एका इतिहास आभ्यासकाला जुन्या वास्तू,अफाट किल्ले,मंदिर,जुने वाडे,महाल अगदी जुन्या समाध्या ,कबरी सतत खुणावत असतात.
आपल्या इतिहासात ज्या शहराचं नाव सतत आलं आहे,शहाजी महाराजांच्या इतिहासात आपण ज्या शहराचं नाव नेहमी ऐकत आलो आहोत.पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी या शहरातील आदिलशाही बरोबर संघर्ष केला.याच शहरातील अनेक सरदारांबरोबर युध्द करत महाराजांची तलवार तळपली, ते शहर म्हणजे कर्नाटकातील "विजापूर ".मुहम्मद आदिलशहा, अली आदिलशहा यासारखे अनेक आदिलशाही बादशहा आणि बडी बेगम सारखी राणी अशी अनेक लोकं जिथे होऊन गेले ते शहर म्हणजे विजापूर.कर्नाटक सरकारने आता याच शहराचं नाव बिजापूर बदलून "विजयपूर" असे केले आहे.
12 व्या शतकात कल्याणी चालुक्यानी या शहराची निर्मिती केली होती.नंतरच्या काळात यादवांकडे असणारे हे शहर मुस्लिम आक्रमणात बहामनी सत्तेकडे गेलं.पुढे बहामनी सत्तेचे 5 घराण्यात विभाजन झाल्यावर युसुफ आदिलशहा याच्याकडे विजापूर ची सत्ता आली.
मुहम्मद आदिलशहा आणि आली आदिलशहा या दोघां बरोबर शिवाजी महाराजांचा टोकाचा संघर्ष झाला.या सगळ्या इतिहासच साक्षीदार कुठलं शहर असेल तर ते म्हणजे विजापूर.नुकतीच विजापूर ला भेट दिली.अनेक वर्षापासून हे शहर मनसोक्त बघायची इच्छा होती.इतिहासातील अनेक घटनांच्या प्रत्यक्षदर्शी असणाऱ्या अनेक वास्तू आजही इथे उभ्या आहेत.जवळपास 100 पेक्षाही जास्त ऐतिहासिक वास्तू अजूनही तग धरून इथे उभ्या आहेत.मुस्लिम इतिहासाचे साक्षीदार तसेच अनेक निर्दयी घटनांच्या प्रत्यक्षदर्शी असणाऱ्या या वास्तू पहिल्या की इतिहासातील घटना डोळ्यापुढे आपोआप जिवंत होतात.
काही वास्तू बद्दल मी सविस्तर लिहणार आहे.1/2 दिवसात मला जेवढं फिरता आलं या शहरात, तेवढं मी बघितलं.इथली अनेक ठिकाणं तर एकदम दुर्लक्षित आहेत.
फ्रेंच प्रवासी ,"अँबे क्यारे" याने 1672 साली विजापूरला भेट दिली होती.त्या भेटीत त्याने ज्या वास्तू बद्दल लिहले होते ती म्हणजे अफजल खानाच्या 63 बायकांच्या एकाच जागी असणाऱ्या 63 कबरी.अफजल खान शिवाजी महाराजांवर आक्रमण करण्यासाठी मोठ्या सैन्यासह निघाला होता त्याच्या अगोदर त्याने आपल्या 63 बायाकाना सुरंग बावडी म्हणून एक विहीर आहे, त्यात बुडवून मारले होते. इतिहासात असं सांगितलं जातं की अफजल खानाला आपल्या परत येण्याची अजिबात शास्वती नव्हती .त्यामुळे त्याने आपल्या 63 बायकांना याच विहिरीत बुडवून मारले होते.अफजल खानाच्या मृत्यू नंतर जवळपास 13 वर्षांनी म्हणजे 1672 ला अँबे क्यारे याने इथे भेट दिली होती.त्याने आपल्या प्रवास वर्णनात हे लिहून ठेवले होते की अफजल खानाच्या 63 बायकांच्या कबरी चे बांधकाम चालू आहे.
मी भेट दिली सगळ्या कबरी मोजल्या बरोबर 63 भरल्या.एकतर या ठिकाणी जायला रस्ता लवकर सापडत नव्हता.खूप वेळ गेला हे ठिकाण शोधायला.पोचलो तर त्या कबरी बघून मन सुन्न झालं.ज्या ठिकाणी या कबरी आहेत बरोबर त्याच्या मागे, त्याकाळातील ती विहीर आहे ,जिथे यांना बुडवून मारले.
विचार करत होतो अफजल खान किती क्रूर असला पाहिजे ,ज्याने त्या निष्पाप बायकांना काही कारणं नसताना मारले.या जागेत एक प्रकारची भयानक निराशा आहे.खूप निगेटिव्ह एनर्जी मला इथे जाणवली.आजूबाजूला चिंचेची झाड, जबरदस्त शांतता,एखाद्या भूत बंगल्यात जावे अशी निर्जन आणि भयानक वास्तू आहे ही. एकदोघा जणांना विचारले ही वास्तू कुठे आहे? तर त्यांनीही सांगितले नका जाऊ ती वास्तू बरोबर नाही.पण इतिहासच प्रेम मला तरी इथे घेऊन आलं.
ती विहीर मी बऱ्याच वेळ बघितली.4 मजली त्याकाळातील ही विहीर आहे.बरोबर कबरिंच्या मागे.11,11,11,11,5,7,7 अश्या एकूण 6 लाईन आहेत कबरीच्या.मजबूत काळ्या पाषाणाच्या बेसवर त्या उभ्या आहेत.कुठेही काहीही शिलालेख लिहलेला नाही.अँबे क्यारे याने 1672 साली लिहलेल्या आपल्या प्रवास वर्णनात याचा उल्लेख केला नसता, तर या 63 कबरी म्हणजे जगाला पडलेला एक कोडंच झालं असतं.कुणीतरी लिहल आहे ,त्यामुळे आज इतिहास जीवंत आहे. त्यामुळं लिहित राहिलं पाहिजे.समोर कबरी च्या जवळ इथे येणाऱ्या लोकांसाठी मस्जिद सारखी वास्तू आहे.50 मीटर वर या परिसरात येण्यासाठी मुख्य दरवाजा आहे , पण झाडांमुळे तो आपल्याला दिसत नाही.ASI ने या वास्तूला पूर्ण लोखंडी कंपाऊंड केलेले आहे.पण ASI ने या वास्तू बद्दल माहिती देणारा कुठलाही बोर्ड लावलेला नाही.ज्याला हा इतिहास माहिती नाही त्याला ही इथे नक्की काय आहे याबद्दल कधीच कळणार नाही.
अगदी कंपाऊंड च्या शेजारी गेलो होतो तरी समजले नाही की इथे त्या कबरा आहेत.
मस्जिद सारख्या असणाऱ्या बाजूच्या वास्तूवर जायला दोन्ही बाजूस पायऱ्या आहेत.वर उभा राहून पुढे पाहिलं की कबरा दिसतात आणि मागे पहिला की अफजल खानची क्रूरता, म्हणजे ती सुरंग बावडी दिसते.खूप मोठं बांधकाम त्याकाळात इथे करण्यात आलं आहे. ऐतिहसिकदृष्ट्या महत्वाच्या या वास्तुकडे ASI ने पूर्णपणे दुर्लक्ष केलेले आहे.या कबरी पाहून छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजखानाला उभा फाडला याचं आत्मिक समाधान मिळतं.छत्रपती शिवाजी महाराजांचे मोठे बंधू संभाजी महाराज यांना दगा देऊन मारणारा,शहाजी महाराजांना कैद करणारा,ज्याने औरंगजेबाला ही जवळपास कैद केले होते आणि शेवटी स्वतःच्या 63 बायकांना मारून ज्यावेळी महाराजांपुढे आला त्यावेळी त्याचा अंत झाला.माझा अभ्यास मला सांगतो की तो महाराजांच्या भेटीला ज्यावेळी आला असेल तोपर्यंत महाराजांना याची खबर नक्की असेल की त्याने आपल्या 63 बायकांना मारले आहे.हे सगळं पाहता महाराजांनी त्याच योग्य नियोजन केले. एकाच वेळी 63 बायकांच्या कबरी पाहणं आयुष्यातील पहिलीच वेळ.पण खरा इतिहास माणसाला याच वास्तू सांगत असतात.योगायोग म्हणायचा हा की 1672 पासून 2023 पर्यंत या कबरिंना 350 वर्ष पूर्ण झाली आहेत....मानव किती क्रूर आणि निर्दयी असू शकतो हे अनुभवायचं असेल तर इथे नक्की भेट द्या .....कबरीच्या पुढे 2 किमी वर गेल्यावर अफजल खान चौक लागला आणि चौकाच हे नाव वाचून तळपायाची आग मस्तकात गेली.. असो छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाला जिवंत फाडला आणि गाडला याची बातमी विजापूर ला ज्यावेळी गेली असेल त्यावेळी इथल्या 63 थडग्यानाही नक्कीच आनंद झाला असेल!!!
No comments:
Post a Comment