विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 10 December 2023

श्रींच्या राज्याचे सरसेनापती संताजी घोरपडे...!! ममलकतमदार

 श्रींच्या राज्याचे सरसेनापती संताजी घोरपडे...!!
ममलकतमदार
लेखन :
इंद्रजित खोरे



अहमदाबाद परीसरात मराठ्यांची वीस हजारांची दमदार फौज दाखल झाली होती.मराठे आल्याची बातमी कानी पडताच मोगली टाणेदार,सरदार हादरून उठले.खासा थोरल्या स्वामींनी ही मोहीम सरनोबत हंबीरराव मामांना आखून दिली होती.या वेळी मात्र मामांच्या हाताखाली बरीच तरणीबांड तरूण-तुर्क नुकतच मिसरूड फुटलेली पण हत्यारावर मजबुत पकड असलेल्या पोरांचा भरणा अधिक होता.आणि यातलंच एक महत्त्वाच नाव म्हणजे संताजी घोरपडे.खास मामांच्या मर्जीतला गडी.फौजेत दाखल झाल्या पासून मामांच्या संगती पाच-पंचवीस मोहिमा पार पाडल्या असतील.मामांना मात्र यांची लय काळजी.गडी लढाईच्या गर्दीत उतरला म्हणजे पुरं बेभान होऊन व्यऱ्यावर तुटून पडणार आपल्या बरोबरीन कोण हाय-नाय याच भान याला उरत नव्हतं.मात्र याचे हुकमी डावपेच आणि काटेकोर नियोजना मुळं वयरी हमखास गोत्यात येतो हे मामांना पक्क ठाऊक होतं.

अहमदाबाद आणि परिसर मराठयांनी पटाखाली घेतला. मराठयांचा जोर आणि संख्या पाहता कुणी आडवा हात टाकण्याचं धाडस केलं नाही.शिस्तीत सर्व लूट गोळा करून मराठे नर्मदातीरी बराणपूर परिसरात आले.खंडण्या गोळा करीत
ते खानदेशात उतरले.खानदेशात आपली घोडी नाचवुन दहशत लावून मराठे माहूर प्रांती दाखल झाले.रेणुका मातेची खणा-नारळान ओटी भरून फौज जालन्यात कडे वळाली. जालना मारून मराठयांनी शिंदखेड घेरलं.दाबजोर खंडणी घेऊन मराठे आता नाशिक प्रांती ठाण झाले.भक्कल लुट जमा झाली होती.या मोहिमेसाठी मराठयांचे पुरते दोन महिने खर्ची पडले होते.साल्हेर किल्ल्याच्या आडोशान लुटीची मोजदाद चालु होती.मोजदाद होताच तपशीलवार यादी तयार झाली
लूट दास्तानी लावली गेली.सोबतीस दहा हजार पाऊल लोक
रायगडाची वाट चालू लागला.लूट लवकर मार्गी लावण्याचं कारण म्हणजे मोगली सरदार दिलेरखान चालू येत असल्याच्या बातम्या हेरांनी मामांच्या कानी घातल्या होत्या.

लूट दूर जाताच मामा निश्चित झाले.सर्व सरदारांना डेरे दाखल करण्यात आलं.खानाची खोड कशी मोडायची यावर खल झाला.खान चालून येण्या अगोदरच आपणच खानावर चाल करून जाऊ त्यालाच अंगावर घेऊ..!! अशी मसलत संताजींनी पेश केली.मामांना ती मनोमन पटली.पहाटेच्या काळोखात मराठयांनी आपल्या घोडदळाला टाच दिली.खान झोपेत असावा तोपर्यंत मराठे मोगलांना जाऊन खेटले.मात्र रात्रीच्या मुक्कामाची जागा निवडताना खाना कडुन गफलत झाली होती
उगडी मयदानी जागा सोडून खान डोंगर रंगांच्या बेचक्यात उतरला होता.त्याचा तरी काय दोष ही मराठयांची दहशतच म्हणायची.खान आयताच तावडीत सापडला.

बिनीच्या पथकाची जबाबदारी मामांनी संताजींवर सोपवली होती.सलामीची जबादारीच संताजींवर दिल्यामुळे मामा निर्धास्त होते.मराठे जवळ जाताच पेटले.तिन्ही बाजूनी मराठयांनी हल्ला चढवला.मुधामुन मराठयांनी खानाची पिछाडी मोकळी सोडली होती.मोगल झोपीत होते तोवर मराठयांनी बरच रान मारलं होतं
आपलं पथक संताजींनी थेट मध्य भागी घुसवल.नेटानं कापाकापी चालू केली.पण बराच वेळ झाला तरी दिलेरखान त्यांना दिसत नव्हता.वीरांच्या आरोळ्यानी तो परिसर दणाणून उठला होता.मोगलांच्या रक्तानं मराठयांच्या समशेरी नाहून निघाल्या.दिवस फुटून वरती आला होता.खान दिसतं नव्हता म्हणून संताजींनी मोगलांचा रेटा मोडून आपलं पथकड अजून खोल गर्दीत गुसवल.खाना नजर टप्प्यात आला.

खान आपल्या हत्तीवर आरूढ होता.उंचीवर असल्यामुळे त्याला
लांबपर्यंतच रण दिसत होतं.मोगली स्वार-हशमांचे विखुरलेले मुडदे बघून खानाला घाम सुटला.मुगल नेटानं भांडत होते पण मराठयांचा जोर अधिक होता.हे सगळं बघताच खानाच्या मनात शंखेची पाल चुकचुकली.काय समजायचं ते खान समजुन चुकला होता.दिवस मावळती कडे झुकला होता.दोन वेळा संताजींनी जीवाची बाजी लावून खानाला घेरण्याचा प्रयत्न केला पण तो वाया गेला.संताजींची समशेर ज्याप्रकारे लढाईत तळपत होती ती पाहून मोगल सुद्धा अवाक झाले होते.
मात्र रात्र होता युद्ध रोखण्या आलं.

खान आपल्या बिचव्यात चिंताग्रस्त मनाने येरझऱ्या घालीत होता.कारण कुटून कुमक येण्याची संभावना नव्हती आणि उद्या सकाळी हे मराठे आपली कबर खोदनार याची त्याला खात्री झाली होती.म्हणून रात्रीच खानानं माघार घेतली आणि पसार झाला.मराठयांना खान माघार घेतोय याची कुणकुण लागली होती पण शांत राहिले.खानाच मोठं नुकसान मराठयांनी घडवून आणला होतं.दुसऱ्या दिवशी मराठयांनी राहुट्यांची जागा मोडून रायगडाची वाट धरली.विजयई खलिता स्वामींना धाडण्यात आला...!!

पुढं चिटणीस असं लिहतात

" तो दिलेरखान व आणखी उमराव चालून आले..त्यास दबाऊन यश घेऊन महाराजांचे दर्शनास आले...महाराज बहुत संतोष झाले..संताजी घोरपडे यांणी कामे बहुत केली.शिपाई मर्द जाणोन हंबीरराव यांणी विनंती केलियावरून तैनात जाजती करून जुमलेदारी दिल्ही...!!'

झाल्याली लेखन सेवा ही सरनोबत हंबीरराव मोहिते आणि सेनापती संताजी घोरपडे यासी अर्पण करतो.

टीप:-नोंदी प्रमाणे प्रसंग खरा आहे.पण कता काल्पनिक रचलेली आहे याची नोंद घ्यावी.



निमित्त :- आमचे परम मित्र रवी दादा मोरे यांनी नुकतीच लिहून प्रकाशित केल्याली " संताजी घोरपडे " ही कादंबरी

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...