विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 1 January 2024

चौबारा, उदगीर

 


चौबारा, उदगीर
लातूर जिल्ह्यात औसा व उदगीर हे दोन भुईकोट किल्ले आहेत. त्यापैकी उदगीरचा भुईकोट हा निजाम व मराठे यांच्यात झालेल्या लढाईमुळे सर्वज्ञात झाला आहे. पेशवे सदाशिवराभाऊ यांच्या नेतृत्वाखाली उदगीरच्या लढाईत मराठ्यांनी यश संपादले होते आणि म्हणूनच पानिपत मोहीमेची जबाबदारी नानासाहेब पेशव्यांनी सदाशिवरावभाऊवर सोपविली. या लढाईत पहिल्यांदा मराठ्यांच्या सेनेत इब्राहिमखान गादडीच्या तोफखान्याने आपले कसब सिद्ध केले.
या उदगीरच्या किल्ल्याकडे उदगीर गावातून जाताना एका चौकात मध्यवर्ती ठिकाणी ही निजामशाहीतील वास्तू लक्ष वेधून घेते. या इमारतीस "चौबारा" नावाने ओळखतात. दुमजली इमारतीत तळमजल्यावर गोलाकार सहा कमानींची व्यावसायिक दुकाने तर वरच्या मजल्यावर पोलीस चौकी आहे. वरच्या मजल्यास देखील गोलाकार सहा जाळीदार कमानी आहेत. चौबारा शब्दातील चौ म्हणजे चौक व बारा म्हणजे दोन्ही मजल्यावरील मिळून असलेल्या बारा कमानी असा असावा. शिरुर तालुक्यातील मलठण येथे सरदार पवारांचा पेशवेकालीन ऐतिहासिक वाडा आहे. या वाड्यातील पाण्याची गरज भागविण्यासाठी तत्कालीन गोलाकार बारव आहे, तिला " बारादरी" हे नाव आहे कारण बारवेच्या अंतर्गत भागात वरच्या गोलाकार भागात सहा दालने व त्याच्याखाली तशीच सहा दालने अशी आहेत. दोन्ही ठिकाणी बारा हा संख्यावाचक शब्द समानता आली म्हणून लेखप्रपंच !
( प्रकाशचित्र - श्री.आनंद शंकर गोसावी सर )

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...