विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 1 January 2024

शूर ताकदवर मराठा रावरंभा निंबाळकर भाग २

 



शूर ताकदवर मराठा
रावरंभा निंबाळकर
भाग २
लेखन :सुरेश नारायण शिंदे
पुढे १६ डिसेंबर १७१० मधे रंभाजी निंबाळकर मोगल सुभेदार दाऊदखान पन्नी यांस औरंगाबाद येथे भेटले. खानाला अतिशय आनंद झाला कारण पराक्रमी मराठा सरदार त्याच्याकडे आल्याने छ. शाहू पक्ष काहीसा कमकुवत होणार होता आणि मोगलांना तर हेच अपेक्षित होते. खानाने रंभाजीचा सत्कार करून आपल्या पदरी ठेवले कारण रंभाजीबरोबर स्वतःचे चार हजार स्वार व चार हजार पायदळ होते. दाऊदखानाने बादशाहाचा हुकूम आणून रंभाजीची नियुक्ती अहमदनगरचा फौजदार म्हणून केली. पुणे ही शिवकाळापासून स्वराज्याचा अविभाज्य भाग होता व यावर पहिला हक्क शाहू महाराजांचा होता पण लोधीखानाच्या मृत्यूनंतर दाऊदखानाच्या शिफारशीवरून बादशाहाने पुण्याची जागीर रंभाजीस देऊन टाकली. रंभाजी निंबाळकराने बाजी कदम व गुंडाजी नाईक शेकदार ह्यांस पुण्याचे कारभारी म्हणून नियुक्त केले. शाहू महाराजांनी हा प्रांत आपल्या ताब्यात घेण्याचा हुकूम पेशवे बाळाजी विश्वनाथ यांना केला. बाळाजीने पुण्याची चौथाई वसूल करण्यासाठी व्यंकोजी ढमढेरे यांना पाठविले असता रंभाजी म्हणाला," आम्ही मराठ्यांना चौथाई देणार नाही. " इ.स.१७१५ मधे त्र्यंबकजी ढमढेरे यांनी सुमारे सात वर्षे पुण्यावर अमल असलेल्या रंभाजी हाकलून लावले.छ.शाहू महाराजांनी रंभाजीस स्वराज्यात आणण्याची खटपट अयशस्वी झाल्यावर सेनापति खंडेराव दाभाडेंना त्यांच्यावर पाठविले. २ एप्रिल १७१६ मधे रंभाजी व खंडेराव दाभाडे यांच्यात युद्ध झाले त्यात रंभाजीचा जेष्ठ पुत्र खंडेराव निंबाळकर मारला गेला व रंभाजी निंबाळकरांचा दणदणीत पराभव झाला तर रंभाजीचा पुण्याचा अंमलदार असलेला बाजी कदम पेशव्यांच्या सेवेत दाखल झाला. पेशवे बाळाजी विश्वनाथच्या उच्छेद झाल्यामुळे चंद्रसेन जाधव ताराराणीचा पक्ष सोडून मोगल सुभेदार निजाम उल्मुल्क याच्या आश्रयास गेला तेव्हा त्याच्या स्वागतास रंभाजी निंबाळकर देखील होते. रंभाजीची पुण्याची जागीर त्यांच्या हातातून गेल्यावर निजामाने करमाळा, परांडा व माढा परगण्याची जागीर दिली. निजामाने रंभाजीस " रावरंभा" असा किताब देऊन सन्मान केला.इ.स.१७२४ मधे निजामउल्मुल्क व मुजारिबखान यांच्यात साखरखर्डा येथे झालेल्या रणसंग्राम झाला होता त्यात रावरंभा हे निजामाकडून सहभागी होते तर छ.शाहू महाराजांच्या आज्ञेने थोरले बाजीराव पेशवे हे देखील निजामाच्या पक्षाकडून युद्धात सहभागी होते. या युद्धातील विजयाने निजामाचे दक्षिणेतील स्थान स्थिर झाले. पराक्रमी रावरंभाजीवर निजामाची विशेष मर्जी होती.
त्यानंतरचा रावरंभाजी कालखंड काहीसा स्थिरतेत गेला कारण त्यांचा दुसरा मुलगा जानोजीराव निंबाळकर आपल्या कर्तृत्वाने वडिलांचा वारसा सक्षमपणे सांभाळू लागला होता. रावरंभाजी हे तुळजापूरच्या क्षात्रतेजस्विनी तुळजाभवानीचे निस्सिम भक्त होते. त्यांनी करमाळा जवळच तुळजाभवानी भव्य कलात्मक मुख्य मंदिर निर्माण केले तर त्यांच्या मुलाने म्हणजे जानोजीने ओव-या व इतर बांधकाम करून आजचे भव्य परिसर निर्माण केलेला आहे. येथील आदिशक्तिला " श्री कमलादेवी " या नावाने संबोधण्यात येते. या देवीच्या प्रचलित असलेल्या एका आरतीची रचना स्वतः रावरंभाजी सारख्या सरदाराने केलेली आहे, आणि यातूनच त्यांची श्री कमलादेवीवर किती नितांत श्रद्धा व भक्ति होती होती हे अधोरेखित होते. तसेच करमाळा येथे सुरक्षित वास्तव्यासाठी एक भुईकोट किल्ला बांधण्यास सुरूवात केली होती, तो किल्ला बांधकाम रावरंभाजीचे पुत्र जानोजीराव निंबाळकर यांनी त्यांच्या कालखंडात पूर्ण केले. याशिवाय त्यांनी सुरवातीच्या कालखंडात माढा येथे एक प्रचंड मोठा वाडा बांधला होता व रोपाळे ता.माढा येथे एक विशाल वाडा आणि गढी यांची उभारणी त्यांनी केली होती. निजामाच्या सेवेत असताना काही काळ औरंगाबाद येथे वास्तव्य होते तेव्हा तेथे रावरंभाजीने एक हवेली बांधली होती. तसेच करमळा गावाला जे करमळा हे नाव ज्या सूफी संत करमे मौलामुळे प्राप्त झाले त्याचा दर्गा देखील बांधला आहे. रावरंभाजीचा शेवटचा कालखंड करमळा येथेच गेला. इ.स.१७३६ मधे करमळा येथे त्यांची जीवनज्योत मालवली.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...