विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 13 February 2024

मस्तानी बाईसाहेब समाधी /कबर /मजार पाबळ , शिरूर

 




मस्तानी बाईसाहेब समाधी /कबर /मजार
पाबळ , शिरूर
lekhan :

Ganesh Uphade

इतिहासात कायमच बदनामीच्या झळा ज्या व्यक्तिमत्त्वाने सोसल्या, ज्यांच्या नावाचा वापर कायम उत्तेजीत, मादक अशा पदार्थांना, वस्तूंना, वास्तूंना, देण्याचं काम केलं गेलं ते एक अतिशय सालस आणि सोज्वळ अस व्यक्तिमत्व म्हणजे श्रीमंत मस्तानी बाईसाहेब बाजीराव बल्लाळ पेशवे.
------------------------
इतिहासात अनेक कर्तृत्ववान स्त्रिया होऊन गेल्या. कोणी सेनानी होत्या, कोणी राज्यकर्त्या होत्या तर कोणी राजकारणी तर कोणी कारस्थानी. १८व्या शतकात एक स्त्री होऊन गेली जीला तिच्या कर्तृत्वाने नाही तर नियतीने अगदी लक्ख काळोखात टाकले.
"मस्तानीबाईसाहेब" ज्यांना हा देश "मस्तानी" नावाने ओळखतो.
आजवर दुर्दैवाने तिला हिणवले गेले आणि नेहमी एका वेगळ्या आणि नीच नजरेने पाहिले गेले. इतिहास काय सांगतो ही एक बाजू. धर्म काय सांगतो ही दुसरी बाजू. आपल्या सोयीने धर्माची व्याख्या बदलून मस्तानीबाईसाहेबांकडे नेहमीच एका विचित्र द्वेषाने पाहिले गेले. एका कर्तृत्ववान पुरुषावर विश्वास ठेवून हजारो किलोमीटर दूर आपला प्रदेश सोडून आल्या. ना इथली भाषा माहीत होती ना इथली परंपरा तरीही त्यांनी इथे येऊन त्या सर्वांग बाजूने इथल्या झाल्या. विख्यात इतिहासकार रियासतकार सरदेसाई यांनी म्हटले आहे की, ".... मस्तानीबाईसाहेबांनी इथे कोणाचेही मन दुखावले नाही. त्यांनी यथावकाश मराठी भाषा शिकली व मराठी पद्धतीचा पेहराव केला...".
मस्तानीबाईसाहेब या अत्यंत हुशार होत्या. त्या उत्तम घोडेस्वार होत्या. त्या तलवार चालवित असत. त्या भालाफेकीत तरबेज होत्या. त्या बाजीरावांसोबत मोहिमेवर जात होत्या. त्या शुद्ध शाकाहारी होत्या व भगवान श्रीकृष्णाच्या भक्त होत्या. त्या छत्रसाल बुंदेला यांच्या कन्या होत्या (रखेली पासून झालेली कन्या, रखेल मुसलमान होती). आपला धर्म हा कोणत्याही मुलाला नेहमी बापाची जात व धर्म लावतो. अर्थात, मस्तानीबाईसाहेब मग हिंदूच. कारण त्यांचे वडील हे हिंदू राजपूत. पण बाजीरावांच्या कुटुंबियांनी मस्तानीबाईसाहेबांना नेहमी त्रास दिला कारण त्या मुसलमान होत्या. पुढे जाऊन समशेर बहाद्दर जे बाजीराव- मस्तानीबाईसाहेब यांचे पुत्र, एका चित्पावन हिंदू ब्राम्हण असलेल्या बाजीरावांचा पुत्र हा मुसलमान ठरला कारण त्याची आईला मुसलमान ठरवले गेले ते ही हिंदू असताना. हाच समशेर बहाद्दर शेवटपर्यंत लढला तो पेशव्यांच्यासाठीच.
नृत्य ही एक कला म्हणून पाहिले जात असताना मग मस्तानीबाईसाहेबांच्या बाबतीतच नर्तिका म्हणजे बाजारू बाई हा तर्क का काढला? हा प्रश्न त्या बिचाऱ्या शनिवार वाड्यालाच माहीत. ती केवळ नर्तिका होती यासाठी कित्येक दंतकथा सांगितल्या गेल्या. मस्तानीबाईसाहेबांचा जेवढा विरोध केला गेला तेवढाच प्रतिकार बाजीरावांनी केला याला त्यांचा हट्ट म्हणा किंवा मस्तानीबाईसाहेबांवरील प्रेम. शनिवार वाड्यात बाजीरावांनी मस्तानीबाईसहेबांसाठी महाल बांधला तर पुणेकरांनी याला अपशकुन मानले व वाड्याचे पावित्र्य नष्ट झाले म्हणून बाजीरावांवर बहिष्कार टाकला. खरच एवढ्या वाईट होत्या मस्तानीबाईसाहेब? कदाचित याचेही उत्तर तो बिचारा शनिवार वाडाच देऊ शकेल.
हा तिरस्कार एवढा वाढला गेला की स्वतः बाजीरावांचा पुत्र नानासाहेब यांनी पातळीत ओलांडली व मस्तानीबाईसाहेबांना अतिशय नीच पातळीवर जाऊन त्रास दिला. नानासाहेबाने मस्तानीबाईसाहेबांच्या पोटी जन्म घेतला नसेल पण बाजीराव तर त्याचे पिता होते याचेही भान नानासाहेब विसरला. काय कारण असावे? कदाचित याचेही उत्तर तो बिचारा शनिवार वाडाच देऊ शकेल. जर खरच मस्तानीबाईसाहेबांचे मन साफ आणि पवित्र नसते तर नानासाहेबाने त्यांचा विरोध नसता पहिला, आणि त्यांना बाजीरावांची आणि घराण्याच्या प्रतिष्ठेची काळजी नसती तर कदाचित घडलेला प्रकार त्यांनी बाजीरावांना सांगितला असता. आणि याचा परिणाम मराठा साम्राज्यावर झाला असता कारण बुंदेलखंडावर आलेले संकट आणि त्याचे भोगावे लागणारे परिणाम हे मस्तानीबाईसाहेब जाणून होत्या.
'तारीखी महमदशाही' मध्ये सरळ सरळ मांडले आहे की मस्तानीबाईसाहेब या नर्तकी बरोबर एक कुशल सेनानी होत्या आणि त्यांना भाला, तलवार अशा शस्त्रांचा अगदी सखोल अभ्यास होता. एखादा राजा आपल्या रखेलीपासून झालेल्या मुलीवर एवढे राजसंस्कार करेल? छत्रसालांना एकच रखेल होती? याचे उत्तर शोधत असताना 'मस्तानी' या शोधग्रंथात मात्र द. ग. गोडसे यांनी मस्तानीबाईसाहेब ह्या क्षुल्लक नर्तकी नसून छत्रसाल राजाच्या मुसलमान राणीची कन्या होत्या, म्हणजे गोडसे यांनी मस्तानीबाईसाहेब या बुंदेलखंडाची प्रतिष्ठित राजकन्या असल्याचं दाखवून दिले आहे.
काशीबाईसाहेबांना सुद्धा नेहमीच मस्तानीबाईसाहेबांच्या विरोधी भूमिकेत दाखवले परंतु वस्तुस्थिती वेगळी होती आणि काशीबाईंनी मस्तानीबाईसाहेबांना समजूतदारपणे स्वीकारले होते. एकदा कृष्ण जन्माच्या उत्सवानंतर मस्तानीबाईसाहेबांनी काशीबाईसाहेबांना विचारले की 'नानासाहेबांना त्याच्या वडिलांकडून काही पत्र आले आहे का?'. पत्र आल्याचं कळल्यावर त्या काशीबाईसाहेबांना म्हणतात 'मलाच पत्र पाठवत नाहीत असे मी काय केले?'. यावर काशीबाईसाहेबांनी त्यांची समजूत काढली.
मस्तानीबाईसाहेबांचे 'मस्तानी' हे नाव आजही अनेकांना मुस्लिम वाटते, परंतु हे नाव मुस्लिम नसून हिंदी आहे हे गोडसे यांनी सांगितले आहे परंतु आजही हे नाव मुस्लिम म्हणून सांगितले जाते व त्या मुस्लिम होत्या हेच सांगितले जाते. जितका तिरस्कार पसरवता येईल तितका तिरस्कार या नावाचा पसरवला गेला. अगदी दुसऱ्या बाजीरावाने तर शनिवार वाड्यात असलेला 'मस्तानी महल' पाया जोत्यासकट खणून काढून नामशेष केली. किती हा तिरस्कार? मस्तानीबाईसाहेब म्हणजे एक कलंक हे सिद्ध करण्यासाठी किती प्रयत्न केले गेले हा एक इतिहास आहे. परंतु जसे गोडसे यांनी म्हटले आहे
"आपण सारेच इतिहास म्हणजे एक तर स्वच्छ, उजळ असतो अथवा कळकट, ओंगळ असतो अशा ढोबळ समजुतीने वाचतो अथवा लिहितो. परंतु इतिहास एवढा सरळसुत, एकमार्गी नसतो. तो उजळ, ओंगळ यांचे मिश्रण असतो. संपूर्ण असत्यापेक्षाही अर्धसत्य हेच पूर्ण सत्य समजले गेल्याची इतिहासातील उदाहरणे म्हणजे तथाकथित इतिहासाने नमूद करून ठेवलेले, अत्यंत घृणास्पद, कुटिल दाखले आहेत आणि इतिहासकारांनी केलेल्या त्या चुका आहेत."
मस्तानीबाईसाहेबांचा इतिहास वाचताना हे आवर्जून लक्षात ठेवायला हवे.
राधाबाई, चिमाजी आणि नाना या तीन व्यक्तींव्यतिरिक्त मस्तानीबाईसाहेबांचा विरोध करणारे एकही ऐतिहासिक पात्र नाही. एवढेच काय पिलाजीराव जाधवराव, मल्हारबा, पवार, शिंदे हे अगदी बाजीरावांचे निकटवर्तीय मंडळी, यांनी सुद्धा कधी मस्तानीबाईसाहेबांची कुठे तक्रार केलेली आढळत नाही. पुढे जाऊन छत्रपती शाहूंचे जे नानाला पत्र आहे त्यावरून हे सिद्ध होते की स्वतः शाहू महाराज मस्तानीबाईसाहेबांचे संरक्षक होते. जर खरेच मस्तानीबाईसाहेबांना एक नर्तकी किंवा रखेल म्हणून आणले असते आणि बाजीराव त्यांच्या आहारी गेले असते तर या मात्तबर मंडळींसोबत शाहू महाराजांनी दखल नक्कीच घेतली असती. बाजीराव मोहिमेवर गेले असता मस्तानीबाईसाहेबांचे खरे रक्षक हे दोनच ते म्हणजे 'छत्रपती शाहू महाराज' आणि 'काशीबाईसाहेब'. याउपर, मस्तानीबाईसाहेबांचे एकही अस्सल चित्र (समकालीन) अस्तित्वात नाही. नक्कीच त्यांचे व बाजीरावांचा पत्रव्यवहार होत असणार परंतु आज एकही पत्र उपलब्द नाही. मस्तानीबाईसाहेब सुंदर दिसत होत्या की नाही हे ठरवण्यासाठी आजवर सांगितलेल्या आख्यायिकांचा आधार घेतला जातो. बुंदेलखंडात लोकगीते व नृत्य ही एक कला आहे आणि बुंदेलखंडातच काय संपूर्ण उत्तरेत नाचगाणी म्हणजे संस्कृतीचा एक भाग आहे परंतु मस्तानीबाईसाहेब जशा पुण्यात आल्या तशा या केलेला एक नाव मिळाले ते म्हणजे 'नाचणारी बाई' आणि अशा बायका म्हणजे केवळ बाजारू बाई याच नजरेने बघितले गेले. यावर समाधानी न होता, मस्तानीबाईसाहेब या शहाजतखानाची कलावंतीण ठरविले.
एक इतिहासाचा विद्यार्थी म्हणून काही प्रश्न पडतात ते असे की, बाजीरावांनी मस्तानीबाई साहेबांना पाबळ, केंदूर आणि लोणी ही तीन गावे इनाम दिली व पाबळला एक गडीवजा वाडा सुद्धा बांधून दिला. एवढे सगळे एका राज्याचा प्रधान एका नर्तकीसाठी करेल? का पत्नीसाठी करेल? आणि शाहू महाराजांनी हे सारे मान्य केले असते? हे सगळे होते ते पत्नीची खानदानी मानमरातबा राखणे. नानासाहेब तर मस्तानीबाईसाहेबांचा द्वेष करणारा नंबर एकचा माणूस तरीही बाजीराव आणि मस्तानीबाईसाहेबांच्या मृत्यूनंतर सहा वर्षाचा असणारा समशेर बहाद्दर याला सरदारी दिली, सरंजाम दिला. मस्तानीबाईसाहेबांचा एवढा द्वेष करणारा आणि त्यांच्या जीवावर उठलेल्या नानाने जर समशेर 'औरस' पुत्र होता तर मग सरदारी, सरंजाम का दिला? उलट समशेरला मारून टाकायला हवे होते. बाजीराव नर्मदेकाठी असताना अशी कोणती बातमी कळली की त्यांनी अक्षरशः मृत्यूस जवळ केले हे एक न समजणारे कोडे आहे.
"कचऱ्याच्या ढिगाऱ्यात एखादा हिरा दडपला जावा तसे मस्तानीबाईसाहेबांच्या बद्दल करण्यात आले ही या इतिहासातील फार मोठी शोकांतिका आहे".
संदर्भ: 'मस्तानी', द. ग. गोडसे.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...