विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 9 February 2024

मराठेशाहीतील श्रावणमासातील शासकीय दक्षिणा वाटप.

 

मराठेशाहीतील श्रावणमासातील शासकीय दक्षिणा वाटप.
लेखन ::- प्रकाश लोणकर

सध्या श्रावण महिना सुरु झाला आहे.धार्मिक कार्यांसाठी हिंदू धर्मात श्रावण महिना अतिशय पवित्र समजला जातो.पुण्यसम्पादनासाठी श्रावण महिन्यात दानाचे विशेष महत्व आहे.मराठ्यांच्या इतिहासात श्रावण महिन्यात विद्वान ब्राह्मणांना दक्षिणा देऊन त्यांच्या ज्ञान,विद्येप्रती आदर व्यक्त करण्यास छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत प्रारंभ झाला असे प्रख्यात इतिहासकार द.बा.पारसनीस यांचे म्हणणे आहे.अन्य काही जण श्रावणमास दक्षिणा वाटपाचा प्रघात छ.संभाजी/छ.राजाराम महाराजांच्या वेळी सुरु झाला असे म्हणतात.छ.शिवाजी महाराज समर्थ रामदास स्वामींच्या सांगण्यावरून श्रावण महिन्यात कोटीलिंगर्चन करीत असत.ह्या प्रसंगी ते ब्राह्मणांना धान्य,रोख दक्षिणा देत.विद्वानांना पण त्यांच्या योग्यते प्रमाणे श्रावणमास दक्षिणा दिली जाई.छ.संभाजी/राजाराम महाराजांच्या काळातही श्रावण महिन्यात दक्षिणा वाटपाची प्रथा चालू होती.पण कालांतराने अस्थिर राजकीय परिस्थितीमुळे दक्षिणा वाटपाचे प्रमाण कमी झाले.तळेगाव-दाभाडे प्रांत छत्रपतींच्या खासगीतला होता.ह्या खास्गीतूनच दक्षिणा वाटपाचा खर्च केला जाई. हा प्रदेश सेनापती दाभाड्यांकडे गेल्या नंतर छ.शाहू महाराजांनी श्रावण मास दक्षिणा वाटप प्रथेची जबाबदारी सन १७१८ मध्ये दाभाड्यांकडे सोपवली.सन १७३० मध्ये त्र्यंबकराव दाभाडे डभईच्या लढाईत मृत्यू पावल्या नंतर हि प्रथा बंद पडली.पुढील वर्षी ती प्रथा थोरल्या बाजीराव पेशव्यांनी पुणे येथे चालू केली.पेशव्यांच्या बखरीतहि दाभाड्यांकडचा देकार(प्रथा)पेशव्यांनी पुण्यास चालू केला असे म्हटले आहे.याला पृष्ठी देणारा उल्लेख पेशवे दफ्तर भाग २२ मध्ये सापडतो.’’ राजश्री पंतप्रधान याणी ब्राह्मणांस दक्षणा दिल्ही.श्रावणमासाचे ब्राह्मण जमा झाले होते.त्यास तीन साली रुपया,दोन.तीन,चार,पाच,दहा,बारा ऐसे दिले’’.
नोंद सन १७३५ सालची आहे. यावरून श्रावण महिन्यातील दक्षिणा वाटपाचे यजमानपद आणि उत्तरदायित्व दाभाडे घराण्याकडून पेशव्यांकडे सन १७३२ पासून आले असे दिसते. हि प्रथा दुसऱ्या बाजीरावांच्या पंतप्रधानकीच्या अखेर पर्यंत म्हणजे १८१८ पर्यंत अव्याहत सुरु होती. थोरल्या बाजीरावांच्या काळात केवळ विद्वान ब्राह्मणांनाच दक्षिणा दिली जात.ब्रह्मवृंदाची संख्या खूप वाढायला लागल्याने ब्राह्मणांची परीक्षा घेऊन त्यात उत्तीर्ण विद्वानांना सर्व साधारण ब्राह्मणांच्या बरोबर दक्षिणा न देता शनिवारवाड्यावर मानाने बोलावून त्यांचा सन्मान करून एक हजार रुपये दक्षिणा थोरले बाजीराव द्यायचे.अन्य ब्राह्मणांना पुण्यातच कबुतरखाना किंवा हुजुरपागेत दक्षिणा वाटप होई.
नानासाहेब पेशव्यांच्या काळातील दक्षिणा वाटप:थोरले बाजीराव एप्रिल १७४० मध्ये मृत्यू पावले.त्यांच्या नंतर छ.शाहू महाराजांनी बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेबांस पेशवा म्हणून जून १७४० मध्ये नियुक्त केले. नानासाहेबांची पेशवेपदाची कारकीर्द उत्तर मराठेशाहीच्या इतिहासात अनेक आयामानी संस्मरणीय ठरली. नानासाहेबांच्या कारकिर्दीत मराठा साम्राज्याने परमोत्कर्ष गाठला होता.त्यामुळे श्रावण मास दक्षिणा वाटपाची रक्कमही हजारांवरून लाखात गेली.कबुतरखाना/हुजुरपाग,रमण बाग,शनिवार वाड्या पुढील चौक हि ठिकाणे कमी पडू लागल्याने तसेच पावसा पासून बचावासाठी जिवाजी गणेश खासगीवाले यांच्या सल्ला मसलतीने सन १७५१ मध्ये पर्वतीच्या पायथ्याशी पन्नास ते साठ हजार माणसे मावतील असे आवार ज्याला रमणा असे म्हटले जाई,बांधण्यात आले. श्रावण संपल्यावर इतर वेळी ह्या जागेचा उपयोग लष्करास ठेवण्यासाठी करायचा असा विचार होता.ह्या रमण्यास पाच दरवाजे ठेवले होते.प्रत्येक दरवाजावर स्वतः नानासाहेब,रामशास्त्री प्रभुणे, अय्याशास्त्री,नाना फडणीस,हरिपंत फडके,अमृतराव पेशवे,मातब्बर सरदार,कारभारी,सैन्यातील अधिकारी बसून एकेक ब्राह्मणास दक्षिणा देऊन बाहेर काढत.कबुतरखान्यात सर्व जाती धर्माच्या याचकांस,फकीर,जंगम,गोसावी यांस दक्षिणा दिली जाई.श्रावण शुद्ध पंचमीपासून सुरु होणारा देकार(दक्षिणा वाटप)पुढे तीन ते चार दिवस चालायचा.रमण्याची सुव्यवस्था राखण्याची जबादारी फौजेवर सोपवली होती.जे विद्वान ब्राह्मण शारीरिक व्याधींमुळे रमण्यात येऊ शकत नसत अशांच्या घरी जाऊन दक्षिणा दिली जायची.नानासाहेबांच्या पेशवे पदाच्या काळात दरवर्षी सरासरी १६ ते १८ लाख रुपये दक्षिणा वाटपावर खर्ची पडले होते.देशाच्या कानाकोपऱ्यातून ज्ञानाच्या विविध शाखांचे विद्वान ब्राह्मण पुण्यात मोठ्या प्रमाणावर येऊ लागले. होते.पेशव्यांकडून श्रावणमास दक्षिणा मिळणे हा मोठा मान आणि आपल्या विद्वत्तेला राजमान्यता मिळाल्याचे समाधान ब्रह्म्वृन्दास मिळायचे.सर्वात मोठी दक्षिणा रु.एक हजार असून विशेष विद्वान ब्राह्मणांना सुवर्ण नाणी दिली जात. सन १७५५ च्या श्रावण मास देकाराच्या दोन दिवस आधी..११ ऑगस्ट .. नानासाहेबांना पुत्ररत्न झाले...नारायणराव.त्याच्या आनंदा प्रीत्यर्थ त्यावर्षी नानासाहेबांनी प्रत्येकी एकेक रुपया अधिक दक्षिणा दिली.यानंतर पाचच दिवसांनी म्हणजे श्रावण शुद्ध नवमीला..१६ ऑगस्टला सकाळी राघोबा दादांना पण पुत्र लाभ झाला.पण संध्याकाळी त्याचा मृत्यू झाला.
थोरल्या माधवराव पेशव्याचा काळ: पानिपतच्या आघातामुळे सन १७६१ साली श्रावणमास दक्षिणेचा कार्यक्रम झाला नाही.सन १७६२ मध्ये फक्त बारा हजार रुपये खर्च केले.ह्यापुढील वर्षी निजामाने पुणे प्रांत लुटला,पुणे शहर जाळपोळ करून उध्वस्त केले.पर्वतीच्या देवळातील देव फोडले,रमणा,आजूबाजूच्या धर्मशाळा जाळून टाकल्या.त्यामुळे ह्या वर्षी श्रावणमास देकार झाला नाही.थोरल्या माधवरावांनी १७६५ च्या सुमारास रमणा पुन्हा एकदा बांधून तिथे श्रावण मास देकाराचे कार्यक्रम पूर्ववत सुरु केले.तरी पण पानिपत पराजय आणि तीर्थरुपांचे( नानासाहेब पेशव्यांचे)निधन ह्या दुःखद घटनांमुळे थोरल्या माधवरावांनी दक्षिणा वाटप फारच कमी केले.सन १७६५ मध्येच रमण्यास आग लागल्याने त्या वर्षी श्रावणमास देकाराचा कार्यक्रम कबुतरखाना इथेच उरकण्यात आला.
थोरले माधवराव सन १७७२ मध्ये थेऊर मुक्कामी निधन पावले.त्यांच्या नंतर नारायणराव पेशवे झाले.नारायणरावांस केवळ एकच वर्ष म्हणजे सन १७७३ मध्ये श्रावणमास देकाराचा योग आला.ऑगस्ट १७७३ मध्ये त्यांच्या खुनानंतर सत्ता हाती घेतलेल्या बारभाईनी राघोबा दादांस सतत दहा वर्षे प्रचंड विरोध केला.राघोबा दादांस त्यामुळे केवळ एकाच श्रावण मासात दक्षिणा वाटपाची संधी मिळाली.सवाई माधवरावांच्या वेळेपासून(सन १७७४-१७९५) पुन्हा मोठ्या प्रमाणावर श्रावणमास देकाराचे कार्यक्रम होऊ लागले.सवाई माधवरावांच्या पेशवेपदाच्या कारकिर्दीतील सन १७९१ चा श्रावणमास देकार पुण्याच्या तत्कालीन कोतवालाच्या-घाशीराम कोतवालाला दिलेल्या देहांत शासनाच्या शिक्षेमुळे संस्मरणीय ठरला.त्यावर्षी २८ ऑगस्ट १७९१ रोजी दक्षिणा समारंभ आटोपल्यानंतर काही तेलंगी ब्राह्मण घाशीरामच्या मळ्यात वास्तव्याला होते.त्यांनी न्याहरीसाठी मळ्यातील कणसे तोडून खाल्ल्याने मळ्याचा रखवालदार आणि तेलंगी ब्राह्मणात वादावादी होऊन घाशीराम कोतवालाने आपले स्वार मळ्यात पाठवून २७ तेलंगी ब्राह्मणांना पकडून आणून फटक्यांची शिक्षा देऊन भवानी पेठेतील आपल्या वाड्यातील चिंचोळ्या भुयारात कोंडले.हि बातमी मानाजी फाकडे यांना कळताच ते दोन्ही हातात तळपत्या तलवारी घेऊन घाशीरामच्या वाड्यात बेधडक घुसले.भुयाराची कुलुपं तोडून सर्व ब्राह्मणांना ओढून बाहेर काढले. कोंदट हवा आणि चेंगराचेंगरी मुळे त्यातील १८ जण मृत व तीघे जण अत्यवस्थ निघाले.नंतर ते पण मरण पावले.मानाजीनी सवाई माधवरावांना भेटून झाला प्रकार सांगितला.सवाई माधवरावांनी पुण्यातील संतप्त ब्र्हमवृन्दास घाशीरामला मृत्युदंड दिला जाईल असे वचन दिले होते.त्यानुसार पुढील कारवाई पार पडली.
शेवटच्या बाजीराव पेशव्यांच्या काळात श्रावण मास दक्षिणा कार्यक्रमातील शिस्त,गांभीर्य,मूळ हेतू लोपला जाऊन त्याला सरकारी बडेजावाचे विकृत स्वरूप मिळाले.हि प्रथा बंद केली तर आपण अप्रिय होऊ ह्या भीतीने दुसऱ्या बाजीरावांनी विकृत रूप मिळालेली दक्षिणा वाटप प्रथा पदभ्रष्ट होईपर्यंत चालूच ठेवली.पेशवाईच्या अस्तानंतर इंग्रजांनी सन १८५१ पर्यंत पुण्यात श्रावण देकार प्रथा चालू ठेवली होती.पुढे संस्कृत पाठशाळा,मंदिरांचे जीर्णोद्धार,वादिक धर्म परंपरा जतन,ग्रंथ लिहिण्यास प्रोत्साहन आदी कारणांकरिता इंग्रजांनी विविध स्वरुपात दक्षिणा पद्धत चालू ठेवली.
बाजीराव द्वितीय इ.स.१७९५ मध्ये पेशवे झाले.पुढील वर्षी म्हणजे सन १७९६ मध्ये आयोजित रमण्याचे तत्कालीन पत्र व्यवहारात असे वर्णन करण्यात आले आहे...पाच सफारी बारा घटका दिवस आल्यावर श्रीमंतांची स्वारी दक्षणा देण्यासाठी रमण्याकडे गेली.प्रथम पर्वतीस देवीचे दर्शन घेऊन मग रमण्याचे दरवाज्यात बसले.नेमणूके प्रमाणे शास्त्री,वैदिक,पंडित वगैरे आले होते.नेमणुकीची याद,व ब्राहमणास द्यावयाचे प्रतीची याद होती.त्या प्रमाणे द्यावयास प्रारंभ केला.प्रत्येक दरवाजावर थोडा वेळ बसून आपण वाटावी असे करीत. परशुरामभाऊ,अय्याशास्त्री यांचे भाऊ यज्ञनेश्वर शास्त्री व इतर मुत्सद्दी निरनिराळ्या दारांवर बसून दक्षणा देत होते.त्या दिवशी पेशवे रमण्यातच राहिले.रमण्या बाहेर भोवताल्या फौजा चौकीस होत्या.संध्याकाळी दिवसास राजश्री दौलतराव शिंदे आले व राजश्री बापू होळकर व भोसले यांजकडील वकील आले होते.शिंदे यांणी घोड्यावर बसून रमण्यातूनच ब्राह्मणांस प्रदक्षणा केली.श्रीमंतानी दोन प्रदक्षिणा केल्या,अस्तमानी ब्राह्मण सारे झाले.उपरांतिक तोफांचे बार करविले...
कॅप्टन मूर ह्या इंग्रज अधिकार्याने इ.स.१७९७ सालच्या श्रावण मास रमणा बघितल्यावर त्याची हकीकत लिहून ठेवली आहे.तो म्हणतो कि...चातुर्मासात दान करण्याने मोठे पुण्या लाभते अशी त्यावेळी सार्वत्रिक श्रद्धा होती.रमण्याच्या आवारात गैर ब्राह्मणांना प्रवेश नसायचा.आम्ही मोठ्या मिनतवारीने आत जाऊ शकलो.एका दारावर बाजीरावांचे बंधू अमृतराव होते.त्यांच्या देखरेखीखाली दक्षिणा वाटप चालू होते.जवळच लाल रंगाने भरलेला एक हंडा असून त्यात हात बुडवून एक नोकर आत येणाऱ्या प्रत्येक ब्राह्मणाच्या कपड्यावर किंवा अंगावर पंजाचा छाप उठावी.प्रत्येकास तीन ते दहा रुपया पर्यंत दक्षिणा मिळायची.दरसाल पेक्षा बाजीरावाने मुद्दाम औदार्य दाखविण्याकरिता जास्त रक्कम खर्च केली.पण नानाला हि गोष्ट पसंत पडली नाही....
- प्रकाश लोणकर
संदर्भ:१-भूतावर भ्रमण ले-य.न.केळकर
२-पेशवे घराण्याचा इतिहास ले.प्रमोद ओक
३- पेशवे-ले.श्रीराम मराठे
४- शिवकालीन महाराष्ट्र ले. वा. कृ.भावे.
५- पेशवाई.ले.कौस्तुभ कस्तुरे.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...