छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्याचे छ. शाहू महाराजांच्या कार्यकालात साम्राज्यात रूपांतर करण्यात कोकणातील भट कुटुंबातील कर्तृत्ववान पेशव्यांचे व मराठमंडळातील सरदारांचे महत्त्वाचे योगदान आहे. छ.शाहू महाराजांची औरंगजेबाच्या मृत्यूनंतर झालेली सुटका जरी स्वराज्याच्या गृहकलहास सुरूवात होणारी असली तरी छ.शाहूंनी आपल्या संयमी व माणसे जोडण्याच्या वर्तनातून सातारा येथे आपली गादी स्थापन करण्यात यशस्वी झाले. पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ यांनी सय्यद बंधूच्या मदतीने दिल्लीपर्यंत धडक मारून छ.शाहू महाराजांच्या मातोश्री येसूबाईसह इतरांची सुटका केली व महाराजांच्या स्वराज्याला मोगलांची मान्यता असलेल्या सनदा देखील प्राप्त केल्या. या मोहीमेत बाळाजी पुत्र बाजीराव हे देखील होते. बाळाजींच्या निधनानंतर छत्रपतींनी थोरले बाजीराव यांची नियुक्ती केली. पेशवे थोरले बाजीरावने वयाच्या विसाव्या वर्षी पेशवेपदावर गेल्यावर आपल्या पराक्रमाने नवनवीन मुलूखात मराठ्यांची सत्ता स्थापनेला सुरूवात केली. माळवा मराठ्यांच्या ताब्यात आल्यावर हैद्राबादचा निजामचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी थोरले बाजीराव यांनी घेतली. निजामाचे सैन्य मराठशाहीत आल्याचे पाहून पेशव्यांनी त्याच्या मुलूखात धुडघूस घालण्यास सुरूवात केली परिणामी निजामाला स्वतःचा मुलूख राखण्यासाठी परत फिरावे लागले. पेशवे चिमाजी अप्पा व पेशवे बाजीरावांच्या वेगाने होणाऱ्या हालचालीने त्रासलेला निजाम औरंगाबादजवळ असलेल्या पालखेड येथे होता. निजामाकडे भला मोठा प्रभावी तोफखाना असल्याने लष्करीदृष्या तो मराठेंपेक्षा वरचढ होता. निजामाच्या सैन्याने गोदावरी नदी ओलांडली व त्याचा तोफखाना मागे राहिला असतानाच बाजीराव, सुभेदार मल्हारजी होळकर, पिलाजी जाधवराव, दावलजी सोमवंशी, राणोजी शिंदे, बाजी भिवराव रेठरेकर आणि उदाजी पवार यांच्या घोडदळाने मोगल सुभेदार निजामा घेरले. निजामाची रसद बंद झाली आणि नदीच्या पाणवठ्यावर व उतारावर मराठ्यांनी चौक्या पहारे बसविल्याने निजाम गलीतगात्र झाला. २८ फेब्रुवारी १७२८ रोजी निजामाने तहाचा प्रस्ताव पाठवला. पालखेडच्या तहाने बाजीराव व मराठ्यांची कीर्ती हिंदुस्थानभर पसरली.
दरम्यानच्या कालखंडात बुंदेलखंडात वेगळेच नाट्य घडत होते. यमुना दक्षिणेला अगदी नर्मदेपर्यंत असलेल्या ओर्च्छा, झाशी, बांदा, काल्पी आणि सागर महत्त्वाची शहरे ही बुंदेलखंडात समाविष्ट आहेत. हा भाग बरासचा डोंगराळ असून चंबळ, यमुना, बेटवा, सोन आणि केन या नद्या वाहतात. बुंदेलखंड हिंदुस्थानच्या मध्यवर्ती ठिकाणी असून याच्या पश्चिमेला माळवा प्रांत आहे. बुंदेलखंडातील स्थानिक रहिवाश्यांना " बुंदेले " म्हणून ओळखले जाते. इ.स.१६६१ मधे मोगलांच्या सैन्याबरोबर छत्रसाल चंपतराय हा दख्खनमधे म्हणजेच महाराष्ट्रात आला होता, त्यावेळी तो छत्रपती शिवाजी महाराजांना प्रत्यक्ष भेटून बुंदेलखंडात राजा असलेल्या आपला पिता चंपतरायांच्या राज्याला मोगलांनी नष्ट केल्याची सविस्तर हकीकत कथन केली होती. छत्रपतींनी आपणांस मदत करावी अशी याचना छत्रसालने केली होती, तेव्हा महाराजांनी त्याला बुंदेलखंडातील रयतेसाठी स्वतः मोगलांशी लढून आपले राज्य निर्माण करण्याचा सल्ला दिला होता. महाराजांकडून संघर्षाची प्रेरणा घेऊन पुन्हा परत गेलेल्या छत्रसालने लवकरच आपले राज्य मोगलांच्या ताब्यातून मुक्त केले आणि प्रणामी वंशाची राजवट कायम केली. बुंदेलखंडाच्या शेजारी असलेल्या अलाहाबादचा मोगल सुभेदार मुहम्मदखान बंगश याने छत्रसालच्या भागात डिसेंबर १७२८ चढाई केली व त्या डोंगराळ भागातील जैतपूर किल्ला व माहोबा परिसर आपल्या ताब्यात घेतला. ऐंशी वर्षे वयाच्या छत्रसालने मराठ्यांचा कर्तबगार पेशवा बाजीरावला नव्व्याण्णव कडवी असलेले विनंतीपत्र दुर्गादासकडून पाठवून दिले. कवी मनाच्या छत्रसालच्या मदतीच्या पत्रातील उल्लेख खालीलप्रमाणे.
जो गत ग्राह गजेंद्रकी,
सो गत भई है आज,
बाजी जात बुंदेल की,
बाजी राखो लाज !७!
पेशवा बाजीराव हे उत्तरेच्या मोहीमेच्या वाटेवर असतानाच हे छत्रसालचे पत्र मिळाले तेव्हा पेशवे बाजीराव आपल्या सरदारांच्याबरोबर बुंदेलखंडाकडे निघाले.दि.१३ मार्च १७२९ ला धामोरा येथे छत्रसलची भेट घेतली तेव्हा त्याने ४९८९ आणि आठ आणे रुपये नजर केले तर पेशव्यांनी छत्रसालास एक हत्ती व एक घोडा भेटीदाखल दिला. मग मराठा व छत्रसाल यांच्या संयुक्त सैन्याने जैतपूरच्या किल्ल्यात असलेल्या बंगशच्या किल्ल्यास वेढा घातला. मे १७२९ ते आॕगष्ट १७२९ दरम्यान जैतपूरच्या चाललेल्या वेढ्यात बाजीराव, पिलाजी जाधवराव, तुकोजी पवार, विठ्ठल शिवदेव, दावलजी सोमवंशी आणि इतर सरदारांनी मुहम्मदखान बंगशला तह करण्यास भाग पाडले. बंगशने छत्रसालचा जिंकलेला प्रांत परत दिला व पुन्हा कधीही आक्रमण करणार नाही अशी हमी दिली.
युद्धसमाप्तीनंतर बुंदेलखंड पुन्हा छत्रसालच्या ताब्या आल्याबद्दल त्याने दरबार भरविला होता व त्यात पेशवे बाजीराव यांना आमंत्रित केले. वृद्ध छत्रसालने आपल्या हिरदोस व जगतराज या दोन्ही मुलांच्या शेजारी बाजीरावांस बसवून बाजीराव हा माझा तिसरा मुलगा आहे असे जाहीर केले. आपल्या राज्याच्या तीन वाटण्या करून एक वाटणी जो छत्तीस लाखांचा मुलूख तो बाजीरावांस दिला. पन्ना येथे हि-याच्या खाणी होत्या, त्याच्या देखील तीन वाटण्या केल्यामुळे पन्ना देखील बाजीरावांस मिळाले. यानंतर छत्रसालने त्याला मुस्लीम स्त्रीपासून झालेली मस्तानी नावाची मुलगी बाजीरावांस दिली.त्यानंतर पेशवे बाजीराव आॕगष्ट अखेर पुण्याला आले व सोबत मस्तानी होती. बाजीराव पेशवा यांना पुण्याची जहागीर इ.स.१७२६ मधे मिळाली होती आणि पेशवे सासवडला राहात होते. पुण्यातून मुळा - मुठा नद्यांचे प्रवाह जात असल्याने मुबलक पाणी उपलब्ध होते तर सोयीची जागा असल्याने पेशवा बाजीराव यांनी आपले कायमचं निवासस्थान पुण्यात करण्याचे ठरविले.बुंदेलखंडातील मोहीम यशस्वी झाल्यानंतर पेशव्यांनी १० जानेवारी १७३० मधे शनिवारवाड्याचा पाया घातला.शनिवारवाडा बांधण्याची जबाबदारी शिवराम कृष्ण खाजगीवाले यांच्यावर सोपविण्यात आला. बांधकाम खर्च १६,११० रुपये झाला असा उल्लेख केला असला तरी प्रत्यक्षात यापेक्षा जास्त झाला असणे संभवतो.
शनिवारवाडा सुमारे दोन वर्षात बांधून झाल्यावर संपूर्ण पेशवे कुटुंबिय येथे राहू लागले. मस्तानीसाठी स्वतंत्र निवासी महल शनिवारवाड्यात १७३३ मध्ये बांधला होता. पेशवा बाजीरावची पहिली पत्नि सौ.काशीबाई, बाजीराव माता राधाबाई आणि मस्तानी ह्या येथे राहात होत्या.पेशवा बाजीराव यांचा जन्म नाशिकजवळच्या दुबारे या गावात १ आॕगष्ट १७०० रोजी झाला होता तर तारूण्यात पदार्पण केल्यावर राजबिंडा दिसत होते. निजाम भेटीच्या वेळी निजामाकडील काही स्त्रियांनी त्यांना चिकाच्या पडद्यामागून पाहून त्यांच्यावर मोती उधळले असा उल्लेख बखरीत येतो हे बाजीरावांच्या देखणेपणासाठी पुरेसे आहे.तर छत्रसालने मस्तानीला बाजीरावांना दिले तेव्हा ती साधारणतः वयाने पंधरा वर्षाची असावी असे अनुमान लावले जाते. प्रणामी पंथाची असलेली मस्तानी अतिशय सौंदर्यवती व नृत्यकला निपून होती. ती अश्वारोहण, तरवारबाजी आणि भालाफेक मधे तरबेज होती. पेशव्यांची मस्तानीवर विशेष मर्जी होती, त्यामुळे ती बहुतेकवेळा बाजीरावांसोबत मोहीमेवर जात असे तेव्हा ती रिकिबीला रिकिब लावून त्यांच्याबरोबर घोडदौड करत असे. बाजीरावांची पत्नी काशीबाई यांना मस्तानीचे येणे पसंत नव्हते पण त्यांना पर्यायही नव्हता. कर्मठ पेशवे कुटुंबातील इतर सदस्य हे मस्तानी-बाजीराव प्रेम प्रकरणामुळे नाराज होते. काशीबाईंनी आपल्या पतीच्या निर्णयाशी नाखुषीने संमती होती मात्र राधाबाई आपल्या कर्तृत्ववान मुलाच्या कृत्याने नाराज होती. काशीबाई ह्यांनी मस्तानीला स्वीकारले होते. पेशवे बाजीराव यांना मस्तानीपासून २८ जानेवारी १७३४ मध्ये एक मुलगा झाला. रास्तेवाड्यात जन्मलेल्या मुलाचे नाव समसेर ठेवले तसेच दुसरे नाव कृष्णसिंग होते. पेशवा बाजीरावने पाबळ, केंदूर व लोणी ही तीन गावे मस्तानीला इनाम करून दिली होती. पाबळ येथे गढीवजा भव्य वाडा देखील होता. बाजीरावांचे मस्तानीशी असलेले नाते संपुष्टात यावे यासाठी चिमाजी अप्पा, राधाबाई, बाळाजी (नानासाहेब ) हे प्रयत्नशील होते. पेशवा बाजीराव हे नासिरजंगचा सामना करण्यासाठी १ नोव्हेंबर १७३९ रोजी पुण्याहून निघाले तेव्हा मस्तानी पुण्यातच होती. १४ नोव्हेंबर १७३९ रोजी बाजीरावकडे जायला मनाई असताना ती पाटसला गेली. १ डिसेंबर १७३९ ला महादजी पुरंदरे पाटसला गेले व पेशवा बाजीराव यांच्याशी बोलून मस्तानीस पुण्यास आणण्यात यशस्वी झाले. मस्तानीस पुण्यात आणल्यावर नजरकैदेत ठेवण्यात आले. पेशवा बाजीरावच्या सैन्याने औरंगाबाद जवळ नासिरजंगला तह करण्यास भाग पाडले. हा तह पालखेड जवळील मुंगी पैठण येथे झाला. त्यानंतर पेशव्याचे सैन्य उत्तरेला निघाले तेव्हा त्यांच्यासोबत पत्नी काशीबाई व मुलगे रघुनाथ व जनार्दन हे होते. नर्मदेच्या दक्षिण तीरावर असलेल्या रावेर येथे असताना २३ रोजी पेशवा बाजीरावांस आजाराची चाहूल लागली. अंगात ताप भरला. प्रकृतीस आराम मिळावा म्हणून दानधर्म व महामृत्यूजंय जप देखील करण्यात आला. अखेर २८ एप्रिल १७४० रोजी रात्री ८:३० वाजता सलग वीस वर्षे चाललेला झंझावात संपला. पेशवे बाजीराव अनंतात विलीन झाले. मुलगा जनार्दनने अंत्यसंस्कार केले. यावेळी मस्तानी पुण्यातील शनिवारवाड्यात नजरकैदेत होती. पेशव्यांच्या निधनाची बातमी कळाल्यावर मस्तानी शनिवारवाड्यात किंवा पाबळ येथे अनैसर्गिक मृत्यू होऊन पावली. मस्तानीचे दफन पाबळ येथे करून, तेथे कबर बांधण्यात आली.
छ.शाहू महाराजांच्या निधनानंतर दशकात पेशवे नानासाहेब यांनी दक्षिणेत आपला अंमल प्रस्थापित करण्यासाठी चार मोहीमा काढल्या, त्यातील १७५१ च्या वेळी त्यांनी आपल्याबरोबर सदाशिवरावभाऊ आणि समसेरबहाद्दर हे प्रामुख्याने होते. अहमदशाहा अब्दालीचा सरदार जहानखान मोठी फौज घेऊन जाट व मराठे यांचा समाचार घेण्यासाठी सुरजमलच्या मथुरेजवळील वल्लभगडवर चालून आला. यावेळी वल्लभगडमधे सुरजमल जाटासोबत त्याच मुलगा जवाहिरसिंग, समसेरबहाद्दर आणि अंताजी माणकेश्वर हे होते. जोराचा संघर्ष झाला पण किल्ल्यास तोफांच्या मा-याने भगदाड पडले. जहानखानाचे सैन्य किल्ल्यात घुसल्यावर मोठा गोंधळ निर्माण झाला व याचाच फायदा घेत समसेरबहाद्दर, अंताजी माणकेश्वर व इतर अफगाणी पेहराव करून सुखरूप बाहेर पडले. जहानखानाने मथुरेत हिंदूची कत्तल मोठ्या प्रमाणात केली तर अब्दालीची लूट करून तेथे आपल्या विश्वासातील लोकांना विविध पदावर नियुक्त करून परत स्वदेशी गेला. अंताजी माणकेश्वर यांनी पुण्याला पत्र पाठवून सविस्तर माहिती दिल्यावर १७५७ मधे पेशवा रघुनाथराव हे समसेरबहाद्दर व इतर सरदारांना घेऊन दिल्लीकडे निघाले. १० आॕगष्ट १७५७ रोजी मराठ्यांनी जुन्या दिल्लीवर हल्ला चढविला, त्यात रघुनाथराव, मल्हारराव होळकर व समसेरबहाद्दर हे प्रामुख्याने होते. दिल्लीचा अब्दालीने नियुक्त केलेला मीरबक्षी नजीब, मराठ्यांचा हल्ला रोखून दिल्ली सुरक्षित ठेवण्यात असमर्थ होता. त्याने मल्हारजी पुढे शरणागती पत्करली आणि मला आपला मानसपुत्र समजून माफ करा. नजीबाने आपल्या सैन्यासहित दिल्ली सोडली व मराठ्यांच्या ताब्यात आली.
समसेरबहाद्दर पुत्र अलीबहाद्दर व तुकोजी होळकर यांची फौज पेशव्यांनी उत्तरेत असलेल्या महादजी शिंदे यांच्या साह्यासाठी सन १७८६ मधे पाठवून दिली होती. परंतु ती दक्षिणेत पोहोचण्यास दोन वर्षे लागली, त्यातहि अलीबहादर हा तुकोजी होळकरच्या तुलनेत लवकर पोहोचला. महादजींची व अलीबहादरची भेट मथुरेच्या छावणीत झाली. त्याचवेळेला नजीबखान रोहिल्याचा नातू गुलाम कादिर व इस्माईल बेग यांनी दिल्लीत प्रवेश करून बादशहास व शाहजादेंना कैद करून मोठा अत्याचार केला. सुमारे दोन महिने संपत्तीच्या लूटीकरिता विविध अत्याचार केले. शेवटी तर बादशहाचे डोळे देखील काढले.मात्र हि बातमी महादजींना कळाल्यावर त्यांनी अलीबहादरच्या ताज्या दमाच्या नेतृत्वाखाली अबुजी इंगळे, राणेखान इत्यादींना दिल्लीला पाठवून दिले. दरम्यानच्या काळात दिल्लीची लुट व अत्याचार करून घोसळगडला पळून गेला होता. अलीबहादर,राणेखान यांनी त्याच्या किल्ल्याला वेढा दिला मात्र तो रात्रीचा पसार झाला. मराठा सैन्य त्याच्या मागावरच होते. शेवटी त्याने एका गावातील ब्राह्मण घरात आश्रय घेऊन त्याला चांगले घोडे घेऊन येण्यासाठी अमिष दाखविले तेव्हा तो ब्राह्मण राणेखानाजवळ येऊन गुलामाचा ठावठिकाणा सांगितला.गुलामास कैद करून महादजींसमोर आणण्यात आली. त्याच्या डोक्यावरील केसांचे पाट कापून उंटावर बसवून मिरवणूक काढून ३ मार्च १७८९ रोजी ठार केले.दोन्ही सैन्यदले महादजींच्या मोहिमेत यश मिळाल्यावर अलीबहाद्दरने बुंदेलखंडात जाऊन पेशवे बाजीरावांच्या काळात मिळालेल्या जाहगिरीची व्यवस्था मराठा दौलतीच्या सेवेत आणण्याची जबाबदारी नाना फडनिसांनी अलीबहाद्दरास सांगितली होती. उन्हाळ्यात महादजी शिंदे चार महिने अतिशय आजारी होते तेव्हा त्यांच्या माणसांनी ह्या आजारपणाचे कारण म्हणजे हिंमतबहाद्दर गोसाव्याने देव घातल्याचे निष्पन्न झाले.मग ह्या गोसाव्यास धरून आणण्याचा आदेश पाटीलबावा महादजींनी दिला. गोसाव्यास धरून पाटीलबावांच्या छावणीकडे नेत असताना तो अचानक अलीबहाद्दरच्या छावणी घुसला व अलीबहाद्दरांस रदबदलेची विनंती केली. अशाप्रकारे पाटीलबांवांचा अपराधी अलीबहाद्दरच्या छत्रछायेत आला. गोसावी याला अटक करून माझ्याकडे हजर करावा म्हणून महादजींनी केलेला आदेश अलीबहाद्दरने वेगवेगळ्या कारणांनी हाणून पाडला कारण नाना फडणीस पुण्याहून अलीबहाद्दास फूस देत होते. तुकोजी होळकर व अलीबहाद्दरांची महादजींनी मदत न होता मोठे नुकसानच होत होते. गोसावी हा अलीबहाद्दरकडे असल्याने त्यांच्या बराच वाकडेपणा आला. वर्षे दोन वर्षे झाली तरी गोसावी व त्याचा कुटुंबकबिला अलीबहाद्दरचे आश्रयास राहिल्याने महादजी शिंदे पुण्याला १७९२ मधे येण्याच्या अगोदर म्हणजे १७९० च्या दस-याला गोसाव्याला घेऊन बुंदेलखंडात गेले तर तुकोजी होळकर इंदूरास दाखल झाले. हिंमतबहाद्दर गोसाव्याच्या मदतीने अलीबहाद्दरने सुमारे चाळीस हजारांची फौज तयार करून बांदा, पन्ना व परिसरात आपली सत्ता कायम केली तर पुण्यात अलीबहाद्दरचा मुलगा समसेरबहाद्दर (दुसरा) याची सुंता १७९१ मधे झाली. त्यावेळी पेशव्यांनी त्याला दरमहा २०० रूपयेची नेमणूक करून दिली तर अलीबहाद्दरने आपला मुलगा समसेरबहाद्दरसाठी नाना फडणिसांमार्फत बांदा संस्थानचे नबाब या नावाने पेशव्यांची सनद प्राप्त करून घेतली. १८०२ मधे झालेल्या लढाईत बाजीराव - मस्तानीचा नातू अलीबहाद्दर मारला गेला तेव्हा बांद्याचा नबाब त्याचा मुलगा समसेरबहाद्दर (दुसरा) हा १८०३ मधे झाला मात्र लवकरच इंग्रज व दुसरा बाजीराव यांच्या तह झाला. या तहातील कलमानुसार बुंदेलखंडातील समसेरबहाद्दरच्या ताब्यातील २६१६००० रुपयेचा प्रांत ईस्ट इंडिया कंपनीस सैन्याच्या खर्चाकरिता देण्यात आला. १८ जानेवारी १७०४ रोजी समसेरबाहाद्दरने ह्या प्रांताचा ताबा इंग्रज अधिका-याला दिला. इंग्रजांनी बांद्याच्या नबाबास दरसाल चार लाख रूपयेचा तनखा निश्चित करून दिला. समसेरबहाद्दर १७२३ पर्यंत जिवंत होता तोपर्यंत त्याला दरसाल चार लाखांचा तनखा इंग्रजांकडून मिळत होता व पुढेहि त्याचा मुलगा झुल्फिकारअली यांस देखील तनखा मिळत होता.
संदर्भ -
१) द इरा आॕफ बाजीराव /साॕल्स्टिस अॕट पानिपत
ले.- डाॕ.उदय स.कुलकर्णी
मुळामुठा प्रकाशन, पुणे
२) मस्तानी कंचनी नव्हे ! कुलकामिनी !
ले. - विद्या सप्रे
प्रतिमा प्रकाशन, पुणे
३) मराठी रियासत
लेखक - गो.स.सरदेसाई
४) पेशवेकुलीन स्त्रिया
लेखिका - मुक्ता केणेकर
प्रकाशक - काॕन्टिनेन्टल, पुणे
©® सुरेश नारायण शिंदे, भोर
shindesn16@gmail.com
No comments:
Post a Comment