छत्रपती शिवाजी महाराज यांचे दुसरे पुत्र छत्रपती राजाराम महाराज यांचे पासून कोल्हापूर घराण्याचा वंशवृक्ष सुरू होतो .या घराण्यात छषत्रपती
राजाराम महाराज (दुसरे ) करवीर यांना पाटणकर घराण्यातून दत्तक घेण्यात आले.
नागोजीराव पाटणकर हे छत्रपती राजाराम महाराज या नावाने कोल्हापूरच्या गादीचे वारस झाले. त्यावेळी त्यांचे वय अवघे सोळा वर्षाचे होते .त्यांना ब्रिटिश सरकारकडून अधिकारनिदर्शक पोषाख व १७ तोफांची सलामी देण्यात आली.
ब्रिटिश गव्हर्नरने छत्रपती राजाराम महाराजांना कोल्हापूरच्या गादीवर बसवले. याची घोषणा दरबारात केली गेली. या अगोदर कोल्हापूरच्या गादीवर बसणाऱ्यांना छत्रपती राजाराम महाराजां इतका मान व वैभव मिळाले नव्हते आणि त्यांच्या इतकी जबाबदारीही कोणाच्या वर पडलेली नव्हती.
छत्रपती राजाराम महाराज गादीवर आल्यानंतर कोल्हापूरच्या राज्यकारभारात अंतर्गत वाद राहिले नाहीत. छत्रपती राजाराम महाराजांनी आपल्या हुशारीने आणि तारतम्याने सर्व परिस्थिती बदलून टाकली. शिक्षण मिळविण्यासाठी त्यांची जिज्ञासा ,राज्यकारभारातील बारीक-सारीक गोष्टी समजून घेण्याची त्यांची उत्कट इच्छा, नव्या परिस्थितीचे ज्ञान मिळविण्यासाठी त्यांनी केलेली धडपड ,पाश्चात्त्य रीतीरिवाज समजावून घेण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न हे सर्व पाहिले म्हणजे छत्रपती राजाराम महाराजांनी कोल्हापूर राज्याचे परावलंबित्व काढून टाकण्याची जिद्द धरली होती हे लक्षात येते.
अवघ्या चार वर्षाच्या छोट्याशा कारकिर्दीत ही त्यांनी आपल्या बुद्धीची चमक दाखविली .प्रजेच्या हितासाठी कळकळ व्यक्त केली, आणि राज्यकारभारात नव्या प्रथा आणण्याची तयारी केली.
अल्पशा काळातही त्यांनी स्वतः इंग्रजी भाषेचे ज्ञान मिळवले आणि कोल्हापुरात इंग्रजी भाषेचे शिक्षण मिळावे म्हणून शाळांच्या संस्थेत आणि संख्येत वाढ केली.
छत्रपती राजाराम गादीवर आल्यानंतर महाराजांच्या विद्या अभ्यासाची अधिक चांगली व्यवस्था करण्यात आली. महाराजांसाठी एक खास ट्युटर नेमण्यात आला .
इंग्रजी शिक्षण व तत्सम चालीरिती शिकविण्यासाठी वेस्ट नावाच्या इंग्रज अधिकार्याची नेमणूक करण्यात आली. त्यांच्या शिक्षणासाठी शहराबाहेर एक खास निवासस्थान बांधण्यात आले होते.
महाराज राजवाड्यात न राहता नव्या बंगल्यातच राहू लागले. छत्रपती राजाराम महाराजांची दोन लग्न झाली होती. पहिले लग्न मुधोजीराव नाईक निंबाळकर संस्थान( फलटण )यांच्या कन्येशी मार्च १८६७ मध्ये झाले. त्यानंतर याच वर्षाच्या अखेरीस गोपाळराव सरलष्कर यांच्या बहिणीशी महाराजांचे दुसरे लग्न झाले.
पहिल्या राणीचे नाव ताराबाई आणि दुसर्या राणीचे नाव सकवारबाई असे ठेवण्यात आले होते. छत्रपती राजाराम महाराजांचे शिक्षण व्यवस्थितपणे चालू झाले होते.त्यांना जात्याच वाचनाची आवड असल्यामुळे
इंग्रजी भाषेतील इतिहास, भूगोल आणि प्रवासवर्णने या विषयावरची त्यांनी बरीच पुस्तके वाचली.प्रवास विषयक पुस्तकांच्या वाचनामुळे आपणही इंग्लंडचा प्रवास करावा अशी इच्छा त्यांच्या मनात निर्माण झाली होती.
इंग्रजी वर्तमानपत्रे, साप्ताहिके आणि इतर नियतकालिके हे त्यांच्या वाचनात येऊ लागले. निरनिराळ्या देशात चालणाऱ्या घटनांची माहिती ते इंग्रज अधिकाऱ्यांशी चर्चा करून मिळवत असत .पाश्चात्त्य शिक्षण आणि चालीरीती प्रमाणे तिकडचे संगीत आणि नृत्य आत्मसात करण्याचा त्यांनी प्रयत्न केला.
छत्रपती राजाराम महाराज आठवड्यातून काही दिवस नियमितपणे न्यायालयात जाऊन दिवानी व फौजदारी कामे पहात असत.त्यानंतर त्यांनी मुलकी खात्याच्या कारभाराची पद्धत समजावून कोर्टात ज्यावेळी महत्त्वाचे खटले चालत असत त्यावेळी महाराज तेथे जाऊन मुद्दाम चौकशीचे कामकाज पाहत असत.छत्रपतींनी राज्याचे सर्व हिशेब एक खास दप्तरदार नेमून त्याच्याकडून पूर्ण करून घेतले .
जानेवारी १८७० मध्ये महाराजांकडे खासगीचे खाते देण्यात आले. खाजगी खात्याकडचे कारभाऱी सर्व कारभार महाराजांच्या हुकुमाने करू लागले. महाराजांनी राजवाड्या जवळील हायस्कूलच्या इमारतीचा पहिला दगड आपल्या हाताने बसवला व कोल्हापूर इलाख्यात शिक्षणाचा प्रसार सुरू झाला. लोकांच्या जुन्या समजुती नाहीशा होऊन विद्येचा प्रकाश सगळीकडे पडत जाईल तसतसे शिक्षणप्रसाराच्या कार्याला अधिक भर आणि दृढता येईल अशी महाराजांची भावना होती.
महाराजांनी कारभार आपल्या हाती घेतला त्यावेळी कोल्हापूर राज्यात सरकारी शाळा नव्हत्या. सर्वत्र अव्यवस्था होती. राज्यावर भलेमोठे कर्ज झाले म्हणून तेथे इंग्रज अधिकारी नेमले होते. त्यांना प्रथम राज्यातील बंड मोडून कारभारात चांगली शिस्त बसवावी लागली. खजिन्यात शिल्लक पडावी याकडे त्यांना लक्ष पुरवावे लागले होते.
कोल्हापूर राज्यात १८१४ साली चार मराठी शाळा स्थापन केल्या.त्याची संख्या पुढे १८ पर्यंत वाढत गेली. त्यापैकी चार शाळात इंग्रजी शिकवण्याचे वर्ग सुरू झाले. छत्रपती राजाराम महाराजांनी शिक्षण प्रसाराच्या दृष्टीने नेटाने प्रयत्न केले होते. ज्या इमारतीचा छत्रपती राजाराम महाराजांनी शुभारंभ केला त्या इमारती मुळे कोल्हापूर शहराला मोठी शोभा प्राप्त झाली होती विद्या वृद्धि हे किती महत्त्वाचे काम आहे हे छत्रपती राजाराम महाराजांना चांगलेच माहित होते.छत्रपती राजाराम महाराजांनी प्रोत्साहनपर अनेक शिष्यवृत्त्या सुरू केल्या.
ड्यूक ऑफ एडिंबरोच्या स्वागतसमारंभासाठी २१ फेब्रुवारी १८७० रोजी महाराज मुंबईला गेले. मुंबईत त्यावेळी या समारंभासाठी अनेक राजे व सरदार जमले होते. या सर्वांमध्ये इंग्रजी भाषा जाणणारे म्हणून छत्रपती राजाराम महाराजांचे खूप कौतुक झाले. महाराजांनी आपल्या विशिष्ट वागणुकीमुळे राजेरजवाड्यांमध्ये चांगलाच प्रभाव पाडला .
छत्रपती राजाराम महाराज २२ मे १८७० रोजी इंग्लंडच्या प्रवासाला निघाले .तेथे त्यांनी सुमारे पाच महिने मुक्काम केला .इतिहास प्रसिद्ध स्थळे, वस्तू संग्रहालय ,प्राणी संग्रहालय, रमणीय उद्याने ,कलापूर्ण वास्तू, ऐतिहासिक शस्त्रास्त्रे ,ग्रंथालय, विद्यापीठ ,सामाजिक संस्था ,कारखाने आणि ग्रामीण भाग अशा अनेक ठिकाणांना महाराजांनी भेटी देऊन त्यांची पाहणी केली ,आणि जरूर ती माहिती ही मिळवली.
या पाच महिन्यातील प्रत्येक दिवसाचा कार्यक्रम इंग्लिश मध्ये स्वहस्ते नोंदवून ठेवला .या दैनंदिनीला ऐतिहासिक वैशिष्ट्य प्राप्त झाले होते. लंडन सारख्या अतिशय संपन्न आणि आधुनिक शहरात महाराजांसारख्या तरुण राजाने ख्यालीखुशालीत न रममान होता नवे ज्ञान संपादन करण्याची उत्कटता दाखविली .असे एकमेव छत्रपती राजाराम महाराजांचे उदाहरण आहे .त्यांच्या मनाचा कल विद्या, कला ,शोध इत्यादीकडे किती उत्कटतेने व्यक्त होत होता हे दिसून येते. विद्वान माणसांना भेटणे राजकारणी आणि मुत्सद्दी यांच्याशी चर्चा करणे सामाजिक आणि शैक्षणिक संस्थांच्या चालकांचे विचारविनिमय करणे इत्यादी प्रयत्ना मागेही छत्रपती राजाराम महाराजांची ज्ञानप्रिय दृष्टी दिसून येते. तसेच प्रतिष्ठितपणा ,वागणुकीतील सौजन्य यांचाही प्रत्यय येतो .
छत्रपती राजाराम महाराज इंग्लंडमध्ये असताना २८ नोव्हेंबर रोजी सकाळी इटलीमध्ये आजारी पडले .व तारीख ३० नोव्हेंबर १८७० रोजी छत्रपती राजाराम महाराजांचा मृत्यू झाला .अर्णव नदीच्या काठी चितेवर ठेवून हिंदू धर्माच्या पद्धतीप्रमाणे त्यांना अग्नी देण्यात आला.
छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूची अनपेक्षित घटना इटलीकरांनाही अतिशय दुःखदायक वाटली.
परदेशाच्या प्रवासात ज्ञानप्राप्ती करून आपली भावी राजवट चांगली करण्याची स्वप्ने पाहणाऱ्या राजाच्या आयुष्याचा शेवट एवढ्या तरुण वयात व्हावा ही गोष्ट सर्वांच्या मनाला चुटपूट लावणारी ठरली. आचार आणि विचार अनुभव आणि महत्वकांक्षा शहाणपणा आणि सदिच्छा अशा विविध गुणांचे दर्शन महाराजांच्या जीवनात नुकतेच होऊ लागले होते आणि तेवढ्यात त्यांना मृत्यूने हिरावून नेले.
अशा या थोर ,समाजसुधारक छत्रपती राजाराममहाराज यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन आणि मानाचा मुजरा
लेखन
डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर
No comments:
Post a Comment