लागला–

अबे बेवकूफो, तुम्हाला काही अक्कल आहे की नाही? अरे! गद्ध्यांनो, हे थोर गृहस्थ शिवाचे सिपाहसालार, सरलष्कर आहेत. त्यांची तुम्ही ही अशी अवस्था करून ठेवलीत? अबे, याला काही खायला-प्यायला देता की नाही? अबे सालो, हा पाचहजारी दरबारी मनसबदार आहे. खास शाही मेहमान म्हणून त्याला या इथे ठेवले आहे. चांगली खातिरदारी झाली पाहिजे याची. समझे?

हजूर, अजून खायला देण्याचा हुकूम जारी झाला नाही.

हरामखोर, काय सांगतोस? इतके दिवस काही खायलाच दिले नाही? बदतमीज. अबे, मी विसरलो असेन हुकूम द्यायला, मला काय एवढे एकच काम आहे? पण तुला आठवण करून देता येत नाही? अरे मूर्खांनो, ही गोष्ट आलमपन्हांच्या कानी गेली तर केवढा गहजब होईल काही कल्पना आहे का? मैं कुछ नहीं जानता. आत्ताच्या आत्ता माझ्यासमोर याला खायला घालण्याचा बंदोबस्त करा. ताजा गरमागरम खाना आत्ता या इथे पकवा आणि मेहमानांना खाऊ घाला.

हजूर, आत्ता या वेळी बाबर्ची कुठून आणायचा. कोठीवान शिधा कसा काढून देईल?

ये बात है? मग असे करा भाजलेले शकरकंद (रताळी) याला पोटभर खाऊ घाला. आत्ता.

राजा बोले, दळ हाले. धावत जाऊन शिपायाने चांगली बुट्टीभर रताळी आणली. भराभरा गोवऱ्या आणल्या. विस्तव आणला. तळघराच्या त्या अंधारकोठडीतच भले मोठे जगरे पेटविले गेले. एका शिपायाने पाठीची ढाल काढून तिचाच पंखा केला आणि वारा घालून विस्तव चेतविला. वारा यायला-जायला जागाच नव्हती. सारी कोठडी धुराने कोंदटून गेली. गुदमरून प्राण जातो की राहतो अशी अवस्था झाली. तरी तशाही परिस्थितीमध्ये मोठ्या आकाराची चांगली दहा-पंधरा रताळी भाजून झाली.

कसेबसे भिंतीला टेकवून ‘मेहमाना’ला बसते केले. एका आडदांड शिपायाने वाफाळणारे एक रताळे जगरातून बाहेर काढले. हात पोळत असल्याने झेलतझेलत ते कसेबसे नेताजींच्या तोंडाजवळ नेले. काही समजण्याच्या आत वाफाळलेले ते भले मोठे रताळे अख्खेच्याअख्खे त्यांच्या तोंडात कोंबले. चपळाई करून दुसऱ्या शिपायाने मुसकी आवळून तोंड बंद केले. शिवाय एका हाताने नाक घट्ट दाबून धरले. तो जळता गोळा गिळण्यावाचून पर्यायच राहिला नाही. तोंडापासून कातडी जाळीत तो जळता गोळा पोटात उतरला. तोंड मोकळे होताच पुन्हा एक गरमागरम रताळे… अशी चांगली आठ-दहा रताळी पोटात गेली.

जिवाच्या आकांताने हातपाय झाडण्याशिवाय नेताजी काहीच करू शकत नव्हते. ती तडफड आणि तगमग पाहून शिपायांची आणि फुलादखानाची चांगलीच करमणूक होत होती. खाणे झाल्यावर पाणी पाजणे ओघानेच आले. थंड पाण्याने भरलेला एक भला मोठा घडा थेट त्यांच्या तोंडावरच रिकामा केला गेला. काही थोडे पाणी पोटात गेले असेल नसेल, मात्र नाकात पाणी जाऊन प्राणांतिक ठसका लागला. खोकूनखोकून डोळे बाहेर येतात की काय असे झाले. भाजलेल्या-पोळलेल्या त्वचेची इंगळासारखी आग होत राहिली. थोड्याच वेळात बेहोशीने नेताजींना अलगद आपल्या कुशीत घेतले.

-५०-

असे गरमागरम ‘शाही’ भोजन आणि त्यानंतर बेशुद्धी असा क्रम दर दिवसाआड काही दिवस होतच राहिला. एका संध्याकाळी त्यांची गुंगी चाळवली तेव्हा त्यांना जबरदस्तीने उठवून उभे केले जात होते. घडाभर थंडगार पाणी भडाभडा त्यांच्या डोक्यावर ओतल्यानंतर ते भानावर आले. सिद्दी फुलादखानाचा नायब सिद्दी याकूत मोठमोठ्याने शिवीगाळ करीत तळघराच्या पायऱ्या उतरत होता. त्याच्या शिव्यांमध्ये अरबी, फारसी, हिंदुस्थानी, दखनी आणि हबशी भाषेतल्या वेचक शिव्या होत्या. त्याच्या मागे एक खोजा मातीचे भले मोठे कुल्हड घेऊन चालत होता. दाणदाण पावले आपटीत सिद्दी याकूत नेताजींच्या कोठडीसमोर उभा राहिला. ओठापासून पोटापर्यंत पोळून निघालेल्या नेताजींना डोळे उघडणे शक्य होत नव्हते. तोंडात आणि घशात भाजल्याचे मोठमोठे फोड आल्यामुळे श्वास घेताना प्राणांतिक वेदना होत होत्या. कंबरेवर हात ठेवून आणि हिंस्रपणे हसत याकूत काही वेळ त्या तडफडीची आणि वेदनांची मजा लुटत राहिला आणि अचानक ढग गडगडल्यासारखा जोरात ओरडला,

ऐ पाजी नेताजी, तुझ्यासाठी मी मोठी खुशीची खबर आणली आहे. तुझा तो बदतमीज भेकड पळपुटा राजा, शिवा, कोहस्तानी चूहा, आलमपन्हा आलमगीर हुजुरांच्या भीतीने आग्र्याहून पळाला. पण आमच्या रहमदिल आलाहजरतांनी त्याला त्याच्या डोंगरी बिळात सुखरूप पोहोचू दिले. तो कमीना आता त्याच्या थेरडीच्या पल्लूमागे जाऊन लपून बसला आहे. आता दुसरी खबर ऐक. शिवा तर बचावला, पण त्याचा तितकाच हरामजादा लौंडा तो संभा, तो मात्र वाटेतच मरून गेला. या खुशखबरी तुला देण्यासाठी हजरत कोतवाल साहेबांनी खास मला पाठवले आहे. तुला खुशीचा जश्न मनवता यावा म्हणून माझ्या रहमदिल आकांनी तुझ्यासाठी खास बनवलेली शिकंजीसुद्धा (लिंबू सरबत) पाठवली आहे.

सिद्दी याकूतने हुकूम करताच चार-सहा धिप्पाड हबशी कोठडीत घुसले आणि त्यांनी नेताजींना फरशीवर उताणे झोपविले. त्यांच्या हातापायांवर दोन-दोन दांडगट हबशी उभे राहिले. एका शिपायाने डोक्याभोवती अवजड लाकडी खोडा अडकविला. त्यावर तो स्वत: बसून राहिला; त्यामुळे त्यांचे मस्तकसुद्धा जमिनीला जखडले गेले. विकट हसत दोन बाजूंना दोन पाय टाकून सिद्दी याकूत त्यांच्या छाताडावर बसला.

लो, हरामजादे लो, तुम्हा काफिरांचा सुलतान घरी पोहोचल्याचा जश्न साजरा कर. घे, पी ही शिकंजी.

मस्तकावर बसलेल्या शिपायाने आपल्या मजबूत पंजाने गपकन त्यांचे नाक दाबून बंद केले. आपसूकच त्यांचे तोंड उघडले गेले. डोळ्याचे पाते लवण्याच्या आतच याकूतने भरपूर मीठ मिसळलेल्या लिंबाच्या रसाने भरलेला तो कुल्हड उघड्या तोंडात रिता केला आणि झटक्यासरशी त्यांचे तोंड बंद केले. आगीचा डोंब उसळला. प्रचंड तडफडाट झाला, पण अंगावर अवजड माणसे उभी असल्याने त्यांचे क्षीण शरीर तसूभरही हलू शकले नाही. नाक-तोंड गच्च आवळून बंद असल्याने उलटून पडू पाहणारा लिंबाचा रस आपसूकच पोटात गिळला गेला. जणू सुरुंगाची बत्ती जळतजळत पोटात उतरली. रस गिळला गेल्याची खात्री पटल्यानंतरच हबशी दूर झाले.

जिवाच्या आकांताने हातपाय झाडणाऱ्या आणि ठसकणाऱ्या नेताजींना सोडून सिद्दी याकूत निघून गेला.

-५१-

दोन-तीन दिवसांनी आगीची जळजळ उणावली. लिंबाच्या रसाचा परिणाम म्हणा वा मुळचीच काटक शरीर प्रकृती म्हणा, हळूहळू तोंडातले, घशातले फोड बरे होऊ लागले. मोठ्या कष्टाने का होईना पण चार-दोन घोट पाणी पिणे शक्य होऊ लागले. रताळ्यांचा तोबरा बंद होऊन अनियमितपणे का होईना माणसासारखे अन्न मिळू लागले. फटक्यांचा रतीब निम्म्यावर येऊन रोजऐवजी दिवसाआड मिळू लागला. कारण कैद्याची सहनशक्ती संपून तो मरण्याची शक्यता दफेदाराने व्यक्त केली. हा कैदी इतक्यात मरणे सिद्दी फुलादखानाला परवडणारे नव्हते. कारण बादशहासमोर त्याची सुनावणी अद्याप झाली नव्हती. कैद्याला जिवंत ठेवण्याचा सख्त हुकूम होता. पौष महिन्याच्या कडाक्याच्या थंडीत फक्त एका लंगोटीखेरीज अंगावर वस्त्र नव्हते. अंथरुणा-पांघरुणाची मिजास पुरविण्याचा प्रश्नच नव्हता. जिथे मालकच आठवड्यातून एकदा अंघोळ करी, तिथे कैद्याला अंघोळ घालून पाणी कोण वाया घालविणार?

खूप दिवसांनंतर सिद्दी फुलादखान तळघरात उतरला. कोठडीच्या दाराशी उभा राहून कोठडीतल्या घाणीत पडलेल्या नेताजींना तो बराच वेळ न्याहाळत होता. अमानुष मारहाणीच्या जखमांनी भरलेले उघडे अंग घाणीने पार लडबडून गेले होते. उवा आणि पिसवा अंगावर धावत होत्या, पण संवेदना हरपल्याने त्यांची जाणीवच होत नसावी. शरीर क्लांत आणि विकल असले तरी अस्ताव्यस्त वाढलेल्या केसांतून आणि दाढी-मिश्यांच्या जंजाळातून फुलादकडे पाहणारे डोळे मात्र खदिरांगारासारखे पेटलेलेच होते. अपलक दृष्टीतील धग खान सहन करू शकत नव्हता. ती अपराजित नजर त्याला मुळातून हादरवून गेली. अंगावर उठलेल्या शहाऱ्याने खानाला भान आले. तो पचकन थुंकला, पण थुंकी ‘चुकून’ नेताजींच्या तोंडावरच पडली. अतिप्रमाणात अफू आणि गांजा ओढल्यामुळे त्याचा आवाज आधीच फुटला होता. तशा आवाजातच किंचाळण्याची भर घालून अधिकच भयानक आवाज काढीत तो ओरडला–

हरामजादो, कुत्तो, हा तरीका आहे शाही मेहमानाला ठेवण्याचा? थोडे दिवस माझे दुर्लक्ष काय झाले, तुम्ही तर अगदी तालच सोडला. नमकहरामों, आलाहजरतांना जवाब मला द्यायचा आहे, तुम्हा लंगुरांना नाही. साफ करा त्याला. खराऱ्याने घासून घुसळून काढा. दाढी-केस सगळे सफाचट झाले पाहिजे. अंगभर कडुनिंबाचे आणि करंजीचे तेल चोपडा. अंगात कपडे चढवा आणि घेऊन चला वरच्या कोठडीत. आलमपन्हांनी मेहमानाची मुलाखत घेण्याची तमन्ना जाहीर केली आहे. परवा जुम्म्याच्या नमाजानंतर आलाहजरतांसमोर पेशी आहे मेहमानांची. त्याचा लिहाज करून चांगले तयार करा याला.

हुकूम देऊन खान निघून गेला. नेताजींचे शरीर घाणीने इतके बरबटले होते की, त्यांना धरून नेताना पहारेकऱ्यांना शिसारी येत होती. पायातील साखळदंडांना धरून ओढत, फरफटत त्यांना आदबखान्याच्या चौकात नेण्यात आले. बादल्याच्या बादल्या थंडगार पाणी ओतून आणि काथ्याच्या खराऱ्याने खसाखसा अंग घासून मेहतराने त्यांना स्वच्छ केले. म्हशीला भादरण्यासाठी वापरला जात असावा अशा प्रकारच्या वस्तऱ्याने न्हाव्याने त्यांच्या अंगावरचा केसन्केस भादरून काढला. अंगाला तेल चोपडून वर पुन्हा चार-सहा बादल्या पाणी ओतण्यात आले. कैद्याच्या विव्हळण्याकडे लक्ष देण्याचा गावठी रिवाज कोतवालाच्या शिपायांमध्ये नव्हता. कुठलेतरी जुनेपाने ढगळ कपडे ओल्या अंगावर चढविले गेले. काढण्या, बेड्या, साखळ्या जिथल्या तिथे चढल्या. सजविलेला नवरदेव भाल्यांनी टोचत नव्या कोठडीत बंद केला गेला.

तळघरातील नरकापुढे ही नवी कोठडी म्हणजे महालच वाटावा. कोठडीच्या भिंती आणि फरश्या तर स्वच्छ होत्याच पण कोठडीत भरपूर सूर्यप्रकाश आणि मोकळी खेळती हवा होती. मोठा चौक आणि समोर उंच भिंतींनी बंदिस्त केलेले मोकळे पटांगण दिसत होते. मध्यभागी भले थोरले आंब्याचे झाड सावली धरून होते. दरोगा उन्हात घातलेल्या खाटेवर लोळत, हुक्का ओढत ऊन खात होता. स्वच्छ झाल्यामुळे हलके हलके वाटणाऱ्या नेताजींना दरोग्याकडे पाहत असतानाच सहजच झोप लागून गेली.

आग्र्याच्या लाल किल्ल्याच्या मोती मशिदीसमोर उभारलेल्या शामियान्यात बसून जुम्म्याच्या नमाजानंतर भिकारी आणि गरजूंना खैरात वाटण्याचा आलमगीर बादशहाचा रिवाज होता. त्या वेळी दरबारातील खास, अगदी वरच्या दर्जाचे मानकरी आणि मनसबदार तेथे उपस्थित असत. मात्र कितीही मोठा तालेवार मानकरी असला, तरी एकाही हिंदू दरबाऱ्यास तेथे प्रवेश करण्यास सख्त मनाई असे.

दंडाला काढण्या, पायात जड बेड्या, मानेभोवती अवजड लाकडी खोडा, बेड्या घातलेले हात खोड्यात जखडलेले; अशा अवस्थेत रोखलेल्या भाल्यांच्या आणि नंग्या तलवारींच्या कडक पहाऱ्यात, कंबरेला कासरा बांधून जनावराप्रमाणे चालवत नेताजींना बादशहासमोर हजर करण्यात आले. आपली करडी हिरवी नजर त्यांच्यावर रोखून ठेवत बादशहाने खैरात वाटण्याचे काम संपविले. शामियान्यासमोरचा परिसर झपाट्याने मोकळा करण्यात आला. बादशहाच्या खुणेची इशारत होताच पंचवीस कदमांच्या अंतरावर नेताजींना उभे करण्यात आले. भोवतालच्या दरबारी मानकऱ्यांमध्ये दबक्या आवाजात अस्वस्थ कुजबुज सुरू होती. बादशहा स्थिर नजरेने त्यांच्याकडे रोखून पाहत होता. हातातल्या माळेचे मणी झरझर सरकत होते. अचानक बादशहाचा संतापलेला आवाज आसमंतात घुमला–

गुस्ताख काफिर, शहेनशहासमोर उभे राहिल्यावर नजर त्याच्या नजरेत नव्हे, तर पायाशी ठेवायची असते हे तुला कोणी शिकवलेले दिसत नाही. तुझी ही उर्मट नजरच जाहीर करते आहे की, तू कोठल्यातरी कारस्थानाला अंजाम देण्यासाठी आमच्या फौजेत दाखिल झाला होतास.

नेताजींची नजर खाली झुकली. कसेबसे तोंडातून शब्द उमटले–

गुस्ताखी माफ शहनशाहे आलम. नाचीज गुलामाला गुस्ताखीची माफी करावी. जहाँपन्हा, गुलामाची अवघी हयात बंडखोरी करण्यात आणि डोंगरदऱ्यांमधील खाक छानन्यात गेली आहे. सभ्यतेचे शाही रस्मोरिवाज आम्हा अडाण्यांना कुठून ठावे असणार? गुलामाला माफी करावी.

हरामखोर, खरे सांग फंदफितुरी करण्यासाठीच शिवाने तुला आमच्या फौजेत पाठवले होते की नाही? बऱ्या बोलाने खरे बोल. जे असेल ते कबूल कर. नाही तर कबुलीजबाब मिळवण्याचे एकसे एक तरीके जाणणारे रुस्तम आमच्या दरबारात आहेत.

आलमपन्हा गरिबाच्या दुर्दैवाने माझ्या दुश्मनांनी हजरतांच्या जहनपाकमध्ये गलतफहमीचे विष कालवलेले असले पाहिजे. माझी क्षुल्लक चूक झाल्यामुळे आदिलशाही किल्लेदाराकडून पन्हाळ्यावर राजांचा पराभव झाला; त्यामुळे त्यांची माझ्यावर खफा मर्जी झाली. संतापाच्या जुनूनमध्ये मला सफाई पेश करण्याचा मौका न देता त्यांनी मला तडकाफडकी बरखास्त केले. इतकी वर्षे इमानदारीने चाकरी केल्याचे हे फळ माझ्या पदरात पडले; त्यामुळे राजांच्या चाकरीचा वीट आला. लाथ मारीन तिथे पाणी काढण्याची माझ्यात धमक आहे. माझ्या मनगटाच्या बळावर आणि अक्कलहुशारीने जाईन तिथे मी मानमरातब आणि दौलत मिळवू शकतो हे राजांना दाखवून देण्यासाठीच मी राजांना सोडून आदिलशाहीत दाखल झालो. तिथे मला सरदारी आणि मरातब मिळाला. चांगला सुखात होतो मी तिथे. मिर्झाराजा जयसिंहांनीच मोठमोठी आमिषे दाखवून आणि नाना प्रकारची आश्वासने देऊन, प्रलोभने दाखवून आलमपन्हांच्या पायाशी वळवून घेतले. मी स्वत: त्यासाठी खटपट केलेली नाही जहाँपन्हा.

त्या बुढ्ढ्याने तर उल्लू बनवण्याचे हर कोशिश प्रयत्न करून अनेक गफलती करून ठेवल्या आहेत. माबदौलतांचा शक शुबाह कायम आहे. तू फंद माजवण्यासाठीच शाही फौजेत दाखल झाला आहेस. खुदा ना खास्ता, तो थेरडासुद्धा तुझ्या या कारस्थानात सामील आहे की काय? अल्लाहु आला!!

सिद्दी फुलादखान…

हुकूम आलमपन्हा.

घेऊन जा या नापाक काफिराला. तो कबूल करीत नाही तोपर्यंत शाही दस्तूराप्रमाणे याची चांगली खातिर करा.

जागत्या पहाऱ्यात नेताजी पुन्हा कोठडीबंद केले गेले.

-५२-

संध्याकाळी सिद्दी याकूत आदबखान्यात पोहोचला. नेहमी चालणारी शिवीगाळ वगैरे आटोपून तो शेवटी नेताजींच्या कोठडीशी आला. त्याने नेताजींचे कपडे काढवून घेतले. दंडाबेडी लावून त्यांना छताला टांगून ठेवले. कडक आवाजात त्याने हुकूम सोडला–

दरोगा अस्लमखान, इस कुत्ते के पिल्लेपर कडी नजर रख्खो. बसल्या जागेवरून तुला याच्यावर लक्ष ठेवता यावे म्हणून याला या इथे तुझ्यासमोर ठेवले आहे. याला कोणी भेटल्याचे किंवा संदेश, निरोप पाठवल्याचे उघड झाले तर त्याच्या जागी तुला बंद करीन, लक्षात ठेव. इस सुअर के साथ कैसा सलूक करनेका ते उद्या स्वत: कोतवालसाहेबच ठरवतील. हुजूर के आने तक इसका खाना-पीना सब बंद.

दुनियाभरच्या व्यापातून फुरसत मिळून आदबखान्यात पोहोचेपर्यंत फुलादखानाला संध्याकाळ झाली. तोपर्यंत कैदी लटकविलेलाच होता. नैसर्गिक विधींसाठीसुद्धा त्याला खाली उतरविले नव्हते. येताच फुलादने त्याला खाली उतरविले. कोठडीबाहेर काढले. पटांगणातल्या झाडाखाली नेवविले. आणि… झाडाला उलटे टांगले. ओल्या वेताचे तीस फटके आणि उलट्या तलवारीचे दहा फटके असा चोख खुराक दिल्यानंतरच तो स्वस्थ झाला. कैद्याला तसेच लटकत ठेवून त्याने दरोग्याच्या खाटेवर अंग टाकले. सिद्दी याकूतपासून सारे त्याच्या खिदमतीत हात बांधून समोर उभे राहिले. गुडगुडीचे आठ-दहा जोरदार कश मारून त्याने डोळे तांबडेलाल करून घेतले. मग तो शरीराने आणि मनाने सैलावला. खर्जातला आवाज लावत स्वत:शीच बडबडावे तसे त्याने बोलण्यास सुरुवात केली–

आलमपन्हांच्या जहनमध्ये काय आहे काही उमगत नाही. या सुअरचा त्यांना शक आहे. फंदफितुरी माजवण्याचा त्याच्यावर इल्जाम ठेवतात. ऊपरसे शिवा पळून गेल्याचा गुस्सा त्यांना या नामुरादवर काढायचा आहे. पण सख्त बजावतात हा हरामी जायबंदी होता कामा नये. काय वाट्टेल ते झाले तरी हा बदमाश मरता कामा नये. आणि तरी याच्या तोंडून सच उगलवा. या हरामजाद्याला उपाशी ठेवला, कुत्र्यासारखा मार मार मारला, चटके दिले पण हा बेटा ढिम्मच! आलमपन्हांनी मला थोडी आझादी द्यावी, मग बघा म्हणावे याला कसा पोपटासारखा बोलायला लावतो ते. पण त्यांनी माझे हातच बांधून ठेवले आहेत. खैर. आपण दिल्या हुकमाचे ताबेदार. अब सुनो मक्कारो, या कुत्र्याला हप्त्यातून दोन दिवस उलटे आणि दोन दिवस सरळ टांगून ठेवा. दर दिवसाआड वेताचे तीस आणि उलट्या तलवारीचे दहा फटके मारा. ज्या दिवशी फटके नसतील फक्त त्याच दिवशी एकदाच खाना द्या. दुपारी जेवला की रात्री अर्धापाव एरंडेल तेल पाजा. हा सिलसिला फिलहाल महिनाभर जारी ठेवा. बघू तोंड उघडतो का. त्यानंतर जिल्हेसुभानी जो हुकूम जारी करतील त्याप्रमाणे अंमल करता येईल.

दरोगा बावळटासारखा बरळलाच–

जो हुक्म सरकार. हुजूर, याला परत तळघरात टाकावे का? आणि शकरकंद अन् शिकंजीचा खुराक पुन्हा सुरू केला तर?

फुलादखानाने खाऊ की गिळू अशा नजरेने दरोग्याकडे पाहिले. तो गरजला–

हरामखोर, गांजा पिऊन वावरता का इथे? मी काय आत्ता नशेत बडबडलो? तो जायबंदी होता कामा नये. तुझ्या नजरेसमोर ठेव त्याला पुरा दिवस. तो जोपर्यंत या कोठडीत आहे तोपर्यंत तूसुद्धा इथून हलता कामा नये. घरी जाण्यालाही पूर्ण बंदी. समझे?

जी…

आपली एक आयती करमणूक हातची गेल्याची चुटपुट फुलादखानापासून शिपायापर्यंत प्रत्येकालाच लागून राहिली. पण शाही हुकमापुढे त्यांचा इलाज नव्हता. हुकूम बजावून फुलादखान निघून गेला. त्याच्या हुकमाची तामिली इमानेइतबारे होत राहिली. उपासमार, रेचक आणि मारहाण यामुळे नेताजींना भयंकर अशक्तपणा आला होता. कोणत्यातरी अगम्य कारणामुळे बादशहाने त्यांना जिवंत एवढेच नव्हे, तर हातीपायी धड ठेवले होते. हे एक आश्चर्यच होते.

नेताजींच्या बाबतीत बादशहा तसा निर्धास्त होता. कारण तो त्याच्या थेट कब्जात होता. आणि एकदा दुधाने तोंड पोळलेला फुलादखान त्याला कोणताही मौका मिळू देणार नाही याची त्याला खात्री होती. त्याने आपले लक्ष मिर्झाराजे आणि रामसिंह या बापलेकांवर केंद्रित केले होते. उसंत मिळताच तो नेताजींची खबर घेणार यात शंकाच नव्हती.

दर आठवड्याला सिद्दी फुलादखान येऊन दमदाटी करून जाई. घटका घटका तो नाना प्रकारे त्यांना छेडत राही पण धगधगत्या नजरेने त्याच्याकडे मूकपणे एकटक बघत राहण्यापलीकडे नेताजी कोणताच प्रतिसाद देत नसत. चडफडाट करीत, शिव्या घालीत, पाय आपटीत तो निघून जाई.

-५३-

महिना उलटला; दीड महिना झाला. फुलादला नवा हुकूम न मिळाल्याने घालून दिलेला रिवाज तसाच सुरू राहिला. मध्यंतरी एका जुम्म्याला त्यांना बादशहासमोर पेश केले गेले पण त्यांच्याकडे लक्ष देण्यास बादशहाला फुरसत झाली नाही. माघ सरून फाल्गुन सुरू झाला होता. थंडी ओसरून वातावरणात उबदारपणा येऊ लागला होता. निसर्गाला वसंताची चाहूल सुखावत होती. पण इथे नेताजींच्या आयुष्यात वैशाख वणवा पेटला होता. पोटाला आता एरंडेलच्या तेलाची सवय झाली होती म्हणून म्हणा किंवा पडून जाण्यासाठी पोटात फारसे अन्नपाणी नसल्यामुळे म्हणा हल्ली फारसे जुलाब होत नसत; पण जे होत ते अंगातली संपूर्ण शक्ती निपटून काढीत. पोटात असह्य कळा उठत.

एक दिवस अचानक कोठडीसमोरच्या पटांगणात वर्दळ वाढली. एक मोठा तख्तपोस झाडाखाली लावण्यात आला. त्यावर बैठक घालण्यात आली. दुपार कलता कलता रसूल बेग आदबखान्यात आला. तो थेट नेताजींच्या कोठडीसमोर उभा राहिला. कोणीतरी आल्याची चाहूल लागली, पण डोळे उघडून बघण्याचे त्राण नव्हते. नि:शब्द उभा राहून तो उघड्यानागड्या नेताजींचे निरीक्षण करीत राहिला. नंतर सोबत असलेल्या सिद्दी याकूतला त्याने हुकूम केला–

इन्हे साफ कर, कपडे पहनाओ और हमारे सामने ले आओ. याद रहे, हम शाही हुक्म की तामील कर रहें हैं.

ओल्या फडक्याने कसेबसे अंग पुसून अंगात तेच पूर्वीचे ढगळ कपडे चढविले गेले. हातापायांत बेड्या घालून त्यांना रसूल बेगसमोर आणले गेले. तख्तपोसावर रसूल बेगसमोर दस्तरखान लागलेला होता. भोवताली चमचमीत पदार्थांचा सुवास दरवळत होता. दोन खोजे चवऱ्या घेऊन माश्या मारीत होते.

आईये, आईये, जनाब नेताजी भाई आईये. आज माझ्यातर्फे तुम्हाला खास दावत आहे. या असे इकडे तश्रीफ ठेवा.

नको. मला कोणाहीकडून कोणत्याही प्रकारची दया आणि मेहेरबानी नको. मी फक्त बादशहा सलामत आलमपन्हांच्या मेहेरबानीची इच्छा धरून आहे. माझ्यासाठी बाकी सारे गवताच्या काडीपेक्षाही तुच्छ आहे.

अरे भाईजान, आप तो ख्वाहमख्वाह नाराज हो गये हम पर. अजी शाही चाकरी म्हणजे असे वर-खाली व्हायचेच. हुजुरे आलांची मेहेरनजर झाली तर तुम्हाला चाँद-सिताऱ्यामध्ये नेऊन बसवतील. पण मर्जी खफा झाली तर पायदळी तुडवले जायला वेळ लागत नाही. मी तुम्हाला आमच्याविरुद्ध लढताना पाहिले आहे. आणि त्याशिवाय आमच्या बरोबरीने विजापूरकरांच्या विरुद्ध मोहीम चालवतानासुद्धा पाहिले आहे. तुमची तडफ, मर्दानगी, झपाटा आणि बुद्धीची चमक पाहून आमच्या दिलात आपल्याविषयी अपार आदर आणि भाईचारा निर्माण झाला आहे. आपल्यासारखा अनमोल हिरा मातीमोल होऊ नये अशी माझी दिली तमन्ना आहे, म्हणूनच आलमपन्हांची खास इजाजत घेऊन मी आपल्या भेटीसाठी आलो आहे. माझ्या मनी कोणतेही पाप नाही. आहे फक्त तुम्हाविषयी जिव्हाळा. हातातल्या रोटीची कसम खाऊन मी तुम्हाला विनंती करतो, माझ्यावर विश्वास ठेवा. दुनियेचा गुस्सा अन्नावर काढू नका. तुम्ही हिंदू, अन्नाला देव मानता. या देवाचा अपमान करू नका. जेवण तुम्हाला चालेल असेच आहे. त्यात खोट नाही.

रसूल बेग जागेवरून उठला. हाताला धरून त्याने नेताजींना तख्तपोसावर बसविले. तस्त घेऊन एक खोजा पुढे झाला. त्याने कोमट पाण्याने हात धुवून घेतले. दुसऱ्या हुजऱ्याने सुग्रास अन्नाने भरलेला थाळा समोर ठेवला. निर्विकार चेहऱ्याने आणि शून्य नजरेने ते थाळ्याकडे बघत राहिले. रसूल बेगने हरप्रकारे आग्रह केल्यानंतर त्यांनी घास उचलला. अनेक महिन्यांनंतर सुग्रास अन्न तोंडाला लागत होते, पण घास तोंडातच फिरत होता. अनेक विषयांवर गोड गोड बोलून रसूल बेग त्यांच्या पोटात शिरण्याचा प्रयत्न करीत होता. त्यांना हरप्रकारे चाचपडून पाहत होता. मिर्झाराजांच्या छावणीतल्या, महाराजांसोबत आग्र्यापर्यंत केलेल्या प्रवासाच्या आठवणी काढून त्यांना खुलविण्याचा प्रयत्न करीत होता. पण स्वराज्याचा हा सरनोबत किड्याच्या घासाने गळाला लागायला कच्च्या गुरूचा चेला नव्हता. अगदी जुजबी बोलून आणि फक्त हां हूं करीत त्यांनी संभाषण चालू ठेवले.

भाईजान, शिवाजीराजांना सोडून आल्याचे तुम्ही जे कारण सांगता त्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. एक जांबाज मर्दच दुसऱ्या जांबाज मर्दाचे मन जाणू शकतो. आपल्या मनगटाच्या ताकदीवर स्वत:ची दौलत तुम्हाला उभी करायची आहे हे मला पटते. पण भाईजान, आपण आलाहजरतांचा स्वभाव जाणता. ते आपल्या पोटच्या पोराचासुद्धा विश्वास धरत नाहीत. एवढेच काय त्यांचा उजवा हात स्वत:च्याच डाव्या हातावर विश्वास ठेवत नाही, हे जगजाहीर आहे. आपण तर शेवटी चाकर माणसे. आपला पाड तो काय? आपली बाजू आलाहजरतांना पटवून देण्याचा मी संधी मिळेल तेव्हा आटोकाट प्रयत्न करीत आहेच, पण तुमची साथ मिळाली तर माझी कोशिश जरूर अंजाम देईल.

नेताजींनी फक्त प्रश्नार्थक नजरेचा कटाक्ष दिला. थोडी उसंत घेऊन आणि शब्दांची जुळवाजुळव करीत रसूल बेगने पुन्हा बोलण्यास सुरुवात केली–

आलाहजरतांचा संशय दूर करण्याचा आणि त्यांचे मन जिंकण्याचा म्हटले तर एक सोपा उपाय आहे. आलम दुनिया जाणते, हजरत अबू बकर आणि हजरत उमर यांच्यानंतर इस्लामनिष्ठा आणि अल्लावर प्रेम आणि इमानासाठी कोणाची मिसाल दिली जात असेल तर ती जिंदा पीर आलमपन्हा आलमगीर यांचीच. इस्लाम त्यांचे इमान आहे, श्वास आहे आणि तबलीग, इस्लामप्रसार त्यांच्या आयुष्याचा मकसद आहे. …तुम्ही जर इस्लाम कबूल करण्यास रजामंदी दाखवली तर त्यांच्या मनातील संशय दूर होण्यास ती मददगार ठरेल. आपल्या सच्चेपणाची आणि इमानदारीची खात्री पटून त्यांचा राग दूर होईल याची मी खात्री देऊ शकतो.

हातातला घास ताटात आपटत नेताजी ताडकन उभे राहिले. जळत्या नजरेने रसूल बेगकडे खाऊ की गिळू असे पाहत ते कडाडले–

नामुमकिन. कतई नामुमकिन. तुमचे हे प्रेमळ वागणे नक्कीच पोटात काहीतरी हेतू बाळगून आहे, हे न समजण्याइतका मी मूर्ख नाही. तुम्हाला काय वाटले उपासमारीने जर्जर झालो म्हणून मिष्टान्नाच्या लालचीने मी तुम्हासमोर फशी पडीन? सिंह म्हातारा झाला, विकल झाला म्हणून ना रानातले गवत खातो, ना गावचे उकिरडे फुंकीत हिंडतो. तुम्ही अन्नब्रह्माची शपथ घातली म्हणून आम्ही त्याचा मान केला एवढेच. रसूल बेग, शिवाजीराजे आमचे लहानपणापासूनचे मैतर. आम्हाला आमचा पराक्रम त्यांना दाखवून द्यायचा होता. जगात आमची काय किंमत आहे हे त्यांच्या नजरेस आणून द्यायचे होते. म्हणून आम्ही त्यांना सोडून निघालो. केवळ त्या ईर्षेपोटीच कदाचित आम्ही ज्यांच्याविरुद्ध हयातभर हत्यार धरले होते, त्याच गनिमाची चाकरी पत्करली. पण याचा अर्थ असा नव्हे की, आम्ही आमच्या देवाधर्माशी गद्दारी पत्करली आहे. प्राण गेला तरी बेहत्तर पण धर्म सोडणार नाही. बेलाशक जाऊन सांगा तुमच्या बादशहाला.

गर्रकन पाठ वळवून नेताजी चालू लागले. झोकांड्या जात असताना ताडताड पावले टाकीत ते आपल्या कोठडीत शिरले आणि त्यांनी स्वत:ला फरशीवर झोकून दिले. सह्याद्रीच्या कड्यासारखा अभंग, ताठ मराठा पार उन्मळून पडला. ओक्साबोक्सी रडू लागला. रसूल बेग काही वेळ त्यांच्याकडे पाहत राहिला. अशा अवस्थेत पुढे काही बोलणे शक्यच नव्हते. त्यांना तसेच सोडून तो हलके हलके आदबखान्यातून बाहेर निघून गेला.

भूकंपात पहाड हलावा तसे नेताजींचे शरीर हुंदक्यांनी हिंदकळत राहिले. त्यांचे मन आक्रंदून उठले–

महाराज, महाराज, काय ही सत्त्वपरीक्षा. आता या दुष्टचक्रातून सुटका दिसत नाही. पुन्हा तुमचे पाय दिसतील असे वाटत नाही. मरण तरी येऊ दे झटकन म्हणजे या

यमयातनांतून आणि बदनामीमधून सुटका होईल. काय करू? देवा, मी काय करू?

क्रमश:

*____📜🚩

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...