रावरंभा निंबाळकर
भाग १
लेखन :सुरेश नारायण शिंदे
छत्रपति शिवाजी महाराजांचे मेव्हुणे बजाजी नाईक निंबाळकर यांना विजापूरच्या बादशाहाने बळजरीने मुस्लिम धर्म स्वीकारायला भाग पाडले होते. बजाजीला फलटणची जहागीरी देऊन बादशाहाने त्यांची रवानगी फलटण येथे केली. एक हिंदू सरदार मुसलमान झाल्याने समाज नाराज होता तर बजाजीला देखील उपरती झाली होती. बजाजी पुन्हा हिंदू धर्मात येण्याची इच्छा उत्पन्न झाली व छत्रपति शिवाजी महाराज व मातोश्री जिजाऊबाईसाहेब यांनी देखील सामाजिक व राजकीयदृष्ट्या हिंदू धर्मात घेण्याचे योग्य वाटल्याने शिंगणापूरच्या शंभू महादेवासमोर प्रायश्चितविधी करून शुद्ध करून पुन्हा हिंदूधर्मात घेतले. त्यानंतर बजाजी नाईक निंबाळकरांची मराठा सरदारांच्या मुलींशी दोन लग्ने झाली. बजाजींना गोरखोजी, महादजी, वणगोजी व मुधोजी असे एकूण चार पुत्र झाले परंतु काही मराठे बजाजीला मनापासून स्वीकारीत नव्हती. मराठे मंडळीच्या मनातील किंतु दूर करण्यासाठी छत्रपति शिवाजी महाराजांनी आपली कन्या सकूबाई हिचा विवाह सदर बजाजींचा दुसरा मुलगा महादजी याचेबरोबर लावून दिला. छत्रपतिंनी महादजीस वाल्हे हा गाव इनाम देखील दिला. महादजींनी छत्रपतिंच्या स्वराज्याच्या लष्करी सेवेत राहून अधिकारी पदाला पोहोचले. महादजींचे स्वराज्यस्थापनेत उत्कृष्ट सहाय्य झाले. छत्रपति संभाजी महाराजांना मोगलांनी कैद करण्यापूर्वीच महादजी हे मोगलांचे हाती लागले. महादजी व त्यांची पत्नि यांना औरंगजेबाने ग्वाल्हेरच्या किल्ल्यात कैदेत ठेवले व तेथेच त्यांचे सन १६८ -८६ मधे कैदेत असतानाच निधन झाले. महादजी नाईक निंबाळकरांना औरस अशी संतती नव्हती मात्र रंभाजी नावाचा दासीपुत्र होता.
रंभाजी नाईक निंबाळकर औरंगजेबाच्या सन १७०७ मधे झालेल्या मृत्यूनंतर शाहू महाराजांच्या सुटकेनंतर असणाऱ्या पहिल्या फळीतील लढवय्ये सरदार होते. थोरल्या शाहू महाराजांच्या सुरूवातीच्या कालखंडात त्यांनी याच महादजीच्या मुलाला रंभाजीला पाच हजार स्वारांची मनसब दिली होती. इ.स.१७०९ मधे शाहू महाराज चंदनवंदन किल्ल्यावर असताना चंद्रसेन जाधव,रंभाजी, राजजी थोरात व मानाजी इत्यादी सरदार त्यांना भेटले. शाहू महाराजांनी भेट म्हणून रंभाजी व मानाजी यांना पोषाख व शिरपाव दिले व राजजी थोरतांना वर भेटीसाठी आणण्याची आज्ञा केली. हा सर्व प्रकार मानाजी आवडला नाही म्हणून ते किल्ल्यावरून पळून गेले तेव्हा महाराजांनी दोनशे घोडेस्वार पाठवून मानाजीचा हत्ती व सामान लुटून घेतले. तसेच राजजी व सुलतानजींना अटकेत ठेवले. दुसऱ्या दिवशी रंभाजीने शाहू महाराजांची भेट घेऊन सांगितले की, 'मला आपली सेवा पसंत नाही. ज्या सरदारांची समजूत घालून मी आपलेपाशी आणिले त्यांना आपण लुटून घेतले हे योग्य की काय ? त्यानंतर महाराजांनी त्यांना सोडून दिले व घेतलेला सरंजाम परत केला. ही घटना रंभाजीने कायम मनात ठेवली होती. पुन्हा ते काहीकाळ ताराराणी पक्षास सामील झाले परंतु बंडखोर वृत्तीचे रंभाजी फार काळ तेथे देखील राहिले नाहीत. स्वराज्याच्या अतंर्गत गृहकलहाने कोल्हापूर व सातारा गादी अशी विभागणी झाली होती. स्वराज्यासाठी प्राणपणाने मराठा सरदारांची विभागणी काही सरदार ताराराणी, तर काही सरदार छ.शाहू यांच्या पक्षास मिळाली. छ.शाहू महाराजांचे स्वराज्य म्हणजे दिल्लीपति मोगल बादशाहाच्या सरदेशमुखी व चौथाईच्या मिळालेल्या सनदावर आधारित होते, याचा दुसरा अर्थ असा की मोगलांचे अंकीत असा होता. छ.शाहू महाराज व ताराराणी या दोन्ही पक्षास न जुमानता स्वतंत्र बंडखोर वृत्तीने वर्तन करण्याची भावना काही सरदारांमधे वाढीस लागली आणि कोणत्याही क्षणी कोणताहि पक्षघरावा वा सोडावा अशी विचारसरणी वाढीस लागली. यातूनच नेमाजी शिंदे व रंभाजी निंबाळकर हे निमाजामाकडे गेले.
No comments:
Post a Comment