विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 1 January 2024

मराठाशाहीतील ताकदवर पवार घराणे भाग 2

 


मराठाशाहीतील ताकदवर
पवार घराणे
भाग 2
लेखन :सुरेश नारायण शिंदे
कृष्णाजीने तारुण्यात पदार्पण केल्यावर आपल्या पित्याचा म्हणजेच साबूसिंग उर्फ साबाजी यांचा मृत्यू कसा दग्याने झाला हे आईकडून कळाले तेव्हा कृष्णाजी छत्रपति शिवाजी महाराजांच्या सेवेत दाखल झाले. महाराजांनी त्यांना सुखेवाडी ( सुपे) येथे असलेल्या मोकादमीवर पुनःश्च पाठवून दिले. कृष्णाजीला बुबाजी व केरोजी असे दोन कर्तृत्ववान मुले होती, ती देखील पित्यासह छत्रपतिंच्या आश्रयास राहिली. कृष्णाजीकडे सुपे प्रमाणे वाघाळे येथील देखील मोकादमकी होती तर इ.स.१६९९ मधे मलठणची निम्मी मोकादमी ही खरेदी केली. यावेळी कृष्णाजीचे तिघे पुत्र बुबाजी, केरोजी व रायाजी हे अधिक वैभवास पोहचले होते. कृष्णाजीचे निधन निश्चित कधी व कसे झाले याबाबत कोणता ऐतिहासिक पुरावा उपलब्ध नाही. छ.राजाराम महाराजांच्या कालखंडात बुबाजी, रायाजी व केरोजी यांनी मोठे शौर्य व पराक्रम निश्चितपणे केला असला पाहिजे कारण छत्रपति राजाराम महाराजांनी बुबाजी पवार यांस 'विश्वासराव' हा बहुमान व सरंजाम दिला होता तर केरोजी पवार यांना ' सेनाबारासहस्त्री ' ही बहुमानाची पदवी दिली होती. केरोजीच्या शिक्क्यात "श्री राजाराम चरणी दृढभाव " अशी अक्षरे होती. पुढील काळात बुबाजी, रायाजी व केरोजी या तीन बंधूंची वेगवेगळी तीन घराणी निर्माण झाली, त्यात बुबाजीचे घराण्याचा विस्तार फार मोठा असून धार व देवास संस्थाने निर्माण झाली आहेत. रायाजीचे घराणे वाघाळकर घराणे म्हणून वाघाळे येथे तर केरोजीचे नगर देवळेकर म्हणून खानदेशातील नगर देवळे येथे प्रसिद्ध आहेत. बुबाजीचे दोन पुत्र काळोजी व संभाजी हे होते, काळोजीचा वंश माळव्यात देवास येथे स्थिरावला. बुबाजीचा धाकटा संभाजी हा छत्रपति राजाराम महाराजांपासून छत्रपति शाहू महाराजांच्या कालखंडापर्यंत लष्कर बाळगून मोहीमेवर जात असल्याचा उल्लेख आढळून येतो. संभाजी पवार या दीर्घायू कर्त्यापुरूषाने आपल्या कार्यकाळात मलठण ( ता. शिरुर ) नवीन घर बांधले व मुलांस व नातवांस नवीन पाटीलक्या व वतने खरेदी करून अहमदनगर जिल्ह्यातील निरनिराळ्या ठिकाणी वसविले. या संभाजी पवार यांस उदाजीराव, आनंदराव व जगदेवराव अशी तीन मुले होती. उदाजीरावची लष्करी कारवाई इ.स.१७०९ पासून सुरू झाली असून माळवा व गुजरात वर मोहीमा करून मराठा साम्राज्याची ठाणी वसवून हक्क स्थापित केले. इ.स.१७०९ मधे उदाजीरावांनी माळव्यातील मांडवगड येथे अनेक शतके मालव राजधानीवर मराठ्यांचा विजयी झेंडा रोवला.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...