विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 20 February 2024

‘दख्खनचा रॉबीनहूड’ नाना मासाळ

 


‘दख्खनचा रॉबीनहूड’ नाना मासाळची अज्ञात कहाणी उजेडात
कुकटोळीच्या वीराने देशकार्यात केली मदत
नाना मासाळला पकडण्यासाठी बक्षीसे
ज्याला ब्रिटीशांनी ‘रॉबीनहूड’ या नावानं संबोधले, ज्याने आपल्या सहकाऱ्यासमवेत सातारा, सोलापूर आणि बेळगाव जिल्हय़ासह दक्षिणेतील सांगली, बुधगांव, जत, कोल्हापूर या संस्थानात ब्रिटीशांना सळो की पळो करून सोडले, लोक ज्याच्याकडे न्याय मागण्यासाठी जात, अशा कुकटोळीच्या नाना मासाळ या वीराची अज्ञात कहाणी सांगणारी कागदपत्रे उजेडात आली आहे. मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अभ्यासक मानसिंगराव कुमठेकर यांनी तत्कालीन गुप्तचर पोलीसांचे अहवाल, संस्थानी कागदपत्रे यांच्या संशोधनातून नाना मासाळ आणि त्याचा सहकारी बाळा वाणी पाटील यांच्या कार्याची माहिती मिळविली आहे. रूढ अर्थाने ही दरोडे घालणारी टोळी नव्हती, तर जुलुम-जबरदस्ती करणारे सावकार आणि श्रीमंतापासून सामान्य लोकांना न्याय मिळवून देणारे आणि गोरगरीबांना मदत करणारे हे तरूण होत. त्यामुळे ब्रिटीशांनी त्यांना ‘रॉबिनहूड’ या नावाने संबोधले होते.
स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटीशांच्या जुलमी सत्तेला दूर फेकण्यासाठी अनेकांनी आपापल्या मार्गांनी प्रयत्न केले. यामध्ये काही दरोडेखोरांचाही समावेश होता. त्यांनी सामान्य नागरिकांवर अत्याचार करणाऱ्या इंग्रज अधिकाऱ्याना धडा शिकविला. इंग्रजाचे पक्षपाती असणारे जुलमी सावकार गरीबांची पिळवणूक करून त्यांच्याकडून जमिनी, पैसे जबरीने काढून घेत. या दरोडेखोरांनी अशा धनदांडग्यांकडून पैसे वसूल करून ते गोरगरीबांमध्ये वाटले.
सन 1905 च्या सुमारास अशीच एक दरोडेखोरांची टोळी सध्याच्या सांगली जिल्हय़ात असणाऱ्या कुकटोळी गावात तयार झाली. या टोळीचा प्रमुख होता, नाना माशाळ. कुकटोळी हे गाव त्यावेळी मिरजमळा (बुधगांव) संस्थानात होते. हे गाव धनगरबहुल होते. गावात कुस्तीची परंपरा मोठी होती. नाना माशाळ याचे वडील विठू धनगर हे मोठे तालीमबाज होते. त्याच्या पोटी सन 1870 च्या सुमारास नाना याचा जन्म झाला. त्यालाही लहानपणापासून तालमीचा शौक होता. कुस्त्या करण्यात तो पटाईत होता. कुकटोळी गाव हा डोंगराच्या पायथ्याशी असल्याने तो वन्यप्राण्यांची शिकार करण्यात तरबेज झाला होता. गोफणीने अचूक शिकार करण्यात त्याचा हातखंडा होता. एका हातात गोफण आणि दुसऱ्या हातात फरशी कुऱ्हाड आणि कमरेला बांधलेल्या धोतरात लहान-लहाग दगडगोटे असा त्याचा वेश होता. कसलेही सावज असो, गोफणीच्या एका दगडात ते सावज तो अचूक टिपत असे. बडोद्याचे तत्कालीन क्रीडा अभ्यासक लक्ष्मण नारायण सप्रे यांनी नाना माशाळ याच्या या गोफण कलेचं कौतुक केलं आहे.
तरूण वयात कुस्त्या आणि शिकारी करीत करणाऱ्या मनमौजी जीवन जगणाऱ्या नानाला सावकारांकडून गोरगरीबांचे होणारे अत्याचार पहावले नाहीत. त्याने *सन 1900 च्या सुमारास आपल्या बरोबरच्या सहकाऱ्यांना घेऊन टोळी तयार केली. बाळा वाणी पाटील हा नानाचा उजवा हात होता. सातारा जिल्ह्य़ातल्या पाटण व शिराळा तालुक्यातल्या मांग, कैकाडी व मराठा जातीचे तरूण बाळा वाणी याने गोळा केले होते. तर नाना माशाळ याने कुकटोळी परिसरातील तरूण गोळा केले होते. त्यांनी दोनशे बंदूका मिळवल्या होत्या. साधू वेशातील चार बंगाली तरूणांनी त्यांना बाँम्ब कसे तयार करायचे? शिक्षण दिले होते. या काळात त्यांनी तत्कालीन बुधगांव, जत, सांगली या संस्थानांसह सोलापूर, सातारा आणि विजापूर जिल्हय़ात बडय़ा सावकारांवर दरोडे टाकले. त्यातील पैसा गोरगरीबांना वाटून टाकला.
तत्कालीन गुप्तचर विभागाचे अधिकारी वॉलिंजर साहेब यांनी नाना मासाळ याच्या टोळीची हकीकत मुंबई सरकारला कळविली आहे. सन 1906 ते 1909 या काळातील हकीकती त्यात लिहील्या आहेत. नाना माशाळ याच्या टोळीत 35 ते 50 तरूण सहभागी होते. बाळा वाणी उर्फ पाटील हा नानाच्या टोळीचा उपप्रमुख होता. या टोळीने या काळात खेडेगावातील दुकानात घुसून तेथील परदेशी कापड व अन्य वस्तू जाळून टाकणे, स्वदेशीवर व्याख्याने देणे परदेशी कापड विकणाऱ्यांना दंड करून तो वसूल करणे अशी कामे नाना माशाळ करीत असे. गावात कोणताचही तंटा उद्भवल्यास गावकरीही इंग्रजांच्या न्यायालयात धाव न घेता, नाना माशाळ व बाळा पाटील यांच्याकडे जात आणि हे दोघेही त्याचा निवाडा करीत, असल्याचे या गोपनीय अहवालांमध्ये म्हटले आहे.
नाना मासाळ आणि त्याच्या टोळीमुळे संस्थानी पोलिस आणि ब्रिटीश पोलीस हादरून गेले. त्यांनी या टोळीला पकडण्यासाठी बक्षीसे लावली. जंग जंग पछाडले. मात्र, नाना मासाळ त्यांच्या हाती लागत नव्हता. सन 1908 मध्ये नानाच्या टोळीतील काही सदस्यांना ब्रिटीशांनी पकडले. पण, नाना मासाळ आणि बाळा पाटील हे दोन प्रमुख हाती लागत नव्हते. अनेक महिने त्यांनी पोलिसांना गुंगारा दिला होता. अखेर 1909 च्या जुन महिन्यात नाना मासाळची टोळी जत ते कोकळे या भागात असल्याची माहिती जत पोलीसांना मिळाली. त्यांनी मोठा फौजफाटा घेऊन जतमधील बाज गावात धडक मारली. पोलीस आल्याचे पाहताच नाना मासाळ याने अंकले मार्गे कोकळे गाठले. कोकळे गावाजवळ बसाप्पाचीवाडी म्हणून एक छोटे गाव होते. तेथे त्याने आश्रय घेतला. ३ जून 1909 रोजी पोलीस पाठलाग करीत बसाप्पाच्यावाडीत आले. तेथील काही स्थानिकांनी फितुरी करीत पोलिसांनी नाना मासाळचा नेमका ठावठिकाणा सांगितला. पोलिसांनी नानाने आश्रय घेतलेल्या घरास वेढा दिला. मात्र, नाना शिताफीने त्या वेढय़ातून निसटला.
पोलीसांनी पाठलाग सुरू केला. त्यांना चुकवित असताना नाना मासाळ वाटेत असणाऱ्या पाण्याच्या ओहोळावरून उडी मारली. मात्र, त्याचे पाय चिखलात रूतले. अशा अवस्थेत हातात कुऱ्हाड असलेल्या नानाच्या आवेशापुढे पोलिसांचेही त्याला पकडण्याचे धाडस होईना. अखेर एकाने मागून हळूच जाऊन नानाच्या डाव्या खांद्यावर कुऱ्हाड मारली. त्यामुळे तो बेशुध्द होऊन पोलिसांच्या तावडीत सापडला. यामध्ये नानाचा डावा हात कायमस्वरूपी लुळा पडला. पुढे २२ जून १९०९ रोजी नाना मासाळचा सहकारी बाळा पाटील याला तीन लोकांसह कोल्हापूर पोलिसांनी तांदूळवाडी येथे पकडले. नऊ जुलैला नाना माशाळ याला मोठय़ा पोलीस बंदोबस्तात विजापूरच्या तुरूंगात पाठविण्यात आले. सन 1909 च्या अखेरीपर्यंत नाना माशाळ याच्या टोळीतील 28 सदस्यांना पकडण्यात आले. जत संस्थानच्या पोलीसांनी केलेल्या या कामगिरीबद्दल 11 पोलीसांना बढती आणि बक्षीसे देण्यात आली.
पुढे सांगली येथे मासाळ टोळीवर खटला भरण्यात आला. नाना मासाळ याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. सात महिने तो सांगलीच्या तुरूंगात होता. त्याचा दहशत इतकी होती, की तो सुटून जाईल, या भीतीने सांगली जेलमध्ये उजेडाची आणि संरक्षणाची खास व्यवस्था केली होती. पुढे नाना माशाळ याला येरवडा तुरूंगात पाठविण्यात आले.
तेथे तो सुमारे 25 वर्षे होता. सन 1931 मध्ये हॉटसन गोळ्या झाडणारे मिरजेचे क्रांतिकारक वासुदेव बळवंत गोगटे हे त्याच जेलमध्ये शिक्षा भोगत असताना नाना मासाळ याची भेट झाली. नाना मासाळच्या आठवणी त्यांनी लिहून ठेवल्या आहेत. या आठवणीत गोगटे म्हणतात, 'नाना अतिशय कृश झाला होता. नानाचा डावा हात लुळा पडला होता. तो धार्मिक वृत्तीचा होता. त्याला पोथी चांगली वाचता येत असे. मात्र, अधूनमधून तो भ्रमिष्टासारखा वागे. 20 वर्षे तुरूंगात राहिल्यावर एखादा पराक्रमी माणूस कसा वेडा बनतो, हे नानाच्या उदाहरणावरून दिसून येत असल्याचे वासूदेव गोगटे यांनी म्हटले आहे. तुरूंगात असताना तो नेहमी म्हणे, ‘मी दरवडे घातले, पण, गरीबांना छळले नाही. उलट त्यांना खूप दान केले. मी श्रीमंतांना लुटले, गरीबांना सुखी केले. सन १९३६ च्या सुमारास त्याची सुटका झाली.
© मानसिंगराव कुमठेकर

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...