छत्रपती जंगली महाराज (सातारा कर) यांची जयंती महाराष्ट्रात प्रथमच साजरी
१२जानेवारी
राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब यांची जयंती व
मराठा साम्राज्य विस्तारक छत्रपती शाहू महाराज यांचा राज्याभिषेक दिन निमित्त यांना त्रिवार मानाचा मुजरा...!
३. आजच्याच दिवशी सन १८४० ला खान्देश च्या पुढे जंगलात काशीच्या वाटेवर सांगवी मुक्कामी जन्म झाला स्वराज्याच्या छत्रपतींचा... छत्रपती प्रतापसिंह महाराज यांचे दत्तक पुत्र श्रीमंत छत्रपती त्रिंबकजी उर्फ शाहू (शहाजी) उर्फ जंगली महाराज यांचा. श्रीमंत छत्रपती शाहू (शहाजी) उर्फ जंगली महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा...!
हे जंगली महाराज अध्यात्मिक क्षेत्रातील नावाजलेले जंगली महाराज नाहीत. तर श्रीमंत जंगली महाराज म्हणजे स्वराज्याचे छत्रपती शाहू महाराज धाकटे यांचे लहान बंधू, स्वराज्यासाठी, छत्रपतींसाठी पराक्रमाची पराकाष्ठा करणारे स्वराज्याचे सेनापती श्रीमंत चतुरसिंग राजे भोसले वावीकर यांचे नातू . श्रीमंत चतुरसिंग राजे भोसले यांचा वारसा समर्थपणे चालवणारे स्वराज्याचे सेनापती श्रीमंत बळवंतराव राजे भोसले यांचे चिरंजीव.
श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज यांनी ७ डिसेंबर १८३९ ला काशीला प्रयाण केले. तेव्हा त्यांच्यासोबत त्यांच्या दोन महाराणी, कन्या गोजराबाई साहेब, श्रीमंत बळवंतराव राजे सेनापती, त्यांची पत्नी गुणवंताबाई साहेब , सेनापतीचे काका - श्रीमंत छत्रपती शाहू महाराज धाकटे यांचे लहान बंधू श्रीमंत परशराम राजे भोसले वावीकर, महाराजांना मानणारे सर्व आप्तेष्ठ होते. या प्रवासात खान्देशात सांगवी मुक्कामी १२ जानेवारी १८४० रोजी श्रीमंत बळवंतराव राजे सेनापती यांची पत्नी गुणवंताबाई साहेब प्रसूत होऊन त्यांनी एका मुलाला जन्म दिला. त्याचे नाव त्रिंबकजी असे ठेवण्यात आले. जंगलात जन्म झाल्याने त्यांना जंगली महाराज हे नाव पडले. त्यांच्या जन्माचा कुठला उत्सव तर सोडा साधा आराम सुद्धा न करू देता इंग्रज अधिकाऱ्याने भोयांना पालखी उचलण्याचा इशारा केला. पालख्या काशीच्या दिशेने मार्गस्थ झाल्या.
श्रीमंत बळवंतराव राजे सेनापती यांना ताप येऊ लागला होता. इंग्रज अधिकाऱ्याने त्यांच्यावर कुठलाही औषधोपचार करू दिला नाही. ज्वर वाढत गेला. मुलगा झाल्यानंतर अवघ्या १५ दिवसांनी २७ जानेवारी १८४० ला स्वराज्याचे सेनापती आपल्या तान्ह्या मुलाला परकं करून, गुणवंताबाई साहेब यांना विधवा करून इहलोकी गेले. मध्य प्रदेशातील महू जवळील तिकुराई येथे स्वराज्याच्या सेनापतींचे श्रीमंत बळवंतराव राजे सेनापती उर्फ बाळासाहेब सेनापती यांचे निधन झाले. प्रबोधनकार ठाकरे आपल्या रंगो बापूजी आणि प्रतापसिंह महाराज या पुस्तकात बाळासाहेब सेनापती यांचे निधन आमांशाने म्हणजे अतिसाराने झाले आहे असं मांडले आहे.
२५ मार्च १८४० ला श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराजांचे सर्व लवाजम्यासह काशी नगरीत आगमन झाले. ऑक्टोबर १८४५ मध्ये श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराजांनी जंगली महाराज उर्फ त्रिंबकजी राजे यांना मेजर कारपेण्टरच्या समक्ष विधीपुर्वक दत्तक घेतले.१० आॕक्टोबर १८४५ च्या श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराजांनी मृत्युपत्रात लिहले की,” माझ्या दोन्ही राण्यांना पुत्र झाला नाही. सबब आमच्या हिंदुधर्माप्रमाणे मी माझे आप्त कै. बळवंतराव राजे भोसले यांचा पुत्र त्रिंबकजी राजेभोसले यास विधीपुर्वक दत्तक घेऊन त्याचे नाव शाहाजी असे ठेवले आहे. सदरहु त्रिंबकजी याच्या मातोश्री गुणवंताबाई हिची या दत्तक विधानाला संमती असुन तीला दुसरा मुलगा दत्तक घेण्याची आम्ही परवानगी दिलेली आहे. माझ्या मागे माझ्या राज्याचा खाजगी आणि सरकारी खजिना नि मालमत्तेचा, माझ्या पदव्यांचा आणि मी उपभोगलेल्या सर्व अधिकारांचा आणि सत्तेचा त्रिंबकजी हा कायदेशिर वारस समजण्यात यावा. विलायतेतल्या मोकादम्याचा निकाल माझ्या हयातीत लागला तर ठिकच. न लागल्यास तो आमचे दत्तकपुत्र शाहाजीराजे यांच्या नावाने पुढे चालवावा आणि ब्रिटीश सरकारने त्यांना न्याय द्यावा.” (मराठी रियासतीमध्ये दत्तकविधानाची तारीख २५ जानेवारी १८४७ आहे. )
त्रिंबकजी राजे यांचेच नाव शहाजी उर्फ शाहू महाराज झाले. या दत्तकविधानानंतर लगेचच गुणवंताबाई साहेब यांनी संताजी राजेभोसले शेडगावकर यांचे कनिष्ठ चिरंजीव तात्याबा यांस दत्तक घेऊन त्याचे नाव दुर्गासिंह ठेवले. श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराजांनी त्यांना दुर्गासिंह सेनापती असे संबोधले. त्यासोबतच श्रीमंत परशराम राजे भोसले वावीकर यांनी जानराव राजेभोसले शेडगावकर यांचे कनिष्ठ चिरंजीव जिजाबा यांस दत्तक घेतले.
दत्तकविधानानंतर काही दिवसांनी १४ ऑक्टोबर १८४७ ला स्वराज्याचे धनी छत्रपती प्रतापसिंह महाराजांचे दुःखद निधन झाले. महाराजांच्या निधनानंतर त्यांची कन्या गोजराबाईसाहेब यशवंतराव गुजर १३ जानेवारी १८५० ला साताऱ्यात आल्या. त्यानंतर अवघ्या तीन वर्षांनी ३० ऑगस्ट १८५३ ला त्यांचे दुःखद निधन झाले.
इसवी सन १८५४ मध्ये श्रीमंत जंगली महाराज, त्यांच्या मातोश्री राजसबाईसाहेब, जनकमता गुणवंताबाई, दुर्गासिंह सेनापती यांचे कृष्णा नदीच्या तीरावर मौजे आरले येथे आगमन झाले. त्यांच्या स्वागतासाठी मातोश्री सगुणाबाईसाहेब आणि व्यंकोजी राजे हे स्वतः आरले येथे जाऊन त्यांना सातारा शहरात घेऊन आले. आणि जुन्या वाड्यात राहू लागले.
इसवी सन १८५७ च्या सुरुवातीलाच इंग्रजांविरुद्ध जनमानसात असंतोष वाढू लागला होता. छत्रपती प्रतापसिंह महाराजांना पदच्युत करून त्यांची काशीला रवानगी केल्याने सातारकर मंडळी जास्त चिडलेली होती. त्यात छत्रपती प्रतापसिंह महाराजांचे चिरंजीव छत्रपती शहाजी उर्फ शाहू महाराज साताऱ्यात आल्याने सातारकर मंडळीत उत्साह संचारला होता. छत्रपती प्रतापसिंह महाराजांची बाजू इंग्लंड मध्ये मांडणारे रंगो बापूजी हेही साताऱ्यात दाखल झाले होते. त्यांच्या वाटाघाटी सुरु झाल्या होत्या. इंग्रज अधिकाऱ्यास ठार मारणार असल्याची बातमी साताऱ्यात पसरली. एके दिवशी छत्रपती शहाजी उर्फ शाहू महाराज आणि दुर्गासिंह सेनापती यांचे घोडे रात्रभर जीन घालून वाड्यापुढे सज्ज असल्याचे आढळले. साताऱ्यात इंग्रजांविरुद्ध उठाठेवी वाढू लागल्या होत्या. जुलै महिन्यात इंग्रजांनी धरपकड चालू केली. ८ सप्टेंबर १८५७ ला रंगो मापूजी यांच्या मुलाला पकडून फाशी देण्यात आली. त्यापूर्वीच ६ ऑगस्ट १८५७ ला छत्रपती शहाजी उर्फ शाहू महाराज, त्यांचे चुलते काकासाहेब, मातोश्री राजसबाईसाहेब, जनकमता गुणवंताबाई, दुर्गासिंह सेनापती यांना अटक करून मुंबई येथे बूचर बेटावर अलग अलग ठेवण्यात आले. डिसेंबर १८५७ ला Mr. Rose हे बूचर बेटावर जाऊन त्यांनी महाराजांना कारस्थानाचा कबुली देण्यासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केला. अर्थात तो प्रयत्न यशस्वी झाला नाही. छत्रपती शहाजी उर्फ शाहू महाराज अथवा इतर कुणीही कबुली दिली नाही.
मार्च १८५८ ला त्यांना कराचीला पाठवण्यात आले. त्यांना एकमेकांना भेटूही दिले जात नव्हते. त्यानंतर इतरांना काही काळानंतर सोडण्यात आले. छत्रपती शहाजी उर्फ शाहू महाराज आणि त्यांच्या पत्नी आनंदीबाईसाहेब याना जुलै १८८५ मध्ये सोडण्यात आले. परत आल्यांनतर छत्रपती शहाजी उर्फ शाहू महाराज आपल्या पत्नी समवेत पुण्यातील भवानी पेठेत घर क्र ५४३ येथे राहू लागले. तिथेच त्यांनी १ जून १८९२ ला आपला देह ठेवला. महाराजांनी त्यांच्या हयातीत ब्राम्हो समाजाची दीक्षा घेतली असल्याने त्यांचा अंत्यविधी त्याच पंथानुसार करण्यात आला.
आजही छत्रपती शहाजी उर्फ शाहू महाराज उर्फ जंगली महाराज यांची समाधी पुण्यातील भवानी पेठेत आहे. श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज यांचे लहान बंधू यांचे देखील नाव श्रीमंत छत्रपती शाहजी महाराज असल्याने गफलत करू नये. दोघांचा कार्यकाळ वेगळा आहे.
आजच्या १८३व्या जयंतीनिमित्त छत्रपती शहाजी उर्फ शाहू महाराज उर्फ जंगली महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा ...!
फोटो १. छत्रपती शहाजी उर्फ शाहू महाराज उर्फ जंगली महाराज यांच्या भवानी पेठेतील समाधीचा.
आज 12 जानेवारी योगायोगाने छत्रपती जंगली महाराज यांची जयंती असल्याची आठवण मला दुपारी दोन ते अडीचच्या दरम्यान झाले यामुळे पुढील वेळ आलेले वेळात आज कसेही करून छत्रपती जंगली महाराजांची जयंती त्यांच्या समाधीवर साजरी करण्याचा विचार मनात आला याप्रसंगी माननीय श्री बाभुळगावकर राजे भोसले धनंजय भोसले पाटील, शेरगावकर भोसले माननीय श्री विजयसिंह राजे भोसले (छत्रपती थोरले महाराज यांच्या राणी लक्ष्मीबाई ज्या छत्रपती शाहू महाराजांच्या मृत्यूनंतर सती गेल्या यांच्या पुत्र कुसाजीव येसाजी राजे भोसले वंशज)तसेच माननीय श्री रावसाहेब माने (नांदेडकर माने घराणे) यांच्या उपस्थितीत जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले यावेळी वरील तीनही मान्यवरांनी सदर समाधीच्या पूजनासाठी स्वखर्चाने पूजेचे साहित्य आणलं सदर समाधी ही ही स्वयंभू आहे म्हणून स्वखर्चाने पूजन करण्यात आले यावेळी मी स्वतः पण समाधी पूजन वेळी उपस्थित होते खरी तर अत्यंत गडबडीत माझ्या शब्दास मान देऊन वरील तिन्ही मान्यवरांनी उपस्थित राहिलं त्याबद्दल आपले शतशः महाराष्ट्र प्रथमच छत्रपती जंगलीमहाराज यांचे जयंती साजरी करण्याची भाग्य मला मिळाले याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजते तसेच भोसले घराण्याशी काय नाते आहे माहिती नाही पण..............धन्यवाद
राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य पुणे संस्थापक संतोष झिपरे ९०४९७६०९८८८
No comments:
Post a Comment