विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 3 December 2023

अफजलखानाचा दडवलेला पाचू : 🟢

 

अफजलखानाचा दडवलेला पाचू : 🟢

: 🟢
इतिहासाच्या साधनांचा अभ्यास करत असताना काही दडलेल्या - दडवलेल्या गोष्टीही अचानक इतिहास अभ्यासकांसमोर येत असतात. प्रस्तुत लेखात अशीच एक ऐतिहासिक कागदात दडलेली गोष्ट आम्ही मांडणार आहोत. ही गोष्ट आहे कोल्हापूरच्या कुळकर्ण्याची !!!
अशी मराठ्यांच्या इतिहासातील अनेक दडवलेली रत्ने ? शोधून ती लोकांसमोर आणणे गरजेचे आहे. याच हेतूने अफजलखानाचा दडलेला हा पाचू आम्ही आपल्यासमोर आणत आहोत.
सतराव्या शतकातील पहिल्या दशकात कोल्हापूर हे आदिलशाहीचे एक मुख्य ठाणे होते. हे आपणाला माहित आहेच. 10 नोव्हेंबर 1659 रोजी प्रतापगडाच्या पायथ्याला शिवाजी महाराजांची आणि आदिलशाही सेनापती अफजलखानाची भेट ठरली. यावेळी वाई या गावचा आदिलशाही हवालदार असणारा कृष्णाजी भास्कर पंडित याला अफजलखानाने आपला वकील म्हणून नेमले होते. या कृष्णाजीपंताने अफजलखानाने दिलेली कामगिरी चखोट बजावली. ऐन भेटीच्यावेळी अफजल आणि महाराजांचे द्वंदयुद्ध सुरू असताना या पंडिताने अफजलखानाची तलवार घेऊन खासा महाराजांवरच वार टाकला होता. महाराज सावध होते म्हणून या पंताच्या वारातून वाचले! महाराजांनी ही पट्ट्याचा शिरवार टाकून कृष्णाजीपंताला यमसदनी पाठवले. हा इतिहास आपणाला माहीत असतोच; पण या अफजलखान महमूदशाहीचा दुसरा एक हेजीब हा कोल्हापूर मौजे टाकळे, बोरगाव, वेल्हे, किरोली अशा गावांचा कुलकर्णी होता. हे आजपर्यंत दडवले गेले होते, किंबहुना ऐतिहासिक साधनांच्या पुस्तकात जरी हा उल्लेख आला असला तरी तो ठळकपणे सांगितला गेला नव्हता. असे का? याचे उत्तर आपणाला इतिहासाची मांडणी सोईस्करपणे करण्याच्या वृत्तीत शोधावे लागते.
तर या अफजलखानाचा दुसऱ्या वकीलाचे नाव होते नारो विश्वनाथ कुलकर्णी. या नारोपंताला काही आदिलशाही फर्मानात पंडित असेही आदराने म्हटले गेले आहे. (कृष्णाजी भास्कर याचा उल्लेख ही आदिलशाही फर्मानात पंडित असाच केला गेला आहे. आदिलशाही फर्माने अशा पंतांचा उल्लेख पंडित अशा आदरार्थी संबोधनाने करत, पण या पंडित असणाऱ्यांकडे कोणत्या ना कोणत्या गावचे कुलकर्णी, जोशी अशी वतनेही असत. त्यामुळे स्थानिक लोक त्यांना कुलकर्णी या आडनावानेच ओळखत. म्हणूनच कृष्णाजी भास्कर याचा उल्लेख जरी पंडित असा येत असला तरी त्याच्या घराण्याकडे वाई सुभ्यातील काही गावांचे कुलकर्णी वतन असल्यामुळे त्याचे वारस कुलकर्णी हेच आडनाव लावत असत. तसेच नारोपंताला ही काही आदिलशाही फर्मानात पंडित लावले असले तरी त्याचे आडनाव कुलकर्णी असेच येते.)
हा नारो विश्वनाथ कुलकर्णी आदिलशाही राजवटीत चांगलाच नावाजलेला होता असे दिसते. या कुलकर्ण्यास खासा मोहम्मद आदिलशहाने विजापूर कोटाच्या आत असलेली एका बनाजी हरेश्वराच्या मालकीची धर्मशाळा तिच्या इमारतीसह हा नारो अफजलखान महंमदशाहीचा हेजिबपंत असल्यामुळे इनाम दिली होती. एवढेच नव्हे तर मोहम्मद आदिलशहाने विजापूर जवळील कसबे नवरसपूर इथल्या कोटाजवळील असलेली पावचावर जमीन त्यातील बाग, विहिरीसह वंशपरंपरेने या कुलकर्ण्यास इनाम दिली होती. इतका याचा माईना विजापूर दरबारात मोठा होता.
या कोल्हापूरच्या कुळकर्णीने फक्त अफजलखानाची चाकरी इमाने इतबारे केली असे नाही, तर अफजलखानाचा एक दिवटा फाजल हा शिवाजीराजाचा सूड घ्यायचा म्हणून परळीच्या किल्ल्यावर (सज्जनगड) दबा धरून बसला होता. या फाजल अफजलखान मुहमदशाहीची चाकरी ही हा नारो विश्वनाथ म्हातारा होईपर्यंत करत होता. याचा मुलगा रामकृष्ण यानेही आदिलशाहीची साथ सोडली नाही.
असो शिवाजी महाराजांनी अफजल मारल्यानंतर अवघ्या सतराव्या दिवशी कोल्हापूर जिंकून घेतले होते. त्यावेळी आदिलशाहीत असणारे शिवाजी काशिदांसारखे अनेक लोक स्वराज्याकडे रुजू झाले होते. पण या कुळकर्णीने आदिलशाहीची बाजू काय सोडली नाही. हेही आपणास या कागदपत्रांवरून समजून येते. एकीकडे देव मस्तकी धरून शिवराय अवघा हलकल्लोळ करत असताना, या नारू कुलकर्ण्यासारखे वतन पिपासू खानाची वकिली - हेजीबी करत खासा आदिलशाही राजधानीत बादशहाच्या राजवाड्यालगत वाडे-हूडे बांधून राहत होते.
अफजलखान करवीर निवासिनी अंबाबाईला त्रास देईल म्हणून करवीर जगदंबा तिच्या मूळस्थानावरून हलवावी लागली तरी हे खानाचे हेजिबपंत आपल्या इनामाला चिकटून राहिले होते. शेवटी कोल्हापूर जिंकून घेतल्यावर शिवाजी महाराजांनी करवीर जगदंबेची पुन्हा स्थापना केली. तिची पूजा बांधली शिवाजी महाराजांच्या दृष्टीने करवीर अंबाबाईचे स्वरूप शिवपत्नी पार्वतीचे कसे होते, पुढे करवीर निवासीनी अंबाबाईची मूर्ती पुन्हा एकदा मूळस्थानावरून का हलवावी लागली याची माहिती पुन्हा कधीतरी.
टीप:- वरील माहितीतील शब्द आणि शब्द संदर्भासह लिहिलेला आहे. ज्यांना मूळ कागदपत्रे पाहायचे असतील त्यांनी या नारो विश्वनाथ कुलकर्णीच्या दडून बसलेल्या वारसांचा शोध घेऊन ती पहावीत किंवा ही कागदपत्रे ग. ह. खरे या साक्षेपी इतिहास संशोधकाने ऐतिहासिक फारसी साधनांमध्ये छापलेली आहेत त्या साधनांचा अभ्यास करावा.
इंद्रजित सावंत
28 नोव्हेंबर 2023
कोल्हापूर

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...