विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 1 January 2024

शूर ताकदवर मराठा रावरंभा निंबाळकर भाग ३

 




शूर ताकदवर मराठा
रावरंभा निंबाळकर
भाग ३
जानोजीराव निंबाळकर
त्यानंतर बापाप्रमाणे बंडखोर प्रवृत्तीच्या जानोजीराव निंबाळकर हे वारसा हक्काने व कर्तृत्वाने त्या भागाचा जाहगिरदार झाला.जानोजीची संपूर्ण हयात निजामाच्या सेवेतच गेली. निजाम व मराठे यांच्या संबंधात दुवा म्हणून जानोजीने व पेशवाईतील साडेतीन शहाणेपैंकी एक असलेल्या विठ्ठल सुंदरने वेळोवेळी सामंजस्याची व वाटाघाटीची जबाबदारी सांभाळली आहे. पेशवा थोरले बाजीराव, पेशवा नानासाहेब व चिमाजी अप्पा यांच्याशी जानोजींचे स्नेहपूर्ण संबंध होते. इ.स.१७३५ मधे निजामाने त्यांना कर्नाटक मोहीमेवर पाठविले असताना कित्तूर प्रांतातील अनेक गावांची लूटपाट करून दोन लक्ष रुपये प्राप्त केल्यामुळे निजाम त्यांचेवर विशेष खूश झाला. इ.स.१७३८ मधे जानोजीने चाकण व खेड भागात मोठा हैदोस घातला होता म्हणून पेशवा नानासाहेब यांनी त्यांची तक्रार थोरले बाजीराव पेशवे यांच्याकडे करून, जानोजीस शासन करावे अशी विनंती केली होती. इ.स.१७३९ मधे जानोजींचे सैन्य डेरा देऊन तापी नदीच्या काठावरील जैनाबादेला येथे असताना स्वतः निजाम तेथे पोहोचला व जानोजीस नौबतीचा मान बहाल केला. यानंतरच्या कालखंडात तो अर्जुनबहाद्दर जानोजी निंबाळकर म्हणून नावलौकिकास आले. ते इ.स.१७४० -४३ दरम्यान रघूजी भोसलेबरोबर त्रिचनापल्लीस गेले असताना तिकडील शिल्पकलेच्या अप्रतिम सौंदयाने नटलेली अनेक मंदिरे त्यांच्या दृष्टीस पडली. अशाप्रकारेची मंदिरे आपल्या जहागिरीत निर्माण करण्यासाठी तेथील स्थानिक कलाकार आपल्यासोबत आणले. आपल्या वडिलांनी बांधलेल्या श्रीकमलादेवी मंदिराची गोपूरे व इतर बांधकाम दाक्षिण्यात्य कसबी कारागीरांकडून करून घेतले. जानोजी व मराठे यांच्यात कधी स्नेहाचे तर कधी संघर्षाचे अनेक प्रसंग आले. गाजीउद्दीनच्या १६ आॕक्टोबर १७५२ मधे विषबाधेने झालेल्या मृत्यूत जानोजी नक्कीच हात असला पाहिजे असे वाटल्याने निजाम जानोजीवर कायमचाच नाराज झाला. जानोजीचे वास्तव्य मुख्यत्वे करून करमाळा, परांडा व हैद्राबाद येथे असे. करमाळा येथे रावरंभाजीने किल्ला बांधण्याचा जो संकल्प केला होता तो जानोजीने त्यांच्या हयातीत पूर्ण करून करमाळ्याला भुईकोट किल्ला निर्माण केला. इ.स.१७६३ मधे ते राक्षसभुवनच्या लढाईच्या मोहीमेवर निजामाबरोबर असताना आजारपणामुळे युद्धाच्या आदल्या दिवशीच निधन झाले. निजाम व मराठे यांच्या इतिहासातील बंडखोर व वादली व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्या आड झाले.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...