विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 1 January 2024

दुर्गालंकारांनी सजलेला, बुलंद किल्ले उदगीर

 


दुर्गालंकारांनी सजलेला, बुलंद किल्ले उदगीर
मराठवाडा विभागात येणाऱ्या बालाघाट परिसरात व लातूर जिल्ह्याच्या हद्दीत असलेला मिश्रदुर्ग म्हणजे किल्ले उदगीर. सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यापासून सुमारे साडे चारशे कि.मी.अंतरावर असलेल्या उदगीरचा किल्ला, दुर्ग अभ्यासकांना विशेष पर्वणीच आहे. मराठवाड्यातील किल्ल्यांना सुमारे दोन हजार वर्षाचा इतिहास आहे. हा मिश्रदुर्ग म्हणजे सह्याद्रीच्या गाभ्यातील दुर्गांसारखा खचितच नाही. सह्याद्रीच्या गिरीशिखरांवरील दुर्गभ्रमंती करणाऱ्या व्यक्तिस हा भुईकोटच आहे. उदगीर तालुका मुख्यालय असलेल्या शहराच्या लगतच विशाल बुरूज व भव्य तटबंदीयुक्त रूप पाहाताच आक्रमक शत्रूला नक्कीच धडकी भरत असणार! उदगीरचा किल्ला अशा ठिकाणी बांधला आहे की, त्याचे अस्तित्व उदगीर शहरातून दिसून येत नाही, मात्र किल्ल्याच्या बुरूजावरून संपूर्ण उदगीर शहर सहज दिसते. प्राचीन इतिहासात उदगीरचा उल्लेख उदयगिरी, उदकगिरी असा येतो, तो येथील लहान टेकड्यातून उगम पावणा-या लेंडी नदीमुळे संभवतो. या नगरीचा उल्लेख पुराणकथामधे आढळत असला तरी उदगीर किल्ल्याचा उल्लेख मात्र अकराव्या शतकातील शिलालेखांत आलेला आहे. करबसवेश्वर या पोथीतील वर्णनानुसार उदलिंग ऋषींनी भगवान शंकराची मोठी तपश्चर्या करून त्यांना प्रसन्न करून घेतले तेव्हा महादेवांनी त्यांना आशीर्वाद देऊन म्हटले," मी येथे लवकरच लिंग स्वरूपात येथे प्रगट होईन." त्यानंतर काही काळाने या भूमीतून हळूहळू शिवलिंग बाहेर आले. मग येथे नागरी लोकवस्ति होण्यास सुरूवात होऊन लवकरच गाव वसले व ऋषी अदलिंगांच्या नावावरूनच ह्या गावाला उदगीर हे नाव मिळाले. ज्या जागी शिवलिंग निर्माण झाले तो भाग म्हणजे आजचा ऐतिहासिक वारसा असलेला हा किल्ल्याचा भाग होय व किल्ल्याच्या अंतर्गत भागात आज देखील उदगीर महाराजांचा मठ व तत्कालीन शिवलिंग आहे.
सातवाहनकाळात प्रतिष्ठाण म्हणजेच आजचे पैठण येथे त्यांची राजधानी असल्याने पैठण हे मुख्य नगर झाले , परिणामी वेगवेगळ्या भागातील सर्व नगरे पैठणशी जोडली गेली. पैठणकडे होणाऱ्या मार्गावर येणारे उदगीर हे व्यापारधंद्यांनी भरभराटीस आले तर पुढीलकाळात चालुक्य कालखंडात येथील भुईकोट किल्ला निर्माण केला असावा. यादव राजा सिंघनदेव यांच्या इ.स.११७८ च्या शिलालेखात उदगीरचा शासक म्हणून सहावा भिल्लम यादव यांच्या नावाचा उल्लेख येतो. यादव राज्य संपुष्टात आल्यावर बहमनी शासक असताना उदगीर हे व्यापारी केंद्र म्हणून नावलौकिकास आले. महमदशहा वली बहमनी याची राजधानी गुलबर्गा येथे होती ती २२ सप्टेंबर १४२६ मधे बिदर येथे करण्यात आली आणि याच्यामुळे उदगीर नगराचे महत्त्व अधिक पटीने वाढले. बहमनी सुलतानाने इ.स.१४९२ मधे आपला औसा येथील सरदार कासीम बरीद यास उदगीर, औसा व कंधार हे किल्ले जहागिरी म्हणून दिले. इ.स.१५२६ मधे बहमनी राज्याचे विघटन होऊन त्याच्यातून पाच शाह्या उदयास आल्या, त्यातील बरीदशाहीचा संस्थापक कासीम बरीद हा मुळचा बहमनी सत्तेतील जाहगिरदार होता. बरीदशाही सत्तेत असलेल्या प्रमुख किल्ल्यात उदगीर, औसा व कंधार या भुईकोटांचा समावेश होतो. बरीदशाहीच्या अस्तानंतर या किल्ल्यावर आदिलशाही, मुघल, मराठे व शेवटी निजामाची सत्ता होती.
मराठ्यांच्या इतिहासातील महत्त्वाच्या प्रमुख लढायात उदगीरच्या लढाईचा देखील समावेश करावा लागतो कारण या लढाईतील विजयाने सदाशिवरावभाऊ यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांना उत्तरेत आलेल्या अहमदशहा अब्दालीशी पानिपतमधे मोठा संघर्ष करावा लागला. पानिपतावर जरी मराठ्यांची सुमारे लाख बांगडी फुटली, पराभवाचा सामना करावा लागला तरी मराठे संपले नाहीत. पेशवे नानासाहेब यांनी निजामाविरूद्ध मोहिमेचे नेतृत्व सदाशिवरावभाऊकडे दिले. भाऊनी १३ आॕक्टोबर १७५९ रोजी पुण्यातील शनिवारवाड्यातून बाहेर पडून लष्करी छावणीत पहिला मुक्काम केला. यावेळी भाऊच्या सैन्यदळात तोफखाना प्रमुख असलेल्या मुझफ्फरखान गाडदी याच्याशी कधीच पटत नव्हते. पेशव्यांनी नियुक्त केलेल्या मुझफ्फरखानाला भाऊचा विरोध होता मात्र बुसीकडे तयार झालेला व पूर्वी निजामाचा तोफखाना प्रमुख राहिलेला मुझफ्फरखानाचा पुतन्या इब्राहिमखानास आपल्याकडे घेण्याच्या त्यांनी हालचाली सुरू केल्या. मुझफ्फर इतका इब्राहिम तोफखान्यात तरबेज नव्हता पण दगलबाज मुझफ्फरवर भाऊचा विश्वास नव्हता. इब्राहिमखान गाडदीच्या मुलीच्या लग्नात स्वतः निजामअली हजर होता परंतु सलाबतजंगच्या सांगण्यावरून निजामअलीने त्याला आपल्या सेवेतून बडतर्फ केले होते. त्याच्या बडतर्फीची बातमी भाऊला समजल्यावर त्यांनी मराठ्यांच्या तोफखाना प्रमुख असलेल्या पानसे यांच्यावर इब्राहिमखानास मराठ्याकडे आणण्याची जबाबदारी दिली. पानसे यांनी आपली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडून इब्राहिमखानास आपल्या तोफा व एक हजार बंदुकधारी सैन्यासह पेशवाईत घेतले. नेमकी हीच घटना मुझफ्फरखानास आवडली नाही म्हणून त्याने आपला जावई हैदरखानाच्या हातून सदाशिवरावभाऊला मारण्याचे षडयंत्र रचले. भाऊचा मुक्काम २८आॕक्टोबर १७५९ रोजी पुण्याजवळील वानवडीच्या सैन्य छावणीत असताना, संध्याकाळी भाऊ बेसावध बसलेले असताना हैदरखानाने त्यांच्या पाठीवर जंबियाने जोराचा वार केला परंतु तेथे असलेल्या नागोजी गुजर या सैनिकाने त्वरित हैदरचा हात पकडला आणि संभाव्य मोठी दुर्घटना टळली. निजामअलीच्या सल्ल्याने मुझफ्फरने हा कट रचल्याचे हैदरने कबूल केले परंतु मुझफ्फरने आपला गुन्हा नाकबूल केला. हैदरखानाला फाशी देण्यात आली तर त्याच्या कुटुंबाला कैदेत ठेवण्यात आले.
मराठ्यांचे सैन्य पूर्वी निजामशाहीचे सत्ताकेंद्र असलेल्या अहमदनगरला पोहोचले.अहमदनगर किल्ल्याचा किल्लेदार कवीजंग यांस मराठ्यांनी लाच दिल्याने एकहि गोळी न झाडता किल्ल्याचा मराठ्यांना ताबा मिळाला आणि किल्ला आपल्या ताब्यातून गेल्याने निजामाला खूप त्रास झाला. निजामअली आणि सलाबतजंग चाळीस हजारांनी सेना घेऊन मराठा सैन्याला रोकण्यासाठी बीदरहून निघाले तर अहमदनगरहून सदाशिवरावभाऊ, नानासाहेब पेशव्यांचा जेष्ठ पुत्र विश्वासराव, बळवंतराव मेहेंदळे, विसाजी कृष्ण बिनीवाले आणि गोपाळराव पटवर्धन हे आपापल्या सैन्यासह उदगीरच्या दिशेने निघाले. उदगीरच्या वाटेवर असताना भाऊंनी श्रीगोंद्यानजीक असलेला पांडे-पेडगांवचा बहादुरगड ऊर्फ धर्मवीरगड जिंकून घेतला. निजामबंधूंनी आपल्या सैन्याची विभागणी करून काही सैन्य धारूर किल्ल्याकडे पाठविले तर स्वतःबरोबर सैन्यदळ घेऊन मंदगतीने अवजड तोफखान्यासह उदगीरला पोहोचला. निजामाची छावणी उदगीराला असताना त्याच्या छावणीला मराठ्यांनी वेढा टाकला. मराठा सैन्याच्या घोडदळ व पायदळाने वेढा इतका पक्का केला होता की त्यातून कोणीही बाहेर पडू शकत नव्हते. निजामाचा सामना कराण्यासाठी इब्राहिमखानाचा तोफखाना सज्ज झाला होता. युरोपियन पद्धतीप्रमाणे सैन्याची चौकोनी अथवा गोलाकार रचना करून वेढ्यातून बाहेर पडायचे हा एकमेव पर्याय निजामापुढे होता. निजामाने आपल्या तोफखान्याच्या मदतीने किल्ले धारूरच्या दिशेने जाण्यास सुरवात केली परंतु मराठ्यांनी चारी बाजूंनी जोरदार हल्ले सुरू केले. निजाम हळूहळू धारूरच्या दिशेने पुढे सरकत असताना भाऊंनी त्याच्या पिछाडीच्या चौकोनी कमकुवत भागावर सैन्याला हल्ला करण्याचे आदेश दिले. दि.१९ व २० जानेवारी १७६० या दोन दिवसांत तुंबळ युद्ध झाले. निजाम सैन्याच्या उजव्या फळीची मराठ्यांनी वाताहत केली व धारूर येथून ४० मैल अंतरावर होते. लातूरच्या दक्षिणेस असलेल्या औसा येथे निजामाला मराठ्यांनी पूर्णपणे घेरल्याने त्याची हालचाल पूर्णपणे बंद झाली. निजामाकडील दाणागोटा संपल्यामुळे त्याची फार दुर्दशा झाली आणि ३ फेब्रुवारी १७६० रोजी तो मराठ्यांना शरण आला. मराठे व निजाम यांच्यात तह होऊन युद्ध समाप्ति झाली. उदगीरच्या तहाने निजामाला पेशव्यांच्या मर्जीत रहावे लागणार होते, तसेच विजापूर आणि औरंगाबाद ही शहरे, अशीरगड, बु-हाणपूर आणि मुल्हेर हे किल्ले व ६० लाखांचा मुलूख पेशवाईस मिळाला. निजामाला या तहाने त्याच्या राज्याचा निम्मा भाग मराठ्यांना द्यावा लागला तर दौलताबादच्या किल्ल्याचा ताबा मराठ्यांना ताबडतोब मिळाला. उदगीरच्या यशाने सदाशिवरावभाऊला सेनापति म्हणून हिंदुस्थानभर प्रसिद्धी मिळाली आणि पानिपतच्या मोहिमेची जबाबदारी देखील मिळाली. उदगीर शहरात पोहोचल्यावर दक्षिणेस असलेल्या रस्त्याने पुढे गेल्यावर एका चौकात मधोमध एक दुमजली दगडी बांधकामातील "चौबारा" ही इस्लामी स्थापत्यशैलीची इमारत लागते. या इमारतीत तळाशी चहुबाजूने लहान लहान दुकाने असून वरील माळ्यावर पोलीस चौकी आहे. तेथून उत्तरेस काही अंतरावर किल्ल्या परिसरात प्रवेश करण्याची नवीन कमान बांधलेली आहे, व कमानीतून पुढे गेल्यावर समोर इतिहासाचा वारसा सांगणाऱ्या किल्ल्याचे सुखद दर्शन होते. समोरचे विलोभनीय दृश्य पाहतानाच आपल्या उजव्या बाजूस खंदकाच्या अलिकडे विशाल दगडी बांधकामातील दरवाजाचे दर्शन होते मात्र तटबंदी राहिलेली नाही. खंदकाच्या अलिकडे देखील किल्ल्याच्या सुरक्षितेसाठी मोठी तटबंदी असल्याचे काही अवशेष दिसून येतात तर पूर्वीच्याकाळी जलवाहिनेस असलेल्या उसासा प्रमाणे दिसणारा क्षतिग्रस्त एक उसासा दिसून येतो. उदगीरचा हा भुईकोट किल्ला असला तरी याच्या तीनहि बाजूंनी नैसर्गिक असलेल्या खोल द-या आहेत व मुख्य दरवाजाचे बाजूने चाळीस फूट खोलीचा व वीस फूटाच्या रुंदीचा खंदक होता. दोन्ही बाजूंनी दगडी बांधकाम केलेल्या खंदकात पाणी सोडलेले असायचे व मुख्य दरवाजाकडे जाण्यासाठी खंदकावर अस्थायी लाकडी पूल होता. हा पूल सूर्वोदयापासून सूर्यास्तापर्यंत हा खंदकावरून ये-जा करण्यासाठी ठेवला जायचा व संध्याकाळी किल्ल्याच्या तटबंदीजवळ उभा करून ठेवला जायचा. युद्धकाळात परिस्थितीनुसार कधीहि हा पूल काढला किंवा टाकला जात असे. आजमात्र समोरचा खंदक पाण्याऐवजी मातीने भरून गेला आहे व तेथे लहान दगडी पुल बांधला आहे, त्यामुळे आपण सहजच किल्ल्याच्या मुख्य दरवाजापर्यंत जाऊ शकतो. खंदकाच्या दोन्ही बाजूंनी केलेले दगडी बांधकाम जवळजवळ नष्ट झालेले आहे. किल्ल्याच्या उजव्या बाजूला चांदणी नावाचा बुरूज असून त्याच्या बाहेरील अंगास भव्य शरभ व हत्तीच्या झुंजीचे शिल्प कोरलेले आहे तसेच डाव्या बाजूच्या अंधारी बुरूजाच्या बाहेरील बाजूस देखील अशीच शिल्पे कोरलेली आहेत. संपूर्ण तटबंदीत शत्रू सैन्यावर मारा करण्यासाठी चर्या ठेवलेल्या आहेत तर प्रत्येक बुरूजाला व तटबंदीला सुरेख, भक्कम व कलात्मक सज्जे आहेत. आतील बाजूस असलेल्या बुरूजाच्या बाहेरील भागात एका हत्तीचे शिल्प कोरलेले आहे. उत्तरेकडील सुमारे ७० फूट उंचीची व बारा बुरूजांची तटबंदीतील दोन भव्य बुरूजांच्या मध्यभागी असलेला पहिला लोहबंदी दरवाजा आहे. हा दरवाजा १४ फूट उंच, ७•५ रुंद व सहा कमानीचा आहे व तो ओलांडून गेल्यावर आतील परकोटाची क्षतिग्रस्थ तटबंदी आहे. किल्ल्याच्या डाव्या बाजूने दोन्ही तटबंदीतील मोकळ्या चिंचोळ्या जागेतून उदगीर महाराजांच्या मठाकडे जाणारा रस्ता आहे तर उजव्या बाजूस दोन भव्य बुरूजांमधे पूर्वाभिमुख दुसरा दरवाजा आहे. या मार्गाने पुढे गेल्यावर परकोटातील बुरूजावर जाण्याचा रस्ता असून त्या बुरूजावर एक फार्सीभाषेतील शिलालेख आहे. उदगीर महाराजांचा मठ हा काळ्या कातळात खोदून करण्यात आलेला आहे. जवळ एक विहीर आहे तर मठासमोरच चौकोनी पाण्याचे टाके आहे. अंधारी बुरूज व मठा दरम्यान तटबंदीतील भुयारात किल्ल्याचा चोर दरवाजा आहे.
उदागीर महाराजांचा मठ पाहून आपण परत दुसऱ्या दरवाजापाशी येतो. हा दरवाजा १४ फूट उंच व ७•५ फूट रुंद आहे. या दरवाजाचे वेगळे वैशिष्ट्य हे आहे की, दरवाजाशेजारीच असलेली दगडी परवाना खिडकी व परवाना देणाऱ्या व्यक्तिस हवा व उजेड मिळावा म्हणून बसविलेले दगडी जाळीचे गवाक्ष. पूर्वीच्याकाळी आलेल्या अभ्यंगताच्या कागदपत्रांची छाननी करून परवाना देण्यासाठी व कागदपत्रे घेण्यासाठी असलेली अर्धगोलाकार खाच ठेवलेली आहे. या दरवाजातून आत प्रवेश केल्यावर दोन्ही बाजूला असलेल्या प्रशस्त देवड्या पाहत तिसरा पूर्वाभिमुख व चौथा दक्षिणाभिमुख दरवाजा ओलांडून आपण जातो. किल्ल्यात पोहोचल्यावर उजव्या बाजूच्या चांदणी बुरूजावर जाणाऱ्या पायरी मार्गाने आपण बुरूजावर पोहोचतो. संपूर्ण उदगीर शहर नजरेच्या टप्प्यात येते. येथून आपण उतरताना पाच कमानींच्या इमारतीत येतो. येथे हिसाम उल्लाखान याने लिहलेला फार्सी शिलालेख आहे. त्यानंतर डाव्या बाजूच्या अंधारी किंवा तेलीण बुरूजावर चढून जातो. या अष्कोनी भव्य बुरूजावर एक पंचधातूची तोफ पाहून दरवाजाच्या कमानीवरील भागात पोहोचता येते. पंचधातूची तोफ सुमारे ८ फूट लांबीची असून तिच्या तोडावर मकर व मागील बाजूस सूर्यमुख कोरलेले आहे. जवळच्या कमानीवरील तटबंदीवर एका हौदाची रचना व त्यातील पाणी खाली वाहून नेण्यासाठी असलेल्या खापरी जलवाहिकेचे अवशेष दिसून येतात. पुन्हा खाली आल्यावर डाव्या बाजूला रंगमहल व त्याच्या समोरच उत्तराभिमुख दरबाराची वास्तू असून या इमारतीच्या छताला व भिंतीत हि-याच्या आकाराचे नक्षी केलेली आहे. ही इमारत पाहून तसेच पुढे गेल्यावर वाटेत असलेले पाण्याचे हौद पहात आपण टेहळणी बुरूजावर येतो. या बुरजाच्या खालील बाजूस रंग महलची पाच कमानी व पंधरा खांबावर असलेली हवेली आहे. उत्तरेच्या तटबंदी लगत दक्षिणाभिमुखी दुमजली खास महल आहे, यास बेगम महल म्हणतात कारण सम्स उन्निसा बेगम हीच्यासाठी हा बांधण्यात आला होता. या महलाशेजारीच कबुतरखाना आहे. याच्यासमोर एक कारंजे असून मोकळ्या जागेत अष्टकोनी पायऱ्यांची विहीर आहे. किल्ल्याच्या मध्यवर्ती ठिकाणी विशाल असे धान्य कोठाराची इमारत आहे. जवळच नर्तकी महल, मशीद, घोड्याचा तबेला, स्नानगृह अशा अनेक इमारती या किल्ल्यात आहेत. पाण्याचे वेगवेगळ्या आकारातील हौद, कारंजे हे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. एक डोळ्याच्या आकाराचे कलात्मक दगडी कारंजे व मशीदीसमोर कमलपुष्प आकाराचा असलेल्या हौद विशेष प्रेक्षणीय आहेत. संपूर्ण किल्ल्यात पाणी खेळवले असून अनेक कबुतरखाने या किल्ल्यात आहेत. अनेक ठिकाणी फार्सीतील शिलालेख आहेत.
इस्लामीशैलींतील वास्तूरचना असलेल्या उदगीर किल्ल्याशी मराठशाहीतील योद्धा सदाशिवरावभाऊ यांच्या विजयाच्या स्मृति जागृत करतो. मराठवाड्यात उन्हाळा तीव्र असतो तेव्हा येथील किल्ल्यांना भेट देण्यासाठी पावसाळा किंवा हिवाळा हे उत्तम ऋतू आहेत. मराठवाड्यातील लोकजीवन, भाषाशैली व खाद्यसंस्कृति याचा अनुभव घेण्यासाठी या भुईकोटास नक्कीच एकदा भेट दिली पाहिजे. पुणे, सोलापूर, उमरगा, निलंगा, लातूर इत्यादी ठिकाणाहून सर्व प्रकारच्या बसेसची व्यवस्था आहे. उदगीर येथे राहण्याची व भोजनाची सोय होऊ शकते तेव्हा कधी निघताय किल्ले उदगीर पाहायला ?
सुरेश नारायण शिंदे, भोर
shindesn16@gmail.com

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...