he Expansion Of Maratha Empire by Chatrapati Shree Shahu Rajah -
छत्रपति शाहू महाराजांनी "मिरज" वर स्वारी केली ह्याचं वर्णन मराठा रियासत मध्ये आढळते -
१७३७ पासून १७३९ पर्यंत शाहू छत्रपति साताऱ्यापासून दूरवर दूरची मजल मारलेली दिसून येते. प्रत्येक्ष स्वतःच्या नेतृत्वाखाली शाहू महाराजांनी ही मोहीम काढली आणि त्यात त्यांना यश पण मिळाले. जून जुलै १७३७ मध्ये शाहू महाराजांनी मिरजेचे ठाणे काबीज केले. या स्वारीत त्यांच्या सोबत अनेक नामी सरदार सहभागी झालेले. मराठा रियासतीमध्ये ह्या स्वारीचे वर्णन रियासतकारांनी केले ते असे - कूच करणे ते दोन तीन कोसांचे करावे ऐसें केले आणि समुहूर्ते डेरे दाखल झाले. पागा हुजुरात सर्व तयारी करून उतरले. तोफखाना तयारी होऊन काढिला व सर्व सरदारांस आपले तालुके व मसलतीचे बंदोबस्त राखून पांच , चार , दोन हजार फौजेनिशी ज्याचे त्याप्रमाणे बरोबर यावे असे नेमून दिल्याप्रमाणे येऊन उतरले.
त्यांस मिसलीस राहण्याचे व स्वारी चालण्याचे निर्बंध नेमून दिले, सेनाधुरंधर व सेनासाहेबसुभा भोसले यांस आघाडीस नेमले. त्यांस व मुख्यप्रधान व अमात्य, सचिव , मंत्री यांची उजवे बाजूस मिसल नेमली. पंडितराव , सुमंत व न्यायाधीश यांस डावे बाजूस नेमून दिले. चिटणीस , पोतनीस वैगरे कारकून मंडळी जमादारखान्यालगत उजवे बाजूस नेमली. फडणीस व दफ्तरकोठी वैगरे डावे बाजूस नेमले. सोयरे लोक , मानकरी व फत्तेसिंह भोसले उजवे बाजूस नेमिले. पिछाडीस सरलष्कर व त्यांचे निसबतीचे सरंजामी होते. हुजूरपागा डेऱ्यापुढे व शागिर्द पेशा लोक वैगरे जिकडील तिकडे मिसली नेमून दिल्या , सर्वांना स्वारीत आपापले मिसलीत चालावे , गलबला काही एक होऊ नये , पादशाही स्वारीत महाराज होते, आणि बाजूला सर्व मातब्बर मुत्सद्दी , प्रधान व सरदार यांनी अंबाऱ्यात बसोन , सरकारचे पाठीमागे जनानखाना , त्यामागे चाळीस पन्नास अंबाऱ्या चालाव्या. नाना प्रकारची रणवाद्ये , हत्ती , घोडे , रथ , सांडणी , नगारखाना , शहाजाने , वाजंत्री , धाडी चोपदार , भालदार , वाटेने सक्के ( पाणी शिंपणारे ) व पखाला यांनी युक्त असलेली छत्रपतींची स्वारी मजल दरमजल करत उंब्रजच्या मुक्कामी पर्यंत आली. ह्या स्वारीत पंतप्रधान बाजीराव , फत्तेसिंह भोसले , सेनासाहेबसुभा रघोजी भोसले , प्रतिनिधी , राणोजी शिंदें , सुभेदार मल्हारजी होळकर असे पराक्रमी वीर सामील झालेले.
(आज अजून ही मौल्यवान लक्ष्मी आपल्या खजिन्यात शामिल झाली )
श्री राजा शाहू छत्रपति जयते
- अमित राणे
No comments:
Post a Comment