लेखन :सुरेश जाधव
----------------
राघोबादादांनी इंग्रजाशी सुरत येथे तह करून मराठा साम्राज्याची दौलत आपल्या स्वार्थापोटी कशी परकीयांच्या दावणीला बांधली याचा हा एक मासला :
पानिपतानंतर झालेली क्षीणशक्ति भरून काढणारे माधवराव अल्पवयांतच मरण पावले. माधवरावाच्या हयातीतच त्यांचे चुलते राघोबा दादा ह्यांच्याशी त्यांचें पटेनासें झालें होतें. माधवरावानंतर नारायणराव गादीवर बसले. आपण प्रधान व्हावे, ही राघोबादादांची फार दिवसाची इच्छा. पण ती साध्य झाली नव्हती. नारायणरावांचा स्वभाव पाहता त्यांना मारण्याचें कारस्थान सुरूं झालें, आणि सुप्रसिद्ध ' ध ' चा ' मा ' होऊन शनिवारवाड्यांत ता. ३ आगस्ट १७७३ रोजी दुपारी दोन प्रहरी नारायणराव बळी पडले. हा अमानुष खून पुण्याला मॉस्टिन येऊन राहिल्या नंतर एक वर्षाच्या आंतबाहेर झाला. ह्यामुळे भाऊबंदकीचे कारस्थान चांगलेच रंगले आणि मॉस्टिन व पर्यायानें इंग्रज सरकार ह्यांनीं राघोबादादांना हाताशी धरलें.
इंग्रजांना मुंबईजवळचें साष्टी आणि २८ मैलावरचें वसईबंदर आपल्या ताब्यांत असावें असें बाटूं लागलें. ही ठिकाणें मराठ्यांनी नुक्तीच पोर्तुगीजांपासून घेतलेलीं होतीं. प्रधानांच्या घराण्यांत भाऊबंदकी रंगल्यामुळे इंग्रजांना सुसंधी प्राप्त झाली.
नारायणरावांचा खून झाल्यानंतरही राघोबांचा मार्ग निष्कंटक झाला नाहीं. नाना फडणीस इत्यादि मुत्सद्दी मंडळींनीं बारभाईचें कारस्थान रचून लहानग्या सवाईमाधवरावास गादीवर बसवून राज्यकारभार सुरु केला.
राघोबादादांना स्वतःस प्रधानपद मिळविण्याची इच्छा होती. म्हणून बारभाईंशी युद्ध करण्या करितां त्यांना कोणाची तरी मदत हवी होती. ती इंग्रजांची घेतली. इंग्रजांना हें हवेंच होते. त्यानीं राघोबास मोठ्या खुषीनें मदत केली. पण तत्पूर्वी मदतीचा मोबदला म्हणून त्यांच्याकडून सुरत मुक्कामी तहाच्या कांहीं अटी कबूल करून घेतल्या.
तहाची मुख्य कलमें अशी होती की,
१ . ' मराठ्यांशी इंग्रजांचे झालेले पूर्वीचे तह राघोबादादांनी मान्य करावे,
२ . इंग्रजांनी तूर्त पंधराशे पण पुढें लवकरच कमीत कमी पंचवीसशे फौज मदतीस द्यावी.
३ . या फौजेच्या खर्चाकरितां राघोबादादांनी सर्व साष्टी बेट, तसेंच साष्टीलगत मराठ्यांच्या ताब्यांत असणारा भाग आणि त्याचे उत्पन्न, जंबूरस व ओलपाड हे गुजराथेंतील दोन परगणे, कारंजा कान्हेरी वगैरे मुंबई लगतची बेटें, बडोद्याच्या गायकवाडामार्फत भडोच शहर व परगणा ह्यांत होत असलेला मराठ्यांचा वसूल, अंकलेश्वराच्या उत्पन्नापैकीं सालिना पाऊणलक्ष रुपये, इंग्रजांनी मदतीस दिलेल्या फौजेच्या खर्चाकरितां दरमहा दीड लक्ष रुपये व या रकमेच्या तारणादाखल गुजराथेंतील चार महालाचे तारण द्यावें.
४ . बंगाल व कर्नाटक इकडील इंग्रजीच्या जहागिरीवर मराठ्यांनी पुढे केव्हांही स्वारी करूं नये.
५ . कंपनीस देऊं केलेला वरील मुलुख तहाच्या तारखेपासून इंग्रजाच्या स्वाधीन करावा व राघोबादादादानें पुण्याच्या दरबारशी स्वतंत्र तह केल्याने जरी युद्धाचें कारण पडलें नाहीं तरी इंग्रजांनी तहा प्रमाणे व्हावयाची ती मदत केली असे समजून सदर मुलुख त्यांना #कायमचा देऊन टाकला असे समजावे '
इतकेच नव्हे तर तहाच्या अटी पाळण्याबद्दल #तारण म्हणून राघोबादादांना आपले सहा लक्ष रुपयाचे जडजवाहीर आपले स्वाधीन करण्यास इंग्रजांनी भाग पाडलें !
राघोबादादा ह्या वेळी स्वार्थानें धुंद झाले असल्याकारणानें स्वकियाविरुद्ध लढण्यांत परक्यांची मदत घेऊं नये हें राष्ट्रीयत्वाचे तत्वही त्यांनी पायदळी तुडवले .
No comments:
Post a Comment