इमानाला, शब्दाला जागलेला एक मुस्लिम सरदार "इब्राहिम खान गारदी"
पानिपतच्या तिस-या युद्धाच्या वेळी दिलेले वचन आणि देशासाठी आपल्या नातलग आणि पाच हजार सहका-यांसह प्राणाची आहुती देणारा अल्पपरिचित मावळा
"इब्राहिम खान गारदी"
मित्रांनो मी खलिल महेमुद शेख. आज पुन्हा एकदा एकाअल्पपरिचीत मावळ्याची माहिती तुमच्या बरोबर शेअर करतोय. त्याला थोडे कारणही आहे. आणि लेख थोडा मोठा पण होऊ शकतो. कारण हे जे पानिपतचे युद्ध झाले, त्याबद्दलच्या कैक पोस्ट नेटवरच्या प्रत्येक माध्यमातुन प्रसारित होत होत्या, होत आहेत. त्यात "महाराष्ट्रतील प्रत्येक घराला सुतक पडले, आपल्या देशासाठी लढताना "लाख बांगडी फुटली, दोन मोती गळाले, २७ मोहरा हरवल्या आणि चिल्लर खुर्दा तर किती गेला याची गणनाच नाही" असे म्हणताना सर्वांचा उल्लेख केला जातो "अठरा पगड बारा बलुतेदारांचा" आवर्जुन उल्लेख करताना, त्या समरात मुस्लिम समाजाचे पण थोडेसे का होईना योगदान आहे, त्याचा उल्लेख कोणिच करताना दिसले नाही!
म्हणुन हा पंक्तिप्रपंच. मला माहित आहे माझ्या लेखांचे नेहमीचे वाचक गैरसमज करुन घेणार नाहीत. परंतु जर कोणला काही शंका असतील तर कोणाही इतिहास तज्ञाशी चर्चा करुनच आपले मत व्यक्त करावे.लेख सुरु करताना एक स्पष्टिकरण करु इच्छितो की, मी हा लेख कुठलिही किव किंवा दया अथवा सहानुभूति मिळवण्यासाठी शेअर करीत नसुन, फक्त हेच नमुद करण्यासाठी की, देशावर आमचे पण प्रेम आहे, आम्ही पण देशासाठी तुमच्या खांद्याला खांदा लाऊन लढलो आहोत, प्राणाहुती दिल्या आहेत. गद्दार, देशद्रोही कुठे नाहीत? सर्वत्रच आहेत म्हणुन ठराविक नालायकांमुळे सर्व समाजाला दोषी कोणीच धरत नाही. तेच धोरण आमच्या बाबतीत का नाही?
एवढ तळतळुन बोलण्याचे कारण म्हणजे, पानिपत युद्धात आपल्या पाच हजार सहका-यांबरोबर बलिदान करणा-या इब्राहिम खान गारदीचा साधा उल्लेखही होत नाही. का? का तर ते मुस्लिम होते म्हणुन?? मुस्लिम असेल तर देशभक्ति नसते अथवा कमी असते का? एकतर ज्यांनी पोस्ट प्रसारित केल्या त्यांचा अभ्यास कमी, किंवा काॅपीपेस्ट करुन केल्या गेलेल्या असतील! किंवा मुद्दाम उल्लेख टाळला जातोय, माझी खंत हिच आहे की जसे गद्दारांचे, समाजकंटकांचे उल्लेख वारंवार करता येतात, तसे देशभक्तांचे, देशासाठी प्राणार्पण करणा-यांच थोडातरी उल्लेख करावा. म्हणुन हा थोडा प्रयत्न.
तर मित्रांनो नेहमी प्रमाणे लेख आवडल्यास तुमच्या प्रतिसादाची आवर्जुन अपेक्षा आहे. आणि काही चुकत असल्यास( व्याकरण सोडुन) मार्गदर्शन करावे.
किरकोळ शरीर यष्टी असलेले इब्राहिम खान गारदी प्रथम निजामाकडे चाकरीला होते. त्यांची काबिलीयत पाहुन पेशव्यांनी राजकारण खेळुन इब्राहिम खानांना आपल्याकडे घेतले. इब्राहिम खान तोफ आणि बंदुका चालवण्यात निष्णात होते. त्यांचाकडे नेतृत्व गुणही असल्याने पेशव्यांनी त्यांना आपल्या तोफखान्याचे प्रमुख बनवले!
(खानांचा जिवनपट इथे देत नाही कारण मग लेख खुपच मोठा होईल. जर कोणाला हवा असेल तर कमेंट मधे सांगावे, पुढचा लेख तोच असेल)
सदाशिवरावांनी इब्राहिम खान बरोबर एकमेकांच्या इमानाच्या शपथा घेतल्या. आणि खानांच्या नेतृत्वात शंभरच्या वरचा तोफखाना आणि दहा हजार गारद्यांचे पथक मराठा सेनेत सामील करुन घेतले.आणि मराठा सेना दिल्लीला रवाना झाली.
तिथे गेल्यावर कळाले की दत्ताजी शिंदेचे मारेकरी शहामतखान आणि कुतुबखान कुंजपु-याच्या किल्ल्यात लपुन बसलेत. मग सदाशिवरांवाच्या आज्ञेने कशाचीही वाट न पहाता इब्राहिम खानांनी शत्रुला कुमक (मदत) मिळण्याआधिच किल्ला जिंकुन घेतला! शत्रु पळुन गेला.
त्यानंतर ज्यावेळी अब्दाली पानिपतास आला तेंव्हा सदाशिवरावांनी इब्राहिम खानांना मसलतीला बोलाऊन त्यांच्या इमानाविषयी खातरजमा करु लागले, कारण शत्रु पण मुस्लिम आणि इब्राहिम खान पण मुस्लिम! तेंव्हा इब्राहिम खानांनी त्यांना आलेली अब्दाली, नजीब आणि सिराजौदौलाची जवळ-जवळ २५ पत्रे दाखवली. ज्यात विविध प्रकारची लालुच, प्रलोभने दिली गेली होती! शिवाय जिहादचे पण आवाहन केले गेले होते. परंतु देशधर्माला आणि दिलेल्या शब्दाला जागणा-या या सच्च्या मुसलमानाने सर्व ठुकराऊन आपल्या देशसेवेला प्राधान्य दिले. ते पहिल्यावर भाऊंचा विश्वास आणखिनच वाढला. आणि अवघड प्रसंगी भाऊ सर्वांसह इब्राहिम खानांना सल्लामसलतीस बोलाऊ लागले.
प्रत्यक्ष युद्धप्रसंगी इब्राहिम खानांचा तोफखानाच आघाडीस होता.त्यांच्या उजव्या बाजुला शिंदे आणि होळकर मुस्तैद होते. तर डाव्या अंगाला गायकवाड आणि पवारांचा मेळा तैनात होता.प्रत्यक्ष व्युहरचना झाल्यावर इब्राहिम खानांचा तोफखाना शत्रुवर आग ओकु लागला, रोहिल्यांना भाजुन काढु लागला. आणि शत्रुसेनेची अवस्था अत्यंत दयनिय झाली. परंतु इब्राहिम खानांच्या तोफा आग ओकतच होत्या. आपल्या देशावर विणाकारण आक्रमण करणा-यांना जिवंत परत जाऊच द्यायचे नाही असे ठरवुनच तोफा आणि बंदुका शत्रुला अचुक टिपत होत्या. रोहिल्यांचे ८००० सैन्य ठार झाले.
शत्रुची पांगापांग झाली, पण इथेच एक घोडचुक झाली! शत्रु पळु लागलेला पहाताच अतिउत्साहाच्या भरात दामाजी गायकवाड आणि विठ्ठल शिवदेव विंचुरकर आपल्या पलटणीसह युद्धमैदानात उतरले आणि पळणा-या रोहिल्यांचा पाटलाग करु लागले. आणि तोफखान्याच्या आणि शत्रुसेनेच्या मधे आले. त्यामुळे आपली माणसं मरु नयेत म्हणुन नाईलाजास्तव इब्राहिम खानांनी तोफखान्याला गोळे दागण्यास बंद करा असा हुकुम दिला. आणि हळु-हळु मराठे जिंकत आलेल्या युद्धाचे पारडे फिरु लागले. सर्व प्रथम रोहिल्यांनी बंद असलेल्या तोफखान्यावरच हल्ला चढवला! आणि ५००० गारदी कापुन काढले. शिवाय, इब्राहिम खानांचा पुत्र आणि भाचा पण मारला गेला! आणि शत्रुशी लढताना स्वतः इब्राहिम खान जखमी होऊन शत्रुच्या तावडीत सापडले. ज्यावेळी त्यांना अब्दाली समोर नेण्यात आले त्यावेळी अब्दाली म्हाणाला "तुला मी स्वजातीचा म्हणुन आवाहन केले होते, जिहादचा पण नारा दिला होता. तु आम्हाला का सामिल झाला नाहीस?" त्यावेळी इब्राहिम खानांनी त्यास अत्यंत बाणेदार उत्तर दिले, "सदाशिवरावांना मी वचन दिले होते. शब्द दिला होता. ते माझ्यासाठी अमुल्य होते. तो शब्द पाळणे माझा धर्म होता. मी त्यांना दगा देऊ शकत नाही." चिडलेल्या अब्दालीने तिथेच त्यांचा शिरच्छेद करण्याचा हुकूम दिला.
अशा प्रकारे पानिपतच्या युद्धात आपल्या वचनाला, शपथेला जागण्यासाठी आपल्या धर्म- जाती पलिकडे जाऊन देशासाठी आपले प्राण अर्पणा-या आणखी एका पानिपतवीरास, इब्राहिम खान गारदी यांस मानाचा मुजरा.
तर मित्रांनो असे कैक वीर आहेत ज्यांचा उल्लेख होत नाही किंवा टाळला जातो! अशाच अल्पपरिचीत विरांचा उल्लेख म्हणुन माझे प्रयत्न असतात. त्यातीलच एक प्रयत्न म्हणुनच या लेखाकडे पहावे. आणि आवडल्यास प्रतिक्रिया द्याव्यात- खलिल शेख.
No comments:
Post a Comment